सप्तचिरंजीवांपैकी एक, म्हणजे वीर हनुमंत ! खरेतर महाबली, अतुल पराक्रमी आणि आजीवन ब्रह्मचारी अशा श्रीरामचंद्रभक्त अंजनेय हनुमंताचे चरित्र आम्हाला ज्ञात आहेच, तरीही त्या नरश्रेष्ठाचे व्यक्तीमत्त्व नक्की कसे होते, याविषयी रामायणात फार विलोभनीय, विलक्षण आणि चिंतनीय असे वर्णन करण्यात आले आहे. सध्या ‘व्यक्तीमत्त्व विकास’ हा अगदी शाळकरी मुलांमध्येही प्रचंड आवडीचा विषय आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या व्यक्तीमत्त्व विकासासाठी सहस्रो रुपयांचे वर्ग लावण्यापेक्षा हनुमंताचे चरित्र वाचले, तरीही आपल्याला बरेच काही शिकायला मिळेल. तसेच व्यक्तीमत्त्व कसे असावे, याचे उत्तम उदाहरण श्रीरामचंद्र आणि हनुमंत यांच्या कार्यातून आपल्याला पहायला मिळेल. त्यासाठी हा लेखनप्रपंच !
अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च बिभीषणः ।
कृपः परशुरामश्च सप्तैते चिरजीविनः ।।
– पुण्यजनस्तुती, श्लोक २
अर्थ : द्रोणाचार्यांचे पुत्र अश्वत्थामा, दानशूर बळीराजा, वेदव्यास, हनुमान, बिभीषण, कृपाचार्य आणि परशुराम या सात चिरंजीवांचे मी स्मरण करतो.
एक दूत म्हणून कसे बोलावे, याचा आदर्श म्हणजे हनुमान !
‘रामायणातील किष्किंधा कांड सांगते की, मर्यादापुरुषोत्तम प्रभु श्रीरामचंद्र हे सीताहरणानंतर कबंधाच्या सूचनेनुसार सुग्रीवाचा शोध घेत ऋष्यमुख पर्वतावर आले. तेव्हा वालीच्या भयाने राज्यापासून लांब रहात असलेला सुग्रीव राम-लक्ष्मण या दोन नरश्रेष्ठांना पाहून किंचित् आश्चर्यचकित आणि शंकामग्न होतो; पण थोड्या भयानेच का होईना, सुग्रीव आपल्या हनुमान नावाच्या मंत्र्याला या दोन राजकुमारांची पारख करण्यास पाठवतो. हनुमंत एका ब्राह्मणाचे रूप घेऊन राम-लक्ष्मण यांना भेटायला येतो आणि त्यांना आत्मपरिचय देऊन त्यांचाही परिचय जाणून घेतो. हनुमंताचे श्रीरामासमवेतचे ते संभाषण जरी वाचले, तरी आपल्याला हनुमंताच्या बुद्धीमत्तेचे दर्शन घडतेच; पण त्याहीपेक्षा एक दूत म्हणून कसे बोलावे, याचाही एक आदर्श प्रकट होतो.
प्रभु श्रीरामचंद्रांनी लक्ष्मणाला हनुमंताविषयी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये
हनुमंताचे ते सुमधुर बोलणे ऐकल्यावर श्रीरामचंद्र लक्ष्मणाला हनुमंताचे जे वर्णन करतात, ते खालीलप्रमाणे आहे.
प्रभु श्रीरामचंद्र म्हणतात,
नानृग्वेदविनीतस्य नायजुर्वेदधारिणम् ।
नासामवेदविदुष: शक्यमेवं विभाषितुम् ।।
– वाल्मीकि रामायण, कांड ४, सर्ग ३, श्लोक २८
अर्थ : ज्याला ऋग्वेदाचे शिक्षण मिळालेले नाही, ज्याने यजुर्वेदाचा अभ्यास केला नाही, जो सामवेदाचा विद्वान नाही, तो या प्रकारे सुंदर भाषेत वार्तालाप करू शकणार नाही !
नूनं व्याकरणं कृत्स्नमनेन बहुधा श्रुतम् ।
बहु व्याहरताऽनेन न किञ्चिदपशब्दितम् ।।
– वाल्मीकि रामायण, कांड ४, सर्ग ३, श्लोक २९
अर्थ : निश्चितपणाने या हनुमंताने व्याकरणाचा अनेक वेळा बारकाईने अभ्यास केला आहे; कारण इतका वेळ बोलत असूनही त्याच्या तोंडातून एकही अशुद्ध बोल बाहेर पडला नाही !
