आवार (जिल्हा जळगाव) येथे ‘ज्ञानशक्ती वाचनालया’चे उत्साहात उद्घाटन !

जळगाव – आपल्या ऋषिमुनींनी जीवनातील प्रत्येक अंगाचा साकल्याने विचार करून प्रत्येक प्राणीमात्राचे जीवन आनंदी व्हावे, यासाठी जे ज्ञान मानवजातीला दिले, त्या ज्ञानावर आधारित, म्हणजेच आरोग्य, आयुर्वेद, बालसंस्कार, व्यक्तीमत्त्व विकास, भारतीय संस्कृती, आचारधर्म, आहार, तसेच हिंदु धर्म आदींविषयीची सनातनची अमूल्य अशी ग्रंथसंपदा जळगाव जिल्ह्यातील आवार गावात उपलब्ध झाली आहे. येथील ग्रामस्थांनी या ज्ञानशक्तीचा अवश्य लाभ घ्यावा आणि जीवनाचे सार्थक करून घ्यावे, असे मार्गदर्शनपर उद्गार सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी आवार येथे आयोजित कार्यक्रमात केले.

येथे ‘ज्ञानशक्ती वाचनालया’च्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक प्रशांत जुवेकर यांनीही उपस्थितांना संबोधित केले.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘पहिल्या ज्ञानशक्ती वाचनालयाचे’ उद्घाटन जळगाव जिल्ह्यातील आवार या गावात करण्यात आले. या वाचनालयात सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संकलित केलेले विविध विषयांवरील ग्रंथ ठेवण्यात आले असून हे ग्रंथालय ग्रामस्थांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे. लवकरच ८ गावांत असे ज्ञानशक्ती वाचनालय चालू करण्यात येणार आहे.

सद्गुरु नंदकुमार जाधव

सद्गुरु नंदकुमार जाधव पुढे म्हणाले, ‘‘इंग्रजाळलेल्या शिक्षणपद्धतीमुळे आज हिंदु समाजाची झालेली हानी भरून निघणार नाही. चारित्र्यवान नागरिक घडवण्यासाठी हिंदु धर्माची ज्ञानशक्ती पुढच्या पिढीपर्यंत पोचवणे आवश्यक आहे. ते या ग्रंथांमुळे साध्य होईल. या ज्ञानशक्तीचा लाभ संपूर्ण गावाला होईल. या ग्रंथांतील चैतन्यामुळे, तसेच यांतील ज्ञानामुळे गावातील एकोपा वाढीस लागेल. युवकांना योग्य दिशा मिळाल्याने व्यसनाधीनता अल्प होण्यास साहाय्य होईल. लहान मुलांना ‘जीवनात योग्य आदर्श कोणते असावेत’, हेही लक्षात येईल, तसेच सर्वांत महत्त्वाचे म्हणजे योग्य साधना करून अल्पावधीत मनुष्यजन्माचे सार्थक करता येईल.’’

 

सहकार्य !

१. या उपक्रमास आवारचे सरपंच श्री. गोकुळ कोळी आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी सहकार्य केले.

२. चौधरी ट्रान्सपोर्टचे धर्मप्रेमी श्री. मयुर चौधरी आणि श्री. उत्तम चौधरी यांनी या ग्रंथालयात ठेवण्यासाठी ग्रंथ प्रायोजित करून दिले.

 

आवाहन

अन्य कुणाला त्यांच्या गावात असे ज्ञानशक्ती वाचनालय चालू करण्याची इच्छा असल्यास त्यांनी ९५५२४२६४३९ या भ्रमणभाष क्रमांकावर अवश्य संपर्क साधावा.

– श्री. प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती, जळगाव

Leave a Comment