कुंभमेळा म्हणजे हिंदूंची सर्वांत मोठी धार्मिक यात्रा ! बहुतेकांना कुंभमेळा म्हणजे काय, त्यांचे अंतरंग स्वरूप, साधूंचे आखाडे इत्यादींविषयी कुतूहल असते. ही धर्मजिज्ञासा लक्षात घेऊन सर्वांसाठी हा लेख प्रसिद्ध करत आहोत.
अनुक्रमणिका
अ. हिंदूंच्या सांस्कृतिक एकतेचे खुले व्यासपीठ !
आ. कोट्यवधी भाविक हीच व्याप्ती
इ. भाविकांचे देहभान हरपवून त्यांच्यात विरक्तभाव जागृत करणारा गंगास्नानाचा ध्यास !
ए. अन्नछत्रांच्या माध्यमांतून उच्चनीचता विसरायला लावणारा भक्तांचा मेळा !
कुंभमेळ्याविषयीचा लघुपट पहा !
अंनिसवाल्यांना चपराक देणारा श्रद्धेचा मेळा !
प.पू. डॉ. जयंत आठवले
‘प्रयाग (अलाहाबाद) येथील कुंभमेळ्याला कोणत्याही निमंत्रणाविना, तसेच प्रसारमाध्यमांतून विज्ञापन वा प्रवासव्ययात सूट, आर्थिक अनुदान आदी नसतांना ५ कोटींहून अधिक भाविक येतात, याचे मुख्य कारण म्हणजे हिंदूंची धर्मश्रद्धा होय. गंगामाता आणि पवित्र त्रिवेणी संगमावरील तीर्थ यांच्यावरील श्रद्धेपोटी हिंदू समाज साधूसंतांसह एवढ्या मोठ्या संख्येने तेथे एकत्रित येतो. एकाही अहिंदू पंथात एवढ्या मोठ्या संख्येने भाविक जमत नाहीत किंवा कधी जमल्याचे वृत्त ऐकिवात नाही. ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’सारख्या नास्तिकवादी संघटनाही श्रद्धाहीन नास्तिकांचे एवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्रीकरण तर सोडाच; पण निमंत्रण देऊन १०० लोकांचेही एकत्रीकरण करू शकत नाहीत. यावरून हिंदु धर्माचे अदि्वतीयत्व लक्षात येते.’
– प.पू. डॉ. जयंत आठवले (निज भाद्रपद कृष्ण पक्ष सप्तमी, कलियुग वर्ष ५११४ (७.१०.२०१२))
१. कुंभमेळा
कुंभमेळा म्हणजे जगातील सर्वांत मोठी धार्मिक यात्रा ! कुंभमेळा हे भारताच्या सांस्कृतिक महत्तेचे केवळ दर्शन नव्हे, तर संतसंग देणारे आध्यात्मिक संमेलन आहे. कुंभपर्वाच्या निमित्ताने प्रयाग, हरद्वार (हरिद्वार), उज्जैन आणि त्र्यंबकेश्वर-नाशिक या चार क्षेत्री प्रत्येक १२ वर्षांनी भरणार्या यात्रेला हिंदु जीवनदर्शनात महत्त्वपूर्ण स्थान आहे. कुंभमेळ्याचे आध्यात्मिक माहात्म्य आणि सांस्कृतिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. गुरूला राशीचक्र भोगण्यास १२ वर्षे लागत असल्यामुळे प्रत्येक १२ वर्षांनी कुंभयोग येतो. गुरु कन्या राशीत असतांना ‘कन्यागत’, सिंह राशीत असतांना ‘सिंहस्थ’ आणि कुंभ राशीत असतांना ‘कुंभमेळा’ अशा तीन मोठ्या पर्वणी हिंदु धर्मदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जातात. तेथे गंगास्नान, साधना, दानधर्म, पितृतर्पण, श्राद्धविधी, संतदर्शन, धर्मचर्चा इत्यादी धार्मिक कृती करण्यासाठी कोट्यवधी भाविक येतात. हा श्रद्धावानांचा मेळाच आहे. केवळ भाविकच नव्हे, तर देवता, ऋषी, संत अन् तेहतीस कोटी तीर्थे कुंभपर्वास येतात, हे सारे अदि्वतीय आहे. ‘हिंदूऐक्य’ हा कुंभमेळ्याचा उद्घोष आहे. कुंभमेळ्यातून हिंदूंची धार्मिक अन् सांस्कृतिक अमरता प्रतीत होते. हा मेळा परदेशी नागरिकांना हिंदु धर्माच्या अंतरंगाचे दर्शन घडवतो. कुंभमेळ्यात धर्मश्रद्धायुक्त आचरण करणार्या भाविकांनाच कुंभपर्वाचा खर्या अर्थाने आध्यात्मिक लाभ होतो.
