सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त . . .
पुणे – सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवनिमित्त ठिकठिकाणी ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियाना’अंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. या उपक्रमाअंतर्गत पुणे जिल्ह्यामध्ये विविध मंदिरे, भजनी मंडळे यांठिकाणी सामूहिक प्रार्थना करून देवाला साकडे घालण्यात येत आहे, तर काही ठिकाणी मंदिरांची स्वच्छता करण्यात येत आहे. या उपक्रमामध्ये सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, धर्मप्रेमी, वाचक, हितचिंतक आणि भक्त मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत.
हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी श्री तांबडी जोगेश्वरी मंदिरात हिंदुत्वनिष्ठांचे साकडे
रामराज्याप्रमाणे आदर्श अशा हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, यासाठी १५ एप्रिल या दिवशी श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर, रविवार पेठ, जुन्नर येथे श्री तांबडी जोगेश्वरीमातेच्या चरणी साकडे घालण्यात आले. साधिका सौ. वंदना जोशी यांनी उद्देश सांगितला. सौ. स्मिता कोटस्ताने या वाचकांनी देवीची ओटी भरली, त्यानंतर उपक्रमास प्रारंभ झाला. पौरोहित्य करणारे श्री. मयूर कुलकर्णीगुरुजी यांनी साकडे घालण्यासाठी प्रार्थना सांगितली. श्री मयुर कुलकर्णी हे प.पू. भक्तराज महाराजांचे भक्त आहेत आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यात त्यांचा सक्रीय सहभाग असतो, तसेच दैनिक ‘सनातन प्रभात’चे ते नियमित वाचक आहेत. या वेळी सौ. सुवर्णा कोकाटे, कु. चैतन्य नागरगोजे, श्री. शशीकांत वराडी, सौ. योगिनी अमृतकर, श्री. मल्हार दुनके, श्रीमती प्रमिला देशपांडे आदी हितचिंतक आणि वाचक उपस्थित होते.
साकडे घालतांना, प्रार्थना करतांना भाव जागृती झाली. हिंदु राष्ट्राची स्थापना व्हायला हवी, रामराज्यच हवे, असे विचार मनात आल्याचे श्री. मयूर कुलकर्णी यांनी सांगितले आणि त्यांनी सनातनच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.
मंदिर स्वच्छता उपक्रम
कल्याण पेठ, जुन्नर येथील रोकडे मारुति मंदिरात १४ एप्रिल या दिवशी मंदिर स्वच्छता उपक्रम राबवण्यात आला. या वेळी माजी नगरसेवक श्री. मधूकर काजळे, वाचक, हितचिंतक श्री. तेजस बायस, सुनिता हरिश्चंद्रे, पूजा बनकर, सोनू बनकर, शशीकांत वराडी आदी उपस्थित होते. त्यांनी मंदिर आणि आजूबाजुचा परिसर स्वच्छ केला.
श्री. मधूकर काजळे म्हणाले की, प्रत्येक उत्सवाच्या वेळी सनातनचे साधक तळमळीने मंदिर स्वच्छ करतात. भाविकांना त्याचा पुष्कळ लाभ होतो. साधक सेवाभावी वृत्तीने सेवा करतात, धार्मिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो. त्यांनी मंदिराच्या आसपासचा परिसर स्वच्छ केला त्यामुळे डास तसेच इतर गोष्टींपासून भाविकांचे संरक्षण होईल, तसेच सहभागी वाचकांनीही नियमित सेवेत सहभागी होणार, असे सांगितले.