अनुक्रमणिका
- १. चित्रगुप्त मंदिर
- २. श्री कामाक्षी मंदिर
- २ अ. सत्ययुगात भंडासुराचा संहार होण्यासाठी आदिशक्तीला प्रसन्न करण्यासाठी देवी-देवतांनी पोपटाचे रूप धारण करून तपश्चर्या करणे आणि तेव्हा देवीने प्रसन्न होऊन भंडासुराचा संहार करणे
- २ आ. वेगवेगळ्या युगांत कामाक्षीची केली गेलेली उपासना
- २ इ. ‘कांची’ हे निर्गुण परब्रह्मस्वरूपिणी आदिशक्तीचे पृथ्वीवरील निवासस्थान असणे
- २ ई. ‘कामाक्षी’ या नावाचा अर्थ
- ३. एकांबरेश्वर मंदिर
- ४. पांडवदूत श्रीकृष्ण मंदिर
- ५. ज्वरहरेश्वर मंदिर
सप्तर्षींच्या आज्ञेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दीर्घायुष्यासाठी
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी
केलेल्या कांचीपूरम् (तमिळनाडू) येथील देवदर्शनाचा वृत्तांत !
‘११.३.२०२१ या दिवशी चेन्नई येथे झालेल्या १७४ व्या सप्तर्षि जीवनाडीपट्टी वाचनात पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून सप्तर्षींनी सांगितले, ‘‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दीर्घायुष्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी (११.३.२०२१ या दिवशी) संध्याकाळी कांचीपूरम् येथील चित्रगुप्त मंदिर आणि कांची कामाक्षी मंदिर येथे जाऊन दर्शन घ्यावे. कांचिपुरमला ‘भूकैलास’, असे म्हटले जाते; म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी कांचीपूरम् येथे मुक्काम करावा. दुसर्या दिवशी एकांबरेश्वर मंदिर, पांडवदूत श्रीकृष्ण मंदिर आणि ज्वरहरेश्वर मंदिर, या मंदिरांत जाऊन गुरुदेवांसाठी प्रार्थना करावी, तसेच गेल्या ५ दिवसांपासून श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ करत असलेल्या १२ लिंबांची पूजा आता पूर्ण झाल्याने ती १२ लिंबे कांचीपूरम् येथील एकांबरेश्वर मंदिरातील स्थलवृक्षाच्या खाली विसर्जित करावीत.’’ (‘सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या सर्व मंदिरांत जाऊन दर्शन घेऊन आल्या.’ – संकलक) या मंदिरांची वैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. चित्रगुप्त मंदिर
‘चित्रगुप्त’ ही यमाला साहाय्य करणारी देवता आहे. चित्रगुप्त पृथ्वीवरील मनुष्याचा पाप-पुण्याचा हिशोब ठेवतो. ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केल्यानंतर ‘मनुष्याच्या पाप-पुण्याचा हिशोब कोण ठेवणार ?’, असा प्रश्न आल्यावर शिवाने एका सोन्याच्या पत्र्यावर एका देवतेचे चित्र काढले. त्या चित्रावर शिव-पार्वतीची दृष्टी पडल्यावर त्या चित्राचे देवतेमध्ये रूपांतर झाले. ‘गुप्त’, म्हणजे हिशोब ठेवणारा. चित्रातून निर्मिती झाल्याने या देवतेला ‘चित्रगुप्त’, असे नाव आले. शिवाने चित्रगुप्ताला यमदेवतेला साहाय्य करण्याचे कार्य दिले. कांचीपूरम् सोडून पृथ्वीवर अन्य कुठेही ‘चित्रगुप्ता’चे मंदिर नाही.
