सोलापूर येथे साधना सत्संग जिज्ञासू शिबिराचा भावपूर्ण वातावरणात प्रारंभ
सोलापूर – योग्य साधना केल्यावर देव कसे साहाय्य करतो आणि आपल्या जीवनात कसे आमुलाग्र पालट होतात, ते आपण प्रत्येकाने साधना सत्संगाच्या माध्यमातून अनुभवले. सनातन संस्थेच्या माध्यमातून सेवा केल्यावर आपले कुटुंब आनंदी झाले. आता आपल्याला त्याही पुढे जाऊन समाजातील प्रत्येक कुटुंब आनंदी होण्यासाठी म्हणजेच संपूर्ण विश्वात हिंदु राष्ट्र आणण्यासाठी प्रयत्नरत रहायचे आहे, असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांनी केले. त्या २१ मार्च या दिवशी टाकळीकर मंगल कार्यालयात साधना सत्संग जिज्ञासू शिबिरात उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या. या वेळी सनातन संस्थेच्या संत पू. (कु.) दीपाली मतकर आणि सनातन संस्थेच्या साधिका सौ. उल्का जठार उपस्थित होत्या.
या शिबिरात सोलापूर, पुणे, मुंबई, बीड, लातूर, बिदल (कर्नाटक) येथून ९४ धर्मप्रेमी उपस्थित आहेत. या शिबिराचे सूत्रसंचालन सनातन संस्थेच्या सौ. वंदना जोशी आणि श्री. सर्वाेत्तम जेवळीकर यांनी केले.
शिबिरातील काही भावक्षण
१. शिबिरासाठी महिला जिज्ञासूंची संख्या लक्षणीय आहे.
२. जिज्ञासू मनोगत व्यक्त करतांना प्रत्येकाच्या मनात सनातन संस्थेविषयी, परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त होत होती. काही जणांना मनोगत व्यक्त करतांना भावाश्रू अनावर झाले. मनोगताच्या सत्रात सर्वजण भावसागरात डुंबून केले होते आणि ‘सत्र संपूच नये’, असे वाटत होते.
पहिल्या सत्रात काही जिज्ञासूंनी व्यक्त केलेले भावानुभव !
१. श्री. विक्रम लोंढे, प्राचार्य, न्यू सातारा कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, मॅनेजमेंट, पॉलिटेक्निक, कोर्टी, पंढरपूर – साधना सत्संगामुळे गुणसंवर्धन झाले. राग अल्प होण्यास साहाय्य झाले. आलेल्या अनेक अडचणी सुटल्या. या दोन वर्षांत मी शांत रहाण्यास शिकलो. इतरांचा विचार करण्यास प्रारंभ केला.
२. श्री. नवनाथ राऊत, धाराशिव – साधना करतांना जे अनुभवले त्यासाठी शब्द अपुरे आहेत. हे कार्य म्हणजे दिव्य प्रकाशासमान आहे. सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना केल्यामुळे माझ्या जीवनाचे सार्थक झाले.
३. श्री. दुर्गानाथ देशमुख, टेंभुर्णी – ‘प्रोग्रेसिव्ह इंजिनिअरींग अँड मेडिकल ज्युनिअर कॉलेज आणि स्कूल’चे प्राचार्य – आमच्या शाळेत दिवसभर वीज नसते; मात्र एका विषयाचे प्रबोधन करतांना दुपारी ४ ते ४.३० या वेळेत वीज आली. त्यामुळे मी विद्यार्थ्यांचे प्रबोधन करू शकू शकलो. हे धर्मकार्य समाजाच्या शेवटच्या टोकापर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करेन.