विवाहसंस्कार आणि विवाहविधी

विवाहसंस्कार

जीवनात घडणार्‍या प्रमुख सोळा प्रसंगी ईश्वराच्या जवळ जाण्यासाठी करावयाचे संस्कार हिंदु धर्माने सांगितले आहेत. त्यांतील सर्वांत महत्त्वाचा ‘विवाहसंस्कार’ ! महागड्या लग्नपत्रिका, ऊंची वेशभूषा, भव्य विवाह कार्यालय, ‘बँड’, आतषबाजी, कर्णकर्कश संगीत, झगमगाट, जेवणाचा थाटमाट इत्यादी गोष्टी असलेला विवाह म्हणजे ‘चांगला विवाह’, अशी चुकीची धारणा सध्या समाजात निर्माण झाली आहे. या सर्व धामधुमीत विवाहातील धार्मिक विधी शास्त्रशुद्ध करण्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. विवाहाचा खरा उद्देश म्हणजे, दोन जिवांचे भावी जीवन एकमेकांना पूरक अन् सुखी होण्यासाठी ईश्वराचा आशीर्वाद प्राप्त करून घेणे ! यासाठी विवाहविधी धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणेच करणे अत्यावश्यक असते.

१. विवाहाचा अर्थ

वधूला पित्याच्या घरून आपल्या घरी नेणे म्हणजे ‘विवाह’ किंवा ‘उद्वाह’ होय. विवाह म्हणजे पाणिग्रहण, म्हणजे वराने वधूचा पत्नी होण्यासाठी हात धरणे. पुरुष स्त्रीचा हात धरतो; म्हणून विवाहानंतर स्त्रीने पुरुषाकडे जावे. पुरुषाने स्त्रीकडे जाणे चुकीचे आहे.

२. विवाहसंस्काराचे महत्त्व

अ. हिंदु धर्मात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ सांगितले आहेत. त्यांपैकी ‘काम’ हा पुरुषार्थ साध्य करून हळूहळू ‘मोक्ष’ या पुरुषार्थाकडे जाता यावे, यासाठी विवाहसंस्काराचे प्रयोजन आहे.

आ. स्त्री-पुरुषांच्या जीवनातील अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी विवाहाशी संबंधित असतात, उदा. स्त्री-पुरुष यांच्यामधील प्रेम, त्यांच्यातील संबंध, संतती, जीवनातील अन्य सुखे, समाजातील स्थान आणि जीवनातील उन्नती.

विवाहविधी

१. मंडपदेवताप्रतिष्ठा

विवाह, उपनयन इत्यादी संस्कारांच्या आरंभी हे संस्कार निर्विघ्नपणे पूर्ण व्हावेत, या उद्देशाने, मंडपदेवता आणि अविघ्नगणपति यांची प्रतिष्ठा करण्याची पद्धत आहे; यालाच देवक बसविणे असे म्हणतात.

२. मंगलाष्टके अन् अक्षतारोपण विधी

 अक्षतारोपण विधी
अक्षतारोपण विधी

मंगलाष्टके पूर्ण झाल्यावर अंतःपट उत्तरेकडून काढून घेतात. नंतर वधू-वर हातातील तांदुळ, गूळ, जिरे एकमेकांच्या मस्तकावर टाकतात. प्रथम वधू वराला आणि नंतर वर वधूला माळ घालतो.

लग्नामध्ये अक्षता वापरण्याचे कारण

लग्नामध्ये अक्षता वापरणे, हे वधु-वरांच्या डोक्यावर झालेल्या देवतांच्या कृपावर्षावाचे प्रतीक आहे. लग्नविधीमध्ये वापरल्या जाणार्‍या अक्षता या कुंकू लावलेल्या असतात. लाल कुंकवाकडे ब्रह्मांडातील आदिशक्तीचे तत्त्व आकृष्ट होते.

