जळगाव येथे तुळशीपूजन आणि तुळशीच्या रोपांचे वाटप !
जळगाव – भारतीय संस्कृती तुळशीला देवता म्हणून पूजते. त्यामुळे २५ डिसेंबर या दिवशी असलेल्या तुळशीपूजन दिनानिमित्त येथे हिंदु राष्ट्र सेना आणि योग वेदांत सेवा समिती, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तुळशीपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या शुभहस्ते तुळशीपूजन करण्यात आले.
या वेळी हिंदु राष्ट्र सेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्री. मोहन तिवारी, योग वेदांत सेवा समितीचे श्री. गणेश चौधरी, व्यावसायिक श्री. दीपक जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी उपस्थित भाविकांना तुळशीची रोपे आणि सनातन संस्थेचे ‘श्री गणपति अथर्वशीर्ष’ आणि ‘सात्त्विक रांगोळ्या’ हे लघुग्रंथ भेट म्हणून देण्यात आले.
२५ डिसेंबरला नाताळऐवजी तुळशीपूजन करणे, म्हणजे
सांस्कृतिक मूल्यांची जोपासना करणे होय ! – सदगुरु नंदकुमार जाधव
२५ डिसेंबर या दिवशी ‘नाताळ’ सण साजरा करण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांपासून भारतात वाढले आहे, हे पाश्चिमात्य देशांचे षड्यंत्र आहे. नाताळच्या नावाखाली ज्या ‘सांताक्लॉज’चा प्रचार होतो, त्याविषयी कुणालाच काही माहिती नाही. अशा काल्पनिक गोष्टींच्या मागे धावून पाश्चात्त्य विकृतीचे अंधानुकरण करण्यापेक्षा अशा पद्धतीने तुळशीपूजन करणे म्हणजे सांस्कृतिक मूल्यांची जोपासना करण्यासारखे आहे. काळानुसार हे अत्यंत आवश्यक आहे.