पेठेतील कोणतेही खत न वापरता लागवडीसाठी सुपीक माती कशी बनवावी ?

Article also available in :

पेठेतील कोणतेही खत न वापरता जिवामृताचा उपयोग करून लागवडीसाठी सुपीक माती कशी बनवावी ?

अनुक्रमणिका

‘सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती’ तंत्रामध्‍ये ‘ह्मूमस’ला (नैसर्गिक पदार्थांचे विघटन झाल्‍यानंतर बनलेल्‍या सुपीक मातीला) पुष्‍कळ महत्त्व आहे. या ‘ह्यूमस’विषयी माहिती या लेखात पाहूया.

 

१. शहरातील लोकांना मातीविषयी येणार्‍या समस्‍या

झाडांना आधारासाठी, तसेच अन्‍नद्रव्‍ये मिळवण्‍यासाठी मातीची आवश्‍यकता असते. शहरातील लोकांना घरातील लागवडीसाठी माती कुठून आणावी ?, हा प्रश्‍न असतो. शहरात माती मिळणे कठीण असते आणि मिळालेली माती सुपीक असेलच, असे सांगता येत नाही. घरातील लागवड ही बहुत करून आगाशीत (गच्‍चीवर) केली जाते. माती जड असल्‍याने वरपर्यंत उचलून नेणे कठीण जाते, तसेच आगाशीलाही मातीचा भार होतो.

 

२. नैसर्गिक पदार्थांचे विघटन होऊन बनणारी ‘सुपीक माती (ह्यूमस)’

पालापाचोळा, वाळलेले गवत, भाजीपाल्याचे अवशेष, पिकांचे अवशेष, गांडूळ आणि अन्य कीटक यांची मृत शरिरे अशा घटकांचे विविध जिवाणूंच्या साहाय्याने विघटन होऊन जी काळ्या रंगाची भुसभुशीत ‘सुपीक माती’ बनते, तिला इंग्रजीत ‘ह्यूमस’ म्हणतात. विविध प्रकारच्या असंख्य सूक्ष्म जिवाणूंच्या माध्यमातून नैसर्गिकपणे सुपीक माती बनवण्याचे कार्य होत असते. सुपीक माती (ह्यूमस) हे झाडांना आवश्यक असणार्‍या सर्व प्रकारच्या जीवनद्रव्यांचा पुरवठा करणारे जणू स्वयंपाकघर आहे. उत्तम प्रतीची सुपीक माती (ह्यूमस) बनण्यासाठी नियमित आच्छादन करणे (पालापाचोळ्याने झाडाभोवतालची माती झाकणे), जिवामृताचा वापर करणे आणि द्विदल आंतरपिके (साहाय्यक पिके) घेणे, या तीनही घटकांची पूर्तता होणे आवश्यक आहे. नैसर्गिक पद्धतीने लागवड करतांना या तीनही घटकांची पूर्तता होते. येथे लक्षात घेण्याचे सूत्र म्हणजे, सुपीक मातीनिर्मितीची प्रक्रिया प्रत्यक्ष लागवडीच्या ठिकाणी झाडांच्या मुळांजवळ पालापाचोळा इत्यादी विघटनशील पदार्थ कुजले तरच होते. ही प्रक्रिया कचरा कुजवण्याच्या डब्यात किंवा खड्ड्यात (कंपोस्ट बीनमध्ये) किंवा खतांच्या कारखान्यात होऊ शकत नाही.

 

३. ‘सुपीक माती’ बनवण्‍यासाठी शहरात उपलब्‍ध साधने

‘ह्यूमस’ ही झाडासाठीच्‍या अन्‍नद्रव्‍यांची खाण आहे. शहरातील सोसायट्यांमध्‍ये जी मोठी झाडे असतात, त्‍यांचा पालापाचोळा सहज उपलब्‍ध होऊ शकतो. आंब्‍यांच्‍या दिवसांमध्‍ये आंब्‍यांच्‍या पेट्यांमधून वाळलेले गवत मिळते. घरातील विघटनशील कचरा, तसेच नारळाच्‍या शेंड्या या सर्वांचा वापर करून आपल्‍याला उत्तम प्रतीचे ‘ह्यूमस’ बनवता येते.

 

४. भाजीपाला लागवडीसाठी वाफे (कप्‍पे) कसे बनवावेत ?