आदिशक्तीचे तत्त्व आकृष्ट झालेल्या अक्षतांचा वर्षाव वधु-वरांच्या डोक्यावर झाल्याने वधु-वरांमधील देवत्व जागृत होऊन त्यांच्या सात्त्विकतेत वाढ झाल्याने साहजिकच त्यांची लग्नविधीच्या ठिकाणी आलेल्या देव-देवतांच्या लहरी आकृष्ट करून घेण्याची क्षमता वाढते. त्यामुळे अशा देव-देवतांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या सोहळ्याचा अपेक्षित लाभ वधु-वरांना मिळणे शक्य होते.

विवाहविधीत अक्षता (अखंड तांदूळ) का वापरतात ?

अक्षता
अक्षता

अ. अक्षता उच्च देवतांच्या लहरी ग्रहण आणि प्रक्षेपित करतात.

आ. विवाहात वधू आणि वर यांवर अक्षता वाहिल्याने वधू-वरांच्या सात्त्विकतेत वाढ होऊन त्यांची विवाहविधीच्या ठिकाणी आलेल्या देवतांच्या लहरी आकृष्ट करण्याची क्षमता वाढते.

इ. अक्षतांचे तांदूळ तुटलेले असल्यास ते त्रासदायक लहरी ग्रहण आणि प्रक्षेपित करतात; म्हणून अक्षतांचे तांदूळ अखंड असावेत.

३. कन्यादान

वधूचे वरास दान देणे, यास कन्यादान म्हणतात. ‘ही कन्या ब्रह्मलोकाची प्राप्ती करून घेण्याच्या इच्छेने आपणांस विष्णूप्रमाणे समजून देतो’, असे वधूपिता म्हणतो.

४. मंगलसूत्रबंधन

मंगळसूत्रात दोन पदरी दोर्‍यात काळे मणी गुंफलेले असतात. मध्यभागी ४ छोटे मणी आणि २ लहान वाट्या असतात. दोन दोरे म्हणजे पती-पत्नीचे बंधन, २ वाट्या म्हणजे पती-पत्नी तसेच ४ काळे मणी म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ.

मंगळसूत्र
मंगळसूत्र

मंगळसूत्रामधील काळे मणी आणि वाट्या यांचा आध्यात्मिक अर्थ

मंगळसूत्राच्या दोन वाट्यांमध्ये एक वाटी शिवाचे, तर दुसरी वाटी शक्तीचे प्रतीक असते. शिव-शक्तीच्या बळावरच वधूने सासरच्या मंडळींचे रक्षण आणि सांभाळ करावयाचा असतो. या दोन वाट्यांना गुंफणारी तार ही माहेरच्या कुलदेवीची उपासना सोडून आता सासरच्या कुलदेवीची उपासना करण्यासंबंधी हिंदु धर्माने दिलेल्या परवानगीतील आदान-प्रदानाचे दर्शक आहे. माहेरच्या वाटीत हळद, तर सासरच्या वाटीत कुंकू भरून, कुलदेवीला स्मरून, मंगळसूत्राची पूजा करून मगच ते गळ्यात घातले जाते.

५. विवाहहोम

विवाहहोम
विवाहहोम

वधूचे ठायी भार्यत्व सिद्ध होण्यासाठी आणि गृह्याग्नि सिद्ध होण्याकरिता विवाहहोम करतात.

६. पाणिग्रहण आणि लाजाहोम

पाचही बोटांसह वधूचा उताणा हात वराने स्वतःच्या हातात धरणे, याला पाणिग्रहण म्हणतात. लाजा म्हणजे लाह्या. वर आपल्या दोन्ही हातांनी वधूची ओंजळ धरून त्यातील सर्व लाह्या होमात अर्पण करतो. मग होमपात्रे, उदककुंभ आणि अग्नि या सर्वांना वधूचा हात धरून तिला आपल्या मागून घेऊन प्रदक्षिणा घालतो.

७. सप्तपदी

सात पावले बरोबर चालल्याने मैत्री होते, असे शास्त्रवचन आहे़ वराने वधूचा हात धरून होमाच्या उत्तर बाजूस केलेल्या तांदुळाच्या सात राशींवरून तिला चालवीत नेणे, या कृतीस सप्तपदी म्हणतात.

