अनुक्रमणिका
- १. जिवाच्या आत्मशुद्धीसाठी चित्त शुद्ध होणे आवश्यक असणे आणि चित्तशुद्धीसाठी मन, बुद्धी अन् देह (शरीर)बुद्धी यांचा त्याग गुरुकृपायोगानुसार लवकर होणे
- २. साधकाची तळमळ आणि इच्छाशक्ती यांवर मनाचा त्याग अवलंबून असणे आणि ४० टक्के पातळीला चित्तशुद्धीला प्रारंभ होऊन अहंच्या लयाला आरंभ होणे
- ३. चित्तशुद्धीला प्रारंभ झाल्यावर जिवाला ईश्वरप्राप्तीची ओढ निर्माण होणे आणि साधक ५० टक्के पातळीला आल्यावर गुरुकार्याची तळमळ अन् ईश्वरप्राप्तीची ओढ वाढणे
- ४. साधकाचे मन, बुद्धी आणि अहं यांचा एकाच वेळी लय होण्यास प्रारंभ होणे अन् साधकाची अंतर्मनातून साधना चालू होणे
- ५. सातत्याने अंतर्मुख राहून गुरुकृपायोगातील साधनेचे प्रयत्न केल्यास चित्त शुद्ध होऊन साधनेमध्ये प्रगती होणे
- ६. अष्टांग साधनेमुळे जिवाची प्रारब्ध भोगण्याची क्षमता वाढून चित्तशुद्धीचा वेग वाढणे आणि परिस्थितीला धिराने तोंड देऊ शकल्याने आवश्यक तेथे साक्षीभावाने पाहू शकणे
- ७. चित्तावर अष्टांग साधनेचा संस्कार, मनाला ‘ईश्वरप्राप्ती’ या ध्येयाची जाणीव आणि गुरुकार्याची तळमळ यांचा संस्कार झाल्याने सनातनचे साधक जलद आध्यात्मिक उन्नती करत असणे
- ८. आपत्काळात साधकांचा भाव आणि तळमळ यांनुसार ईश्वराचे अस्तित्व, सूक्ष्म-गंध अथवा सूक्ष्म दर्शन याने श्रद्धा अन् भाव वाढणे आणि स्वतः निमित्तमात्र असल्याची अनुभूती घेत साधक भावावस्थेमध्ये रहाणार असणे
- ९. प.पू. डॉक्टरांच्या जागी पांढरा गोळा दिसणे, या गोळ्याकडून साधकांमधील आत्मतत्त्वाकडे गुरुतत्त्वरूपी किरण जातांना जाणवणे आणि हे किरण संपूर्ण ब्रह्मांडात, तसेच देश-विदेशांतील सर्व साधकांकडे जात असून त्यामुळे आत्मशुद्धी अन् गुरुकार्य यांचा सुरेख संगम होत असणे
- १०. गुरुकृपायोगानुसार साधना करणार्या साधकांची तळमळ आणि भाव यांनुसार त्यांच्यासाठी आपत्काळ हा साधना होण्यासाठीचा संपत्काळ असल्याने त्यांची जलद गतीने उन्नती होणार असणे
- ११. साधकांनो, ‘आपत्कालामध्ये घडणारा प्रसंग आणि परिस्थिती ही शिकण्यासाठी आणि पालटण्यासाठी संधी असून ‘ईश्वरप्राप्ती’ या ध्येयाच्या दिशेने नेणारी आहे’, असा सकारात्मक विचार करा !
- १२. जेवढी तळमळ अधिक, तेवढे उन्नतीसाठी पोषक वातावरण, प्रसंग आणि परिस्थिती अधिकाधिक घडवून जिवाची उन्नती होण्याच्या दिशेने पुढचे पुढचे टप्पे होऊन चित्तशुद्धी होत रहाणार असणे
लेख क्रमांक : २
मागील लेख क्रमांक १ वाचण्यासाठी भेट द्या. आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यावर स्तरानुसार जिवावर होणारे परिणाम आणि त्यामागील शास्त्र
ज्ञानप्राप्तकर्त्या : सौ. कोमल जोशी
संकलक : परात्पर गुरु डॉ. आठवले
१. जिवाच्या आत्मशुद्धीसाठी चित्त शुद्ध होणे
आवश्यक असणे आणि चित्तशुद्धीसाठी मन, बुद्धी अन्
देह (शरीर)बुद्धी यांचा त्याग गुरुकृपायोगानुसार लवकर होणे
‘गुरुकृपायोगानुसार साधना करणारा साधक अष्टांग साधना करणारा असल्यामुळे त्याचे मन, बुद्धी आणि देह (शरीर) यांचा त्याग होणे लवकर शक्य होते. चित्तशुद्धीसाठी साधकाच्या देह (शरीर) बुद्धीचा त्याग ८० टक्के, मनाचा त्याग ७० टक्के आणि बुद्धीचा त्याग ६० टक्के होणे आवश्यक असते. शरिराने (स्थूलदेहाने) सेवा केल्याने अहंचा लय होतो, म्हणजे स्थूलदेहाभोवती असलेले अहंचे आवरण न्यून होते.
२. साधकाची तळमळ आणि इच्छाशक्ती यांवर
मनाचा त्याग अवलंबून असणे आणि ४० टक्के पातळीला
चित्तशुद्धीला प्रारंभ होऊन अहंच्या लयाला आरंभ होणे
साधकाच्या जीवनामध्ये येणारी परिस्थिती, प्रसंग आणि साधना करतांना येणारे अडथळे यांवर मात करत साधक शिकणे, ऐकणे, स्वीकारणे, विचारून करणे या स्थितींना थोड्याफार प्रमाणात आल्यावर त्याचा मनाचा त्याग चालू होतो. याला ‘गुरुकृपायोगानुसार साधकत्व निर्माण होणे, म्हणजे सत्त्वगुण निर्माण होऊन साधक अंतर्मुख होणे’, असे म्हणतात. मनाचा त्याग साधकाची तळमळ आणि इच्छाशक्ती यांवर अवलंबून असतो. ४० टक्के पातळीला साधक थोड्याफार प्रमाणात नाम घेण्यास प्रारंभ करतो. तेव्हापासून त्याच्या चित्तावर असलेला जन्मोजन्मीचा अहं आणि स्वभावदोषयुक्त संस्कार पुसण्यास प्रारंभ होतो. त्यामुळे जेवढा वेळ नाम चालू असते, तेवढा वेळ जिवाची चित्तशुद्धी होऊन साधना होत असते. यांमुळे स्थूल आणि सूक्ष्म देहांभोवती असलेले स्थूल अन् सूक्ष्म रूपांतील अहंचे आवरण हळूहळू न्यून होण्यास साहाय्य होते. स्थूलदेह आणि मन यांचा ४० टक्के त्याग झाल्यावर, म्हणजेच ४० टक्के पातळीला चित्तशुद्धीला प्रारंभ होऊन अहंच्या लयाला, म्हणजेच अहंचा त्याग होण्यास आरंभ होतो.