२. श्री कामाक्षी मंदिर
२ अ. सत्ययुगात भंडासुराचा संहार होण्यासाठी आदिशक्तीला प्रसन्न करण्यासाठी
देवी-देवतांनी पोपटाचे रूप धारण करून तपश्चर्या करणे आणि तेव्हा देवीने प्रसन्न होऊन भंडासुराचा संहार करणे
आपल्या धर्मग्रंथांमध्ये ‘काशी’ आणि ‘कांची’, हे शिवाचे दोन नेत्र आहेत’, असे म्हटले जाते. पृथ्वीवरील मोक्ष प्रदान करणार्या सप्तपुरी, म्हणजे काशी, गया, अयोध्या, मथुरा, द्वारका, कांची, उज्जैन आणि हरिद्वार. यांमध्ये ‘कांचीपूरम्’ एक आहे. कांचिपुरमला ‘भूकैलास’, असेही म्हटले आहे. सत्ययुगात भंडासुराचा संहार होण्यासाठी आदिशक्तीला प्रसन्न करावे लागणार होते. आदिशक्ति कामाक्षी गुह्य रूपात कांचीनगरीत निवास करत असल्याने सर्व देवी-देवतांनी पोपटाचे रूप धारण करून देवीच्या स्थानाजवळ असलेल्या चंपक वृक्षावर राहून तपश्चर्या केली. तेव्हा देवी प्रसन्न झाली आणि तिने देवतांना ‘पद्मासनास्थ’ आणि ‘चतुर्भुज’ या रूपांत दर्शन दिले. पुढे देवीने भंडासुराचा संहार केला.
२ आ. वेगवेगळ्या युगांत कामाक्षीची केली गेलेली उपासना
१. त्रेतायुगात श्रीरामाने कांचीला येऊन कामाक्षीची पूजा केली.
२. नंतर द्वापरयुगात दुर्वासऋषींनी देवीची उपासना केली. त्यांनी देवीची श्रीचक्राच्या रूपात उपासना केली आणि देवीवर अनेक स्तोत्रे लिहिली.
३. कलियुगात २ सहस्र ६०० वर्षांपूर्वी आद्य शंकराचार्यांनी देवीची श्रीयंत्राच्या रूपात पूजा करण्याच्या पद्धतीचा प्रारंभ केला. त्यांनी ‘देवीला कुंकूमार्चन करणे आणि नंतर ते कुंकू भक्तांना देवीचा प्रसाद म्हणून देणे’, ही पद्धत आरंभली.
२ इ. ‘कांची’ हे निर्गुण परब्रह्मस्वरूपिणी आदिशक्तीचे पृथ्वीवरील निवासस्थान असणे
कांचिपुरममध्ये कामाक्षीदेवी परब्रह्मस्वरूपिणी आहे; म्हणून येथे देवीच्या मंदिरात शिवमंदिर नाही. हयग्रीव भगवान अगस्तिऋषींना सांगतात, ‘‘निर्गुण परब्रह्मस्वरूपिणी आदिशक्तीचे पृथ्वीवरील निवासस्थान, म्हणजे ‘कांची’ होय. या स्थानी आदिशक्ती स्वयं कामाक्षीरूपात विराजमान आहे.’’
२ ई. ‘कामाक्षी’ या नावाचा अर्थ
का + मा + अक्षी = कामाक्षी. यातील ‘का’ म्हणजे ‘काली’ आणि ‘मा’ म्हणजे ‘मातंगी’ होय. अक्ष म्हणजे डोळा. ‘कामाक्षी’ या नावाचा अर्थ आहे, ‘जिच्या एका डोळ्यात ‘काली’ची आणि दुसर्या डोळ्यात ‘मातंगी’ची शक्ती आहे अन् जी केवळ दृष्टीक्षेपानेच आपल्या भक्तांचे कल्याण करते, ती देवी.’ ती कामेश्वर शिवाची शक्ती आहे.
३. एकांबरेश्वर मंदिर
३ अ. दक्षिण भारतातील पंचमहाभूतांशी संबंधित शिवाची मंदिरे
दक्षिण भारतात प्रत्येक पंचमहाभूताशी संबंधित शिवाचे एक मंदिर आहे. पृथ्वीतत्त्वाशी संबंधित कांचीपूरम् येथील एकांबरेश्वर मंदिर, आपतत्त्वाशी संबंधित तिरुचिरापल्ली येथील जंबुकेश्वर मंदिर, अग्नितत्त्वाशी संबंधित तिरुवण्णमलई येथील अरुणाचलेश्वर मंदिर, वायुतत्त्वाशी संबंधित कालहस्तीचे कालहस्तीश्वर मंदिर आणि आकाशतत्त्वाशी संबंधित चिदंबरम् येथील चिदंबरेश्वर मंदिर.
