अध्यात्मातील सैद्धांतिक भागाचा कितीही अभ्यास केला, तरी मनातील शंकांचे निरसन झाले नाही तर साधना नीट होत नाही. या दृष्टीने गांवोगांवच्या जिज्ञासू आणि साधकांच्या मनात सर्वसाधारणपणे उद्भवणार्या अध्यात्मशास्त्राच्या सैद्धांतिक आणि प्रायोगिक भागाच्या शंकांचे सनातन संस्थेचे प्रेरणास्थान प.पू. डॉ. जयंत आठवले यांनी निरसन केले आहे. ‘शंकानिरसन’ या सदरातून प्रश्नोत्तराच्या रूपात हे, सर्वच वाचकांसाठी उपलब्ध करत आहोत. याचा अभ्यास करून अधिकाधिक जिज्ञासूंनी योग्य साधनेला आरंभ करावा आणि जीवनाचे खर्या अर्थाने सार्थक करून घ्यावे, हीच श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !
कर्मकांड हा साधनेतील प्राथमिक परंतु अविभाज्य असा भाग आहे. कर्मकांडात पाळावयाचे विविध नियम, आचरण कसे असावे याविषयी बहुतेकांना माहिती असते; परंतु त्यामागील कारण अन् शास्त्र यांविषयी आपण अनभिज्ञ असतो. प्रत्येक कृतीमागील शास्त्र लक्षात आल्यास देवावरील श्रद्धा वाढण्यास साहाय्य होते. या दृष्टीने विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे येथे दिली आहेत.
प्रश्न : स्त्रियांनी गुरुचरित्राचे वाचन करू नये, गायत्रीमंत्र म्हणू नये, या पाठीमागचे कारण काय ?
उत्तर : सध्याच्या काळात स्त्रिया पुरुषांसारखे वागण्याचा प्रयत्न करतात. आम्हालाही पुरुषांसारखे हक्क हवेत म्हणून लढतांना दिसतात. देह तर दोघांचे निराळेच असतात. पुरुषांची जननेंद्रीये बाहेरच्या बाजूला आहेत, तर स्त्रियांची जननेंद्रीये आतल्या बाजूला आहेत, उदा. गर्भाशय. कोणतीही साधना म्हणजे तपश्चर्या आहे, तप आहे, त्यातून उष्णता निर्माण होत असते. त्याचा पुरुषांच्या जननेंद्रियांवर काही परिणाम होत नाही; कारण ती बाहेरच्या बाजूला असतात. हवा लागत असते. त्यामुळे त्यांचे तापमान अल्प असते; मात्र स्त्रियांची जननेंद्रीये आतल्या बाजूस असल्यामुळे अधिक तापमानाला जास्त काळ कार्य करू शकत नाही. त्यामुळे कोणी गायत्रीची किंवा ओंकाराची साधना, सूर्योपासना अशा तीव्र साधना केल्यास जवळजवळ २ प्रतिशत स्त्रियांना गर्भाशयाचे विकार चालू होतात. स्त्रीबीज निर्माण करणार्या ज्या ग्रंथी आहेत, त्यांचे विकार चालू होतात. पाळीच्या वेळेला कुठले ना कुठले त्रास होतात. गुरूंनी जर कोणाला अशा प्रकारची साधना सांगितली, तर प्रश्नच येत नाही; कारण गुरूंना सर्व ठाऊक असते, कोणी काय करणे आवश्यक आहे. कोणत्यातरी कारणामुळे शरिराचा एखादा विकार झाला, तर प्रतिजैविके घेऊन तो ठीक करता येतो; परंतु या शक्तींमुळे काहीतरी त्रास निर्माण झाल्यास तिथे वैद्य काही साहाय्य नाही करू शकत; म्हणून असे करण्यापेक्षा आपल्या परंपरेने जे सांगितले आहे, ते करावे, म्हणजे देवतेच्या नामापुढे ॐ लावणे टाळावे. ‘ॐ नमः शिवाय ।’ ऐवजी नुसतेच ‘नमः शिवाय ।’ म्हणावे. गायत्रीची उपासना करणे टाळावे.
प्रश्न : आपल्यात रूढीप्रीयता असते आणि रूढीप्रमाणे आजोबांनी, पणजोबांनी किंवा आपल्या आधीच्या पिढीने सांगितले आहे, त्याप्रमाणे आपण काही करत असतो. साधकाच्या दृष्टीने हे योग्य आहे का ?
उत्तर : रुढीला काही अर्थ नसतो. शास्त्रात जे आहे, त्याप्रमाणे केले पाहिजे. शास्त्र म्हणजे ‘सायन्स’. ज्यामध्ये एखादी गोष्ट सप्रमाण सिद्ध केलेली असते, जी पुनःपुन्हा सिद्ध करता येते; परंतु बर्याच कुटुंबात ‘शास्त्रात् रुढी बली’ म्हणजे शास्त्रापेक्षा रुढी अधिक बलवान असते. अशा वेळी जर आपण शास्त्र सांगायला गेलो, तर कोणी ऐकणार नाहीत. त्यापेक्षा ते करतात ते करू द्यायचे. एकदा त्यांचा साधनेवर विश्वास बसला की, ते आपल्या शब्दावर विश्वास ठेवतील. शब्दप्रमाण निर्माण झाले की, आपण सांगू शकतो की, ती रूढी आहे, तोपर्यंत याविषयी बोलणे टाळावे.
