जळगाव – भगवंताच्या कृपेने मानवाला प्रचंड शक्तीशाली ‘मन’ मिळाले आहे; पण या मनाची शक्ती स्वभावदोष आणि अहं यांमुळे अनावश्यक मोठ्या प्रमाणात खर्च होत रहाते. वर्तमान परिस्थितीत दोष आणि अहं यांचे प्रमाण वाढल्याने मनाची बहुतांश ऊर्जा त्यात खर्च झाल्याने अनेकांचे मन दुर्बल झालेले दिसते. यातूनच पुढे आत्महत्या करण्याचे प्रयत्न केलेले दिसतात. ‘स्वभावाला औषध नाही’ म्हणतात; पण हे पूर्ण सत्य नाही. मनाची दुर्बलता नष्ट करून त्याला सबळ बनवण्यासाठी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन करणे अत्यावश्यक आहे. योग्य प्रयत्नांद्वारे आपण स्वतःमध्ये आमूलाग्र पालट करू शकतो, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या सौ. क्षिप्रा जुवेकर यांनी केले. शिक्षण प्रसारक मंडळ जळगाव अंतर्गत येणार्या ला.ना. माध्यमिक शाळेतील शिक्षकांसाठी अध्यापक प्रबोधिनी उपक्रमाअंतर्गत आयोजित कार्यक्रमात ‘होय, स्वभावाला औषध आहे !’ या विषयावर त्या मार्गदर्शन करत होत्या. या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर यांनीही संबोधित केले.
सौ. जुवेकर पुढे म्हणाल्या, ‘‘भूतकाळातील प्रसंग आणि भविष्यातील चिंता अशा अनावश्यक विचारांमध्ये मनाची ८० टक्के ऊर्जा व्यय होते. ती आपण प्रेरक कार्यासाठी वापरू शकतो. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शोधलेल्या या प्रक्रियेचा लाभ आजवर सहस्रो जणांनी घेऊन त्यांच्या स्वभावात आमूलाग्र पालट करून त्यांचे जीवन सुखकर केले आहे. एक शिक्षक अनेक विद्यार्थी घडवत असतो. हे विद्यार्थीच पुढे समाज आणि राष्ट्र निर्मितीत मोलाचे योगदान देत असतात. त्यामुळे विद्यार्थीदशेतच त्यांना दोष आणि अहं निर्मूलन यांचे बाळकडू मिळाले, तर चारित्र्यवान पिढी घडून एक सक्षम समाज निर्माण होऊ शकतो; म्हणून शिक्षकांनी स्वतः ही प्रक्रिया आत्मसात करून विद्यार्थ्यांनाही याविषयी अवगत करावे.’’
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे श्री. प्रशांत जुवेकर यांनी केले. सनातनच्या अनमोल ग्रंथसंपदेचे प्रदर्शन लावण्यासाठी पाळधी कन्या शाळेच्या माजी मुख्याध्यापिका सौ. सुवर्णा साळुंखे आणि सौ. आरती कोमटी यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाची सर्व सिद्धता ला.ना. शाळेचे मुख्याध्यापक देवीदास मोरे, पर्यवेक्षिका सौ. भारती गोडबोले आणि त्यांचे सहकारी शिक्षक यांनी केली होती.
उत्तम प्रतिसाद !
१. अनेक शिक्षकांनी पुढील कार्यक्रम घेण्यासाठी आमंत्रण दिले.
२. ‘आपल्यापैकी दोष घालवण्यासाठी प्रयत्न करायला हवे ? असे कुणाकुणाला वाटते ?’, असे सौ. जुवेकर यांनी विचारल्यावर उपस्थित सर्वच शिक्षकांनी हात वर केले.
३. या ठिकाणी लावलेल्या सनातनच्या ग्रंथप्रदर्शनालाही शिक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. काहींनी वाण देण्यासाठी लघुग्रंथ घेतले.
४. या शाळेच्या शिक्षकांनी सनातनच्या जळगावमधील सेवाकेंद्राला भेट देण्याची इच्छाही व्यक्त केली.
५. शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्त्व विकासाचे वर्ग घेण्याविषयी आयोजन करण्याची सिद्धता दर्शवली.
६. ‘पालक-शिक्षक बैठकीतही विषय मांडण्यास आमंत्रित करतो’, असे शिक्षकांनी सांगितले.