३. चित्तशुद्धीला प्रारंभ झाल्यावर जिवाला
ईश्वरप्राप्तीची ओढ निर्माण होणे आणि साधक ५० टक्के
पातळीला आल्यावर गुरुकार्याची तळमळ अन् ईश्वरप्राप्तीची ओढ वाढणे
चित्तशुद्धीला प्रारंभ झाल्यावरच जिवात ईश्वरप्राप्तीची ओढ निर्माण होऊन जीव ‘ईश्वरप्राप्ती’ हे ध्येय निश्चित करू लागतो. प्रारब्ध आणि चुकीचे क्रियमाण यांमुळे जीवनात येणारे अडथळे, घटना अन् मनाची दोलायमान स्थिती यांवर मात करत साधकाची चित्तशुद्धी होत राहून साधकाचा गुरूंप्रती विश्वास, भाव आणि पुढे हळूहळू श्रद्धा वाढू लागते. ‘नाम, गुरुस्मरण, ईश्वरप्राप्तीची तळमळ यांमुळे मनोदेहाची शुद्धी झाल्याने अशा साधकाची बुद्धी सात्त्विक होऊन तो गुरूंना, देवाला काय आवडेल ?’, असा विचार करतो. त्याची जसजशी चित्तशुद्धी होईल, तसतशी त्याची निर्णयक्षमता आणि ईश्वराचे विचार ग्रहण करण्याची क्षमता वाढते. त्याचे मन सत् च्या विचारांकडे झुकते आणि त्याची मायेची ओढ अल्प होऊ लागते. या वेळी साधकाची व्यवहारातील गोष्टींची आवड न्यून होते. अशा रितीने साधक ५० टक्के पातळीला आल्यावर त्याची गुरुकार्याची तळमळ आणि ईश्वरप्राप्तीची ओढ वाढते.
४. साधकाचे मन, बुद्धी आणि अहं यांचा एकाच वेळी
लय होण्यास प्रारंभ होणे अन् साधकाची अंतर्मनातून साधना चालू होणे
या टप्प्याला साधकाचे मन, बुद्धी आणि अहं यांचा एकाच वेळी लय होण्यास प्रारंभ होतो. मनावरील संस्कार न्यून होतो आणि मनाची शुद्धी होऊन बुद्धी शुद्ध होते. असा साधक शरिराने कार्य करत नसून त्याची सेवा साधना म्हणून होते. या सेवेतून, म्हणजेच स्थूलदेह गुरुचरणी अर्पण होत राहून सूक्ष्म देह आणि सूक्ष्म मन सेवा करू लागतात अन् साधकाची अंतर्मनातून साधना चालू होते. साधकाच्या चित्तशुद्धीला आवश्यक असेल, त्याप्रमाणे ईश्वर त्याच्या शरिराचा अथवा मनाचा त्याग करवून घेतो.
५. सातत्याने अंतर्मुख राहून गुरुकृपायोगातील साधनेचे
प्रयत्न केल्यास चित्त शुद्ध होऊन साधनेमध्ये प्रगती होणे
याच कालावधीमध्ये चित्त शुद्ध होत असतांना साधक अष्टांग साधनेतील काही भागांकडे (उदा. स्वभावदोष आणि अहं-निर्मूलन, भावजागृती) दुर्लक्ष करून बहिर्मुख झाल्यास साधकाचे चित्त शुद्ध होण्याची प्रक्रिया थांबते अथवा वेग अल्प होतो. त्यामुळे सातत्याने अंतर्मुख राहून प्रयत्न केल्यास चित्त शुद्ध होऊन साधनेमध्ये प्रगती होते.
६. अष्टांग साधनेमुळे जिवाची प्रारब्ध भोगण्याची
क्षमता वाढून चित्तशुद्धीचा वेग वाढणे आणि परिस्थितीला
धिराने तोंड देऊ शकल्याने आवश्यक तेथे साक्षीभावाने पाहू शकणे
गुरुकृपायोगातील अष्टांग साधनेमुळे जिवाची प्रारब्ध भोगण्याची क्षमता वाढून चित्तशुद्धीचा वेग वाढतो. त्यासह त्याचा प्रारब्धातील अधिकाधिक भाग अल्प होत जाऊन त्याचे मन शांत, स्थिर आणि आनंदी रहाते. साधकाची ईश्वरप्राप्तीची तळमळ वाढून तो गुरुकृपेसाठी प्रयत्न करत रहातो. असा साधक कुठेही राहिला, तरी त्याची साधना चालू रहाते. त्याच्या चित्तशुद्धीचा वेग वाढल्याने तो प्रसंग आणि परिस्थिती यांना धिराने तोंड देऊ शकतो आणि आवश्यक तेथे साक्षीभावाने पाहू शकतो.