प्रश्न : गुरुपुष्यामृताच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा करावी का ?
उत्तर : सत्यनारायणाची पूजा हा एक रूढीचा भाग आहे. मागील शंभर वर्षांपासून ती आपल्याकडे आली आहे. तिचा धर्मशास्त्रात उल्लेख नाही. बंगालकडून ती आपल्याकडे आली आहे.
धर्मशास्त्रात नियम दिलेले असतात. भटजी आपल्याला सांगतात की, या विधीला हा योग चांगला आहे किंवा हा दिवस चांगला आहे, नक्षत्र चांगले आहे, त्याप्रमाणे तो विधी करावा. भक्तीभावाने केले की, कशाचे काहीच बंधन रहात नाही, कोणतीही गोष्ट कधीही करा.
प्रश्न : गणपति गावी बसवत आहोत, तर दुसरीकडे बसवायचा नाही, असे म्हटले जाते. तसेच गावी देव आहेत म्हणून इथे बसवायचे नाहीत, यामागील नेमके शास्त्र काय आहे ?
उत्तर : ही प्रथा अतिशय अयोग्य आहे. जिथे जिथे निराळा स्वयंपाक होत असतो, तिथे तिथे निराळे देवघर असले पाहिजे. केवळ मोठा भाऊ देवाचे सर्व करतो, तर देवसुद्धा सर्व मोठ्या भावाचेच करील. इतरांचे काही करणार नाही.
प्रश्न : पंचायतन देवतांविषयी देवघरातील मांडणी कशी करावी ? कुलदेवतेच्या मूर्तीची मांडणी करतांना श्री गणेशाची मूर्ती मध्ये ठेवणे आवश्यक आहे का ?
उत्तर : आपल्याकडे एक वेड्यासारखी पद्धत आहे. कोणी गावी किंवा तीर्थक्षेत्री गेले की, तेथून देवतेच्या मूर्ती अथवा प्रतिमा आणून सर्व नातेवाईक, शेजारीपाजारी यांना वाटतात. आपण त्या मूर्ती देवघरात ठेवून देतो.
एका जिल्ह्यात सत्संगाला येणार्या एक महिलेचे सात घंटे केवळ पूजा करण्यात जायचे. रात्री दोन वाजता उठून तिला हे सर्व करावे लागे, तेव्हा कुठे ९ वाजेपर्यंत सर्व आटपायचे. यामध्ये धार्मिकता, श्रद्धा, भाव काहीच येत नाही. आपल्या दृष्टीने दोन-चार देवच महत्त्वाचे आहेत. त्यांचीच प्रतिमा किंवा मूर्ती देवघरात ठेवावी. कुलदेव आणि कुलदेवी, लग्नाच्या वेळेस माहेरहून आणलेली अन्नपूर्णेची मूर्ती, काही कुळात मारुति असतो तो एक. असे दोन-चार देव पुरे झाले. आधीच्या पिढीच्या अन्नपूर्णा देवघरात ठेवण्याची आवश्यकता नाही; कारण अन्नपूर्णा हे तत्त्व आहे. अनेकातून एकात जायचे, हा साधनेतील पहिला नियम आहे.
‘मुंबईतील एका डॉक्टर मित्रांनी मला (प.पू. डॉ. जयंत आठवले यांना) एकदा घरी बोलावले. त्यांच्या घरात आल्यावर त्यांना म्हटले, ‘‘ही तुमची मधली खोली आहे ना, तिच्या त्या टोकाला काहीतरी वाईट जाणवत आहे.’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘अहो डॉक्टर, असे काय म्हणता, तिकडे तर आमचे देवघर आहे.’’ आतमध्ये जाऊन पाहिले, तर त्या ठिकाणी २५ – ३० देवतांच्या मूर्ती आणि प्रतिमा ठेवल्या होत्या. जेथे देवतेची मूर्ती किंवा प्रतिमा आहे, तेथे त्या देवतेचे ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि शक्ती’ हे एकत्र असतात. आपणा सर्वांना केवळ शब्द आणि रूप माहीत असते. देवतेची आपण उपासना करत गेलो, नाम घेत गेलो की, तिचे दर्शन होते. ज्यांनी पदार्थविज्ञानाचा अभ्यास केला आहे, त्यांना प्रत्येक वस्तूमध्ये असणार्या शक्तीविषयी माहिती असते. दोन शक्ती एकत्र आल्या की, त्यांचा परिणाम होऊन काहीतरी नवीन शक्ती निर्माण होते. त्या देव्हार्यात अनेक देव कसेही ठेवल्यामुळे त्याचा परिणाम म्हणून त्रासदायक शक्ती निर्माण झाली होती.
देवघरातील अतिरिक्त देव काढून ते इतरांना किंवा जवळच्या देवळांत द्यावेत किंवा विसर्जन केले, तरी काही बिघडत नाही. ज्याला गुरुप्राप्ती झाली आहे, त्याने केवळ गुरूंचेच छायाचित्र देवघरात ठेवावे. आपण कुटुंबात रहात असू, एकच देवघर असेल, तर मात्र घरातील इतरांचाही विचार करावा. त्यांच्यासाठी मिळून चार-पाच देव तरी देवघरात ठेवावेत. आपल्यासाठी बाकीचे देव नाहीत, हे मनात दृढ करायचे; मात्र आपल्यावर पूजा करायची वेळ आल्यास सर्वांचीच करायची.
शंकराचार्यांनी ज्या काळात पंचायतन आणले, त्याच काळात गणपतीसुद्धा आणले. पूर्वी शैव आणि वैष्णव या दोन संप्रदायांत पुष्कळ भांडणे आणि मारामार्या होत असत. तेव्हा त्यांचा समन्वय साधला जावा; म्हणून शंकराचार्यांनी शंकर आणि विष्णु यांना डावलून गणपतीला पहिला मान देण्याचे निश्चित केले.
आपण बोलतो, ती नाद भाषा. देवांची प्रकाश भाषा असते. गणपतीला या दोन्ही भाषा येतात; म्हणून गणपति ‘दुभाषा’चे काम करतो. व्यासांना पुराण लिहायचे होते. त्या वेळी ते विचारांच्या पातळीला सुचणार असल्याने विचारांच्या गतीला ग्रहण करून त्याच गतीने लिहिले जाणे आवश्यक होते. त्यासाठी त्यांनी गणपतीची निवड केली होती.
मानसिकदृष्ट्या पंथांचे एकत्रीकरण आणि आध्यात्मिकदृष्ट्या प्रकाश आणि नाद भाषेचे रूपांतर करणे, या दोन्ही गोष्टींमुळे गणपतीला देवघरात मध्यभागी स्थान देण्यात आले. गणपतीच्या उजव्या बाजूला पुरुषवाचक देव, उदा. कुलदेव, मारुति आणि डावीकडे स्त्रीवाचक देव, उदा. कुलदेवी, अन्नपूर्णा.
पूजेच्या वेळेस पुरोहित कधी सांगतात पत्नीने पतीच्या डाव्या बाजूला बसावे, तर कधी उजव्या बाजूला बसण्यास सांगतात. उपासनेसाठी शक्ती हवी असल्यास पत्नीला उजव्या बाजूला बसवतात आणि शक्ती विरहित पूजा करायची असेल, तेव्हा पत्नीला डाव्या बाजूला बसवले जाते. शक्ती संप्रदायात याच्या पूर्णपणे उलट मांडणी असते. आपण सर्व भक्तीमार्गानुसार साधना करणारे आहोत. त्यात आपल्याला शक्ती नको. आपल्याला शक्ती नष्ट करून शिवाची अनुभूती घ्यायची आहे; म्हणून आपण पुरुषवाचक देव आपल्या डावीकडे आणि स्त्रीवाचक देवी आपल्या उजवीकडे ठेवतो.
एखाद्या धार्मिक कृतीपेक्षा संतांच्या
सांगण्यानुसार केलेली तीच कृती अधिक महत्त्वाची !
काही वेळा एखादे संत पूजा, पठण इत्यादी करायला सांगतात. त्यांनी सांगितलेली साधना एखादा आधीपासूनच करत असला, तर त्याला वाटते, मी हे करतच आहे. त्याने लाभ झाला नाही, तर आता तेच करून लाभ कसा होईल ? त्याने हे लक्षात घेतले पाहिजे की, त्या कृतींपेक्षा त्या करण्यास सांगणार्या संतांचा संकल्प कृती करतांना कार्यरत होतो. त्यामुळे फलप्राप्ती होते. – (प.पू.) डॉ. आठवले (८.१.२०१५)
संदर्भ : सनातन-निर्मित ध्वनिचकती ‘अध्यात्मविषयक शंकानिरसन’
प्रश्न : सोमवारी, तसेच शिवाच्या देवळात नारळ का फोडू नये ?
वेदमूर्ती केतन शहाणे : एखाद्या कार्याला आरंभ करतांना शुभसूचक म्हणून नारळ फोडतात. शिव ही लयाची देवता आहे; म्हणून शिवाच्या देवळात नारळ फोडू नये. सोमवारी शिवतत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत असते. त्यामुळे सोमवारी नारळ फोडू नये. (१४.७.२०१६)
‘आपण काही करत नसून सर्वकाही देवच करवून घेतो’, असा भाव असल्यास क्रियमाणकर्म नष्ट होते !
एक साधक : प्रारब्धकर्म कुलदेवीच्या उपासनेने नष्ट होते, तर क्रियमाणकर्म कसे घालवायचे ?
प.पू. डॉक्टर : ‘आपण काही करतच नाही, सर्वकाही देवच करवून घेतो’, या विचाराने क्रियमाण कर्म नष्ट होते. (९.९.२०२०)