अनुक्रमणिका
आयुर्वेदात ज्वर म्हणजे ताप या व्याधीसाठी चिकित्सा सूत्र (लाईन ऑफ ट्रिटमेंट) या लेखात दिले आहे.
लङ्घनं स्वेदनं कालो यवाग्वस्तिक्तको रस: ।
– चरक संहिता, चिकित्सास्थान, अध्याय ३, श्लोक १४२
अर्थ : ताप येत असतांना लंघन (उपाशी रहावे), स्वेदन (घाम येईपर्यंत शेक घ्यावा), काही काळ वाट पहावी, पेज आणि कडू रस घ्यावा.
ज्वरादौ लङ्घनं प्रोक्तं ज्वरमध्ये तु पाचनम् ।
ज्वरान्ते भेषजं दद्याज्ज्वरमुक्ते विरेचनम् ।।
– भावप्रकाश, मध्यखण्ड, प्रकरण ८, श्लोक २४
अर्थ : ताप येण्यास प्रारंभ झाला असतांना लंघन करावे (उपाशी रहावे), तापात पचनशक्ती वाढवणारी औषधे द्यावीत, ताप उतरण्यास प्रारंभ झाला की, तो समूळ नष्ट होण्यासाठी औषध द्यावे आणि ताप येण्याचे पूर्णपणे थांबल्यावर विरेचन (जुलाबाचे औषध) द्यावे, असे सांगितले आहे.
परिपक्वेषु दोषेषु सर्पिष्पानं यथाऽमृतम् ।
– चरकसंहिता, चिकित्सास्थान, अध्याय ३, श्लोक १६५
अर्थ : तापामध्ये वात, पित्त आणि कफ हे दोष कमी झाले असता तूप पिणे हे अमृतासमान आहे.
१. लंघन (उपाशी रहाणे)
वैद्यांचे मार्गदर्शन, प्रत्येकाची स्वतःची शक्ती आणि तापाची तीव्रता यांनुसार तापामध्ये ३, ६, ८, १०, १२, १४, २१, २४ दिवसांपर्यंत उपवास करावा. याचे स्वरूप म्हणजे रुग्णाने फक्त एक चतुर्थांश आटवलेले पाणी दिवसभर थोडे थोडे अनुमाने प्रत्येक घंट्याला १०० मिली जोपर्यंत जागे आहोत, तोपर्यंत पीत रहावे. झोप लागली, तर मुद्दाम उठून पाणी पिऊ नये. तापात अन्न अजिबात नाही, तसेच चहा, दूध, कॉफी, सरबत, फळांचे रस, अंघोळ, बाहेर फिरणे, बाहेरचा वारा, पंखा, कूलर, वातानुकूलन यंत्राचा वारा संपूर्णपणे टाळणे आवश्यक आहे. यात संहितेत सांगितलेले षडं्गपानीय कल्पना म्हणजे मुस्ता, पर्पट, वाळा, चंदन, उदीच्य आणि सुंठ इत्यादी सहा औषधांनी सिद्ध केलेले पाणी देऊ शकतो. थोडक्यात अलगीकरण (क्वारंटाईन) केल्याप्रमाणे रुग्णाने फक्त पाण्यावर राहून स्वतःला इतरांपासून वेगळे करावे म्हणजे कुठलाच खाण्या-पिण्याचा मोह होत नाही.
साधारणपणे ३ दिवसांचा उपवास झाला की, कुठलाही ताप कितीही तीव्रतेचा असला, तरी तो न्यून होत जातो. या कालावधीत अशक्तपणा, उलटी, जुलाब, डोकेदुखी, सर्दी, अंगदुखी यांसारखी लक्षणे होतात. या कुठल्याही लक्षणावर औषध किंवा उपचार करू नये; कारण हा उपचाराचा एक भाग आहे. काही रुग्णांचे ताप यापेक्षा जास्त दिवस उपवास करून उतरू शकतात, अशा रुग्णांना ६ ते ८ दिवसांपर्यंत उपवास करायला सांगून तितके दिवस पाणी किंवा षड्ंगपानीय देऊ शकतो.
२. स्वेदन (घाम येईपर्यंत शेक घेणे)
रुग्णाला जर अंगदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, डोकेदुखी किंवा छातीत कफ असेल, तर त्याला तापाची तीव्रता बघून त्या त्या अवयवांसाठी स्वेदन म्हणजे शेक घेणे करू शकतो. यात छातीत कफ असेल, तर नाडी स्वेद म्हणजे कूकरला नळी जोडून त्यातील वाफेने घाम येईपर्यंत शेक घेणे. रुग्ण अलगीकरणात असेल, तर घरच्या घरी रबरी पिशवीने किंवा तव्यावर कापड ठेवून शेक घेऊ शकतो. छातीत कफ असेल, तर जाड्या मीठाने किंवा वाळूने शेक घेऊ शकतो. तापात अग्नीविरहित स्वेद म्हणजे घाम येईपर्यंत भरपूर पांघरुणे अंगावर घेऊन झोपून रहाणे. ज्या रुग्णाकडे शेक घेण्यासाठी साधन उपलब्ध नाही, अशा रुग्णांना अग्नीविरहित स्वेद देऊ शकतो.