घरच्‍या घरी लागवड करण्‍यासाठी ज्‍या भागात दिवसभरातून न्‍यूनतम ३ – ४ घंटे ऊन मिळते, अशी जागा निवडावी. (भाजीपाला लागवडीसाठी जेवढे जास्‍त ऊन मिळेल, तेवढे चांगले.) या ठिकाणी लागवडीसाठीच्‍या कुंड्या ठेवाव्‍यात किंवा विटांचे वाफे (कप्‍पे) बनवून घ्‍यावेत. वाफ्‍यांची रुंदी २ फुटांपर्यंतच ठेवावी. असे केल्‍याने आपल्‍याला वाफ्‍यांमध्‍ये लागवड करणे सोपे जाते. खाली वाकावे लागू नये, यासाठी जमिनीपासून ठराविक अंतरावर कप्‍पे बनवून घेता येतात. घरातील खिडक्‍यांमध्‍ये जिथे ऊन येते, अशा ठिकाणीही वाफे बनवता येऊ शकतात. एका विटेची जेवढी रुंदी असते, तेवढ्या उंचीचे, म्‍हणजे साधारण ४ इंच उंचीचे वाफे पुरेसे होतात. असे केल्‍याने आगाशीला मातीचा जास्‍त भार होत नाही. ‘सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती’ तंत्रामध्‍ये झाडाला फार अल्‍प पाणी द्यावे लागत असल्‍याने वाफ्‍यांच्‍या खाली प्‍लास्‍टिक अंथरण्‍याची आवश्‍यकता रहात नाही, तरीही पाणी खाली झिरपण्‍याची धाकधुक वाटत असल्‍यास जमिनीवर प्‍लास्‍टिक अंथरून त्‍यावर विटांचे वाफे बनवावेत. (विटांचा वाफा कसा बनवावा, याचा व्‍हिडिओ पहा https://www.sanatan.org/mr/a/82985.html)

 

५. वाफ्‍यांमध्‍ये नैसर्गिक कचरा पसरून त्‍यावर आठवड्यातून एकदा जिवामृत शिंपडणे

आपण ज्‍यांमध्‍ये लागवड करणार असू, त्‍या कुंड्या किंवा विटांचे वाफे यांमध्‍ये वाळलेला नैसर्गिक कचरा (उदा. नारळाच्‍या शेंड्या, वाळलेले गवत, पालापाचोळा) अंथरून दाबून घ्‍यावा. यावर उपलब्‍ध असल्‍यास थोडी माती पसरवून टाकावी. माती नाही टाकली, तरी चालते; परंतु माती टाकल्‍यास कचर्‍याचे विघटन लवकर होते. यावर स्‍वयंपाकघरातील ओल्‍या कचर्‍याचा १ इंचाचा थरही देता येतो; मात्र ओल्‍या कचर्‍याचा थर १ इंचापेक्षा जास्‍त नसावा; कारण असे झाल्‍यास दुर्गंध पसरू शकतो. देशी गायीच्‍या शेणामध्‍ये नैसर्गिक कचर्‍याचे विघटन करणारे जीवाणू असतात. या शेणापासून ‘जीवामृत’ नावाचा पदार्थ बनवला जातो.

हे जीवामृत बनवून ते दहा पट पाण्‍यात मिसळून या कचर्‍यावर शिंपडल्‍यास या कचर्‍याचे शीघ्रतेने विघटन होते आणि कचर्‍यापासून लागवडीसाठी उपयुक्‍त ‘ह्यूमस’ बनते. ‘जीवामृत कसे बनवायचे ?’ याविषयी सविस्‍तर व्‍हिडिओ पहा https://www.sanatan.org/mr/a/82985.html#i-5 प्रत्‍येक आठवड्याला जीवामृत बनवून ते दहा पट पाण्‍यात मिसळून एकदा या कचर्‍यावर शिंपडावे. प्रतिदिन सकाळ सायंकाळ कुंड्या आणि वाफे यांमधील कचर्‍यावर पाणी शिंपडून तो ओलसर राहील असे पहावे; मात्र जास्‍त पाणी घालू नये. (‘जीवामृत’ बनवून ते वापरणे हे आदर्श आहे; परंतु काही कारणांमुळे जीवामृत बनवणे शक्‍य न झाल्‍यास केवळ सकाळ सायंकाळ पाण्‍याचा शिडकावा करावा. घरातील खरकटी भांडी विसळून मिळणारे पाणीही या कचर्‍यावर शिंपडता येते; फक्‍त त्‍यामध्‍ये साबण नसावा.)

 

६. जिवामृताचे महत्त्व

‘जीवामृत’ हे झाडांना मातीतून अन्‍नद्रव्‍ये उपलब्‍ध करून देणार्‍या जीवाणूंचे विरजण (कल्‍चर) आहे. नैसर्गिक कचर्‍याचे शीघ्रतेने विघटन करून त्‍यांतील अन्‍नद्रव्‍ये झाडाला उपलब्‍ध करून देणारे असंख्‍य जीवाणू देशी गायीच्‍या शेणात असतात. पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी या जिवाणूंची अनेक पटींनी वृद्धी करणारा एक पदार्थ बनवून त्‍याला ‘जीवामृत’ हे नाव दिले आहे. जिवामृतामुळे नैसर्गिक कचर्‍याचे शीघ्रतेने विघटन होते आणि कचर्‍याचा दुर्गंधही येत नाही. ‘सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती’ तंत्राचा ‘जीवामृत’ हा मुख्‍य आधार आहे. त्‍यामुळे नियमित जीवामृत बनवण्‍याचे नियोजन करावे.

 

७. कचर्‍याचे विघटन होईल, तशी त्‍यात भर टाकणे आवश्‍यक

नैसर्गिक कचर्‍याचे जसजसे विघटन होत जाते, तसतसे त्‍याचे आकारमान न्‍यून होत जाते. यामुळे दुसर्‍या आठवड्यात कुंडीमध्‍ये किंवा वाफ्‍यांमध्‍ये जागा निर्माण होते. अशा वेळी त्‍यावर पुन्‍हा नैसर्गिक कचरा अंथरून जीवामृत शिंपडणे इत्‍यादी कृती करावी. साधारण २० ते ३० दिवसांमध्‍ये या कचर्‍यापासून लागवडीला उपयुक्‍त अशी सुपीक माती म्‍हणजे ‘ह्यूमस’ बनते. आपण जेव्‍हा स्‍वयंपाकघरातील ओला कचरा अंथरतो, त्‍या वेळी त्‍यामधून काही वेळा टोमॅटो, मिरची, वांगी यांसारख्‍या भाज्‍यांचे बियाणेही या वाफ्‍यांमध्‍ये पडते. असे बी जेव्‍हा आपोआप रुजून येते, तेव्‍हा आपले वाफे लागवडीसाठी योग्‍य झाले आहेत, असे समजावे आणि मग त्‍यामध्‍ये घरात उपलब्‍ध भाजीच्‍या बियाण्‍याची लागवड करावी. मिरची, चवळी, मूग, टोमॅटो, मेथी हे बियाणे घरात उपलब्‍ध असतेच. आले, बटाट्याला आलेले कोंब, लसुणीची पाकळी, लहान कांदा, गाजराचा देठाकडील भाग, पुदीन्‍याची खोडासकट मुळे हेही घरात उपलब्‍ध असते. त्‍याचीही लागवड या ह्यूमसमध्‍ये करू शकतो.

 

८. ‘ह्यूमस’चे लाभ

नैसर्गिक कचरा अंथरून त्‍याचे जीवामृताच्‍या साहाय्‍याने विघटन केल्‍याने झाडाला आवश्‍यक अशी सर्व अन्‍नद्रव्‍ये उपलब्‍ध होतात. बाहेरून कोणतेही खत विकत आणावे लागत नाही. या ह्यूमसमध्‍ये आपण जी रोपे लावतो, ती अत्‍यंत सशक्‍त होतात. त्‍यांच्‍यामध्‍ये नैसर्गिक रोगप्रतिकारक क्षमता असल्‍याने ह्यूमसमध्‍ये लावलेल्‍या रोपांना रोग होण्‍याची शक्‍यता न्‍यून होते. ह्यूमसमध्‍ये पाणी धरून ठेवण्‍याची क्षमता असते. त्‍यामुळे थोडेसे पाणी दिले, तरी ते पुरेसे होते. ह्यूमस मातीपेक्षा हलके असल्‍याने याचा आगाशीला भार होत नाही.

 

९. घरोघरी लागवड मोहिमेच्‍या अंतर्गत लागवडीसाठी
नैसर्गिक कचर्‍यापासून वाफे तयार करून त्‍यामध्‍ये लागवड करा !

या लेखात लागवडीची जी पद्धत दिली आहे, ती अत्‍यंत सोपी आणि येताजाता करून पहाण्‍यासारखी आहे. दिवसाकाठी १५ ते २० मिनिटे यासाठी काढून सर्वांनी आवर्जून ही लागवड करून पहावी. आरंभी नैसर्गिक कचर्‍याचे विघटन होऊन माती बनण्‍यास थोडा वेळ लागतो; परंतु एकदा का ही माती बनून तयार झाली की, आपण यात आपल्‍याला आवश्‍यक असलेल्‍या भाजीपाल्‍याची नियोजनपूर्वक लागवड करून घरच्‍या घरी भाजीपाला पिकवून खाऊ शकतो.’

