आध्यात्मिक दृष्टिकोनातून योग्य वस्त्र : धोतर

Article also available in :

१. धोतर

हे अखंड सुतापासून बनवले जाते. नैसर्गिक सुतामध्ये सात्त्विकता आणि ईश्‍वरी चैतन्य असते. अखंड सूत असल्यामुळे धोतरातील सात्त्विकता आणि ईश्‍वरी चैतन्यही अखंडपणे धोेतरात रहाते अन् धोतर नेसणार्‍या जिवाला त्यांचा अखंड लाभ होतो.

 

२. आध्यात्मिक दृष्टिकोनातून योग्य वस्त्र : धोतर

सर्वसाधारणतः दोन पद्धतींनी धोतर नाभीवर नेसले जाते. ‘षट्वच्छ’ म्हणजे सहा ठिकाणी खोचून नेसले जाते किंवा नाभीजवळ गाठ मारून नेसले जाते. प्रांतानुसार किंवा स्थानिक प्रथेनुसार धोतर नेसण्याची पद्धत थोडीफार पालटू (बदलू) शकते. धोतर नेसणार्‍या किंवा धोतर नेसण्याची पद्धत ज्ञात असणार्‍या व्यक्तीकडून धोतर कसे नेसावे, हे शिकून घेणे सोयीचे असते.

३. धोतर नेसल्यामुळे होणारे लाभ

अ. धोतर नाभीवर नेसल्यामुळे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून पूर्णतः रक्षण होणे

‘धोतर नाभीवर नेसल्यामुळे नाभीवर धोतराच्या निर्‍यांचा थर येतो. त्यामुळे नाभीचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून पूर्णतः रक्षण होते. नाभी उघडी राहिल्यास वाईट शक्तींना तिच्यावर आक्रमण करून तिच्यातून काळी शक्ती सर्व शरिरात प्रक्षेपित करणे अधिक सोपे असते. त्यामुळे पोटातील सर्व अवयवांना जास्त अपाय होऊ शकतो.

आ. निर्‍यांमुळे कटीखालच्या (कमरेखालच्या) भागात सतत चैतन्याचा पुरवठा होत असल्यामुळे तेथील काळी शक्ती नष्ट होणे

निर्‍यांचे एकावर एक असे ५ किंवा त्याहूनही जास्त थर बनतात. यामुळे धोतरामध्ये मूलतःच असलेले चैतन्य धोतरामध्येच साठवून ठेवले जाते. त्यामुळे धोतर परिधान करणार्‍या जिवाला या चैतन्याचा २४ घंटे (तास) लाभ होतो. कासोट्यातील निर्‍यांमुळे कटीखालच्या भागात सतत चैतन्याचा पुरवठा केला जात असल्यामुळे तेथील काळी शक्ती नष्ट होते. तसेच नवद्वारांपैकी जननेंद्रिय अन् गुदद्वार येथून वाईट शक्तींची आक्रमणे जास्त प्रमाणात होत असल्यामुळे आणि तेथेच कासोट्यातील निर्‍यांचे संरक्षक-कवच असल्याने जिवाचे या आक्रमणांपासून सतत रक्षण केले जाते.

धोतराच्या निर्‍या करून त्या नाभीवर खोचल्यामुळे नाभी आणि पोटातील अवयव यांचे वाईट शक्तींच्या आक्रमणापासून रक्षण होणे

 

कासोट्याच्या निर्‍या मागे खोचल्यामुळे कटीच्या खालच्या भागाचे वाईट शक्तींच्या आक्रमणापासून रक्षण होणे अन् मूलाधार-चक्राला चैतन्य मिळणे

 

इ. निर्‍यांमुळे मूलाधारचक्राला चैतन्याचा पुरवठा होणे

पुढे खोचलेल्या निर्‍यांमुळे नाभी, स्वाधिष्ठानचक्र आणि पोटातील सर्व अवयव यांचे रक्षण केले जाते. कासोट्यातील निर्‍यांमुळे मूलाधारचक्राला चैतन्याचा पुरवठा केला जातो. त्यामुळे मूलाधारचक्रात असलेले वासनांचे केंद्र क्षीण होऊन असा जीव संयमी जीवन जगायला शिकतो. असा जीव साधनाही करत असल्यास त्याचा वासनाक्षय लवकर होऊन त्याची आध्यात्मिक प्रगती वेगाने होते.

ई. धोतराला चुण्या पडून त्यांतील चैतन्यामुळे जिवाचे सतत रक्षण होणे

धोतर नेसण्याच्या पद्धतीमुळे जिवाच्या दोन्ही पायांवर धोतराच्या चुण्या पडतात. यामुळे धोतरातील चैतन्य प्रवाही होऊन जिवाच्या देहावर फिरत रहाते आणि त्याचे एक वलयही देहाभोवती निर्माण होते. त्यामुळे जिवाचे सतत रक्षण होते.’ – सौ. राजश्री खोल्लम (चैत्र शु. सप्तमी, कलियुग वर्ष ५१११, २.४.२००९)

४. धोतर, सोवळे आणि पितांबर

‘धोतर शक्यतो पांढर्‍या रंगाचे असते. हे नेहमी घालावयाचे वस्त्र आहे. मुख्यतः पूजाकर्म, धार्मिक कार्य इत्यादींच्या वेळी वापरत असलेल्या कौशेयाच्या (रेशमाच्या) वस्त्राला सोवळे असे म्हणतात. हे तांबडे (लाल), पिवळे, केशरी अशा विविध रंगांत असते. पिवळ्या रंगाच्या सोवळ्याला पितांबर असे म्हणतात.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, आषाढ शुद्ध तृतीया, कलियुग वर्ष ५११०, ५.७.२००८)

Leave a Comment