३. कालो (काळ)
अर्थात् काळ म्हणजे थांबणे आणि वाट पहाणे (वेट अँड वॉच), हाही उपचाराचा भाग आहे. लंघनाच्या अंतर्गत आपण बघितले आहेच की, ठराविक काळापर्यंत रुग्णाला पाण्यावर ठेवायचे आहे. यात उद्देश असा आहे की, जोपर्यंत रुग्णाला शौचास साफ होऊन मलशुद्धी होणे, कडकडून सहन होण्यासारखी भूक लागणे, पाणी पिऊनही तहान लागणे, अंगातील कपडे किंवा बिछान्यावरील कापड (बेडशीट) घाम येऊन ओलेचिंब होणे, अंग हलके होणे, उत्साह वाटणे, ताप संपूर्ण जाणे ही लक्षणे होत नाहीत, तोपर्यंत जठराग्नी स्वस्थानी आलेला नाही, असे समजावे. म्हणून काळ हाच उपचार करणे.
४. यवागू (पातळ पदार्थ जसे कण्हेरी, पेज इत्यादी)
म्हणजे जेव्हा रुग्णाला ताप उतरून भूक लागायला लागते, रुग्णाने उपवासाचा कालावधी पूर्ण केला आहे, अशा वेळेला रुग्ण प्रथम काहीतरी खाण्यासाठी मागतो, तेव्हा भाताची पातळ पेज, कडधान्याचे कढण, कारल्याचे सूप इत्यादी आहार प्रकार क्रमाक्रमाने देऊ शकतो. उदा. एखाद्या रुग्णाने ३ दिवसांचा उपवास केल्यावर त्याचा ताप पूर्ण गेला, तर त्याला ४ थ्या दिवशी कडधान्याचे कढण द्यावे, ५ व्या दिवशी भाताची पातळ पेज, सहाव्या दिवशी कारल्याचे सूप, ७ व्या दिवशी मऊ भात, आणि ८ व्या दिवशी वरण भात या पद्धतीने देऊ शकतो.
५. तिक्तको रस (कडू रस देणे)
यात ज्वर संपूर्ण उतरल्यावर ज्वरनाशक असा कडूरस देणे. यात प्रामुख्याने कडू रसाची औषधे, जसे की गुळवेल, काडेकिराईत, नागरमोथा, कडू पडवळ, कडुनिंब इत्यादींचे चूर्ण किंवा काढे देऊ शकतो.
६. ज्वरान्ते विरेचन (ताप पूर्ण उतरल्यावर जुलाबाचे औषध देणे)
ताप पूर्ण उतरल्यावर जेव्हा रुग्ण थोडा थोडा हलका आहार घेण्यास प्रारंभ करतो आणि तो आहार त्याला पचायला लागतो, तेव्हा ताप पुन्हा उलटू नये म्हणून विरेचन अर्थात् जुलाबाचे औषध द्यायचे आहे. रुग्णाचे बल पाहून अशा वेळेला प्रामुख्याने मृदुविरेचन जसे की, आरग्वधशिम्बी फांट, कटुकी, त्रिफळा इत्यादी वापरू शकतो. मलशुद्धी आणि प्रकृतीप्रमाणे अग्नीबळ प्राप्त झाल्याची लक्षणे दिसेपर्यंत विरेचन देऊ शकतो. ही लक्षणे साधारणपणे ३ ते ६ दिवसांत दिसायला लागतात.
७. ज्वर मुक्ते सर्पिष पानं (ताप येणे पूर्णपणे थांबल्यावर आहारातून तूप देणे)
विरेचन व्यवस्थित झाल्यावर रुग्णाचे बळ वाढवण्यासाठी त्याला भरपूर प्रमाणात तूप खाण्यासाठी द्यावे. यात रुग्णाला शक्यतो आहारातून तूप खाण्यास प्रोत्साहन द्यावे. तूप आवडत नसल्यास रुग्णाची प्रकृती आणि आवड बघून त्या प्रकारच्या औषधांनी सिद्ध केलेले तूप औषध म्हणून देऊ शकतो. उदा. एका रुग्णाला तूप आवडत नाही; परंतु तिखट खायला आवडते, तर अशा रुग्णाला तिखट औषधे जसे की सुंठ, पिंपळी, मिरी यांसारख्या औषधांनी सिद्ध केलेले तूप औषध म्हणून ३० मिली-६० मिली मात्रेपर्यंत दिवसभरात आहारासह देऊ शकतो. याप्रमाणे तूप खाणे हे किमान ७ दिवस तरी करावे.
जर वैद्यांनी याप्रमाणे चिकित्सा केली, तर कोरोना ज्वर असो किंवा कुठलाही ज्वर असो रुग्णाची गंभीर परिस्थिती उद्भवणे, रुग्णाला रुग्णालयात भरती करायची वेळ येणे याची शक्यता खूप न्यून होऊ शकते. ज्वरामध्ये मृत्यू सांगितला असल्यामुळे सर्व रुग्ण याप्रमाणे बरेच होतील, याची कुठलीही शाश्वती कुणीच देऊ शकत नाही. आयुर्वेद चिकित्सा करणार्या वैद्यांना संहितेत सांगितलेली चिकित्सा आप्तोपदेश (आप्तांनी म्हणजे ऋषीमुनींनी सांगितलेला उपदेश) प्रमाण मानून करण्याची प्रेरणा होवो, हीच भगवान धन्वन्तरिच्या चरणी प्रार्थना !
– वैद्य मंदार श्रीकांत भिडे, आयुर्वेदाचार्य, रत्नागिरी
टीप : हा लेख आयुर्वेदानुसार चिकित्सा करणार्या वैद्यांसाठी आहे. सदर चिकित्सेसह शासनाने प्राधिकृत केलेली वैद्यकीय चिकित्सा आणि औषधे घेणे टाळू नये. अन्य सर्व उपाययोजना पाळाव्यात, तसेच स्थळ, काळ आणि प्रकृती यांनुसार चिकित्सेत पालट होऊ शकतो. त्यामुळे योग्य त्या वैद्यांचा सल्लाही घ्यावा. |