– एक कृषीतज्ञ, पुणे (८.१२.२०२१)


१०. भाजीपाला लागवड करतांना साधिकेने अनुभवलेली ईश्‍वराची प्रीती

आम्‍ही गेल्‍या दीड वर्षापासून आपत्‍काळासाठीची पूर्वसिद्धता म्‍हणून छतावर भाजीपाला लागवड करत आहोत. यामध्‍ये येणारे विविध अनुभव निसर्गाविषयीच्‍या अनेक नव्‍या गोष्‍टी शिकवणारे, आनंद देणारे, तसेच निसर्गरूपी भगवंताचे प्रेम अनुभवायला देणारे आहेत.

सौ. राघवी कोनेकर

१. अळूच्‍या ४ – ५ कंदांची लागवड केल्‍यावर अनेक वेळा भाजीसाठी अळूची पाने, तसेच अनेक अळूचे कंद मिळणे

अळूच्‍या ४ – ५ कंदांपासून निर्माण झालेले अनेक कंद

ज्‍यांना आपण ‘अळकुडी’ अथवा ‘अरवी’ या नावाने ओळखतो, ते बाजारात मिळणारे अळूचे ४ – ५ कंद आम्‍ही छतावर लावले होते. या ४ अळूच्‍या रोपांच्‍या पानांची पातळ भाजी या वर्षी संपूर्ण पावसाळ्‍यात अनेक वेळा बनवता आली. मोठे झालेले पान काढले की, पुन्‍हा याला नवीन पाने येत राहतात. साधारण ऑक्‍टोबर मासात हळूहळू हे रोप वाळू लागते किंवा पावसाळ्‍यासारखी पुष्‍कळ पाने येत नाहीत. रोपाच्‍या खाली जमिनीत याचे कंद आपोआप तयार होतात. या रोपांची ‘खत-पाणी’ अशी कोणतीच काळजी घ्‍यावी लागत नाही. आता आम्‍ही ही चारही रोपे उपटून काढून त्‍याचे कंद वेगळे केले. त्‍यांचे वजन १ किलो ३०० ग्रॅम इतके भरले.

हे कंद अत्‍यंत पौष्‍टिक आणि चविष्‍ट असतात. पानांप्रमाणे कंदालाही थोडा खाजरेपणा असल्‍याने शिजवताना त्‍यात चिंच घालतात. कंद उकडून खाता येतात, तसेच बटाट्यासारखी भाजी आणि भरीतही छान होते. पावसाळा चालू होण्‍यापूर्वी साधारण मे मासात यांची लागवड करता येते.

२. मातीच्‍या ढिगार्‍यात चुकून राहिलेल्‍या हळदीच्‍या एका कंदापासून अर्धा किलो ओले हळदीचे कंद मिळणे

आपोआप रुजून आलेल्‍या हळदीच्‍या रोपापासून मिळालेले हळदीचे कंद

छतावर एका कोपर्‍यात अतिरिक्‍त मातीचा ढिग होता. त्‍यात चुकून एक हळदीचा कंद राहिला असावा. पावसाळा चालू झाल्‍यावर त्‍यापासून हळदीचे एक रोप आपोआप उगवून आले. नोव्‍हेंबर मासापर्यंत पावसाच्‍या पाण्‍यावर ते मोठे होत राहिले. आम्‍ही त्‍याची कोणतीच काळजी घेतलेली नाही. आता ते रोप उपटून काढल्‍यावर खाली जे हळदीचे कंद निघाले, त्‍यांचे वजन अर्धा किलो भरले.

– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (७.१२.२०२१)

3 thoughts on “पेठेतील कोणतेही खत न वापरता लागवडीसाठी सुपीक माती कशी बनवावी ?”

  1. नमस्कार ! जीवामृत तयार करून ७ दिवस होवून गेले. त्यातील निम्मे जीवामृत वापरले व निम्मे शिल्लक राहिले आहे, मग आता ते राहिलेले जीवामृत वापरायचे की टाकून द्यायचे ?

    Reply
    • राहिलेले जीवामृत वापरू शकतो; परंतु जीवामृत तयार केल्यावर चौथ्या दिवशी वापरावे आणि ७ व्या दिवसापर्यंत वापरून संपवावे.

      Reply

Leave a Comment