अनुक्रमणिका
- १. झाडाला अन्नद्रव्ये कशी प्राप्त होतात ?
- २. देशी गायीच्या शेणाचे महत्त्व
- ३. ‘जिवामृत’ या संकल्पनेचा उगम
- ४. जिवामृत कसे बनवावे ?
- ५. जिवामृत वापरण्याची पद्धत
- ६. जिवामृत कार्य कसे करते ?
- ७. जिवामृताचे लाभ
- ८. जिवामृतासाठी देशी गायीचे शेण आणि गोमूत्र कुठे मिळेल ?
- ९. जीवामृत बनवतांना गूळ आणि बेसन यांना पर्याय म्हणून काय वापरावे ?
- १०. साधकांनो, घरोघरी लागवड मोहिमेच्या अंतर्गत नियमितपणे जिवामृताचा वापर करा !
- साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती !
- लागवडीसंबंधी प्रायोगिक लिखाण पाठवा !
‘पद्मश्री’ पुरस्कारप्राप्त सुभाष पाळेकर यांनी ‘सुभाष पाळेकर नैसर्गिक शेतीतंत्र’ शोधून काढले. आज भारत शासनानेही याची नोंद घेऊन या तंत्राचा प्रसार करण्याचे ठरवले आहे. या शेतीतंत्रात ‘जिवामृत’ नामक पदार्थाचा वापर केला जातो. याविषयी आजच्या लेखात माहिती करून घेऊया.
१. झाडाला अन्नद्रव्ये कशी प्राप्त होतात ?
‘कोणतेही झाड त्याच्या मुळांवाटे अन्नद्रव्ये शोषून घेते. ही अन्नद्रव्ये मातीत असतात. असे असले, तरी मातीतील अन्नद्रव्ये झाडाला मिळण्यासाठी काही सूक्ष्म जिवाणूंची आवश्यकता असते. झाडांसाठी नत्र (नायट्रोजन) अतिशय आवश्यक असते. हवेमध्ये नत्र जास्त प्रमाणात असते; परंतु झाडे हवेतून नत्र घेऊ शकत नाहीत. झाडे मातीतूनच नत्र घेऊ शकतात. झाडांना आवश्यक असलेले नत्र मातीमध्ये उपलब्ध होण्यासाठीसुद्धा काही जिवाणूंची आवश्यकता असते. जिवाणूंच्या कार्यावर झाडांचे पोषण अवलंबून असते. या जिवाणूंचे कार्य जेवढे चांगले होईल, तेवढी झाडाला अन्नद्रव्ये अधिक प्रमाणात प्राप्त होतात.
२. देशी गायीच्या शेणाचे महत्त्व
देशी गायीच्या शेणामध्ये झाडांसाठी अत्यंत उपयुक्त जीवाणू पुष्कळ मोठ्या प्रमाणात असतात. हे जीवाणू जर्सीसारख्या विदेशी गायींच्या किंवा म्हशींच्या शेणात नसतात. एक देशी गाय दिवसाला सरासरी १० किलो शेण देते. एवढ्या शेणापासून २०० लिटर जिवामृत बनवता येते. हे जिवामृत १० पट पाण्यात मिसळून १ एकर (४ सहस्र वर्ग मीटर) शेतामध्ये खत म्हणून वापरता येते. हे जिवामृत महिन्यातून एकदा वापरले तरी पुरते. याप्रमाणे एका देशी गायीच्या एका दिवसाच्या शेणापासून प्रतिदिन एक एकर शेतीसाठी लागणारे खत सिद्ध होऊ शकते, म्हणजे महिन्याच्या ३० दिवसांमध्ये एका देशी गायीच्या शेणापासून ३० एकर शेतीच्या खताची व्यवस्था होऊ शकते.
३. ‘जिवामृत’ या संकल्पनेचा उगम
‘पद्मश्री’ सुभाष पाळेकर यांनी देशी गायीच्या शेणाचे महत्त्व ओळखले. ‘देशी गायीच्या शेणात असलेले झाडांसाठी उपयुक्त जिवाणूंचे प्रमाण कसे वाढवता येईल’, यावर त्यांनी चिंतन केले. यातूनच ‘जिवामृत’ या संकल्पनेचा उदय झाला. दुधात दह्याचे विरजण टाकले की, दुधाचे दही बनते. दह्यामध्ये ‘लॅक्टोबॅसिलस’ नावाचे असंख्य सूक्ष्म जिवाणू असतात; पण हे जिवाणू दुधात नसतात. थोडक्यात दही हे या जिवाणूंचे विरजण (कल्चर) असते. ते दुधात टाकल्यावर दुधामध्ये जिवाणूंची वाढ होऊन दही बनते. दह्याप्रमाणे जिवामृत हेसुद्धा जिवाणूंचे एक विरजण (कल्चर) आहे. देशी गायीचे शेण, गोमूत्र आणि माती यांमध्ये असलेले झाडांना उपयुक्त असे जीवाणू गूळ अन् डाळीचे पीठ यांच्या साहाय्याने झपाट्याने वाढतात. जिवाणूंच्या शरिरासाठी प्रथिनांची (‘प्रोटीन्स’ची) आवश्यकता असते. जिवामृत बनवण्यासाठी जे डाळीचे पीठ वापरण्यात येते, त्यातून ही आवश्यकता पूर्ण होते. वाढीसाठी जिवाणूंना आवश्यक असलेली ऊर्जा गुळातून मिळते.
४. जिवामृत कसे बनवावे ?
घरच्या घरी स्वतःपुरता भाजीपाला पिकवण्यासाठी १० लिटर (१० तांबे) पाण्यामध्ये देशी गायीचे साधारण अर्धा ते १ किलो ताजे शेण आणि अर्धा ते १ लिटर देशी गोमूत्र नीट मिसळून घ्यावे. (शेण नेहमी ताजे (ओलसर) असावे. ते वाळलेले नसावे. गोमूत्र कितीही जुने असले, तरी चालते. गोशाळेत जमिनीवर पडून नालीतून वाहून आलेले गोमूत्रसुद्धा यासाठी चालते. गोमूत्र अर्क वापरू नये.) या मिश्रणात १ मूठ माती, १०० ग्रॅम बेसन किंवा कोणत्याही डाळीचे पीठ आणि १०० ग्रॅम सेंद्रिय गूळ नीट मिसळून घ्यावा. हे मिश्रण काठीने घड्याळाच्या काट्याच्या दिशेने २ मिनिटे ढवळावे आणि यावर गोणपाट किंवा कापड झाकून सावलीत ठेवावे. यापुढील ३ दिवस सकाळ सायंकाळ हे मिश्रण प्रत्येकी २ मिनिटे काठीने घड्याळाच्या काट्याच्या दिशेने ढवळून पुन्हा झाकून ठेवावे. चौथ्या दिवशी हे जिवामृत वापरण्यास सिद्ध होते. जिवामृत धातूच्या भांड्यात न बनवता मातीच्या किंवा प्लास्टिकच्या भांड्यात बनवावे.
अ. जीवामृत कमी प्रमाणात कसे बनवाल ?
‘एका प्लास्टिकच्या तांब्यामध्ये ३०० मिलि (अनुमाने १ पेला) पाणी, देशी गायीचे ३० ग्रॅम (अनुमाने अर्धी वाटी) ताजे शेण, देशी गायीचे ३० मिलि (अनुमाने अर्धी वाटी) मूत्र (हे कितीही जुने चालते), १ चमचा बेसन, १ चमचा गूळ आणि चिमूटभर माती यांचे मिश्रण बनवून सुती कपड्याने झाकून ठेवावे. हे मिश्रण ३ दिवस सकाळ-सायंकाळ काठीने घड्याळाच्या काट्याच्या दिशेने अर्धा मिनिट ढवळावे. चौथ्या दिवशी यामध्ये १० पट (३ तांबे) पाणी मिसळावे. हे पाण्यात पातळ केलेले जीवामृत कुंडीतील झाडांना प्रत्येकी १ – १ वाटी या प्रमाणात मुळांशी द्यावे. हे पाणी मिसळलेले जीवामृत फडक्याने गाळून तुषाराच्या बाटलीत (स्प्रेयरमध्ये) भरून याची झाडांवर फवारणीही करावी. प्रत्येक पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना फवारणी करावी. एकदा बनवलेले जीवामृत २ – ३ दिवसांत वापरून संपवावे.