१. मानवी देहाचे प्रतीक असलेला कुंभ !
‘कुंभ म्हणजे मातीचा घडा (मडके) ! माणसाच्या शरिराला ‘पार्थिव’ (पृथ्वीतत्त्वप्रधान) म्हणतात. शरीर मातीपासून निर्माण झाले आहे आणि मृत्यूनंतर मातीतच विलीन होत असते; म्हणून कुंभाला, अर्थात् घड्याला मानवी देहाचे प्रतीक मानले आहे.
२. पाप, वासना आणि कामक्रोधादी विकार
यांनी भरलेले देहरूपी कुंभ रिकामे करण्याचा काळ म्हणजे कुंभमेळा !
‘आपण देवाचे लाडके आहोत’, ‘देव आपल्याशी बोलतो’, ‘आपल्यासह नाचतो’, या विचारांचा संत नामदेवांना अहंकार होता. म्हणूनच संतांच्या सभेत संत मुक्ताबाई म्हणाली, ‘‘नामदेवाचे मडके (कुंभ) अहंकाराने भरलेले आहे. म्हणून नामदेव अजून कच्चाच राहिला आहे.’’ आपल्या सर्वांचीही मडकी (कुंभ) ही कच्चीच आहेत; कारण आपले रूप, श्रीमंती, कर्तृत्व इत्यादींचा अथवा यांपैकी एकाचा आपल्याला अहंकार असतो. तसेच आपले मन कामक्रोधादी अनेक स्वभावदोषांनी भरलेले असते. असे आपले अनेक पापांनी, वासनांनी, कामक्रोधादी विकारांनी भरलेले देहरूपी कुंभ रिकामे करण्याचे सर्वोत्तम स्थळ आणि काळ म्हणजे कुंभमेळा !
३. साधनेचे १,००० पट फल देणारे कुंभपर्व !
कुंभमेळ्याच्या स्थळ आणि काळात केलेल्या दानादी सर्व धार्मिक कृतींचे आणि नामस्मरणादी साधनेचे फळ इतर स्थळ-काळाच्या तुलनेने १,००० पट अधिक मिळते. कुंभमेळ्यात अनेक देवता, ब्रह्मज्ञानी, तसेच विविध योगमार्गांतील साधूसंत एकत्र येत असल्याने त्यांचा सत्संग आणि मार्गदर्शन यांचा लाभ अल्पावधीत अन् एकाच ठिकाणी मिळतो; म्हणून कुंभमेळा म्हणजे भगवंताने आपली शीघ्र गतीने आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी दिलेली सुवर्णसंधी होय.
२. कुंभमेळ्याची वैशिष्ट्ये
अ. हिंदूंच्या सांस्कृतिक एकतेचे खुले व्यासपीठ !
प्रयागराज (अलाहाबाद), हरद्वार (हरिद्वार), उज्जैन आणि त्र्यंबकेश्वर-नाशिक या चार ठिकाणी भरणार्या कुंभमेळ्यांच्या निमित्ताने धर्मव्यवस्थेने चार खुली व्यासपिठे हिंदू समाजाला उपलब्ध करून दिली. कुंभमेळ्याची ही चार क्षेत्रे म्हणजे चार दिशांची प्रतिके होत. वाहतुकीच्या आधुनिक साधनांचा शोध लागण्याच्या पूर्वीपासून हे कुंभमेळे भरत आहेत. त्या वेळी भारताच्या चारही दिशांतून एकत्र येणे, ही सहजसाध्य गोष्ट नव्हती. म्हणूनच हे कुंभमेळे भारतीय एकतेचे प्रतीक आणि हिंदू संस्कृतीमधील समानतेचे सूत्र ठरतात.
