परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त रामराज्याच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रार्थना !
मुंबई – रामराज्याप्रमाणे आदर्श अशा हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, यासाठी श्रीरामनवमीच्या दिवशी महाराष्ट्रात विविध ठिकाणी प्रभु रामरायाच्या चरणी साकडे घालण्यात आले. हिंदुत्वनिष्ठ संघटना, स्थानिक मंडळे, हिंदु धर्माभिमानी यांच्या सहभागाने हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था आयोजित उपक्रमाद्वारे राज्यभरातील ५० हून अधिक मंदिरांमध्ये शेकडो हिंदूंनी हिंदु राष्ट्रासाठी कटीबद्ध होण्याची शपथ घेतली. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त रामराज्याच्या निर्मितीसाठी सामूहिक प्रार्थनाही या वेळी करण्यात आली.
अनेक ठिकाणी शोभायात्रांमध्ये सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला. मंदिरांमध्ये श्रीरामाचा सामूहिक नामजप करण्यात आला. शेकडो ठिकाणी फलकलिखाण करून प्रवचने, तसेच ग्रंथप्रदर्शन यांचेही आयोजन करण्यात आले होते.
भारतासह पृथ्वीवर विश्वकल्याणार्थ हिंदु राष्ट्र
स्थापन होऊ दे ! – धर्मप्रेमी हिंदूंची आर्ततेने प्रार्थना
हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आणि त्याला साहाय्य करणाऱ्या सर्व हिंदु धर्मप्रेमींचे रक्षण व्हावे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी जगभरात कार्य करणाऱ्या हिंदुत्वनिष्ठांचे आयुरारोग्य उत्तम राहून त्यांच्या कार्यात उत्तरोत्तर वृद्धी होऊ दे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारखे ज्ञात-अज्ञात संत, ऋषिमुनी यांनी देहधारी रहाणे आवश्यक असल्याने त्यांचे प्रकृतीस्वास्थ्य उत्तम राहू दे. भारतासह पृथ्वीवर विश्वकल्याणार्थ हिंदु राष्ट्र स्थापन होऊ दे, अशी आर्त प्रार्थना राज्यभरात विविध मंदिरांमध्ये धर्मप्रेमी हिंदूंनी सामूहिकपणे केली.