कुंभमेळा आणि विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या हिंदूंचे दायित्व !

१. कुंभमेळ्याची व्याप्ती

विश्वातील सर्वांत मोठा धार्मिक मेळा असणार्‍या आणि १२ वर्षांतून एकदा येणार्‍या महाकुंभमेळ्याला ५ कोटी श्रद्धाळू गंगेच्या तीरावर येतात. या कुंभमेळ्याच्या निमित्ताने अनेक विद्वान, संन्यासी, विविध पिठांचे शंकराचार्य, १३ आखाड्यांचे साधू, संत, महात्मा आणि महामंडलेश्वर येतात.

कुंभमेळा
कुंभमेळा

 

२. कुंभमेळ्याला हिंदूंची गर्दी होण्याची प्रमुख कारणे

‘आपले मन शुद्ध होईल’, ‘पापे नष्ट होतील’ आणि ‘जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून सुटका होऊन ‘मोक्ष’ मिळेल’, ‘अमरत्व’ प्राप्त होईल, या भावाने कित्येक हिंदू या कुंभमेळ्यात येतात.

 

३. प्रसिद्धीमाध्यमांची प्रस्तुत आणि अपेक्षित भूमिका !

३ अ. प्रस्तुत भूमिका

कुंभमेळ्यात साधूसंत शोभायात्रा काढून मोठ्या थाटामाटात शाही स्नान करतात. वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या या गंगास्नानाच्या वृत्तांनाच प्राधान्य देतात. किती लोकांनी शाही स्नान केले ? आधी कोणाचे स्नान ? शेवटी कोणाचे ? हा चर्चेचा मुख्य विषय असतो.

 

३ आ. अपेक्षित भूमिका

हरिद्वारमध्ये रहाणारे लोक संपूर्ण वर्षभर गंगा नदीच्या सान्निध्यात रहातात आणि प्रतिदिन तिच्यात बुडी मारतात. त्यामुळे त्यांना अमरत्व आणि मोक्षप्राप्ती होत नाही. हे काही धर्माचे खरे स्वरूप नाही. महाकुंभमेळ्याचे खरे स्वरूप सर्वांना ज्ञात व्हावे किंवा त्याचा आध्यात्मिक लाभ घेता यावा, यासाठी महाकुंभमेळ्यात ‘धर्मचर्चा’ आणि ‘ज्ञानचर्चा’ घडवून आणायला हवी.

 

४. हिंदू धर्माचार्यांकडून अपेक्षा !

साडेतीन मास चालणार्‍या विश्वातील या सर्वांत मोठ्या महाकुंभमेळ्यात धार्मिक गंगास्नानोत्सवामध्ये कोट्यवधी श्रद्धाळू जमतात. या वेळी देशातील कोट्यवधी लोकांना पुढीलप्रमाणे मनूने सांगितलेली मूळ तत्त्वे आणि सर्व धर्मांचे मूळ असणारा ‘वैदिक धर्म’ पुनःपुन्हा सांगायला हवा.

अद्भिः गात्राणि शुध्यन्ति मन: सत्येन शुध्यति ।
विद्यातपोभ्यां भूतात्मा बुद्धिज्र्ञानेन शुध्यति ।। – मनुस्मृति, अध्याय ५, श्लोक १०९

अर्थ : पाण्याने केवळ शरीर शुद्ध होते, सत्याने मन शुद्ध होते, विद्या आणि तप यांद्वारे आत्म्याची शुद्धी होते, तर ज्ञानार्जनाने बुद्धी शुद्ध होते.

 

५. गंगा नदीला श्रद्धास्थान मानणार्‍या सर्वांकडून अपेक्षा !

कुंभमेळा : गंगा नदीची सध्याची दुःस्थिती !