३ आ. एकांबरेश्वर मंदिराचा इतिहास
कांचीपूरम् येथील एकांबरेश्वर मंदिरातील शिवलिंगाला ‘पृथ्वीलिंग’, असेही म्हणतात; कारण हे लिंग वाळूचे आहे. देवी पार्वतीने या मंदिरात आंब्याच्या वृक्षाखाली तपश्चर्या केली होती. त्या वेळी तिने वाळूचे एक लिंग सिद्ध केले. या मंदिरात ५ सहस्र वर्षे प्राचीन आंब्याचा एक वृक्ष आहे. या वृक्षाची ‘स्थलवृक्ष’ म्हणून पूजा केली जाते. ‘एक + आम्र + ईश्वर = एकांबरेश्वर’, अशी ‘एकांबरेश्वर’ या शब्दाची व्युत्पत्ती आहे.
४. पांडवदूत श्रीकृष्ण मंदिर
४ अ. श्रीकृष्ण पांडवांचा दूत झाल्याने त्याला ‘दूतहरि’, असे नाव पडणे
भगवान श्रीविष्णूची १०८ दिव्य स्थाने आहेत. त्यांना ‘दिव्यदेशम्’, असेही म्हणतात. यांतील १०६ दिव्यदेशम् पृथ्वीवर आहेत, तर उर्वरित २ वैकुंठलोकात आहेत. पृथ्वीवर असलेल्या १०६ दिव्यदेशम् पैकी १७ स्थाने कांचीपूरम् येथे आहेत. यांतील एक म्हणजे ‘पांडवदूत श्रीकृष्ण मंदिर.’
श्रीकृष्ण पांडवांचा दूत बनून दुर्याेधनाकडे जातो. श्रीकृष्ण ज्या ठिकाणी बसणार, त्या ठिकाणी भूमीच्या खाली दुर्याेधन आधीच एक खोली बनवून ठेवतो. तो भूमीवर एक छान बिछाना घालतो आणि त्यावर रत्नाचे सिंहासन ठेवतो. दुर्याेधनाने भूमीखालच्या खोलीत अनेक कुस्तीपटूंना ठेवले होते. दूत बनून आलेल्या श्रीकृष्णालाच बंदी बनवण्याचा त्याचा कट होता; मात्र श्रीकृष्ण दुर्याेधनाकडे गेल्यावर सिंहासनावर बसतो. त्या वेळी ते सिंहासन भूमीच्या खाली जाते. भूमीच्या खाली गेल्यावर श्रीकृष्ण तेथील कुस्तीपटूंशी लढतो आणि नंतर त्याच ठिकाणी तो विश्वरूप धारण करतो. साक्षात् भगवंत दूत झाल्याने त्याला ‘दूतहरि’, असे नाव पडले.
४ आ. राजा जनमेजयाने कांचिपुरममध्ये
श्रीकृष्णाला आळवल्यावर श्रीकृष्णाने त्याला ‘दूतहरि’ रूपात दर्शन देणे
द्वापरयुगाच्या शेवटी राजा जनमेजयाला भगवंताचे ‘दूतहरि’ रूप पहाण्याची इच्छा झाली. वैशंपायनऋषींच्या आज्ञेने राजा जनमेजयाने कांचिपुरममध्ये श्रीकृष्णाला आळवले आणि या ठिकाणी श्रीकृष्णाने त्याला ‘दूतहरि’ रूपात दर्शन दिले. कलियुगात या स्थानाचे नाव ‘पांडवदूत मंदिर’, असे पडले आहे.
४ इ. मंदिराचे वैशिष्ट्य
जो कुणी श्रीकृष्णाचे स्मरण करत या मंदिराला प्रदक्षिणा घालतो, त्याच्या ७२ सहस्र नाड्यांतील विकार दूर होतात.
५. ज्वरहरेश्वर मंदिर
कांचीपूरम् येथे ८ व्या शतकातील पल्लवकालीन शिवमंदिर आहे. येथे शिवाला ‘ज्वरहरेश्वर’ या नावाने संबोधले जाते. असे म्हटले आहे की, हा शिव ज्वर दूर करणारा असल्याने त्याला ‘ज्वरहरेश्वर’ हे नाव पडले. हे मंदिर अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. या मंदिराचा मागचा भाग हत्तीच्या पृष्ठभागासारखा असल्याने या मंदिराला ‘गजपृष्ठ विमान असलेले मंदिर’, असे म्हटले जाते.
‘सप्तर्षींच्या कृपेनेच एका दिवसात या सर्व मंदिरांत जाता आले आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करता आली’, यांसाठी आम्ही सप्तर्षींच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’
– श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), चेन्नई, तमिळनाडू. (१४.३.२०२१)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या आणि संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |