
रामनाथी (गोवा) – भारत शासनाचे माहिती आयुक्त श्री. उदय माहूरकर यांनी ८ जानेवारी २०२२ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. श्री. माहूरकर हे त्यांच्या ‘वीर सावरकर : दि मॅन हु कुड हॅव प्रिव्हेंटेड पार्टिशन’ या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी गोवा येथे आले होते. या वेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) यांनी त्यांना आश्रमात चालणारे राष्ट्र-धर्म यांच्या प्रसाराचे कार्य आणि आध्यात्मिक संशोधनाचे कार्य यांची माहिती दिली. श्री. माहूरकर यांनी आश्रमात चालणारे कार्य आस्थेने जाणून घेतले.आश्रमभेटीच्या वेळी श्री. माहूरकर यांनी धर्मप्रसाराची सेवा करणार्या, तसेच ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयात सेवा करणार्या साधकांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील आरोप आणि त्यांचे खंडण’ या विषयावर मार्गदर्शन केले.
श्री. उदय माहूरकर यांचा परिचय

श्री. उदय माहूरकर हे वरिष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक आणि लेखक आहेत. ‘इंडिया टुडे’ या वृत्तपत्र समूहात पत्रकार आणि राजकीय विश्लेषक या रूपात त्यांनी ३४ वर्षे कार्य केले, तसेच तेथे वरिष्ठ उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदर्श शासन’ या विषयातील/ प्रकल्पाचे ते तज्ञ आहेत. (Expert on Modi model of governance) या विषयावर त्यांनी ‘मार्चिंग विथ बिलियन’, ‘सेंटरस्टेज’ ही पुस्तकेही लिहिली आहेत. त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘भारताची राष्ट्रीय सुरक्षा’ या महत्त्वाच्या सूत्रांचे ते तज्ञ आहेत. ऑक्टोबर २०२० मध्ये भारत शासनाने त्यांची ‘माहिती आयुक्त’ म्हणून नियुक्ती केली आहे.
वीर सावरकर यांची राष्ट्रीय सुरक्षेविषयीची दूरदृष्टी अतुलनीय होती ! – उदय माहूरकर

कुठल्याही राष्ट्राचे सामर्थ्य आणि सुरक्षा त्या राष्ट्राची सैन्यशक्ती निश्चित करत असते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भारतीय तरुणांना सैन्यामध्ये भरती होण्याचे आवाहन केले होते. भारताने अणूबाँब बनवला पाहिजे, असे स्वातंत्र्यवीर वीर सावरकर यांनी वर्ष १९५२ मध्ये सांगितले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची राष्ट्रीय सुरक्षेविषयीची दूरदृष्टी अतुलनीय होती. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची ‘समर्थ भारता’ची संकल्पना कृतीत उतरवली असती, तर आतापर्यंत भारत महासत्ता झाला असता, असे मत केंद्रीय माहिती आयुक्त श्री. उदय माहूरकर यांनी व्यक्त केले. ८ जानेवारी २०२२ या दिवशी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात एका अनौपचारिक वार्तालापाच्या वेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भारताची फाळणी रोखण्यासाठी पुष्कळ प्रयत्न केले होते. काँग्रेसच्या ‘मुसलमानांचे तुष्टीकरण’ या धोरणाच्या विरोधात त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला होता.‘हिंदूंचे हनन करून मुसलमानांचे तुष्टीकरण करणे म्हणजे हिंदूंचा विश्वासघात करणे होय. सिंध प्रांताला मुंबई प्रांतापासून वेगळे करणे, हे ब्रिटीश आणि मुसलमान यांनी रचलेले एक षड्यंत्र होते. ते देशाच्या फाळणीच्या दिशेने टाकलेले एक पाऊल होते’, असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी म्हटले होते.
या वार्तालाप कार्यक्रमात गोव्यातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या. त्यामध्ये ‘भारत माता की जय’चे प्रा. सुभाष वेलिंगकर, पतंजलि योग प्रतिष्ठानचे डॉ. सुरज काणेकर, हिंदुत्वनिष्ठ श्री. दत्तात्रय आमोणकर, श्री. दत्तप्रसाद पोकळे, ‘स्वराज गोमंतक’चे श्री. प्रशांत वाळके, अधिवक्ता शैलेश कुलकर्णी, राष्ट्रीय युवा वाहिनीच्या सौ. सुमन शर्मा, युगांतरचे श्री. अभिदीप देसाई, माजी नौदल अधिकारी श्री. प्रवीण चौधरी, गोमंतक मंदिर महासंघाचे श्री. जयेश थळी इत्यादींचा समावेश होता. श्री. प्रवीण चौधरी, अधिवक्ता शैलेश कुलकर्णी, श्री. प्रशांत वाळके, श्री. जयेश थळी, श्री. अभिदीप देसाई इत्यादींनी या चर्चेत भाग घेतला.
सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी वक्त्यांची ओळख करून दिली आणि शेवटी आभार मानले.