भारतात ‘गंगा’ आणि ‘यमुना’ या सर्वांत महत्त्वाच्या नद्या आहेत. एका अहवालानुसार या सर्वांत दूषितही आहेत. गंगा नदी दूषित असण्यामागे औद्योगिक आस्थापना आणि उद्योगालये यांनी सोडलेले रसायनयुक्त सांडपाणी, इतर कचरा आणि धर्माच्या नावावर लोकांनी प्लास्टिकच्या पिशव्यातून फेकलेले पूजासाहित्य, ही दोन मोठी कारणे आहेत. वर्ष १९८५ ते २००० पर्यंत भारत शासनाने गंगा नदीला प्रदूषणमुक्त करण्याच्या कृतीयोजनेअंतर्गत १ सहस्त्र कोटी रुपये व्यय केले. तरीही भारतातील सर्वात पवित्र गंगा नदी आजही दूषितच आहे. योजना आयोगाच्या अहवालाप्रमाणे गंगा नदीला केवळ प्रदूषणमुक्त करण्यासाठी ७ सहस्त्र कोटी रुपयांची आवश्यकता आहे. कोट्यवधी लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या गंगा नदीला आपल्याला वाचवायचे आहे. त्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा.’ (पाक्षिक ‘आर्यनीति’, २५.७.२०१०)

भावी हिंदू राष्ट्रातील निर्मळ गंगा !

६. भाविकहो, कुंभक्षेत्रांचे पावित्र्य जोपासण्याचा
आणि तेथील सात्त्विकता टिकवण्याचा प्रयत्न करा !

कुंभक्षेत्रे ही तीर्थक्षेत्रे असून तेथील पावित्र्य आणि सात्त्विकता जोपासण्यासाठी प्रयत्न करणे, हे स्थानिक पुरोहित, देवळांचे विश्वस्त आणि प्रशासन यांच्यासह तेथे आलेल्या प्रत्येक यात्रेकरूचेही कर्तव्य आहे.

६ अ. सहलीला आल्याप्रमाणे कुंभक्षेत्री वागू नका !

कुंभक्षेत्री आलेले अनेक जण तेथे सहलीला आल्याप्रमाणे वागतांना आढळतात. एकमेकांची चेष्टा करणे, पाश्चात्त्य वेशभूषा करणे, चित्रपटसंगीत ऐकणे, अभक्ष्य भक्षण करणे आदी कृती त्यांच्याकडून होतात. तीर्थक्षेत्रगमन ही एक ‘साधना’ आहे. ती पूर्ण होण्यासाठी तीर्थक्षेत्री आल्यावर भावपूर्ण गंगास्नान करणे, देवतांचे दर्शन घेणे, दान-धर्म करणे, उपास्यदेवतेचा नामजप करणे, अशा प्रकारे अधिकाधिक वेळ ईश्वराशी अनुसंधान ठेवणे अपेक्षित आहे. असे केले, तर गंगास्नान अन् यात्रा करण्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो.

६ आ. पवित्र तीर्थ प्रदूषित होणार नाही, याची दक्षता घ्या !

कुंभक्षेत्री पवित्र तीर्थात स्नान करणार्‍या यात्रेकरूंंकडून ते तीर्थ प्रदूषित होणार्‍या कृती केल्या जातात. काही जण प्लास्टिकच्या पिशव्या, सिगारेटची पाकिटे, जुनी अंतर्वस्त्रे इत्यादी गोष्टीही तीर्थाच्या ठिकाणी (नदीत किंवा कुंडात) टाकतात. यामुळे तीर्थाचे पावित्र्य घटते. गंगा, गोदावरी आणि क्षिप्रा अशा पवित्र नद्या प्रदूषित करणे, हा मोठा अपराध असल्याचे धर्मशास्त्राने सांगितले आहे. त्यामुळे यात्रेकरूंनी स्नानाचे वेळी तीर्थाचे पावित्र्य राखले जाईल, याची दक्षता घ्यायला हवी.

६ इ. पर्वस्नानाच्या आरंभी प्रार्थना,
तसेच स्नान करतांना नामजप करा !

