‘बर्याच वेळा लहान-सहान कृती करतांनाही साधकांतील अहं जागृत होतो. साधकांना एखादी कृती चांगली जमली किंवा करता आली, तर ‘ती माझ्यामुळे झाली किंवा मी केली’, असा विचार येऊन त्यांच्यातील अहं जागृत होतो आणि ते देवापासून दूर जातात. त्यांना ‘देवाने सेवा करवून घेतली किंवा देवाने सुचवले; म्हणून सेवा चांगली झाली’, असे वाटत नाही. देवाकडे कर्तेपणा अर्पण करण्यासाठी, म्हणजेच स्वतःतील अहं न्यून करण्यासाठी साधकांनी पुढीलप्रमाणे प्रयत्न करावेत.
१. शरीरदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करणे
१ अ. देवाने आपल्याला सुदृढ आणि सक्षम अवयव दिले आहेत. त्यासाठी आपण सतत देवाच्या चरणी कृतज्ञ राहूया.
१ आ. ‘देवा, तू मला २ चांगले डोळे दिलेस; म्हणून मी ही सृष्टी बघू शकतो. तू मला २ कान दिलेस; म्हणून मी ऐकू शकतो. तू मला चांगले नाक दिलेस; म्हणून मी सुगंध घेऊ शकतो. तू मला चांगला तोंडवळा आणि जीभ दिलीस; म्हणून मी बोलू शकतो अन् चव घेऊ शकतो. तू मला २ चांगले हात दिलेस; म्हणून मी सेवा करू शकतो. तू मला २ चांगले पाय दिलेस; म्हणून मी चालू शकतो. हे भगवंता, माझा एक जरी अवयव निकामी असता, तर माझे काय झाले असते ? मला कोणी विचारले नसते. मला मान-सन्मान मिळाला नसता. तू हे सर्व मला देऊन साधनेत आणले आहेस’, अशी देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करूया.
२. कर्ता-करविता केवळ भगवंत आहे !
साधकांनो, तुमच्या मनात जेव्हा अहंचे विचार येतात, तेव्हा समाजातील एखादा अवयव निकामी असलेली व्यक्ती डोळ्यांसमोर आणा, म्हणजे लक्षात येईल की, आपण केवळ निमित्तमात्र असून कर्ता-करविता धनी केवळ भगवंतच आहे. एखादी अंध व्यक्ती त्याला डोळे नाहीत; म्हणून तो भगवंताने बनवलेली सर्वाेत्तम सृष्टी बघू शकत नाही. हे त्याचे दु:ख आहे; पण आपले तसे नाही.
त्यामुळे आपल्याला सदृढ बनवणारा भगवंत आणि स्वतःचे अवयव यांच्याप्रती सतत कृतज्ञ राहूया. जेणेकरून आपण कुठलीही कृती केली, तरी तिचा आपल्याला अहं होणार नाही.
३. देवा, तू मला परात्पर गुरुमाऊलींसारखे उच्च कोटीचे
आणि अवतारी गुरु दिलेस. त्यासाठी मी क्षणोक्षणी तुझ्या चरणी कृतज्ञच असायला हवे.’
– (सद्गुरु) कु. स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था