सप्तपदी
सप्तपदी

सप्तपदीचा भावार्थ

वधू-वरांनी गत सात जन्मांतील सर्व संस्कार मागे टाकून एकमेकांना पूरक वैवाहिक जीवनाला प्रारंभ करणे.

८. वधूगृहप्रवेश

वरात घरी येताच वधू-वरांवरून दहीभात ओवाळून टाकतात. वधू घरात प्रवेश करतांना उंबर्‍यावर तांदूळ भरून ठेवलेले माप उजव्या पायाने लवंडून आत जाते. याला वधूगृहप्रवेश म्हणतात.

 

अहेर घेणे आणि देणे !

१. अहेर देतांना अन् घेतांना ठेवायचा दृष्टीकोन : व्यावहारिक वस्तूंचा अहेर दिल्याने अहेर स्वीकारणार्‍या व्यक्तीमध्ये आसक्ती निर्माण होते. याउलट आध्यात्मिक ग्रंथ अन् ध्वनीचित्र-चकती (ऑडीओ सीडी) यांसारखे आध्यात्मिक अहेर दिल्याने व्यक्ती धर्माचरणास प्रवृत्त होते.

२. अहेर घेणार्‍याने ‘अहेर म्हणजे ईश्वराकडून मिळालेला वस्तूरूपी किंवा धनरूपी प्रसाद आहे’, असा भाव ठेवावा.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सोळा संस्कार’

 

विवाह आचारसंहिता

वधू-वराची वेशभूषा कशी असावी ?

१. वधू : नऊवारी साडी नेसावी. नऊवारी साडी नेसणे शक्य नसल्यास सहावारी साडी नेसावी. लाल, केशरी, निळा, पिवळा, गुलाबी यांसारख्या सात्त्विक रंगांची सुती किंवा रेशमी साडी नेसावी.

२. वर : वराने कृत्रिम धाग्यांपासून शिवलेले शर्ट-पँट, कोट-टाय यांसारखे कपडे घालू नयेत, तर नैसर्गिक धाग्यांपासून बनवलेले सुती किंवा रेशमी सोवळे-उपरणे किंवा अंगरखा (सदरा)-पायजमा हे कपडे परिधान करावेत.

वधू-वराची वेशभूषा
वधू-वराची वेशभूषा

विवाहभोजन कसे असावे ?

१. अती तेलकट, तिखट, मसालेदार अशा तामसिक पदार्थांपेक्षा वरण-भात-तूप, कोशिंबीर, लाडू आदी सात्त्विक पदार्थ भोजनात असावेत.

२. चायनीजसारखे फास्टफूड; पाणीपुरी-भेळपुरी, पाव यांसारखे पदार्थ; मांसाहारी पदार्थ; कृत्रिम शीतपेये यांसारखे तामसिक अन्न टाळावे.

३. पाश्चात्त्य प्रथा दर्शवणार्‍या ‘बुफे’ पद्धतीचा नव्हे, तर पारंपारिक भारतीय पद्धतीचा अवलंब करावा !

विवाहप्रसंगी अशास्त्रीय अन् अनिष्ट कृती टाळून विवाहविधीचे पावित्र्य जोपासा !

१. विवाहविधीच्या ठिकाणी पादत्राणे घालून जाऊ नका !

२. मंगलाष्टके चित्रपटगीतांच्या चालीत म्हणू नका !

३. वधू-वर एकमेकांना हार घालतांना त्यांना उचलून घेऊ नका !

४. अक्षता वधू-वरांवर न फेकता त्यांच्या जवळ जाऊन डोक्यावर वहा !

५. ‘बँड’ किंवा फटाके वाजवू नका, तर सात्त्विक सनई-चौघडा वाजवा !

६. ‘वराची पादत्राणे पळवून त्याची भरपाई (मोबदला) मागणे’ ही कुप्रथा टाळा !

संदर्भ : सनातन-निर्मित लघुग्रंथ ‘विवाहसंस्कार : शास्त्र आणि सध्याच्या अयोग्य प्रथा’

Leave a Comment