पर्वस्नानाच्या वेळी यात्रेकरूंकडून मोठमोठ्याने गप्पा मारणे, आरडाओरडा करणे, एकमेकांवर पाणी उडवणे इत्यादी अयोग्य कृती केल्या जातात. स्नान करणार्‍याचे मन तीर्थक्षेत्रातील पावित्र्य अन् सात्त्विकता अनुभवत नसेल, तर त्याची पापकर्मे धुतली जाणे अशक्य आहे; म्हणून पर्वस्नानाचा आध्यात्मिक लाभ मिळण्यासाठी त्याच्या आरंभी गंंगामातेला पुढील प्रार्थना कराव्यात.

१. हे गंगामाते, तुझ्या कृपेने मला हे पर्वस्नान करण्याची संधी मिळाली आहे यासाठी मी तुझ्या चरणी कृतज्ञ आहे. हे माते, तुझ्या या पवित्र तीर्थात माझ्याकडून श्रद्धायुक्त अंतःकरणाने पर्वस्नान होऊ दे.

२. हे पापविनाशिनी गंगादेवी, तू माझ्या सर्व पापांचे हरण कर.

३. हे मोक्षदायिनी देवी, तू माझ्याकडून आध्यात्मिक प्रगतीसाठी आवश्यक अशी साधना करवून घे आणि मला मोक्षाच्या दिशेने घेऊन जा.  यानंतर उपास्यदेवतेचा नामजप करत स्नान करावे !

६ ई. कुंभक्षेत्रातील देवळांचे पावित्र्य राखा !

१. तीर्थावर स्नान करून अनवाणी परतणार्‍या भाविकांच्या पायाला माती किंवा चिखल लागतो. तशाच स्थितीत त्यांनी प्रवेश केल्याने देवळात सर्वत्र चिखलाचे पाणी पसरते. असे होऊ नये, यासाठी देवळात प्रवेश करण्यापूर्वी पाय धुवावेत आणि ते पुसूनच देवळात प्रवेश करावा.

२. पादत्राणे वापरणार्‍यांनीही ती ओळींत काढून वरीलप्रमाणे कृती करावी.

३. दर्शनासाठी झुंबड करू नये. ओळीने आणि शांतपणे दर्शन घ्यावे.

४. देवळाच्या परिसरात इतरांच्या उपासनेत अडथळा येईल, असे मोठ्याने बोलणे, उच्च स्वरात स्तोत्रपठण करणे, गोंगाट करणे आदी टाळावे.

५. देवळाचा परिसर स्वच्छ ठेवावा. निर्माल्य निर्माल्यकुंडीत आणि उदबत्ती, काडीपेटी इत्यादी साहित्याची वेष्टने कचराकुंडीत टाकावीत.

६ उ. देवतेचे दर्शन लवकर होण्यासाठी अवैधरित्या पैसे देणे टाळा !

कुंभपर्वाच्या काळात तेथील देवतेचे (उदा. त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंगाचे) दर्शन होण्यासाठी काही घंटे (तास) रांगेत उभे रहावे लागते. हे रांगेत उभे रहाणे टाळण्यासाठी काही भाविक प्रत्येकी १००-२०० रुपये अवैधरित्या देऊन रांगेत उभे न रहाता दर्शन घेतात. असे करणे अयोग्य ठरते; कारण –

१. रांगेत उभे न रहाता लाच देऊन देवतेचे दर्शन घेणे, हा भ्रष्टाचारच आहे.

२. तीर्थयात्रा ही एक प्रकारची तपश्चर्याच असते. देवदर्शनासाठी रांगेत काही घंटे उभे रहाणे, हा त्या तपश्चर्येचाच एक भाग आहे. त्यात सूट घेणे योग्य नाही. देवतेच्या दर्शनासाठी रांगेत उभे असतांना गप्पा न मारता नामजप करावा.

६ ऊ. साधूसंत आदींच्या मंडपांत योग्य वर्तन करा !

