अनुक्रमणिका
- १. भाजीपाला लागवडीसाठी आवश्यक घटक
- २. लागवडीसाठी विकतच्या सामुग्रीपेक्षा घरात उपलब्ध सामुग्रीचा वापर करा !
- ३. झाडांना आवश्यक तेवढे ऊन आणि पाणी मिळू द्या !
- ४. झाडाला बुरशी येते. त्याला काय करावे ?
- ५. हळदीचे झाड वाढत आहे; पण खालची पाने पिवळी झाली आहेत. याला कारण काय ?
- ६. गेल्या ५ मासांपासून आमच्याकडील गुळवेलीला पाने येत नाहीत; पण ती जिवंत आहे. याचे कारण काय ?
१. भाजीपाला लागवडीसाठी आवश्यक घटक
‘वनस्पती स्वतःचे अन्न स्वतःच बनवत असतात. या प्रक्रियेला ‘प्रकाश संश्लेषण (फोटो सिन्थेसिस)’ असे म्हणतात. या प्रक्रियेसाठी हवा (कार्बन डायऑक्साईड), पाणी आणि सूर्यप्रकाश या गोष्टी आवश्यक असतात. या ३ घटकांव्यतिरिक्त लागणारे घटक झाडे मातीतून शोषून घेत असतात. यामुळे झाडांना खते द्यावी लागतात. ज्याप्रमाणे प्राण्यांना विविध किडे त्रास देतात किंवा चावतात, त्याप्रमाणे वनस्पतींनाही किड्यांचा त्रास होतो. या हानीकारक किड्यांपासून झाडांचे संरक्षण होण्यासाठी झाडांवर कीटकनाशके फवारली जातात. प्राण्यांना ज्याप्रमाणे जीवाणू (बॅक्टेरिया), विषाणू (व्हायरस) आणि बुरशी (फंगस) यांमुळे रोग होतात, त्याप्रमाणे वनस्पतींनाही रोग होतात. यांचा प्रतिबंध होण्यासाठी जीवाणूनाशक, विषाणूनाशक, तसेच बुरशीनाशक यांचा वापर करावा लागतो. थोडक्यात भाजीपाला लागवडीसाठी हवा आणि सूर्यप्रकाश या गोष्टी निसर्गातून उपलब्ध होतात, तर माती, खते, कीटकनाशके, बुरशीनाशके इत्यादींची व्यवस्था आपल्याला करावी लागते. ‘सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती’ या तंत्रामध्ये वापरले जाणारे जीवामृत आणि बीजामृत हे पदार्थ पूर्णतः नैसर्गिक आणि दुष्परिणामविरहित असून हे खते अन् बुरशीनाशके यांचे काम करतात. या पद्धतीत बनवले जाणारे ‘नीमास्त्र’, ‘दशपर्णी अर्क’ यांसारखे पदार्थ कीटकनाशकांचे काम करतात.
२. लागवडीसाठी विकतच्या सामुग्रीपेक्षा घरात उपलब्ध सामुग्रीचा वापर करा !
२ अ. विकतच्या कुंड्यांना पर्याय
कुंड्यांच्या ऐवजी वापरात नसलेले प्लास्टिकचे डबे, बाटल्या, पिशव्या, तसेच पसरट भांडी यांचा वापर करता येतो. त्यांचा आकार न्यूनतम २ ते ४ इंच माती किंवा पालापाचोळ्याचा थर मावेल एवढा असावा. अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी यांना तळाशी २ ते ४ भोके पाडावीत. यांमध्ये उपलब्ध माती, वाळलेली पाने किंवा ‘कंपोस्ट (कचर्यापासून बनवलेले खत)’ भरून त्यावर पाणी, जीवामृत किंवा खरकटी भांडी धुतलेल्या पाण्याचा शिडकावा करून माती ओलसर करून घ्यावी.
२ आ. विकतच्या बियाण्याला पर्याय
काही पालेभाज्यांच्या बिया घरातच उपलब्ध असतात, उदा. धणे (कोथिंबीर), मेथी, बाळंतशेप (शेपू), मोहरी (मोहरीच्या पानांची भाजी करता येते. याला हिंदीत ‘सरसो का साग’ म्हणतात.) याखेरीज लहान कांदे किंवा लसणाच्या पाकळ्याही मातीत पुरल्यास त्यांपासून रोपे तयार होतात. सुक्या मिरचीचे बी, टॉमेटोचे बी, चवळी, पुदीन्याची खोडासहित मुळे यांपासूनही लागवड करता येते. या बिया कुंडीत किंवा वाफ्यांमध्ये खोलवर न पुरता बीच्या जाडीएवढ्याच खोल पुराव्यात. या सर्व भाज्या ४ ते ८ दिवसांत रुजून येतात.
३. झाडांना आवश्यक तेवढे ऊन आणि पाणी मिळू द्या !
आपण जी लागवड करतो, तिला सकाळचे न्यूनतम २ ते ४ घंटे ऊन मिळेल, असे पहावे. नियमित झाडांचे निरीक्षण करावे. माती वाळलेली असल्यास हलक्या हातांनी अलगद पाणी शिंपडावे. पाणी शिंपडतांना रुजत घातलेले बी उघडे पडणार नाही, याची काळजी घ्यावी. आरंभी रोपे नाजूक असतांना पाण्याच्या मोठ्या थेंबानेही सपाट होऊ शकतात. त्यासाठी प्लास्टिकच्या बाटलीच्या झाकणाला लहानसे छिद्र पाडून अभिषेकाच्या धारेप्रमाणे अलगद पाणी द्यावे. जास्त पाणी दिल्यास बुरशीजन्य रोग वाढू शकतात. त्यामुळे झाडांना योग्य त्या प्रमाणातच पाणी द्यावे.’
– एक कृषीतज्ञ, पुणे
टीप – कोकणात पावसाळ्याच्या दिवसांत रोपांचे पावसापासून रक्षण करावे लागते.
(साभार : सामाजिक संकेतस्थळ)
४. झाडाला बुरशी येते. त्याला काय करावे ?
गोमूत्र, जिवामृत, आंबट ताक यांपैकी कोणत्याही पदार्थात १० पट पाणी घालून फवारणी करावी.
५. हळदीचे झाड वाढत आहे; पण खालची पाने पिवळी झाली आहेत. याला कारण काय ?
हळदीची रोपे ४ मासांपेक्षा मोठी असतील, तर जुनी पाने पिवळी होणे, ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. लवकरच पूर्ण रोपही पिवळे होऊ शकते.
६. गेल्या ५ मासांपासून आमच्याकडील गुळवेलीला
पाने येत नाहीत; पण ती जिवंत आहे. याचे कारण काय ?
गुळवेलीला पावसाच्या दिवसांतच पाने असतात. नंतर पाने न्यून होतात. गुळवेल जिवंत असेल, तर तिला पाने फुटतील. जिवामृताची आणि आंबट ताकाची फवारणी (१० पट पाणी मिसळून) आठवड्यातून एकदा करावी.
तुळशी चं झाड़ आमच्याघरी स्वतःच सुकून गेलं? याला कारण काय असावं? त्याला यूरिया वगैरे रासायनिक खत दिली तर चालेल का? माझी आई रासायनिक खत द्यायला नकार देत आहे.
नमस्कार श्री. अमित अरविन्देकरजी,
कोणत्याही झाडाला कोणतेही रासायनिक खत कधीही देऊ नये. झाड सुकून गेले असल्यास मुळाशी मुंग्या आहेत का, हे पाहावे. मुंग्या असल्यास मुळाशी कपूराची वडी ठेवावी. झाडाच्या मुळाशी ओलसरपणा राहील, एवढ्या प्रमाणात पाणी द्यावे. फार जास्त किंवा अल्पही पाणी देऊ नये. जीवामृत इत्यादी कोणतेही सेंद्रिय खत घातल्यावर झाडाला लगेच पाणी द्यावे. असे केल्याने झाड कोमेजणार नाही.