न मुखे नेत्रयोश्चापि ललाटे च भ्रुवोस्तथा ।
अन्येष्वपि च गात्रेषु दोष: संविदित: क्वचित् ।।
– वाल्मीकि रामायण, कांड ४, सर्ग ३, श्लोक ३०
अर्थ : संभाषणाच्या वेळी याचे मुख, डोळे, कपाळ, भुवई, तसेच अन्य सर्व अंगांमधूनही एखादा दोष प्रकट झालेला आहे, असे मला दिसला नाही !
अविस्तरमसंदिग्धमविलम्बितमव्ययम् ।
उर:स्थं कण्ठगं वाक्यं वर्तते मध्यमस्वरम् ।।
– वाल्मीकि रामायण, कांड ४, सर्ग ३, श्लोक ३१
अर्थ : यांनी (हनुमंताने) थोडक्यात पण अगदी स्पष्टपणे आपले म्हणणे मांडलेले आहे. ते समजण्यास नि:संदिग्ध होते. थांबून थांबून किंवा शब्द आणि अक्षरे तोडून कुठलेही वाक्य त्यांनी उच्चारले नाही. कुठलेही वाक्य कर्णकटु वाटले नाही. त्याची वाणी हृदयात मध्यमा रूपाने स्थिर झाली आहे आणि कंठातून वैखरी रूपाने प्रकट झाली आहे !
संस्कारक्रमसम्पन्नामद्भुतामविलम्बिताम् ।
उच्चारयति कल्याणीं वाचं हृदयहारिणीम् ।।
– वाल्मीकि रामायण, कांड ४, सर्ग ३, श्लोक ३२
अर्थ : बोलतांना याचा आवाज फार बारीकही येत नाही नि फार वरही जात नाही. मध्यम आवाजात सर्व काही सांगितले आहे. हृदयाला आनंद प्रदान करणाऱ्या कल्याणमय वाणीचे उच्चारण यांनी केले आहे.
अनया चित्रया वाचा त्रिस्थानव्यञ्जनस्थया ।
कस्य नाराध्यते चित्तमुद्यतासेररेरपि ।।
– वाल्मीकि रामायण, कांड ४, सर्ग ३, श्लोक ३३
अर्थ : हृदय, कंठ आणि मूर्धा या या तीन स्थानांकडून स्पष्ट रूपाने अभिव्यक्त होणारी याची ही चित्रवत वाणी ऐकून कुणाचे चित्त प्रसन्न होणार नाही ! वध करण्यासाठी म्हणून तलवार उचललेल्या शत्रूचे हृदयही या वाणीने पालटू शकेल !
एवंविधो यस्य दुतो न भवेत् पार्थिवस्य तु ।
सिद्ध्यन्ति हि कथं तस्य कार्याणां गतयोsनघ ।।
– वाल्मीकि रामायण, कांड ४, सर्ग ३, श्लोक ३४
अर्थ : हे निष्पाप लक्ष्मणा, ज्या राजांपाशी यासारखे दूत नसतील, त्यांची कार्य सिद्धी कशी होऊ शकेल बरे ?
हनुमानाच्या ब्रह्मचर्याविषयी समर्थ रामदासस्वामी यांनी केलेले वर्णन
मूळ वाल्मीकि रामायणात हनुमंताचे जे वर्णन आले आहे, ते वाचले की, मन अक्षरश: थक्क होते. ते ‘बुद्धिमतां वरिष्ठं’ तर आहेतच; पण त्याहीपेक्षा त्यांचा प्रखर इंद्रिय संयम, म्हणजे कडकडीत असे आजीवन अखंड ब्रह्मचर्य ! ब्रह्मचर्याचे सामर्थ्य हे हनुमंताखेरीज अन्यत्र कुठेच फारसे प्रकट झालेले नाही. महाभारतातील भीष्माचार्यांचे उदाहरण असले, तरीही हनुमंताचे उदाहरण हे विलक्षण प्रेरणादायी आहे.
समर्थ रामदासस्वामीही म्हणतात,
मुखी राम त्या काम बाधू शकेना ।
गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना ।।
हरीभक्त तो शक्त कामास मारी ।
जगीं धन्य तो मारुती ब्रह्मचारी ।।
– मनाचे श्लोक, श्लोक ८७
अर्थ : त्याच्या मुखात रात्रंदिवस परमेश्वराचे नाम आहे, त्यामुळे त्याला काम बाधू शकत नाही. दैवी गुण चढत्या वाढत्या क्रमाने त्याला सहजपणे लाभले आहेत. हरिभक्तीच्या बळावर तो ‘शक्त’ म्हणजेच समर्थ होऊन कामावर विजय प्राप्त करतो, असा ब्रह्मचारी मारुति धन्य होय !
महर्षि वाल्मीकि यांनी हनुमानाच्या गतीचे केलेले वर्णन
महर्षि वाल्मीकि स्पष्ट म्हणतात,
न भूमौ नान्तरिक्षे वा नाम्बरे नामरालये ।
नाप्सु वा गतिसङ्गं ते पश्यामि हरीपुङ्गव ।।
– वाल्मीकि रामायण, कांड ४, सर्ग ४४, श्लोक ३
अर्थ : हे कपिश्रेष्ठ ! पृथ्वी, अंतरिक्ष, आकाश, देवलोक अथवा जलातही तुमच्या गतीचा अवरोध मी कधी पहात नाही.
सुग्रीव सीताशोधाच्या वेळी हनुमंताला उद्देशून म्हणतो, ‘‘हनुमंता, तुला असुर, गंधर्व, नाग, मनुष्य आणि राजे लोकांचे ज्ञान आहे. लोकपालांसह १४ भुवने, २१ स्वर्गांचे तुला ज्ञान आहे. सागरांसह पर्वताचेही तुला ज्ञान आहे. हे मारुति, तुझी अकुंठित गती, तुझे तेज आणि स्फूर्ती हे सर्व सद्गुण तुझ्यात परिपूर्ण आहेत. या भूमंडळात तुझ्यासारखा तेजस्वी दुसरा कुणीही नाही.’’
अशा या नरश्रेष्ठास कोटी कोटी प्रणाम !
महाबली, अतुल पराक्रमी पवनसूत अंजनेय श्रीरामदूत हनुमान की जय ! सियावर श्रीरामचंद्र की जय !! हिंदु धर्म की जय !!! हिंदु राष्ट्र की जय !!!
– तुकाराम चिंचणीकर (साभार : सामाजिक संकेतस्थळ)
हिंदु धर्मात वेदांचा अभ्यास केवळ विशिष्ट जातींपुरता केला जातो, हे निखालस खोटे !
प्रत्यक्ष श्रीरामचंद्राच्या तोंडून प्रथम भेटीत हनुमंताविषयीचे चिंतन ऐकल्यावर हनुमंताचे व्यक्तीमत्त्व किती विलक्षण प्रभावशाली असेल, याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो. पहिल्याच भेटीत श्रीरामचंद्र हनुमानाविषयीचे गुणगौरव करतात, काय आश्चर्य आहे ! ‘बुद्धिमतां वरिष्ठं’ अशा हनुमंताने सर्व वेदांचा सूक्ष्म रितीने अभ्यास केला होता आणि त्याचे आचरणही तसेच होते. त्याचा व्याकरणाचाही अभ्यास आहे. याचा अर्थ त्या काळी वानरही वेदांचा अभ्यास करत होते. मग तथाकथित स्त्री-क्षुद्रांना आणि तथाकथित बहुजन समाजाला वेद नाकारण्याचा प्रश्न येतोच कुठे ? किती दिवस आम्ही ही खोटी धारणा बाळगणार आहोत की, हिंदु धर्मात वेदांचा अभ्यास केवळ विशिष्ट जातींपुरता केला जात होता आणि आहे ?
रामचंद्रांचाही वेदांचा नि संस्कृत व्याकरणाचा अभ्यास होता आणि तेही त्यात पारंगत असून रत्नपारखी होते, हे किती विलक्षण आहे ! याहून व्यक्तीमत्त्वाचे उत्तम उदाहरण शोधायची आवश्यकता आहे का ? वेद आणि संस्कृत व्याकरण यांचा अभ्यास जर वानरही करत असतील, तर आम्हा मनुष्यांना आज एवढा अस्पृश्य झाला आहे का ? आम्ही भारतीय किती करंटे आहोत ? याहून दुर्दैव ते काय ?
हनुमानाची उपासना भक्तीभावाने करण्यास सांगणारा सनातनचा ग्रंथ !
मारुति (लघुग्रंथ)
- मारुतीची कार्ये आणि वैशिष्ट्ये कोणती ?
- मारुतीच्या सर्वांगाला शेंदूर का लावतात ?
- मारुतीला रुईची पाने, तेल का वहातात आणि ते तेल घरुन का न्यावे ?
- वाईट शक्तींच्या निवारणार्थ मारुतीच्या उपासनेचे महत्त्व
- मारुतीला हनुमान असे का म्हटले जाते ?
- यांसारख्या शंकांच्या निरसनासाठी हा लघुग्रंथ अवश्य वाचा !
हनुमत्कृपेचे संरक्षक-कवच प्राप्त करण्यासाठी नित्य वाचा…
श्रीरामरक्षास्तोत्र आणि मारुतिस्तोत्र (अर्थासह)
सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com
संपर्क ९३२२३१५३१७