अनुक्रमणिका
- ७. अनेक संतांचे दर्शन आणि मार्गदर्शन लाभणे
- ८. सौ. ज्योतीने पुण्यातील साधकांशी जवळीक साधून केलेली प्रसारसेवा
- ९. ‘रामनाथी आश्रमात जाऊन रहावे’, असे वाटल्याने आश्रमात रहावयास जाणे आणि ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित होणे
- १०. अनिष्ट शक्तींचे त्रास असलेल्या साधकांसाठी नामजपादी उपाय करणे
- ११. पुढच्या टप्प्याची साधना जाणून घेऊन त्यासाठी प्रयत्न करणे
- १२. यजमानांचे निधन
- १३. संतपदप्राप्ती होणे
- १४. स्वतःत जाणवलेला पालट
- १५. राखीपौर्णिमेनिमित्त स्फुरलेल्या काही ओळी
- १६. प्रार्थना
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://www.sanatan.org/mr/a/80973.html
७. अनेक संतांचे दर्शन आणि मार्गदर्शन लाभणे
७ अ. प.पू. काणे महाराज यांची भेट घडून त्यांचे मार्गदर्शन लाभणे
माझ्या दिरांचे ‘एम्.ई.एस्.’च्या नाशिक येथील शाखेत ‘जी.ई.’ या पदावर स्थानांतर झाले होते. त्यांनी मला आणि यजमानांना तेथे नेण्यासाठी आमच्या जाऊबाईंना पाठवून दिले. त्यांच्यासमवेत नाशिकला जातांना आम्ही नारायणगाव येथे श्री. शशिकांत ठुसे यांच्या घरी गेलो. तिथे आम्हाला प.पू. काणे महाराज यांचे दर्शन, मार्गदर्शन आणि त्यांच्यासमवेत भोजन असा त्रिवेणी लाभ मिळण्याचा योग जुळून आला. ‘गुरुदेवांच्या इच्छेविना झाडाचे पानही हालत नाही’, असे सांगून ठुसेकाकांनी त्याचे श्रेय प.पू. गुरुदेवांनाच दिले.
७ आ. प.पू. भक्तराज महाराज यांच्या समाधीस्थळाचे दर्शन होणे
त्यानंतर आम्ही कांदळी येथील प.पू. भक्तराज महाराज यांची समाधी, धुनी, बैठकीची (भजनाची) जागा आणि तेथील मंदिरातील श्रीरामाचे दर्शन घेऊन आनंद लुटत नाशिकला गेलो.
७ इ. प.पू. पत्की महाराजांचे मार्गदर्शन लाभणे
नाशिकला पोचल्यावर नाशिक येथील उत्तरदायी साधकांच्या अनुमतीने आमची प.पू. पत्की महाराज यांची २ घंटे भेट झाली. त्यांनी आम्हाला ‘१६ सहस्र राण्यांच्या महाली श्रीकृष्णाचे अस्तित्व कसे असते ?’ या नारदाच्या शंकेचे भगवान श्रीकृष्णाने केलेल्या निरसनाची कथा सांगितली. प.पू. पत्की महाराज तेथे एकटेच रहात होते. ते ‘वाचस्पती’ होते. त्यांच्याकडून आम्हाला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.
७ ई. प.पू. बेजन देसाई यांचे लाभलेले मार्गदर्शन
नाशिकला आमचा तेथील एका शिक्षण संस्थेचे प्रमुख संचालक असलेले प.पू. बेजन देसाई यांच्या भेटीचा योग आला. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करतांना सांगितले, ‘‘आम्ही पारशी आहोत. ‘या भौतिक जगातून ईश्वराकडे जातांना आपण केवळ एक अंगुष्ठमात्र आत्माच घेऊन जाणार आहोत’, हे लक्षात रहाण्यासाठी आम्ही आमच्या पोशाखाच्या आतल्या बाजूने तेवढ्याच आकाराचा खिसा शिवतो.’’ असे सांगून त्यांनी आम्हाला खिसा दाखवला. ते पुढे म्हणाले, ‘‘आपली सनातन संस्थाही अशीच आहे. (‘तिचे स्वरूप जरी लहान दिसले, तरी ती ईश्वरप्राप्ती करून देणारी आहे.’ – संकलक) तिची साथ कधीच सोडू नका.’’ असे सांगून त्यांनी त्यांच्या अमृत महोत्सवी समारंभाच्या वेळच्या त्यांच्या छायाचित्रावर स्वाक्षरी करून ते आम्हाला दिले.
अशा प्रकारे आमचा नाशिक येथील प्रवास आमची प.पू. गुरुदेवांवरील श्रद्धा आणि भक्ती वाढवून साधनेत पुढे नेणाराच ठरला.
७ उ. एका संतांचा आलेला अनुभव
७ उ १. केर्ले येथील प.पू. शामराव महाराज यांच्या एका शिष्याने त्यांच्या सत्संगाला येण्यासाठी आग्रह करणे, तेव्हा त्यांनीच ‘तुम्ही सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसारच साधना करा’, असे आम्हाला सांगून त्या शिष्यालाही तसे सांगणे : त्याच सुमारास सनातन संस्थेतील साधकांना आध्यात्मिक त्रास चालू झाले होते. आम्ही नाशिकहून घरी गेलो. तेथील सत्संग घेणार्या एका साधकाला माझ्याविषयी कळल्यावर त्यांनी ‘आम्ही सनातनच्या सत्संगांना न जाता केर्ले येथील प.पू. शामराव महाराज यांच्या सत्संगांना जाणेच कसे योग्य आहे’, हे माझ्या मनावर बिंबवण्यास आरंभ केला. मी त्यांचे बोलणे ऐकून घेतले. नंतर मी, माझे यजमान आणि आमचा मुलगा मधुकर त्यांच्यासमवेत प.पू. शामराव महाराजांकडे गेलो. मला दारातूनच त्या संतांचे दर्शन झाले. मला पहाताक्षणीच मान हालवून ते म्हणाले, ‘तू सनातन संस्थेतच थांब.’ एकूण परिस्थिती माझ्या लक्षात आली. पुन्हा ४ दिवसांनी त्यांच्या शिष्यांनी मला त्या संतांच्या सत्संगाला येण्यासाठी गळ घातली. तेव्हा सौ. ज्योती (पू. काळे आजी यांची मुलगी) काही कामासाठी पुण्याला आली होती. तिच्यासमवेत आम्ही दोघे त्यांच्या सत्संगाला गेलो. त्यांच्या शिष्याने आमची त्यांच्याशी ओळख करून देण्यासाठी आम्हाला पुढे बोलावले. तेव्हा आम्हाला पाहून ते त्यांच्या त्या शिष्याला म्हणाले, ‘‘अरे, तुम्ही त्यांच्या मागे का लागला आहात ? ते आहेत, तिथेच त्यांना राहू द्या.’’ मग आम्ही त्यांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेऊन घरी आलो.
७ उ २. प.पू. शामराव महाराज यांच्याविषयी आलेली अनुभूती : सौ. ज्योतीला सूक्ष्मातून ‘त्या महाराजांच्या पायातून एक मोठा नाग बाहेर पडला असून त्याने अरण्येश्वर मंदिरातील शिवलिंगाला विळखा घातला आहे आणि तो शिवलिंगावर फणा उभारून बसला आहे’, असे दृश्य दिसले. तिलाही आनंद झाला.
७ ऊ. इतर अनेक संतांचे दर्शन घडणे
प.पू. गुरुदेवांच्या कृपेने आम्हा दोघांना अनेक संतांचे दर्शन घडत होते, उदा. प.पू. ढेकणे महाराज, पुणे; प.पू. मालतीआई बाळ, म्हैसाळ (मिरज); प.पू. तोडकर महाराज, कोल्हापूर आणि प.पू. रघुवीर महाराज (आताचे प.पू. दास महाराज), पानवळ (बांदा) इत्यादी. वर्ष २००७ मध्ये सौ. ज्योतीला पुणे येथील नवले रुग्णालयात कायमस्वरूपी नोकरी मिळाली. मग आम्ही सर्वजण पुणे येथे स्थलांतरित झालो. तेव्हा आमचा समर्थ भक्त पू. सुनील चिंचोलकर आणि त्यांची पत्नी यांच्याशी संपर्क येऊ लागला. अशा अनेक संतांच्या शुभाशीर्वादाने आम्ही सनातन संस्थेच्या साधनामार्गावर टिकून राहिलो.
८. सौ. ज्योतीने पुण्यातील साधकांशी जवळीक साधून केलेली प्रसारसेवा
८ अ. सौ. ज्योतीने आई-वडिलांच्या वाढदिवसांचे सोहळे करून साधकांशी जवळीक साधणे
सौ. ज्योतीने वर्ष २००८ मध्ये तिच्या बाबांचा सहस्रचंद्र दर्शन सोहळा, वर्ष २००९ मध्ये माझा अमृत महोत्सव आणि त्यानंतर आमच्या लग्नाचा ५० वा वाढदिवस असे अनेक समारंभ पाठोपाठ करून पुण्यातील सर्व साधकांशी जवळीक निर्माण केली.
८ आ. भोर येथील प्रसारसेवा
याच काळात माझे गुडघ्याचे आणि मोतीबिंदूचे शस्त्रकर्म झाले. त्यामुळे आम्ही उभयतांनी शारीरिक व्याधींमुळे घरी राहून घरी येणार्या साधकांचा सत्संग चालू केला. आमचा नवनवीन साधकांशी परिचयही वाढत गेला. ज्योतीने पुणे येथील साधकांसमवेत भोर तालुक्यातही प्रसार चालू केला. तिने आमच्या नातेवाइकांनाही साधनेची गोडी लावली. माझी एक भावजय आणि मोठा भाऊ दोघे साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वार्षिक वर्गणीदार झाले. नंतर पुढे भावाचीही ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित झाली. त्या दोघांनाही सौ. ज्योतीने गोव्यातील रामनाथी येथील सनातनचा आश्रम दाखवला. तिच्यामुळे मला परात्पर गुरु कालिदास देशपांडे यांचे दर्शन झाले.
९. ‘रामनाथी आश्रमात जाऊन रहावे’, असे वाटल्याने
आश्रमात रहावयास जाणे आणि ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित होणे
वर्ष २०१० मध्ये मला संसारात न रहाता ‘आश्रमातच जाऊन रहावे’, असे वाटू लागले. मी सर्वांपुढे माझा मानस बोलून दाखवला. सगळ्यांची संमती मिळाल्यावर मी गोवा येथील सनातनच्या आश्रमात रहाण्यास गेले. तेथे सेवा करत असतांना एक दिवस अकस्मातपणे मला छायाचित्रीकरण कक्षात बोलावून नामजप करण्यास सांगितले. माझ्यासमोर बसलेल्या आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांसाठी मी करत असलेल्या नामजपाचा परिणाम अभ्यासण्यात आला. मला हे सगळे नवीन होते. साधारण एक घंट्यानंतर मी माझ्या खोलीत परत आले. तेव्हा मला पुण्याच्या उत्तरदायी साधकांचा अभिनंदनाचा भ्रमणभाष आला. ‘माझी ६१ टक्के पातळी घोषित झाली असून मी जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाले आहे’, अशी घोषणा झाली.
अशा प्रकारे १.९.२०१० या दिवशी प.पू. गुरुदेवांच्या कृपेने कृष्णजन्माष्टमीला भगवान श्रीकृष्णाने माझी भूलोकातून सुटका केली.
१०. अनिष्ट शक्तींचे त्रास असलेल्या साधकांसाठी नामजपादी उपाय करणे
रामनाथी आश्रमातून पुण्याला परत आल्यावर मला ठिकठिकाणी साधकांसाठी नामजपादी उपाय करण्याची सेवा मिळाली. त्यामुळे पुण्यातील अनेक भागांतील साधकांशी परिचय होऊन देवाने माझी साधना पुढे नेली. कालांतराने चिंचवड, भोर, नगर येथील साधकांसाठीही नामजपादी उपाय चालू झाले.
११. पुढच्या टप्प्याची साधना जाणून घेऊन त्यासाठी प्रयत्न करणे
साधकांसाठी उपाय करण्यासमवेतच मी अधूनमधून प्रवचनेही घेत होते. मी खोक्यांचे उपाय करणे, स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची सारणी अन् दैनंदिनी लिहिणे इत्यादी व्यष्टी साधनाही करत असे आणि इतरांना ती शिकवून त्यांचा आढावाही घेत असे. प्रकृती उत्तम रहाण्यासाठी मी नियमित प्रतिदिन काही व्यायाम-प्रकार करत होते. मी ठिकठिकाणी होणार्या नामफेर्यांमध्ये सहभागी होत होते. याचसमवेत मी हिंदु धर्मजागृती सभांना उपस्थित राहून ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठणार्या साधकांचे प्रयत्न समजून घेत असे. अशा प्रकारे माझी पुढच्या टप्प्यांची साधना चालू झाली.
१२. यजमानांचे निधन
काही दिवसांनी यजमानांना त्रास हाेऊ लागला. त्यांचे सर्व अंथरुणावरच करावे लागत होते. त्यांची सेवा करतांना ‘ही श्रीकृष्णाचीच सेवा आहे’, असा भाव माझ्या मनात निर्माण झाला. मृत्यूपूर्वी १० दिवस ते ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप अखंड करत होते. वर्ष २०१५ मध्ये त्यांच्या ८८ व्या वाढदिवसाच्या दिवशी ते अनंतात विलीन झाले. देवाने त्यांच्यावर कृपा केली. प.पू. गुरुदेवांनी मला माझे प्रारब्ध भोगण्यासाठी साधनेत स्थिर ठेवले.
१३. संतपदप्राप्ती होणे
मला बाहेर जाऊन सेवा करणे अवघड होऊ लागल्याने मला समष्टीसाठी नामजप करणे, प्रार्थना करणे, अशा प्रकारच्या सेवा सांगितल्या जाऊ लागल्या. त्या करता असतांनाच सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी फाल्गुन शुक्ल पक्ष नवमी (१७.३.२०१६) या दिवशी मला ‘संत’ म्हणून घोषित केले. हा माझ्या जीवनातील ‘सर्वोच्च आनंदाचा क्षण’ होय !
१४. स्वतःत जाणवलेला पालट
माझी त्वचा मऊ होऊ लागली आहे.
१५. राखीपौर्णिमेनिमित्त स्फुरलेल्या काही ओळी
अध्यात्माच्या आलमगिरांना (टीप) अर्पियली राखी ।
आत्मज्योतीने औक्षण करिते आत्मानंद राखी ।।
टीप : अग्रगण्य / प्रमुख / विश्वविजेता
१६. प्रार्थना
‘प.पू. गुरुदेव, माझे स्वभावदोष आणि अहं घालवून मला साधनेत पुढे नेऊन आपल्यासमवेत हिंदु राष्ट्राची पहाट पहाण्याचा अवसर लाभू द्या’, हीच आपल्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करत आहे. आपण माझ्या साधनेची वाटचाल येथपर्यंत करून घेतलीत, त्यासाठी आपल्या प्रती कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– आपली एक सेविका,
– (पू.) श्रीमती विजयालक्ष्मी काळे (१०.३.२०२०)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या/संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |