१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अवतारत्व जाणून त्यांच्या
कार्याला सर्वस्वी वाहून घेणारे संत, म्हणजे प.पू. दास महाराज !
‘सप्तर्षींनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अवतारकार्याचे वर्णन नाडीपट्टीत लिहून ठेवले आहे. नाडीपट्टीवाचन होण्याआधी समाजातील हाताच्या बोटांवर मोजण्याएवढ्या संतांनी याची प्रत्यक्ष अनुभूती घेतली होती. या संतमालिकेतील पहिले संत, म्हणजे पानवळ-बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील प.पू. दास महाराज ! त्यांनी त्यांचे संपूर्ण जीवन अत्यंत शरणागतभावाने परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी समर्पित केले.
२. प.पू. दास महाराज यांनी साधकांना होणार्या वाईट
शक्तींच्या त्रासाच्या निवारणार्थ पंचमुखी हनुमत्कवच यज्ञ करणे
२ अ. प्रथम भेटीतच ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीरामाचा अवतार आहेत’, हे जाणणे
आणि सनातनच्या आश्रमांत ५५ पंचमुखी हनुमत्कवच यज्ञ करून सनातन संस्थेत यज्ञसंस्थेची मुहूर्तमेढ रोवणे
वर्ष २००० पासून सनातनच्या साधकांना होणारा वाईट शक्तींचा त्रास वाढला. याच कालखंडात प.पू. दास महाराज यांची परात्पर गुरुदेवांशी भेट झाली. प.पू. दास महाराज यांनी प्रथम भेटीतच ‘परात्पर गुरु डॉ. आठवले श्रीरामाचा अवतार आहेत’, हे जाणले. त्या क्षणापासून प.पू. दास महाराज यांनी समाजातील व्यक्तींसाठी पंचमुखी हनुमत्कवच यज्ञ करणे बंद करून सेवा म्हणून केवळ सनातन संस्थेसाठी यज्ञ करणे चालू केले. प.पू. दास महाराज यांनी साधकांना होणार्या वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणासाठी सनातनच्या विविध आश्रमांत मिळून एकूण ५५ पंचमुखी हनुमत्कवच यज्ञ केले. त्यांनी केलेल्या पंचमुखी हनुमत्कवच यज्ञाने सनातन संस्थेत यज्ञसंस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली.
२ आ. स्वतःवर वाईट शक्तींची अनेक प्राणघातक आक्रमणे होऊनही
परात्पर गुरुदेवांप्रतीच्या श्रद्धेच्या बळावर पंचमुखी हनुमत्कवच यज्ञ करणे
‘परात्पर गुरुदेव केवळ संकल्पानेच या वाईट शक्तींच्या त्रासाचे निवारण करू शकतात; पण ‘माझ्याकडून सेवा घडावी’, यासाठी ते मला संधी देत आहेत’, असा प.पू. दास महाराज यांचा भाव होता. वाईट शक्तींनी महाराजांवर अनेक प्राणघातक आक्रमणे केली. महाराजांनी ती परात्पर गुरुदेवांचे स्मरण करतच यशस्वीपणे परतून लावली. ते पाहून ‘त्रेतायुगात मारुतीने श्रीरामाची सेवा कशी केली असेल !’, याची प्रचीती आली.
प.पू. दास महाराज यांची दास्यभक्ती पाहूनच चैतन्यमूर्ती परात्पर गुरु (कै.) पांडे महाराज यांनी त्यांचे नामकरण ‘प.पू. दास महाराज’ असे केले. ‘ते किती सार्थ आहे !’, हे लक्षात येते. (‘प.पू. दास महाराज यांचे पूर्वीचे नाव ‘प.पू. रघुवीर महाराज’, असे होते.’ – संकलक)
३. वयाची पर्वा न करता वर्षभर ‘मौनसाधना’ करून साधकांना चैतन्य पुरवणे
‘परात्पर गुरुदेव या वयातही धर्मसंस्थापनेसाठी जिवाची पर्वा न करता अहोरात्र कार्य करत आहेत. वयोमानामुळे माझ्याकडून काहीच सेवा घडत नाही’, अशा विचारांत असतांनाच प.पू. दास महाराज यांना त्यांचे गुरु भगवान श्रीधरस्वामी यांनी स्वप्नदृष्टांत देऊन ‘मौनसाधना’ करण्याचा आदेश दिला. त्यानुसार प.पू. दास महाराज यांनी साधकांसाठी वर्षभर ‘मौनसाधना’ केली आणि साधकांना चैतन्यशक्ती पुरवली. केवढे हे त्यांचे परात्पर गुरुदेव आणि त्यांचे कार्य यांच्याप्रतीचे प्रेम ! त्याचे शब्दांत वर्णन करणे शक्य नाही.
४. परात्पर गुरुदेवांप्रतीचा भाव !
एकदा प.पू दास महाराज यांनी परात्पर गुरुदेवांना रामफळ अर्पण केले होते. परात्पर गुरुदेवांनी ते ग्रहण केले. परात्पर गुरुदेवांनी खाल्लेल्या रामफळातील बिया महाराजांनी ‘गौतमारण्य’ आश्रमातील बागेत रुजवल्या. त्या झाडाला आता पुष्कळ फळे येतात. ही फळे अत्यंत गोड आणि रसाळ असतात. ‘या झाडाच्या फळांमधून परात्पर गुरुदेवांचे चैतन्य अखंड प्रवाहित होत आहे’, असे जाणवते. प.पू. दास महाराज यांच्या या कृतीतून त्यांचा परात्पर गुरुदेवांप्रतीचा उच्च कोटीचा भाव लक्षात येतो.
५. प.पू. दास महाराज यांचे परात्पर गुरु डॉ. आठवले
यांच्या धर्मसंस्थापनेच्या कार्यातील अतुलनीय योगदान !
द्वापरयुगात श्रीकृष्णाने पांडवांच्या माध्यमातून धर्मसंस्थापना केली. भगवंताने भगवद्गीतेच्या माध्यमातून या कार्यासाठी अर्जुनाला प्रवृत्त केले आणि स्वतः अर्जुनाच्या रथाचे सारथ्य केले. याच रथावर धर्मध्वजाच्या ठिकाणी सूक्ष्मातून उपस्थित राहून मारुतिरायाने शत्रूच्या भीषण आणि संहारक शस्त्रांपासून अर्जुनाच्या रथाचे रक्षण केले. ‘आज परात्पर गुरुदेव साधकरूपी अर्जुनाचे सारथ्य करत आहेत आणि अंजनीसूत हनुमंत प.पू. दास महाराज यांच्या रूपाने साधकांचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण करत आहे’, असे जाणवते.
६. दास्यभक्तीच्या बळावर परात्पर गुरुदेवांशी एकरूपता साधणे
नवविधा भक्तीत ‘दास्यभावा’ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सद्गुरूंचे दास्यत्व अंगिकारल्याविना भक्तीची पूर्तता होत नाही. ‘सेवा झाली नाही, तर खाणे-पिणे न रुचणे, चित्त व्याकुळ होणे’, ही दास्यभक्तीची परिसीमा मानली जाते. ‘सद्गुरूंची कीर्ती वाढावी, त्यांच्या कार्याचा विस्तार व्हावा’, यासाठी दास अहोरात्र झटत असतो. दास्यभक्तीचे मूर्तीमंत उदाहरण, म्हणजे प.पू. दास महाराज ! प.पू. दास महाराज यांनी भक्तीच्या बळावर परात्पर गुरुदेवांशी एकरूपता साधली.
७. कृतज्ञता आणि प्रार्थना
परात्पर गुरुदेवांनी आम्हाला प.पू. दास महाराज यांच्या रूपात साक्षात् हनुमंताचे दर्शन घडवले. प.पू. दास महाराज यांनी आम्हा साधकांचे आध्यात्मिक त्रासांपासून रक्षण केले, तसेच स्वतःच्या आचरणातून साधकांमध्ये दास्यभक्तीचे बीज रोवले. त्यांची कितीही सेवा केली, तरी त्यांच्या या ऋणातून मुक्त होणे शक्य नाही. ‘आमच्यातही अशी दास्यभक्ती निर्माण व्हावी’, अशी परात्पर गुरुदेव आणि प.पू. दास महाराज यांच्या चरणी प्रार्थना करतो.’
– श्री. संतोष गरुड आणि सौ. समृद्धी संतोष गरुड, पर्वरी, गोवा. (१३.१२.२०२१)
‘या लेखावरून मला प.पू. दास महाराज यांची आणखीन ओळख झाली; म्हणून श्री. संतोष आणि सौ. समृद्धी गरुड यांना धन्यवाद ! ’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |