चेन्नई – अयोध्येच्या रामजन्मभूमी न्यायालयीन खटल्यातील एक मुख्य अधिवक्ता के. परासरन् (वय ९४ वर्षे) यांची भेट घेऊन सनातन संस्थेच्या वतीने १ एप्रिल २०२२ या दिवशी त्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी अधिवक्ता परासरन् यांना सनातनचे संत पू. प्रभाकरन् यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, भेटवस्तू आणि तमिळ भाषेतील सनातननिर्मित ग्रंथ भेट देण्यात आले. या वेळी सनातनच्या संत पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांच्या हस्ते के. परासरन् यांना सनातननिर्मित भगवान श्रीरामाचे चित्र भेट दिले. त्या चित्राकडे पाहून त्यांचा भाव जागृत झाला. या वेळी सनातन संस्थेच्या वतीने श्री. बालाजी कोल्ला आणि श्री. गणेश रविचंद्रन् उपस्थित होते. या प्रसंगी के. परासरन् यांनी सर्व साधकांना आशीर्वाद दिले आणि अयोध्येमध्ये उभारण्यात येणाऱ्या श्रीराम मंदिराचे छायाचित्र भेट दिले. या वेळी अधिवक्ता के. परासरन् यांनी रामजन्मभूमी खटल्याच्या वेळी त्यांना आलेले विविध दैवी अनुभव कथन केले.
अधिवक्ता के. परासरन् यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१. उत्साह : अधिवक्ता के. परासरन् यांचे वय अधिक असल्याने न्यायाधिशांनी बसूनच बाजू मांडण्याची विनंती केली; परंतु त्यांनी त्यास नकार दिला आणि खटल्याच्या वेळी उभे राहूनच बाजू मांडली. त्यांच्यामध्ये एवढा उत्साह निर्माण झाल्याचे ते भावपूर्णरित्या सांगत होते.
२. अधिवक्ता के. परासरन् वयोवृद्ध असूनही अतिशय नम्र आहेत.
अधिवक्ता के. परासरन् यांनी रामजन्मभूमी सुनावणीच्या वेळी अनुभवलेले काही दैवी अनुभव
१. विरोधी पक्षाने उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी पुष्कळ धारिकांमधील एक आडवी धारिका दिसणे आणि त्यात आवश्यक असलेल्या उत्तराचे पान उघडले जाणे
एकदा विरोधी पक्षाने सुनावणीच्या वेळी ‘दशरथाच्या राजवाड्यात प्रसुती कक्ष होता का ?’, असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर न्यायाधिशांनी मला तपशील सादर करण्यास सांगितले. या खटल्याच्या पुष्कळ धारिका रचलेल्या होत्या. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर कसे शोधायचे ? याचा मी विचार करत होतो. तेव्हा लक्षात आले की, त्या सर्व धारिका उभ्या रचल्या गेल्या आहेत. त्यातील केवळ एक धारिका आडवी आहे. मी माझ्या साहाय्यकाला ती आडवी असलेली धारिका काढायला सांगितली आणि माझ्याकडून नेमके तेच पृष्ठ उघडले, जे आवश्यक होते. (याविषयी भावपूर्वक सांगतांना अधिवक्ता के. परासरन् म्हणाले की, त्याचे वर्णन करता येत नाही; पण अनुभवता येते. – संकलक) दुसऱ्याच दिवशी न्यायालयात सुनावणी झाली आणि न्यायालयाकडून हिंदूंच्या बाजूने म्हणजेच ‘श्रीरामजन्मभूमी प्रभु श्रीरामाचीच आहे’, असा निकाल घोषित करण्यात आला.
२. अधिवक्ता के. परासरन् यांच्या निवासस्थानी वानरांचा कळप येऊन आनंदाने नाचणे
खटल्याचा निकाल घोषित झाल्यानंतरच्या तिसऱ्या दिवशी माझ्या देहलीतील निवासस्थानी वानरांचा एक कळप आला आणि घराच्या गच्चीत आनंदाने नाचू लागला. न्यायालयात माहिती सादर करतांना मी काय बोललो, हे मलाच कळले नाही. (‘केवळ भगवान श्रीरामानेच ते घडवून आणले’, असा अधिवक्ता के. परासरन् यांचा भाव होता. – संकलक)
– अधिवक्ता के. परासरन्, चेन्नई