हिंदु राष्ट्र स्थापनेसाठीचे आवश्यक अधिष्ठान साधनेतूनच निर्माण होणार आहे ! – सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये, सनातन संस्था

सोलापूर येथे दोन दिवसांच्या हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेचा उत्साही वातावरणात प्रारंभ !

दीपप्रज्वलन करतांना सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये, पू. (कु.) दीपाली मतकर आणि श्री. मनोज खाडये

सोलापूर – पाच पांडवांच्या पाठिशी साक्षात् श्रीकृष्ण होते, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पाठिशी भवानीमातेचा आशीर्वाद होता. छत्रपती शिवाजी महाराज हे नेहमी त्यांचे राज्य ‘हिंदवी स्वराज्य’ म्हणून आणि ते राज्य म्हणजे ‘श्रींचे’ राज्य म्हणून चालवत होते. आपल्याला यापुढील काळात जे हिंदु राष्ट्र स्थापन करायचे आहे. त्यातील पहिली पायरी साधना आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्र स्थापनेसाठीचे आवश्यक अधिष्ठान साधनेतूनच निर्माण होणार आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांनी केले. त्या १९ मार्च या दिवशी टाकळीकर मंगल कार्यालयात दोन दिवसांच्या हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या.

या कार्यशाळेत सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर या जिल्ह्यांतील ८० हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले आहेत. प्रारंभी शंखनाद झाल्यावर सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या प्रसंगी पू. (कु.) दीपाली मतकर आणि पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये उपस्थित होते. सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. मिनेश पुजारे यांनी केले. कार्यशाळेचा उद्देश हिंदु जनजागृती समितीच्या कु. वर्षा जेवळे यांनी सांगितला. दोन दिवसांच्या कार्यशाळेत धर्मप्रेमींना साधना, हिंदु राष्ट्र, आदर्श वक्ता कसे व्हावे, संपर्क कसा करावा यांसह विविध विषयांवर मार्गदर्शन मिळणार आहे.

उपस्थित मान्यवर – सोलापूर महापालिकेच्या भाजप नगरसेविका सौ. राधिका पोसा, डॉ. विष्णु चव्हाण

 

या वेळी सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये म्हणाल्या…

१. भारतात हिंदूंसाठी कार्य करणार्‍या अनेक संघटना असूनही अपेक्षित असे हिंदूंचे संघटन नाही. याच्या मुळाशी जाऊन विश्लेषण केल्यास धर्मशिक्षणाचा अभाव आहे, हेच लक्षात येते.

२. हिंदू संघटित असते, तर वर्ष १९९० च्या दशकात काश्मिरी हिंदु पंडितांवर अत्याचार झालेच नसते.

३. धर्मशिक्षणाअभावी हिंदूंनी स्थिती इतकी वाईट आहे की, त्यांना नमस्कार कसा करावा ? हेही ठाऊक नाही. ऋषिमुनींनी सांगितलेले धर्मशास्त्र समजून घेऊन साधना केल्यास आपल्याला ईश्वरप्राप्ती निश्चित होऊ शकते.

४. सत्ययुगात सात्त्विकता पुष्कळ होती, तर कलियुगात सात्त्विकता अल्प असल्याने  भक्तीयोगच महत्त्वाचा आहे. त्यासाठी साधनेतील पहिला टप्पा म्हणजे प्रत्येकाने कुलदेवतेचा नामजप करणे आवश्यक आहे.

क्षणचित्रे

१. सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये विषय सांगत असतांना ‘प्रोजेक्टर’द्वारे त्याची छायाचित्रे दाखवण्यात येत होती, तसेच पू. (कु.) दीपाली मतकर याही फलकावर विविध सूत्रे लिहून दाखवत होत्या. त्यामुळे धर्मप्रेमींना विषय समजणे सोपे जात होते.

२. सर्व धर्मप्रेमींचे स्वागत करणारा वैशिष्ट्यपूर्ण फलक स्वागत कक्षात लावला होता.

३. व्यासपिठावरून वक्ते विषय सांगत असतांना अनेक धर्मप्रेमी विषय जिज्ञासेने ऐकत होते आणि लिहून घेत होते. धर्मप्रेमी मध्ये मध्ये देत असलेल्या ‘हर हर महादेव’, ‘जय श्रीराम’ अशा  घोषणांमुळे सभागृहातील वातावरणात एक वेगळाच उत्साह निर्माण होत होता.

पहिले सत्र झाल्यावर काही धर्मप्रेमींनी व्यक्त केलेले वैशिष्ट्यपूर्ण मनोगत

१. श्री. राकेश मोतीवाले – आजपर्यंत मी कधी न ऐकलेले विषय ऐकायला मिळाले. यापुढील काळात धर्मजागृतीसाठी प्रयत्न करीन.

२. श्री. श्रीगणेश देवरकोंडा – आजची कार्यशाळा हा प्रसाद आहे. ‘हा प्रसाद घेण्यासाठी माझे हात अपुरे आहेत’, असे वाटते. या कार्यशाळेतून ‘स्वयंपूर्ण कसे व्हायचे’, ते शिकायला मिळणार आहे.

३. श्री. नरेश गणुरे, सोलापूर – हिंदूंसाठी आणि धर्मासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. नेमकी दिशा मिळत नव्हती; मात्र समितीमुळे मार्ग मिळाला.

४. श्री. कृष्णाहरि क्यातम, सोलापूर – जेव्हापासून मला सनातन संस्थेचे मार्गदर्शन मिळाले तेव्हापासून आदर्श पुरोहित सेवा कशी करायची, हे समजले. धर्मकार्यात सहभाग हीच खरी पुरोहित सेवा आहे.

५. सोनम गोडसे – राणी लक्ष्मीबाई, राजमाता जिजामाता यांनी जन्म घेतलेल्या पवित्र भूमीत जन्म घेतल्याविषयी मला कृतज्ञता वाटते. स्वरक्षण प्रशिक्षण, राष्ट्र-धर्म जागृतीसाठी ज्या ज्या मोहिमा होतील त्यात सहभागी होऊन मी यापुढील काळात हिंदु युवतींना संघटित करून धर्मकार्यात सहभागी होईन.

६. श्री. विपुल अर्शिद – इथे आल्यावर व्यष्टी साधना समजली. पुढच्या काळात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेत योगदान; म्हणून समष्टी साधना करण्यास प्राधान्य देईन.

Leave a Comment