मंगलमय’ या यू ट्यूब वाहिनीवरील ‘हिंदुत्व आणि हिंदु संतांवर होणारे आघात’ या विषयावरील चर्चासत्रात सनातनचा सहभाग

श्री. अभय वर्तक

पनवेल – बहुराष्ट्रीय आस्थापने आणि ख्रिस्ती यांनी  मिळून ज्यांच्यावर हिंदूंची श्रद्धा आहे, ते भारतातील संत अन् संप्रदायांचे प्रमुख यांची अपकीर्ती करण्याचे षड्यंत्र आखल्याचे भारतीय गुप्तचर संघटनांनी वर्ष २००८ मध्ये सांगितले. वर्ष २००६ मध्ये अमेरिकेच्या गुप्तहेर संघटनेनेही हा अहवाल दिला होता. या नंतरच्या काळात उत्तर, तसेच दक्षिण भारतातीलही आमच्या विविध संप्रदायांच्या हिंदु संतांवर आरोप झाले, ज्याचा कोणताही पुरावा नव्हता. प्रथम शंकराचार्य जयेंद्र सरस्वती, नंतर योगऋषी रामदेवबाबा, पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू आणि अन्य संत यांच्यावरही खोटे आरोप करण्यात आले. एकीकडे अशा प्रकारे संतांवरील खोट्या आरोपांच्या माध्यमातून हिंदूंच्या श्रद्धांवर आघात झाले आणि त्यामुळेच दुसरीकडे ख्रिस्त्यांच्या ‘चंगाई’ (चंगाई म्हणजे पाद्र्यांकडून आजारी असणार्‍यांवर प्रार्थनेद्वारे उपचार करून त्यांना कथितरित्या बरे करणे) सारख्या धर्मांतर करणार्‍या सभा मात्र जोरात चालू आहेत, जे प्रत्यक्षात फसवणूक करत आहेत. भारतात ख्रिस्ती मिशनर्‍यांना पुष्कळ सकारात्मक वातावरण आहे. त्यामुळेच नागालँडच्या मुख्यमंत्र्यांनी तर राज्यच ख्रिस्ती असल्याचे घोषित केले आहे. आपण एकटे राहिलो, तर आपण नष्ट होऊ. वर्ष १९७५ मध्ये आनंद संप्रदायाला असेच नष्ट करण्यात आले. मुसलमान संघटित असल्याने त्यांना राजकीय नेते घाबरतात, हिंदू मात्र जातींमध्ये विभागले गेले आहेत. संतांवरील आघातांसह हिंदूंवरील सर्व प्रकारची आक्रमणे रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आणि हिंदु राष्ट्राची मागणी अतिशय प्रभावीपणे करणे अपरिहार्य आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांनी केले. ते ‘मंगलमय’ या यू ट्यूब वाहिनीवरील ‘धर्मक्षेत्र मालिका भाग २’मध्ये ‘हिंदुत्व आणि हिंदु संतांवर होणारे आघात’ या विषयावरील चर्चासत्रात बोलत होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योग वेदांत समितीचे श्री. मानव बुद्धदेव यांनी केले.

 

संतांनी एकत्र येऊन हिंदु धर्मियांची भक्कम
व्यवस्था उभी करायला हवी ! – निखिल वर्मा, राष्ट्रीय अध्यक्ष, युवा मोर्चा

प्रसारमाध्यमे हिंदुत्वाची सकारात्मक बाजू लपवतात आणि थोडसे जरी नकारात्मक  असले, तरी संपूर्ण भारतभर त्याचे कथानक रचून दाखवले जाते. हिंदु संघटित होऊ शकत नाहीत, असे नाही. जसे इस्लाम किंवा ख्रिस्ती यांचा एक पाया किंवा व्यवस्था सिद्ध आहे आणि त्याच्या आधारावर सगळे मिळून काम करतात, तशी हिंदु धर्मियांची भक्कम व्यवस्था उभी रहायला हवी. आपली व्यवस्था इंग्रजांनी उद्ध्वस्त केली. साधूसंत आणि शंकराचार्य यांनी एकत्र येऊन ही व्यवस्था (स्ट्रक्चर) उभी केली पाहिजे. मंदिरात येणारा पैसा हिंदुत्वाच्या कार्यासाठी दिला गेला पाहिजे. हिंदूंचा पैसा अल्पसंख्यांकांना अनुदान देण्यासाठी व्यय होतो. भारतविरोधी व्यक्तींसाठी न्यायालयाचे दरवाजे रात्री २ वाजताही उघडतात. पुरावे नसतांनाही साध्वी प्रज्ञा सिंह ९ वर्षे कारागृहात खितपत पडल्या होत्या.

 

माध्यमांत सतत वृत्त दाखवल्याने न्यायव्यवस्थेवर
परिणाम होतो ! – धर्मेंद्र, प्रमुख, युवा सेवा संघ, लक्ष्मणपुरी (लखनौ)

हिंदु संतांच्या संदर्भात प्रशासन लगेच कृतीशील होते. मौलवींच्या संदर्भात असे काही झाल्यास मात्र प्रशासन झोपून असते. हिंदु संतांच्या संदर्भात माध्यमे वस्तूनिष्ठ माहिती सांगत नाहीत. कांची कामकोटी पीठाच्या शंकराचार्यांना अटक झाली, तेव्हा माध्यमांनी अनेक घंटे वृत्त दाखवले; पण त्यांची निर्दाेष मुक्तता झाल्यावर केवळ ४२ सेकंदांचे वृत्त दाखवले. एका आश्रमातील एक २२ वर्षांचा युवक जम्मू-काश्मीर येथे स्वतःहून गेला होता. त्या वेळी ‘आश्रमातून युवक गायब’ अशा मथळ्याचे वृत्त सर्व माध्यमांनी दाखवले. माध्यमे २४ घंटे एखादे वृत्त दाखवतात, तेव्हा न्यायव्यवस्थेवर दबाव येतो.

 

धर्मावरील आक्रमणे रोखण्यासाठी संत पुढाकार घेत असल्याने
त्यांच्यावर आघात होतात ! – श्रीमती नीलम दुबे, प्रवक्त्या, योग वेदांत समिती

संतांवर होणारे आघात पूर्वीपासून चालत आले आहेत. शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांना दिवाळीच्या दिवशी कारागृहात ठेवण्यात आले. संत धर्महानी टाळतात, तसेच ते धर्म टिकवण्यासाठी, संस्कृतीवरील आक्रमणे रोखण्यासाठी पुढाकार घेतात. त्यामुळे त्यांच्या विरोधकांना त्रास होतो; कारण विरोधक धर्मविरोधी आणि संस्कृतीविरोधी आहेत. त्यामुळे  मोठ्या संतांना कारागृहात टाकले, तर अन्यांवरही दडपण येते. पूज्यपाद संतश्री आसारामबापूजींनी मातृ-पितृपूजन, तुलसीपूजन चालू केले, गुरुकुल चालू केले आणि धर्मांतर रोखले. त्यामुळे ख्रिस्ती मिशनर्‍यांना ते आवडले नाही. आधी संस्कृतीवर आणि नंतर देशावर आक्रमण हे ख्रिस्त्यांचे धोरण आहे. सनातन संस्थेच्याही पाठीमागे हे लागले होते.

 

पूज्यपाद आसारामजी बापू
यांचा खटला आणि अन्य यांमधील भेद दिसून येतो ! – अधिवक्ता विनोद

प्रतिदिन चर्च आणि मदरसे येथील अपप्रकार समोर येतात; पण त्यांच्या संदर्भात कुणाला अटक होत नाही. माध्यमांचे ‘कॅमेरे’ तिथे जात नाहीत. हिंदु संतांचे, त्यांच्या कार्याचे गौरवगान कधी केले जात नाही. जोधपूर खटल्यात माध्यमांकडून पूज्यपाद आसारामजी बापूंच्या संदर्भातील वैद्यकीय अहवाल दाखवला गेला नाही. पूज्यपाद आसारामजी बापू यांची धर्मपत्नी आणि कन्या यांना जामीन दिल्यावर गांधीनगर येथील न्यायाधिशांचे स्थानांतर करण्यात आले. हा विरोधाभास आहे. अन्य खटल्यांत ‘मिडिया ट्रायल’ (वृत्तवाहिन्यांवर एकांगी पद्धतीने केली जाणारी चर्चा) होऊ नये, असे सांगितले जाते; मात्र बापूजींच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात केवळ ‘मिडिया ट्रायल’च करण्यात आली. कायदा सर्वांसाठी सारखा आहे, असे आपण म्हणतो; पण यात असे दिसत नाही. हिंदु संतांवर आरोप होतात, तेव्हा मानसिकता वेगळी असते; मात्र अन्य धर्मियांच्या संदर्भात प्रत्यक्षात असे चालू असूनही त्यांच्या संदर्भात ‘मिडिया ट्रायल’ होत नाही.

 

भक्तांनी आत्मबल न गमावता श्रद्धा वाढवावी ! – श्री. अभय वर्तक

या चर्चासत्रामध्ये श्री. अभय वर्तक म्हणाले, ‘‘पूज्यपाद संतश्री बापूजींच्या जिवाला धोका असूनही त्यांना जामीन किंवा पॅरोल मिळाला नाही; परंतु भक्तांनी खचून जाता कामा नये. ‘पूज्यपाद बापू आपल्या जीवनात आल्यामुळे आपल्या जीवनात काय परिवर्तन झाले’, हे लक्षात घेऊन भक्तांनी स्वतःची श्रद्धा वाढवली पाहिजे. ईश्वर आणि संत आपल्यासमवेत असल्याने आपला विजय निश्चित आहे.’’

 

सनातन संस्थेविषयी सूत्रसंचालक मानव बुद्धदेव यांनी काढले गौरवोद्गार !

सनातन संस्था ही नेहमी सत्याची बाजू घेणारी संघटना !

श्री. मानव बुद्धदेव

चर्चासत्राच्या आरंभी सनातन संस्थेची ओळख करून देतांना सूत्रसंचालक मानव बुद्धदेव म्हणाले, ‘‘सनातन संस्था ही नेहमी सत्याची बाजू घेणारी संघटना आहे. मग त्या सत्याची बाजू घेतांना स्वतःला त्रास झाला, तरी सनातन संस्था निडरतेने सत्यासाठी आवाज उठवते.’’

 

हिंदु संतांवर आघात करणे, हे ख्रिस्ती मिशनर्‍यांचे ध्येय ! – दिव्या नागपाल

युवकांनी संतांसाठी संघटित झाले पाहिजे. धर्माप्रती भाव असणे अतिशय आवश्यक आहे. धर्मासाठी पैसा आहे; पण श्रद्धा नसेल, तर काही उपयोग नाही. संतांप्रती श्रद्धा असणे आवश्यक आहे. शांतीप्रिय संतांना काही झाले, तरी त्यामुळे कुणी प्रभावित होत नाही; कारण आज समाजावर अभिनेत्यांचा प्रभाव आहे. पूज्यपाद आसाराम बापूजी आणि अन्य प्रकरणे यामध्ये माध्यमे आणि प्रशासन यांची दुटप्पी भूमिका दिसून येते. संतांमुळे आपल्याला परंपरा, संस्कृती यांचे ज्ञान होते. हिंदु संतांवर आघात करणे, हे ख्रिस्ती मिशनर्‍यांचे ध्येय आहे. त्यांची प्रतिमा डागाळली की, लोकांचा त्यांच्यावरील विश्वास उडतो. असे झाले की, युवक ‘अन्य पंथ चांगले आहेत’, असे समजतात आणि त्यामुळे त्यांचा हिंदु धर्मावरील विश्वास नाहीसा होतो, हे ख्रिस्त्यांचे षड्यंत्र आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment