अनुक्रमणिका
- १. मृत्यूकुंडलीत भौतिक, मानसिक किंवा आध्यात्मिक स्वरूपाचे ग्रहयोग प्रधान असल्यास होणारे परिणाम
- २. ग्रह, राशी, नक्षत्रे आणि कुंडलीतील स्थाने यांची भौतिक, मानसिक अन् आध्यात्मिक यांनुसार असलेली विभागणी
- ३. ‘जिवाला मृत्यूत्तर गती कशी लाभेल ?’, यासंबंधी बोध करणारे काही ज्योतिषशास्त्रीय निकष
- ४. मृत्यूकुंडलीत जितके उच्च प्रतीचे शुभयोग असतील, तितक्या उच्च लोकांत (सप्तलोकांत) जिवाला स्थान मिळते.
- ५. मृत्यूकुंडलीत जितके तीव्र अशुभयोग असतील, तितक्या नीच लोकांत (सप्तपाताळांत) जिवाला स्थान मिळते.
- ६. ‘मृत्यूकुंडलीवरून पुढील जन्मासंबंधी काही कळू शकते का ?’
- ७. जिवंत असलेल्याची मृत्यूकुंडली मांडता न येणे
- ८. सनातनच्या संत पू. (कै.) श्रीमती शालिनी माईणकरआजी यांच्या देहत्यागाच्या वेळी मांडलेल्या कुंडलीचे (मृत्यूकुंडलीचे) ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण
‘जिवाचा जन्म आणि मृत्यू हे प्रारब्धानुसार होतात. जन्मकुंडलीवरून जिवाला या जन्मात भोगावयाच्या प्रारब्धाची तीव्रता आणि प्रारब्धाचे स्वरूप यांचा बोध होतो. जिवाच्या मृत्यूच्या वेळी मांडलेल्या कुंडलीवरून ‘जिवाला मृत्यूत्तर गती कशी लाभेल ?’, हे कळू शकते. याला ‘मृत्यूकुंडली’ म्हणता येईल. मृत्यूकुंडलीवरून व्यक्तीने आयुष्यात केलेल्या चांगल्या-वाईट कर्मांचाही बोध होतो.
१. मृत्यूकुंडलीत भौतिक, मानसिक किंवा आध्यात्मिक
स्वरूपाचे ग्रहयोग प्रधान असल्यास होणारे परिणाम
१ अ. भौतिक
मृत्यूकुंडलीत भौतिक स्वरूपाचे ग्रहयोग प्रधान असल्यास जिवाला मृत्यूत्तर गती चांगली लाभत नाही. त्यामुळे त्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो. अशा जिवाने आयुष्यात केवळ भौतिक सुख, धन, मान, प्रतिष्ठा आदी मिळवण्यासाठी प्रयत्न केलेले असतात. त्यामुळे स्वार्थ, वासना, षडरिपू आणि मायेची ओढ यांचे प्रमाण पुष्कळ अधिक असते.
१ आ. मानसिक
मृत्यूकुंडलीत मानसिक स्वरूपाचे ग्रहयोग प्रधान असल्यास जिवाला मध्यम गती लाभते आणि पुनर्जन्माची शक्यता ५० टक्के असते. अशा जिवाने आयुष्यात विद्यादान, संशोधन, समाजसेवा किंवा परोपकार आदी केलेले असते; परंतु त्याच्या इच्छा, वासना आदींचा लोप झालेला नसतो.
१ इ. आध्यात्मिक
मृत्यूकुंडलीत आध्यात्मिक स्वरूपाचे ग्रहयोग प्रधान असल्यास जिवाला चांगली लाभते आणि पुनर्जन्माची शक्यता अत्यल्प असते. अशा जिवाने आयुष्यात गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधना केलेली असते. त्याचे बहुतांश प्रारब्ध भोगून झालेले असते, तसेच साधनेमुळे त्याचा मनोलय झालेला असतो.
२. ग्रह, राशी, नक्षत्रे आणि कुंडलीतील स्थाने यांची
भौतिक, मानसिक अन् आध्यात्मिक यांनुसार असलेली विभागणी
ज्योतिषशास्त्रात ग्रह, राशी, नक्षत्रे आणि कुंडलीतील स्थाने हे फलादेश करण्यासाठीचे प्रमुख घटक आहेत. या घटकांची भौतिक, मानसिक आणि आध्यात्मिक यांनुसार असलेली विभागणी पुढील सारणीत दिली आहे, उदा. शुक्र, मंगळ आणि राहू हे भौतिक स्वरूपाचे ग्रह आहेत; म्हणजे ते धन, आसक्ती, भोग, वासना आदींचे कारक आहेत.
ग्रह | राशी | नक्षत्रे | कुंडलीतील स्थाने | |
---|---|---|---|---|
भौतिक | शुक्र, मंगळ, राहू | मेष, कर्क, तुळ आणि मकर | राक्षसगणी नक्षत्रे (टीप १) | १, ४, ७, १० |
मानसिक | रवि, चंद्र, बुध | वृषभ, सिंह, वृश्चिक आणि कुंभ | मनुष्यगणी नक्षत्रे (टीप २) | २, ५, ८, ११ |
आध्यात्मिक | गुरु, शनि, केतू | मिथुन, कन्या, धनु आणि मीन | देवगणी नक्षत्रे (टीप ३) | ३, ६, ९, १२ |
टीप १ – राक्षसगणी नक्षत्रे : कृत्तिका, आश्लेषा, मघा, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, मूळ, धनिष्ठा आणि शततारका ही ९ नक्षत्रे राक्षसगणी आहेत. त्यांमध्ये तमोगुण अधिक असतो.
टीप २ – मनुष्यगणी नक्षत्रे : भरणी, रोहिणी, आर्द्रा, पूर्वाफाल्गुनी, उत्तराफाल्गुनी, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, पूर्वाभाद्रपदा आणि उत्तराभाद्रपदा ही ९ नक्षत्रे मनुष्यगणी आहेत. त्यांमध्ये रजोगुण अधिक असतो.
टीप ३ – देवगणी नक्षत्रे : अश्विनी, मृग, पुनर्वसु, पुष्य, हस्त, स्वाती, अनुराधा, श्रवण आणि रेवती ही ९ नक्षत्रे देवगणी आहेत. त्यांमध्ये सत्त्वगुण अधिक असतो.
३. ‘जिवाला मृत्यूत्तर गती कशी लाभेल ?’, यासंबंधी बोध करणारे काही ज्योतिषशास्त्रीय निकष
३ अ. कुंडलीतील स्थान
कुंडलीतील स्थान म्हणजे आकाशाचा बारावा भाग. कुंडलीतील प्रत्येक स्थानावरून जीवनातील निरनिराळ्या गोष्टी पाहिल्या जातात.
३ अ १. प्रथम स्थान : प्रथम स्थान म्हणजे पूर्वक्षितिजावर दिसणारा आकाशाचा भाग. हे कुंडलीतील महत्त्वाचे स्थान आहे. मृत्यूसमयी तेथे जो ग्रह असेल, तो मृत्यूत्तर प्रवासाविषयी नेमकेपणाने बोध करतो. या स्थानात आध्यात्मिक स्वरूपाचा ग्रह असल्यास चांगली, मानसिक स्वरूपाचा ग्रह असल्यास मध्यम आणि भौतिक स्वरूपाचा ग्रह असल्यास अल्प गती लाभते.
३ अ २. दशम स्थान : प्रथम स्थानाप्रमाणे ‘दशम’ स्थानही महत्त्वाचे आहे. दशम स्थान म्हणजे डोक्याच्या बरोबर वर असलेला आकाशाचा भाग. या ठिकाणी असलेला ग्रह जिवाच्या कर्मबंधनाविषयी सूचित करतो. या स्थानात गुरु, शनि किंवा केतू हे ग्रह शुभ स्थितीत असल्यास व्यक्तीने जीवनात चांगली साधना केल्यामुळे तिला कर्मबंधन उरत नाही.
३ अ ३. पंचम आणि नवम ही स्थाने : कुंडलीतील पंचम आणि नवम ही अनुक्रमे उपासना अन् साधना यांच्याशी संबंधित स्थाने आहेत. मृत्यूकुंडलीत या स्थानांमध्ये रवि, चंद्र, गुरु आदी सत्त्वगुणी ग्रह शुभ स्थितीत असल्यास जिवाची उपासना आणि पूर्वपुण्याई चांगली असल्यामुळे तिला चांगली गती लाभते.
३ अ ४. चतुर्थ, सप्तम आणि एकादश ही स्थाने : कुंडलीतील चतुर्थ, सप्तम आणि एकादश ही स्थाने अनुक्रमे सुख, भोग अन् अर्थलाभ यांची कारक आहेत. मृत्यूकुंडलीत या स्थानांत शुक्र, मंगळ, राहू आदी भौतिक स्वरूपाचे ग्रह भौतिक स्वरूपाच्या राशींमध्ये असल्यास जिवाच्या इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतात. त्यामुळे त्याचा लिंगदेह भुवलोकात अडकतो.
३ आ. भावेश
कुंडलीतील स्थानाचा स्वामी असणार्या ग्रहाला ‘भावेश’ म्हणतात. भावेश हा ‘संबंधित स्थानाचे फळ अनुकूल मिळेल कि प्रतिकूल ?’, हे दर्शवतो.
३ आ १. प्रथम स्थानाचा स्वामी (लग्नेश) हा आध्यात्मिक ग्रह असून तो पंचम किंवा नवम या धर्मस्थानांमध्ये शुभ स्थितीत असल्यास व्यक्तीचे आचरण चांगले असल्याने तिला चांगली गती लाभते.
३ आ २. प्रथम स्थानाचा स्वामी (लग्नेश) हा आध्यात्मिक ग्रह असून तो अष्टम किंवा द्वादश या मोक्षस्थानांमध्ये शुभ स्थितीत असल्यास व्यक्तीची साधना चांगली असल्याने तिला उत्तम लोकात स्थान मिळते.
३ आ ३. प्रथम स्थानाचा स्वामी (लग्नेश) हा भौतिक ग्रह असून तो द्वितीय, सप्तम किंवा एकादश या मायेशी संबंधित स्थानांमध्ये असल्यास व्यक्तीचे प्रारब्ध शेष असल्याने तिला पुन्हा जन्म घ्यावा लागतो.
३ आ ४. प्रथम स्थानाच्या स्वामी प्रमाणेच दशम स्थानाच्या स्वामीचाही असाच विचार करतात.
३ इ. नक्षत्रे
३ इ १. मृत्यूकुंडलीत अधिकाधिक ग्रह ‘देवगणी’ (सत्त्वगुणी) नक्षत्रांमध्ये असून त्या ग्रहांमध्ये शुभयोग असल्यास व्यक्तीने जीवनात सत्कर्मे केली असल्याने तिला उर्ध्वगती प्राप्त होते.
३ इ २. मृत्यूकुंडलीत अधिकाधिक ग्रह ‘राक्षसगणी’ (तमोगुणी) नक्षत्रांमध्ये असून त्या ग्रहांमध्ये अशुभयोग असल्यास व्यक्तीने जीवनात पुष्कळ पापकर्मे केली असल्याने तिला अधोगती प्राप्त होते.
४. मृत्यूकुंडलीत जितके उच्च प्रतीचे शुभयोग असतील,
तितक्या उच्च लोकांत (सप्तलोकांत) जिवाला स्थान मिळते.
५. मृत्यूकुंडलीत जितके तीव्र अशुभयोग असतील,
तितक्या नीच लोकांत (सप्तपाताळांत) जिवाला स्थान मिळते.
वरील निकष हे ज्योतिषशास्त्रातील मूलभूत घटकांचे गुणधर्म लक्षात घेऊन तर्काच्या आधारे नमूद केले आहेत. प्रत्यक्ष कुंडल्या अभ्यासतांना अधिक समर्पक निकष लक्षात येऊ शकतील.
६. ‘मृत्यूकुंडलीवरून पुढील जन्मासंबंधी काही कळू शकते का ?’
हा संशोधनाचा विषय असून अभ्यास करून, तसेच अनुभवी ज्योतिषांचे मार्गदर्शन घेऊन याविषयी संशोधन करता येऊ शकते.
७. जिवंत असलेल्याची मृत्यूकुंडली मांडता न येणे
ज्योतिषशास्त्राद्वारे ‘व्यक्तीचा मृत्यू कोणत्या काळात संभवतो ?’, हे कळू शकते; परंतु मृत्यूचा नेमका दिवस आणि वेळ हे सांगणे पुष्कळ कठीण आहे. ‘एखादी घटना घडण्यासाठी पूरक काळ कोणता ?’, हे ज्योतिषाला सांगता येते; परंतु ‘ती घटना नेमकी कधी घडेल ?’, हे केवळ बुद्धीने कुंडलीचा अभ्यास करून सांगता येत नाही. केवळ सर्वज्ञानी संत किंवा संत-ज्योतिषीच हे सांगू शकतात.
– श्री. राज कर्वे, ज्योतिष विशारद, गोवा. (२७.८.२०२१)
८. सनातनच्या संत पू. (कै.) श्रीमती शालिनी माईणकरआजी यांच्या
देहत्यागाच्या वेळी मांडलेल्या कुंडलीचे (मृत्यूकुंडलीचे) ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण
सनातनच्या ८६ व्या संत पू. (कै.) श्रीमती शालिनी माईणकरआजी यांनी ११.५.२०२१ या दिवशी उत्तररात्री १.३८ वाजता फोंडा, गोवा येथे देहत्याग केला. त्यांच्या देहत्यागाच्या वेळी मांडलेल्या कुंडलीचे ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.
८ अ. देहत्यागाच्या वेळची कुंडली ही कुंडली खाली दिली आहे
८ आ. ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण
८ आ १. कुंडलीत प्रथम स्थानी गुरु हा आध्यात्मिक ग्रह आहे. गुरु ग्रह भावमध्यावर आहे, म्हणजे तो पूर्वक्षितिजाला चिकटलेला आहे. याचा अर्थ ‘गुरु ग्रह उदित होण्याच्या नेमक्या वेळी पू. माईणकरआजींनी देहत्याग केला’. हा एक उच्च आध्यात्मिक योग आहे. संतांच्या कुंडल्यांमध्ये असे योग आढळतात.
८ आ २. प्रथम स्थानाचा स्वामी शनि ग्रह बाराव्या स्थानात आहे. शनि हा आध्यात्मिक स्वरूपाचा ग्रह असून बारावे स्थान हे मोक्षस्थान आहे. हा उच्च आध्यात्मिक योग असून पू. आजींना उच्च लोकात स्थान मिळाल्याचे, तसेच पुनर्जन्म नसल्याचे दर्शवतो.
८ आ ३. दशम स्थानात केतू ग्रह आहे. दशम स्थान हे कर्माचे कारक असून केतू ग्रह लयाचा कारक आहे. हा योग ‘साधनेमुळे पू. आजींच्या संचित कर्माचा लय झाल्याने त्यांना कर्मबंधन उरले नाही’, असे दर्शवतो.
८ आ ४. ११.५.२०२१ या दिवशी उत्तररात्री १२.३० पर्यंत अमावास्या तिथी होती. पू. आजींनी उत्तररात्री १.३८ वाजता म्हणजे अमावास्या संपून ‘शुक्ल प्रतिपदा’ ही तिथी चालू झाल्यानंतर देहत्याग केला. अमावास्येला वातावरणात सूक्ष्मातील अनिष्ट शक्तींचा प्रभाव अधिक असल्याने लिंगदेहाला गती मिळण्यास अडथळे येतात.
वरील विश्लेषणावरून ‘संतांचा देहत्याग त्यांच्यासाठी पूरक अशा ग्रहस्थितीत होतो’, हे लक्षात येते.’
– श्री. राज कर्वे, ज्योतिष विशारद, गोवा. (२७.८.२०२१)
खुप छान महिती आहे. खरच खुप आवडली .अशीच 22वा द्रेशकान आणि 64वा नवमांश यावर पण लिखाण केले तर बरे होईल. धन्यवाद.
नमस्कार,
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.