पुण्यातील ‘आय.आय.टी.एम्.’च्या शास्त्रज्ञांच्या अभ्यासातील निष्कर्ष
पुणे – उत्तर हिंदी महासागरातील प्रत्येक चौथ्या चक्रीवादळाचे रूपांतर तीव्र चक्रीवादळात होत आहे. जगभरातील चक्रीवादळांपैकी ६ टक्के चक्रीवादळे उत्तर हिंदी महासागरात सिद्ध होत आहेत. अरबी समुद्रातील चक्रीवादळांची तीव्रता २० ते ४० टक्क्यांनी वाढली आहे, असे हवामान शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासातून दिसून आले आहे. पुण्यातील ‘भारतीय उष्ण कटीबंधीय हवामानशास्त्र संस्थे’तील (आय.आय.टी.एम्.) डॉ. रॉक्सी कॉल, मेधा देशपांडे आदी शास्त्रज्ञांच्या गटाने ‘उत्तर हिंदी महासागरातील उष्ण कटीबंधीय चक्रीवादळांची पालटती स्थिती’ याविषयी अभ्यास केला.
डॉ. रॉक्सी कॉल म्हणाले की, चक्रीवादळांच्या अचूक अंदाजासाठी अधिक सखोल निरीक्षणाची आवश्यकता आहे, तसेच चक्रीवादळांचा अल्प वेळेत अंदाज करता येणे आवश्यक आहे. चक्रीवादळांच्या अंदाजासाठीच्या प्रणालीमध्ये तातडीने सुधारणा करणे आवश्यक आहे. चक्रीवादळांचा स्वतंत्रपणे अभ्यास करण्यासाठी केंद्राची निर्मिती व्हायला हवी.
चक्रीवादळांची तीव्रता समजून घेण्यासाठी वर्ष १९८० ते २०१९ या कालावधीतील चक्रीवादळांचा अभ्यास केला. या अभ्यासाचा शोधनिबंध नुकताच प्रसिद्ध झाला आहे. त्याचे निष्कर्ष खालीलप्रमाणे आहेत.
१. अरबी समुद्रातील चक्रीवादळांचे प्रमाण ५२ टक्क्यांनी, तर अतीतीव्र चक्रीवादळांचे प्रमाण १५० टक्क्यांनी वाढले आहे, तर बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळांचे प्रमाण ८ टक्क्यांनी घटले आहे.
२. अरबी समुद्रातील चक्रीवादळांची वारंवारता, कालावधी आणि तीव्रता लक्षणीयरित्या वाढत आहे, तर बंगालच्या उपसागरात चक्रीवादळांची वारंवारता अल्प होत आहे.
३. वर्ष १९८० ते १९९० या कालावधीत मान्सूनपूर्व हंगामात चक्रीवादळांचा ताशी वेग १०० कि.मी. होता, तर वर्ष २००० ते २०१९ या कालावधीत मान्सूननंतरच्या काळातील चक्रीवादळांचा ताशी वेग १३८ कि.मी. असल्याचे या अभ्यासातून दिसून आले.
४. गेल्या ५० वर्षांत मानवनिर्मित हवामान पालटामुळे सिद्ध झालेल्या ऊर्जेपैकी ९० टक्के अतिरिक्त ऊर्जा समुद्राने शोषून घेतली आहे. अरबी समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान १.२ ते १.४ अंश सेल्सिअसने वाढले आहे. समुद्राच्या पृष्ठभागाचे वाढते तापमान चक्रीवादळांची तीव्रता वाढण्यास कारणीभूत ठरत आहे, तसेच उत्तर हिंदी महासागरातील चक्रीवादळांमुळे संबंधित देशांमध्ये कोट्यवधींची हानी झाली आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.