आ. कोट्यवधी भाविक हीच व्याप्ती
प्रयाग येथील महाकुंभमेळ्याला न्यूनतम ५ कोटी श्रद्धाळू गंगास्नानासाठी येतात, तर हरद्वार (हरिद्वार), उज्जैन आणि त्र्यंबकेश्वर-नाशिक येथील कुंभमेळ्यांना १ ते २ कोटी भाविकांची उपस्थिती असते. या मेळ्यांत जैन, बौद्ध आणि शीख या पंथांचे अनुयायीही सहभागी होतात. प्रयागच्या कुंभमेळ्यातील भाविकांच्या उपस्थितीची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये झाली आहे.
केवळ पंचांगाद्वारे १२ वर्षांनी
एकदा येणार्या पवित्र कुंभमेळ्याची माहिती आधीच देऊन
कोट्यवधी हिंदूंना आमंत्रणाविना एकत्र करू शकणारा प्राचीन हिंदु धर्म !
‘वर्ष १९४२ मध्ये भारताचे व्हॉईसराय लॉर्ड लिनलिथगो यांनी पं. मदनमोहन मालवीय यांच्यासमवेत प्रयाग येथील कुंभमेळा विमानातून पाहिला. ते लक्षावधी श्रद्धाळूंच्या जनसागरास पाहून आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी उत्सुकतेने पं. मालवीय यांना प्रश्न विचारला, ‘‘या कुंभमेळ्यात लोकांना सहभागी करण्यासाठी आयोजकांना भरपूर परिश्रम करावे लागले असतील ना ? आयोजकांना या कामासाठी किती व्यय (खर्च) आला असेल ?’’ पं. मालवीय यांनी उत्तर दिले, ‘‘केवळ दोन पैसे !’’ हे उत्तर ऐकून लॉर्ड लिनलिथगो यांनी पं. मालवीय यांना प्रतिप्रश्न केला, ‘‘पंडितजी, आपण चेष्टा करत आहात ?’’ पं. मालवीय यांनी खिशातून पंचांग काढले आणि ते लॉर्ड लिनलिथगो यांच्या हातात देत म्हणाले, ‘‘याचे मूल्य केवळ दोन पैसे आहे. यातून जनसामान्यांना समजते की, कुंभपर्वाच्या पवित्र कालखंडाची वेळ कोणती आहे ? त्यानुसार सर्व जण त्या वेळी स्नानासाठी स्वतःहून उपस्थित रहातात. कोणाही व्यक्तीस व्यक्तीशः निमंत्रण दिले जात नाही.’’ (‘केशव संवाद’, २७.७.२००७)
इ. भाविकांचे देहभान हरपवून त्यांच्यात विरक्तभाव जागृत करणारा गंगास्नानाचा ध्यास !
‘कुंभमेळ्यात ‘कोणी काय परिधान केले आहे’, याकडे कोणाचेही लक्ष नसते. एखादा नग्न साधू स्वतःच्या आखाड्यासह गंगेमध्ये उडी घेतो, तेव्हा ते दृश्य अतिशय चांगले वाटते. येथे स्त्री-पुरुष असा लिंगभेद विसरायला होतो आणि कामवासनेचा विचार, तर दूरच रहातो. ‘ही व्यक्ती नग्न आहे कि वस्त्रांकित’, हा विचारही मनाला शिवत नाही ! स्नानानंतर स्वतःच्या साड्या वाळवतांना अनेक स्त्रिया दृष्टीस पडतात; पण त्यांच्याकडेही कोणाचे लक्ष जात नाही. कामशास्त्राच्या अभ्यासकांनी कुंभमेळ्याला अवश्य भेट द्यावी. येथील वातावरणात मनात कामवासना निर्माणच होऊ शकत नाहीत, याचा अभ्यास त्यांना आव्हानात्मक वाटेल ! कुठेही बलात्कार नाही, असभ्य वर्तन नाही, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न नाही ! गंगेत स्नान करायला मिळावे, हा एकच ध्यास सर्वांना असतो.’ (दैनिक ‘लोकसत्ता’, ६.२.२००१)
ई. ‘पवित्र स्नाना’च्या (‘शाही स्नाना’च्या) निमित्ताने घडणारे
साधूसंतांची सशस्त्र मिरवणूक आणि भाविकांची निस्सीम भक्ती यांचे दर्शन !
ई १. आखाड्यांतील साधूंचे पर्वकाळातील पवित्र स्नान (शाही स्नान)
कुंभमेळ्यात पर्वणीच्या दिवशी विविध आखाड्यांतील साधूसंतांनी ठरवून घेतलेल्या क्रमाने स्वतःच्या आखाड्यातील सहसंत अन् शिष्य यांच्यासह स्नान करणे, याला ‘पवित्र स्नान (शाही स्नान)’ म्हणतात.
ई २. ‘पवित्र स्नाना’साठी आखाड्यांतील साधूसंतांची शस्त्रांसह निघणारी मिरवणूक !
पहाटे चार वाजण्याच्या सुमारास कुंभमेळ्याच्या ‘पवित्र स्नाना’स आरंभ होतो. ‘पवित्र स्नाना’ला जाण्यासाठी आखाड्यांतील साधूसंतांची शस्त्रांसह मिरवणूक निघते, तेव्हा रस्त्याच्या दोन्ही अंगांनी अफाट जनसमुदाय जमतो. स्थानिक भाविक लोक आधीच मिरवणुकीचा मार्ग रांगोळ्या आणि फुलांच्या पाकळ्या यांनी सजवतात. त्यानंतर या मार्गावरून एक-एक आखाडा, त्यांचे संतमहंत आणि शिष्य, हत्ती, उंट, घोडे अशा परिवारासह थाटात आणि वाद्यांच्या तालावर पवित्र तीर्थाकडे जातात. काही स्वामी हत्तीवरून, तर काही ट्रॅक्टर ट्रॉलीवर उभारलेल्या रथावर आरूढ झालेले असतात. त्यांचे अनुयायी त्यांच्या मस्तकावर छत्र धरतात, तर भाविक त्यांच्यावर फुले उधळतात. या वेळी ढोल, ताशे, नगारे इत्यादी वाद्यांचे नाद आणि ‘हर हर शंकर, गौरी शंकर, हर हर महादेव ।’ आणि ‘जय गंगामैयाकी जय ।’ या घोषणा दुमदुमतात. अंगाला भस्म फासलेले सहस्त्रो नग्न साधू गळ्यात फुलांच्या माळा, हातात तळपत्या तलवारी किंवा इतर शस्त्रे आणि ध्वजपताका घेतात. अंगाला भस्म फासल्यामुळे अमानवी आकृत्या वाटत असलेले सहस्त्रांहून अधिक नागा साधू ‘हर हर महादेऽऽव’, ‘हर हर गंगेऽऽ’, असा घोष करतात, तेव्हा आपण एखादे जिवंत चित्र पहात असल्याचा भास होतो.
ई ३. मिरवणुकीच्या वेळी भाविकांकडून घडणारे निस्सीम भक्तीचे दर्शन !
‘वर्ष १९३० मध्ये आम्ही प्रयाग येथील कुंभमेळ्यात गंगास्नान करून परतत होतो. तेव्हा काठियावाड (गुजरात) प्रांतातील अनेक भाविक स्त्रिया रस्त्याच्या दोन्ही अंगांनी बांधलेल्या दोर्या तोडून रस्त्यावर येऊ पहात होत्या. त्या वेळी नागा लोकांचा आखाडा निघत होता. तो आखाडा निघून गेल्यावर कठोर प्रतिबंध असूनही त्या स्त्रिया रस्त्यावर आल्या आणि त्यांनी त्या रस्त्यावरील धूळ स्वतःच्या मस्तकाला लावली, तसेच थोडीशी धूळ स्वतःच्या पदरात बांधली. त्यांची ती निस्सीम भक्ती धन्य होती !’ – वैकुंठजी मेहरोत्रा (‘कल्याण हिंदू-संस्कृति अंक (२४ व्या वर्षाचा विशेषांक), कल्याण कार्यालय, गोरखपूर.)
ई ४. विविध योगमार्गांतील साधूसंतांच्या दर्शनाचा अमोल लाभ म्हणजे कुंभमेळ्यातील एक महापर्वणी !
‘कुंभमेळ्यात हिमालयाच्या गुहेत ध्यानधारणा करणारे सिद्धपुरुष, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पायी प्रवास करणारे परिव्राजक (संन्यासी) आणि शस्त्रधारी आखाड्यांतील संतमहंत यांचे दर्शन होते. त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, तर लक्षात येते की, ते ज्ञानाचा आणि अनुभवांचा साक्षात् हिमालय आहेत. असे असूनही त्यांची नम्रता आणि प्रेमळ दृष्टी सर्वांना सामावून घेणार्या सागरासारखी विशाल असते.’ (पाक्षिक ‘सांस्कृतिक वार्तापत्र’, ‘महाकुंभ विशेषांक’, १५.८.२००३)
उ. कुंभमेळ्यात भाविकांच्या श्रवणभक्तीला चालना देणारे
धर्म, अध्यात्म आदी विषयांवर साधूसंतांचे रसाळ निरूपण !
कुंभमेळ्यात संतदर्शन सोहळा भाविकांच्या दर्शनभक्तीला चालना देतो, तर साधूसंतांची धर्म, अध्यात्म, रामायण, भागवत इत्यादी विषयांवरील रसाळ भाषेतील प्रवचने अन् व्याख्याने भाविकांच्या श्रवणभक्तीला चालना देतात. कुंभस्थळी अनुमाने १०,००० मंडप घातले जातात आणि त्यातील बहुतेक मंडपांत धार्मिक विषयांवर प्रतिदिन निरूपण होत असते.
ऊ. अहर्निश चालणारी अन्नछत्रे म्हणजे कुंभमेळ्यातील
भाविकांसाठी विविध संप्रदायांनी निर्माण केलेली सुविधा !
‘कुंभमेळ्यातील प्रत्येक संप्रदायाच्या मंडपामध्ये किंवा आखाड्यामध्ये असणारी सामायिक गोष्ट म्हणजे अहर्निश चालणारे भाविकांसाठीचे अन्नछत्र ! ‘जेथे अन्नछत्र चालू नाही, असा आखाडाच नसावा’, असे म्हटले तरी चालेल. कुंभक्षेत्री अशी अन्नछत्रे अनेक ठिकाणी असल्यामुळे लाखो भाविकांच्या अन्नपाण्याची व्यवस्था योग्य प्रकारे होते. अन्यथा एखाद्या पर्वस्नानाला जमणार्या ७५ लाखांहून अधिक भाविकांना त्यांच्या चुली पेटवाव्या लागल्या असत्या, तर किती मोठी भूमी लागली असती !’ – डॉ. दुर्गेश सामंत, माजी समूह संपादक, ‘सनातन प्रभात’ नियतकालिके (२८.९.२००३).
ए. अन्नछत्रांच्या माध्यमांतून
उच्चनीचता विसरायला लावणारा भक्तांचा मेळा !
‘कुंभक्षेत्री काही श्रीमंत आखाड्यांच्या वतीने अन्नछत्रे (लंगर) चालवली जातात. अन्नछत्र म्हटले की, ‘ते दरिद्री लोकांसाठी असते’, अशी सर्वसाधारण समजूत असते; पण कुंभमेळ्यातील भंडार्याला (अन्नछत्रात एकत्रित भोजन करण्याला) आध्यात्मिक अधिष्ठान आहे. येथे भिक्षेकर्याच्या मांडीला मांडी लावून कोट्यधीश असलेले भाविकही ‘देवाचा प्रसाद’ या भावाने भोजन ग्रहण करतात.’ (दैनिक ‘लोकसत्ता’, ६.२.२००१)