६ ऊ १. सत्संग चालू असलेल्या ठिकाणी निद्रा घेण्याचे टाळा !

कुंभक्षेत्री उभारण्यात आलेल्या साधूसंतांच्या मंडपात सत्संग (प्रवचन, भागवतकथा इत्यादी) चालू असतांना काही जण तेथे झोपलेले आढळतात. सत्संगाच्या ठिकाणी देवता उपस्थित रहात असल्याने भाविकांनी त्या स्थानी निद्रा घेणे टाळावे. थकलेल्या यात्रेकरूंनी आवश्यक असल्यास मंडपाच्या एखाद्या कोपर्‍यात, तसेच एका रांगेत निद्रा घ्यावी. त्या वेळी स्वतःचे सर्व साहित्य नीटनेटके ठेवावे.

६ ऊ २. अन्नछत्रांत अन्नाची नासाडी होऊ देऊ नका !

साधूसंतांच्या मंडपांत चालवण्यात येणार्‍या अन्नछत्रांत भोजन करणार्‍या काही जणांकडून अन्नाची नासाडी केली जाते. अन्न हे ‘पूर्णब्रह्म’ असल्याने अन्नाची नासाडी करणे, हे पाप आहे; म्हणून भाविकांनी आवश्यक तेवढेच अन्न ताटात घ्यावे. अन्नछत्रांतील पिण्याच्या पाण्याचाही अपव्यय टाळावा.

६ ऊ ३. मंडप आणि अन्नछत्र स्वच्छ ठेवा !

भोजनानंतर द्रोण, पत्रावळी, खरकटे, तसेच अन्य कचरा इतस्ततः न टाकता तो कचराकुंडीतच टाकावा.

६ ए. साधूसंत आणि भाविक यांची टिंगळटवाळी करू नका !

काही यात्रेकरूंकडून जटाधारी, हठयोगी, नग्न आदी साधूंची, तसेच मुंडन केलेल्या भाविकांची चेष्टा वा निंदा केली जाते. असे करणे पुढील कारणांसाठी अयोग्य ठरते.

१. साधूनिंदा हा महापातक ठरणारा अपराध आहे, असे धर्मशास्त्र सांगते.

२. तीर्थक्षेत्री मुंडन करणे, हा एक विधी आहे. हा विधी करणार्‍याची निंदा करणे,
म्हणजे धर्मशास्त्राचीच निंदा करण्याचे पातक करणे होय.

६ ऐ. कुंभक्षेत्री होणारे देवतांचे विडंबन रोखा !

देवतांचे विडंबन रोखण्यासाठी प्रयत्न करणे, हे एक प्रकारचे धर्मपालनच आहे. यासाठी पुढील कृती करा.

१. देवतांचे चित्र असणारी उत्पादने (उदा. खोक्यावर देवतेचे चित्र असलेली मिठाई, उदबत्ती पुडा आदी) विकत घेऊ नका. अशा उत्पादनांचा उपयोग संपला की, त्यांची वेष्टने बहुधा पायदळी येतात किंवा कचर्‍यात टाकली जातात.

२. देवतांची चित्रे किंवा ‘ॐ’ सारखे धर्मचिन्ह असलेले कपडे परिधान करू नका. अशा कपड्यांचा धुतांना चोळामोळा होतो किंवा त्यांवर डाग पडू शकतात.

३. देवतांची वेशभूषा करून भीक मागणार्‍यांचे किंवा तसे करणार्‍या बहुरूप्यांचे प्रबोधन करून त्यांना तसे करण्यापासून परावृत्त करा ! प्रबोधन करूनही देवतांचे विडंबन करणार्‍यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याच्या कारणावरून पोलिसांत तक्रार करा !

संदर्भ : साप्ताहिक ‘सनातन प्रभात’  आणि  सनातन – निर्मित ग्रंथ ‘कुंभमेळ्याचे महत्त्व आणि पावित्र्यरक्षण’

Leave a Comment