७. चित्तावर अष्टांग साधनेचा संस्कार,
मनाला ‘ईश्वरप्राप्ती’ या ध्येयाची जाणीव आणि गुरुकार्याची तळमळ
यांचा संस्कार झाल्याने सनातनचे साधक जलद आध्यात्मिक उन्नती करत असणे
परात्पर गुरु डॉक्टर यांच्या रूपात प्रत्यक्ष श्रीविष्णुतत्त्व आणि गुरुतत्त्व यांचा संगम होऊन, गुरुकृपायोगानुसार साधना करवून घेत ईश्वराने सनातनच्या सर्व साधकांना चित्तशुद्धीची प्रक्रिया शिकवून अंतर्मुख केले आहे. हे साधक आपत्काळामध्ये कुठेही असले, तरी त्यांच्या चित्तावर अष्टांग साधनेचा संस्कार, मनावर ईश्वरप्राप्ती या ध्येयाची जाणीव आणि गुरुकार्याची तळमळ यांचा संस्कार होतो.
आपत्काळाला संधीकाळ करून आध्यात्मिक उन्नतीला पोषक वातावरण आणि पोषक ज्ञान दिल्याने सनातनचे साधक जलद आध्यात्मिक उन्नती करतात. साधक ईश्वरी राज्याची स्थापना स्वतःपासून; म्हणजेच प्रथम स्वतःची चित्तशुद्धी करून राष्ट्र आणि धर्म रक्षणाचे अमूल्य कार्य करून ईश्वरी राज्याची निर्मिती करतील.
८. आपत्काळात साधकांचा भाव आणि तळमळ
यांनुसार ईश्वराचे अस्तित्व, सूक्ष्म-गंध अथवा सूक्ष्म दर्शन
याने श्रद्धा अन् भाव वाढणे आणि स्वतः निमित्तमात्र
असल्याची अनुभूती घेत साधक भावावस्थेमध्ये रहाणार असणे
सनातनचे साधक आपत्काळामध्ये कुठेही असले, तरी गुरुतत्त्वाचा ओघ प.पू. डॉक्टरांच्या स्मरणाने नेहमी येत राहील. त्या वेळच्या स्थितीनुसार आणि आवश्यकतेनुसार साधकांना आतून मार्गदर्शन मिळून साधकांची निर्णयक्षमता वाढेल. त्यामुळे योग्य निर्णय आणि योग्य कृती होऊन साधकांतील ईश्वरी तत्त्व जागृत होईल. स्थुलातून म्हणजे मार्गदर्शक सेवक आणि दैनिक ‘सनातन प्रभात’ यांसारख्या माध्यमांतून मार्गदर्शन मिळत नसूनही देवाला अपेक्षित असे समष्टी कार्य देवच साधकांना माध्यम म्हणून करवून घेईल. ‘कार्य आपोआप होत आहे’, याची अनुभूती साधक त्यांच्यातील भाव आणि तळमळ यांमुळे घेतील. या वेळी प.पू. डॉक्टरांच्या अवतारी रूपातील लीलांची अनुभूती साधकांना येऊन साधकांचा भाव आणि श्रद्धा वाढायला साहाय्य होईल. त्याचप्रमाणे साधकांचा भाव आणि तळमळ यांनुसार ईश्वराने स्वतःचे अस्तित्व सूक्ष्म गंध अथवा सूक्ष्म दर्शन या माध्यमांतून दाखवल्याने साधकांची श्रद्धा अन् भाव वाढेल. ‘कार्य करणारा ईश्वर आहे. आपण निमित्तमात्र आहोत’, याची अनुभूती सातत्याने घेत साधक पुढच्या पुढच्या टप्प्याची साधना करत भावावस्थेमध्ये रहातील.
९. प.पू. डॉक्टरांच्या जागी पांढरा गोळा दिसणे,
या गोळ्याकडून साधकांमधील आत्मतत्त्वाकडे गुरुतत्त्वरूपी किरण
जातांना जाणवणे आणि हे किरण संपूर्ण ब्रह्मांडात, तसेच देश-विदेशांतील
सर्व साधकांकडे जात असून त्यामुळे आत्मशुद्धी अन् गुरुकार्य यांचा सुरेख संगम होत असणे
हे ज्ञान मिळतांना मला प.पू. डॉक्टरांच्या अस्तित्वाची जाणीव होऊन कृतज्ञतेच्या भावाने रडू येत होते. त्या वेळी मला पांढरा प्रकाश माझ्या आत जातांना दिसला. मला प.पू. डॉक्टरांच्या जागी पांढरा गोळा दिसला. काही कालावधीनंतर प.पू. डॉक्टर मला शेषशायी विष्णुप्रमाणे पहुडलेले दिसले; परंतु त्यांचा पेहराव मात्र नेहमीप्रमाणे पांढरा सदरा आणि निळी पँन्ट असा होता. (पूर्वी प.पू. डॉक्टर असे कपडे घालायचे.) त्यांच्या या रूपाकडून साधकांना सगुण-निर्गुण ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज मिळत होते. त्याचप्रमाणे आवश्यकतेनुसार चैतन्य, आनंद आणि कार्य करण्यासाठी शक्ती अन् क्षमताही मिळत होती. प.पू. डॉक्टर साधकांची कार्य करण्याची तळमळ वाढवून त्यांचे मन आणि बुद्धी यांवर नियंत्रण ठेवत होते. प.पू. डॉक्टरांच्या जागी दिसणारा पांढराशुभ्र गोळा, म्हणजे गुरुतत्त्वाचा स्त्रोत असून त्यातून केवळ गुरुतत्त्वाचा ओघ आणि ब्राह्मतेज सर्वत्र जातांना दिसले. उगवत्या सूर्याचे किरण जसे सूर्याकडून निघतांना दिसतात, त्याप्रमाणे या गोळ्याकडून साधकांमधील आत्मतत्त्वाकडे गुरुतत्त्वरूपी किरण जातांना जाणवले. ‘हे किरण संपूर्ण ब्रह्मांडात, तसेच देश-विदेशातील सर्व साधकांकडे जात असून त्यामुळे आत्मशुद्धी आणि गुरुकार्य यांचा सुरेख संगम होत आहे’, असे जाणवले.
१०. गुरुकृपायोगानुसार साधना करणार्या साधकांची
तळमळ आणि भाव यांनुसार त्यांच्यासाठी आपत्काळ हा साधना
होण्यासाठीचा संपत्काळ असल्याने त्यांची जलद गतीने उन्नती होणार असणे
आपत्काळ चालू होण्यापूर्वी साधकांना शारीरिक त्रासासह मानसिक स्वरूपाचे त्रास होतील. वातावरणातील सूक्ष्म-युद्धामुळे साधकांच्या मनाचा संघर्ष वाढून त्यांचे जन्मोजन्मीचे संस्कार नष्ट होण्यापूर्वी जाता जाता उफाळून येतील. गुरुकृपायोगानुसार साधनेमुळे ते प्रारब्धरूपात नष्ट होतील. म्हणूनच नोव्हेंबर २००९ पासून साधकांना तीव्र मानसिक त्रासाला, म्हणजे संघर्षमय जीवनाला सामोरे जावे लागले. हा संघर्ष नोव्हेंबर २०१० पर्यंत राहील. स्थूल युद्धाच्या वेळी साधकांच्या मनावरचे संस्कार पुसले जाऊन त्यांचे मन निर्विचार अवस्थेमध्ये गेलेले असेल. त्यामुळे ते ईश्वरी अनुसंधानामध्ये रहातील. गुरूंना अपेक्षित कार्य आपोआप साधना म्हणून होत राहील. याच कालावधीमध्ये सनातनच्या काही साधकांची वर्षाला १० ते १५ टक्के प्रगती होईल; कारण ईश्वरच सनातनच्या साधकांकडून ईश्वरी राज्य निर्माण करून समष्टी कार्य करून घेणार असून त्यामध्ये साधकांची व्यष्टी आणि समष्टी साधना आपोआप होऊन ते मोक्षाला जातील.
गुरुकृपायोगानुसार साधना करणार्या साधकांची तळमळ आणि भाव यांनुसार थोड्याशा प्रयत्नांनी वेगाने अनेक पालट होतील. स्वतःला पालटणार्या जिवासाठी आपत्काळ हा साधना होण्यासाठीचा संपत्काळ असल्याने तो जलद उन्नती करून आनंदप्राप्तीच्या दिशेने वाटचाल करेल.
११. साधकांनो, ‘आपत्कालामध्ये घडणारा प्रसंग
आणि परिस्थिती ही शिकण्यासाठी आणि पालटण्यासाठी संधी
असून ‘ईश्वरप्राप्ती’ या ध्येयाच्या दिशेने नेणारी आहे’, असा सकारात्मक विचार करा !
साधकांनो, ‘आपत्काळामध्ये घडणारे प्रसंग आणि परिस्थिती ही मला शिकण्यासाठी, पालटण्यासाठी संधी असून ‘ईश्वरप्राप्ती’ या ध्येयाच्या दिशेने नेणारी आहे’, असा सकारात्मक विचार करा. ‘प्रत्येक प्रसंगात आणि परिस्थितीत माझ्याकडून देवाला काय अपेक्षित आहे ? त्याला काय शिकायचे आहे ? मी कुठे आहे ?’, असा अंतर्मुख होऊन विचार करा. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असा, तुमच्या अंतर्मनाची साधना होऊन तुमच्यात साधकत्व असेल, तरच तुम्ही निर्विचार अवस्थेकडे जाऊन मोक्षाच्या दिशेने वाटचाल कराल.
१२. जेवढी तळमळ अधिक, तेवढे उन्नतीसाठी पोषक वातावरण,
प्रसंग आणि परिस्थिती अधिकाधिक घडवून जिवाची
उन्नती होण्याच्या दिशेने पुढचे पुढचे टप्पे होऊन चित्तशुद्धी होत रहाणार असणे
साधकांनो, आपत्काळ हा साधनेसाठी संपत्काळ असल्यामुळे परिस्थिती स्वीकारत मिळेल ती सेवा तळमळीने करून गुरुतत्त्वरूपी स्रोताच्या प्रवाहामध्ये सतत कार्यरत रहा. साधकाला त्याच्या आध्यात्मिक उन्नतीला पोषक अशी सेवा देवच निर्माण करून देतो. ज्या सेवेतून साधकाचे शरीर, मन, बुद्धी आणि अहं यांपैकी कोणचा किती टक्के लय होणे आवश्यक आहे, त्याप्रमाणे देवच सेवांचे नियोजन करतो. सेवा स्वीकारतांना ‘देवानेच दिली’, असा भाव ठेवून ती मनापासून स्वीकारली, तर त्यातील ईश्वरी नियोजनानुसार होणारे पुढचे संकेत कार्यरत रहातात. ईश्वराला अपेक्षित अशा पद्धतीने त्याने सांगितल्याप्रमाणे ऐकले की, देवाला अपेक्षित ते पालट आणि उन्नतीला पोषक वातावरण अन् दिशा त्यानेच दिल्याने ईश्वरी नियोजनानुसार साधना होते. जिवाची तळमळ जेवढी जास्त, तेवढे त्याच्या उन्नतीसाठी पोषक वातावरण, प्रसंग, परिस्थिती देव अधिकाधिक घडवून जिवाची उन्नती होण्याच्या दिशेने पुढचे पुढचे टप्पे येऊन चित्तशुद्धी होत रहाते. देवच त्याच्यामध्ये ईश्वरप्राप्तीची ओढ ही प्रसंग आणि परिस्थिती यांच्या माध्यमातून निर्माण करतो.’
– सौ. स्मिता जोशी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान) (१९.२.२०१०)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
लेख क्रमांक ३ वाचण्यासाठी भेट द्या. हिंदु धर्माचे धर्मचिन्ह ‘ॐ’ची उत्पत्ती आणि त्याचे परिणाम