देशी गायीच्या केवळ ३० ग्रॅम शेणापासून ३ दिवसांत ३० कुंड्यांना पुरेल एवढे नैसर्गिक खत बनते. याहून स्वस्त आणि पटकन बनणारे दुसरे कोणते खत असेल ? १५ दिवसांतून एकदा असे खत बनवा आणि घरच्या घरी भरपूर भाजीपाला पिकवा.’
(जिवामृत कसे बनवावे, याविषयी अधिक माहिती वाचा https://www.sanatan.org/mr/a/82985.html)
५. जिवामृत वापरण्याची पद्धत
जिवामृत बनल्यावर ७ दिवसांपर्यंत वापरता येते; परंतु पहिल्या ४ दिवसांत (म्हणजे जिवामृताचे घटक मिसळल्याच्या चौथ्या दिवसापासून सातव्या दिवसापर्यंत) वापरल्यास जास्त चांगले परिणाम मिळतात. जिवामृत वापरतांना त्यात १० पट पाणी मिसळून वापरावे. जिवामृत प्रत्येक वेळी ताजे बनवावे.
अ. पालापाचोळ्यासारख्या विघटनशील कचर्यापासून सुपीक माती (ह्यूमस) बनवण्यासाठी प्रत्येक आठवड्याला कचर्यावर सडा शिंपडल्याप्रमाणे जीवामृत शिंपडावे. (विघटनशील कचर्यापासून सुपीक माती बनवण्याविषयी सविस्तर माहिती `पेठेतील कोणतेही खत न वापरता जिवामृताचा उपयोग करून लागवडीसाठी सुपीक माती कशी बनवावी ?` यात दिली आहे.)
आ. १० पट पाण्यात पातळ केलेले जिवामृत लहान झाडांना एक कप, तर मोठ्या झाडांना १ तांब्या प्रमाणात सर्व बाजूंनी मुळांशी पाणी देतात, त्याप्रमाणे द्यावे.
इ. झाडांवरील बुरशीचा प्रतिबंध करण्यासाठी जिवामृत १० पट पाण्यात मिसळून फडक्याने गाळून तुषाराच्या (‘स्प्रे’च्या) बाटलीत भरून झाडांवर तुषारसिंचनही (स्प्रे) करता येते.
ई. आठवड्यातून, १५ दिवसांतून किंवा अगदीच शक्य नसल्यास महिन्यातून एकदा सर्व झाडांना जिवामृत द्यावे.
१५ दिवसांतून एकदा जिवामृताची फवारणी करण्याचे लाभ : ‘१५ दिवसांतून एकदा १ लिटर पाण्यामध्ये १०० मि.लि. गाळलेले जीवामृत मिसळून किंवा २५ मि.लि. गाळलेले आंबट ताक आणि ७५ मि.लि. गाळलेले जीवामृत असे मिश्रण मिसळून त्याची झाडांवर फवारणी करावी. या फवारणीमुळे झाडाच्या पानांमधून होणारी बाष्प उत्सर्जनाची क्रिया नियंत्रित होते. झाडाची प्रतिकारशक्ती वाढते. झाडाला होणारे विविध विषाणूजन्य आणि बुरशीजन्य रोग आटोक्यात येतात.’ – सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा
६. जिवामृत कार्य कसे करते ?
विघटनशील नैसर्गिक कचर्याचे विघटन करणारे असंख्य जीवाणू जिवामृतात असतात. जिवामृत नैसर्गिक कचर्यावर शिंपडल्यावर हे जीवाणू कचर्याचे झपाट्याने विघटन करतात. कचर्याच्या विघटनामुळे झाडांसाठी आवश्यक अशी सुपीक माती (ह्यूमस) बनते. जिवामृतातील जीवाणू झाडांना अन्नद्रव्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध करून देतात. यामुळे झाडे सशक्त होतात. झाडांच्या पानांचा आकार वाढतो. झाडे त्यांचे अन्न प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे (‘फोटोसिंथेसिस’द्वारे) करत असतात. झाडे फळांमध्ये नवीन बीजसाठी अन्न साठवून ठेवतात. प्रकाश संश्लेषण क्रिया आणि अन्नद्रव्यांचा पुरवठा जेवढा जास्त, तेवढी फलधारणा, म्हणजे अन्न साठवून ठेवण्याची क्रिया जास्त होते. जिवामृतामुळे झाडाला अन्नद्रव्ये जास्त प्रमाणात मिळतातच, तसेच पानांचा आकारही वाढतो. यामुळे प्रकाश संश्लेषण क्रियाही जास्त प्रमाणात होते आणि उत्पन्न वाढते. जिवामृतात झाडांची रोग प्रतिकारशक्ती वाढवणारे गुणधर्मही असतात.
७. जिवामृताचे लाभ
अ. जिवामृत बनवणे अत्यंत सोपे आणि स्वस्त आहे. याच्यामुळे खतांवरील खर्च पुष्कळ न्यून होतो.
आ. हे पूर्णतः नैसर्गिक तर आहेच, तसेच झाडांना अमृतासमान आहे. विषमुक्त अन्नाच्या निर्मितीसाठी जिवामृत महत्त्वाचा घटक आहे.
इ. जिवामृतामुळे नैसर्गिक कचर्याचे लवकर विघटन होऊन त्याचे सुपीक मातीत (‘ह्यूमस’मध्ये) रूपांतर होते.
ई. माती भुसभुशीत होते. त्यामुळे मातीत काम करणे सोपे जाते.
उ. मातीची पाणी धरून ठेवण्याची आणि ते झाडांना उपलब्ध करून देण्याची क्षमता वाढते. त्यामुळे अल्प पाण्यामध्ये झाडे चांगली वाढतात आणि पाण्याची बचत होते.
ऊ. झाडांना आवश्यक ती अन्नद्रव्ये आणि ‘मित्र जीवाणू (उपयुक्त जीवाणू)’ भरपूर प्रमाणात उपलब्ध होतात.
ए. झाडांमध्ये रोग प्रतिकारशक्ती निर्माण झाल्याने झाडांना रोग होण्याचे प्रमाण घटते.
ऐ. जिवामृताच्या तुषारसिंचनाने (फवारणीने) झाडांवर रोग निर्माण करणार्या बुरशीचा प्रतिबंध होण्यास साहाय्य होते.
ओ. झाडे कठीण वातावरणातही तग धरतात. त्यामुळे उष्णता, थंडी किंवा पाऊस न्यून अधिक झाल्यामुळे होणारी हानी टळू शकते.
८. जिवामृतासाठी देशी गायीचे शेण आणि गोमूत्र कुठे मिळेल ?
आजकाल सर्वत्र देशी गायींच्या गोशाळा असतात. मुंबई-पुण्यासारख्या शहरी भागांतही गोशाळेला भेट देऊन त्यांच्याकडून जिवामृत बनवण्यासाठी शेण आणि गोमूत्र विकत किंवा अर्पण घेता येऊ शकते. अनेक देशी गायी रस्त्यावर फिरत असतात. त्यांचे पडलेले शेण उचलून आणता येते. (असे करण्यापूर्वी गाय देशीच आहे, याची जाणकाराकडून निश्चिती करून घ्यावी.) काही गोशाळा जिवामृत बनवून विकतात. त्यांच्याकडून जिवामृत विकतही घेता येते; परंतु ते स्वतः बनवणे स्वस्त पडते.
९. जीवामृत बनवतांना गूळ आणि बेसन यांना पर्याय म्हणून काय वापरावे ?
‘जीवामृत हे देशी गायीचे शेण, गोमूत्र, बेसन आणि गूळ यांच्यापासून बनवलेले एक मिश्रण आहे. घरगुती लागवडीसाठी ५ लिटर जीवामृत करायचे असेल, तर अर्धी वाटी गूळ आणि अर्धी वाटी बेसन लागते. त्यांचे पर्याय खाली दिले आहेत.
अ. बेसनाला पर्याय
येथे बेसन केवळ चणाडाळीचे अपेक्षित नसून मूग, तूर, मसूर, चवळी, अशा कुठल्याही द्विदल धान्याचे पीठ चालते. स्वयंपाकघरातील चांगले बेसन घेण्याऐवजी डाळी, कडधान्ये निवडतांना त्यांतील छिद्र पडलेली डाळ किंवा कडधान्य निवडून बाजूला काढून ते साठवून ठेवावे. मिक्सरवर दळून त्यांचे पीठ करता येते. हे पीठ जीवामृतासाठी वापरावे.
आ. गुळाला पर्याय
गुळाऐवजी तेवढ्याच प्रमाणात गोड फळांचा गर घेतला, तरी चालतो. केळी, पपई, चिकू, आंबा, या गोड फळांचा गर काढून वापरावा. काही वेळा घरी आणलेली ही फळे अतिरिक्त प्रमाणात पिकतात अन् मऊ होतात. अशा वेळीही त्यांचा गर जीवामृत करण्यासाठी घ्यावा. ऊसाचा रससुद्धा वापरता येतो. तो गुळाच्या चौपट प्रमाणात घ्यावा, उदा. अर्धी वाटी गूळ असेल, तर २ वाट्या ऊसाचा रस घ्यावा.’
१०. साधकांनो, घरोघरी लागवड
मोहिमेच्या अंतर्गत नियमितपणे जिवामृताचा वापर करा !
काही साधकांचा एकत्रित गट करून जिवामृत बनवता येऊ शकते. बनलेले जिवामृत साधक त्यांच्या आवश्यकतेनुसार वाटून घेऊ शकतात. असे केल्याने श्रम अल्प होतील. आपल्या संपर्कातील जवळच्या गोशाळांकडून देशी गायींचे शेण आणि गोमूत्र उपलब्ध होऊ शकते. जिवामृत वापरल्यास कोणतीही बाहेरील विकतची खते वापरावी लागत नाहीत. यामुळे साधकांनी केंद्रस्तरावर जिवामृत बनवण्याचे नियोजन करून नियमितपणे (न्यूनतम १५ दिवसांतून एकदा) जिवामृताचा वापर करावा. यामध्ये प्रायोगिक स्तरावर ज्या शंका येतील, त्या सनातनच्या संकेतस्थळावर पृष्ठ ४ वर दिलेल्या मार्गिकेवर विचाराव्यात.
सर्वत्रच्या साधकांकडून स्वतःच्या घरी लवकरात लवकर भाजीपाला, फळझाडे आणि औषधी वनस्पतींची लागवड होवो, अशी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !’
(पद्मश्री सुभाष पाळेकर नैसर्गिक शेतीतंत्रावरील विविध लेखांच्या आधारे संकलित लेख)
साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती !
लागवडीसंबंधी प्रायोगिक लिखाण पाठवा !
‘लागवड हा एक प्रायोगिक विषय आहे. यामध्ये लहान लहान अनुभवांनाही पुष्कळ महत्त्व असते. जे साधक आतापर्यंत लागवड करत आले आहेत, त्यांनी त्यांना लागवड करतांना आलेले अनुभव, झालेल्या चुका, त्या चुकांतून शिकायला मिळालेली सूत्रे, लागवडीसंबंधी केलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग यांविषयीचे लिखाण स्वतःच्या छायाचित्रासहित पाठवावे. हे लिखाण दैनिकातून प्रसिद्ध करता येईल. यातून इतरांनाही शिकता येईल.
लिखाण पाठवण्यासाठी टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१
संगणकीय पत्ता : [email protected]