नगर – रहाता (जिल्हा नगर) येथील सनातनच्या संत पू. (श्रीमती) रुक्मिणी पुरुषोत्तम लोंढे (वय ९५ वर्षे) यांनी २७ जानेवारी २०२२ या दिवशी दुपारी २.२५ वाजता त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळामुळे देहत्याग केला. त्यांच्यावर त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे २ मुले, २ सुना, २ मुली, २ जावई, नातवंडे आणि पतवंडे असा परिवार आहे. पू. (श्रीमती) रुक्मिणी पुरुषोत्तम लोंढे या सनातनच्या ३९ व्या संत असून त्यांना २३ जानेवारी २०१४ या दिवशी संतपदी विराजमान झाल्याचे घोषित करण्यात आले होते. पू. (श्रीमती) रुक्मिणी लोंढे या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ सेवा करणार्या आणि ६२ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या सौ. वैशाली राजहंस यांच्या आई अन् ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. धनंजय राजहंस यांच्या सासूबाई होत्या. रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणार्या सौ. अवनी संदीप आळशी आणि सौ. नंदिनी नीलेश चितळे या पू. लोंढेआजी यांच्या नाती आहेत, तर सनातनच्या ग्रंथ संकलनाची सेवा करणारे पू. संदीप आळशी आणि रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारे श्री. नीलेश चितळे हे नातजावई आहेत. सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. चेतन राजहंस हे पू. लोंढेआजी यांचे नातू आहेत, तर रामनाथी आश्रमात सेवा करणार्या त्यांच्या पत्नी आणि ६९ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या सौ. प्रियांका राजहंस या पू. लोंढेआजी यांच्या नातसून आहेत.