शिवाला बेल वहाण्यामागील शास्त्र

अनुक्रमणिका

१. बेल : वैशिष्ट्ये

२. शिवाला त्रिदल बेल वहाण्यामागील मानसशास्त्रीय कारणे

अ. त्रिगुणातीत होण्यासाठी साहाय्यभूत ठरणे

आ. बेल आणि दूर्वा यांच्याप्रमाणे गुणातीत अवस्थेतून गुणाला घेऊन कार्य केल्यास, ते कार्य करूनही अलिप्त रहाता येणे

३. शिवाला बेल वहाण्याच्या पद्धतीमागील अध्यात्मशास्त्र

अ. तारक किंवा मारक उपासना-पद्धतीनुसार बेल कसा वहावा ?

अ १. शिवाच्या तारक रूपाची उपासना करणारे

अ २. शिवाच्या मारक रूपाची उपासना करणारे

आ. बेल वहाण्याच्या पद्धतीनुसार व्यष्टी आणि समष्टी स्तरावर होणारा शिवत्त्वाचा लाभ

इ. बेल उपडा का वहावा ?

४. बेलाच्या त्रिदल पानाची वैशिष्ट्ये दर्शवणारे सूक्ष्म-चित्र

५. सूक्ष्म-ज्ञानविषयक परिक्षण

६. बेलाचे आरोग्यदृष्ट्या असलेले लाभ


१. बेल : वैशिष्ट्ये

त्रिदल बेल
त्रिदल बेल

त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रयायुधम् ।
त्रिजन्मपापसंहारं एकबिल्वं शिवार्पणम् ।। – बिल्वाष्टक, श्लोक १

अर्थ : तीन पाने असलेले, त्रिगुणाप्रमाणे असलेले, तीन डोळ्यांप्रमाणे असणारे, तीन आयुधे असल्याप्रमाणे असणारे आणि तीन जन्मांची पापे नष्ट करणारे असे हे बिल्वदल मी शंकराला अर्पण करतो.

 

२. शिवाला त्रिदल बेल वहाण्यामागील मानसशास्त्रीय कारणे

अ. त्रिगुणातीत होण्यासाठी साहाय्यभूत ठरणे

‘सत्त्व, रज आणि तम यांमुळे उत्पत्ती, स्थिती अन् लय उत्पन्न होतात. कौमार्य, यौवन आणि जरा या अवस्थांचे प्रतीक म्हणून शंकराला बिल्वपत्र वहावे, म्हणजे या तिन्ही अवस्थांच्या पलीकडे जाण्याची इच्छा प्रगट करावी; कारण त्रिगुणातीत झाल्याने ईश्वर भेटतो.’

आ. बेल आणि दूर्वा यांच्याप्रमाणे गुणातीत
अवस्थेतून गुणाला घेऊन कार्य केल्यास, ते कार्य करूनही अलिप्त रहाता येणे

‘शिवाला त्रिदल बेल आवडतो, म्हणजे जो आपले सत्त्व, रज आणि तम हे तीनही गुण शिवाला अर्पण करून समर्पण बुद्धीने भगवत्कार्य करतो, त्याच्यावर शिव संतुष्ट होतो. श्री गणेशसुद्धा त्रिदल दूर्वा स्वीकारतो. बेल आणि दूर्वा हे गुणातीत अवस्थेत राहून गुणाद्वारे भगवत्कार्य करतात; म्हणूनच ते भक्तांना म्हणतात, ‘तुम्हीसुद्धा गुणातीत होऊन भक्तीभावाने कार्य करा. गुणातीत अवस्थेतून गुणाला घेऊन कार्य केल्यास, ते कार्य करूनही अलिप्त रहाल.’ – प.पू. परशराम माधव पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

विवरण : सर्वसाधारण व्यक्तीला ईश्वराच्या निर्गुण, निराकार रूपाची उपासना करणे कठीण असते. बेल आणि दूर्वा यांसारख्या गुणातीत अवस्थेत राहून कार्य करणार्‍या पत्रींच्या साहाय्याने सगुण भक्ती करत, भक्ताला सगुणातून निर्गुणाकडे जाणे सुलभ होते.

 

३. शिवाला बेल वहाण्याच्या पद्धतीमागील अध्यात्मशास्त्र

अ. तारक किंवा मारक उपासना-पद्धतीनुसार बेल कसा वहावा ?

बेलाची पाने तारक शिवतत्त्वाची वाहक आहेत, तर बेलाच्या पानाचे देठ मारक शिवतत्त्वाचे वाहक आहे.

अ १. शिवाच्या तारक रूपाची उपासना करणारे

सर्वसामान्य उपासकांची प्रकृती तारक स्वरूपाची असल्याने शिवाची तारक उपासना ही त्यांच्या प्रकृतीला जुळणारी आणि त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीस पूरक ठरणारी असते. अशांनी शिवाच्या तारक तत्त्वाचा लाभ होण्यासाठी पानाचे देठ पिंडीकडे आणि अग्र (टोक) आपल्याकडे करून बेलपत्र वहावे (बिल्वं तु न्युब्जं स्वाभिमुखाग्रं च ।).

अ २. शिवाच्या मारक रूपाची उपासना करणारे

शक्तिपंथीय शिवाच्या मारक रूपाची उपासना करतात.

अ. अशा उपासकांनी शिवाच्या मारक तत्त्वाचा लाभ होण्यासाठी बेलाच्या पानाचे अग्र देवाकडे आणि देठ आपल्याकडे करून बेलपत्र वहावे.

आ. पिंडीत आहत (पिंडीवर पडणारे पाणी आपटल्याने निर्माण होणार्‍या) नादातील ± अनाहत (सूक्ष्म) नादातील, अशी दोन प्रकारची पवित्रके असतात. ही दोन पवित्रके अधिक वाहिलेल्या बिल्वदलातील पवित्रके, अशी तीन पवित्रके खेचून घेण्यासाठी तीन पाने असलेला बेल शिवाला वहावा. कोवळे बिल्वपत्र आहत (नादभाषा) आणि अनाहत (प्रकाशभाषा) ध्वनी एक करू शकते. वाहतांना बिल्वपत्र पिंडीवर उपडे ठेवून देठ आपल्याकडे ठेवावा. तीन पानांतून एकत्र येणारी शक्ती आपल्याकडे यावी, हा त्यात उद्देश असतो. या तीन पवित्रकांच्या एकत्रित शक्तीने त्रिगुण न्यून (कमी) होण्यास साहाय्य होते.

आ. बेल वहाण्याच्या पद्धतीनुसार व्यष्टी आणि समष्टी स्तरावर होणारा शिवत्त्वाचा लाभ

बेलाच्या पानाचे देठ पिंडीकडे आणि अग्र (टोक) आपल्याकडे करून जेव्हा आपण बेलपत्र वहातो, तेव्हा बेलपत्राच्या अग्रावाटे शिवाचे तत्त्व वातावरणात पसरण्याचे प्रमाण अधिक असते. या पद्धतीमुळे समष्टी स्तरावर शिवतत्त्वाचा लाभ होतो. याउलट बेलाच्या पानाचे देठ आपल्याकडे आणि अग्र (टोक) पिंडीकडे करून जेव्हा आपण बेलपत्र वाहतो, तेव्हा देठाच्या माध्यमातून शिवतत्त्व केवळ बेलपत्र वाहणार्‍यालाच मिळते. या पद्धतीमुळे व्यष्टी स्तरावर शिवतत्त्वाचा लाभ होतो.

इ. बेल उपडा वहाण्यामागील कारण

बेलाचे पान शिवपिंडीवर उपडे वाहिल्यावर त्यातून निर्गुण स्तरावरील स्पंदने अधिक प्रमाणात प्रक्षेपित होतात. त्यामुळे बेलाच्या पानाचा भाविकाला अधिक लाभ होतो. शिवाला बेल ताजा न मिळाल्यास शिळा चालतो; परंतु सोमवारचा बेल दुसर्‍या दिवशी चालत नाही.

 

४. बेलाच्या त्रिदल पानाची वैशिष्ट्ये दर्शवणारे सूक्ष्म-चित्र

खालील सूक्ष्म-चित्र मोठ्या आकारात पहाण्यासाठी चित्रावर क्लिक करा !

 

५. परिक्षण

अ. ‘त्रिगुणात्मकतेचे प्रतीक असल्याचे जाणवणे : बिल्वपत्राकडे बघितल्यावर ते त्रिगुणात्मकतेचे प्रतीक असल्याचे जाणवले.

आ. शिवतत्त्वाची अनुभूती : बिल्वपत्रातून फार थंड लहरी येत होत्या. बिल्वपत्रामध्ये शांतीची स्पंदने जाणवत होती, तर त्याच्या बाहेरच्या भागातून शक्तीची ऊर्जात्मक स्पंदने जाणवत होती. या दोन्ही अनुभूतीबिल्वपत्रातील शिवतत्त्वामुळे आल्या.

इ. बिल्वपत्रामुळे ध्यान लागण्यास साहाय्य होणे : बिल्वपत्राच्या देठातून चैतन्याची स्पंदने वातावरणात प्रक्षेपित होत होती आणि त्यामुळे ध्यान लागण्यास (मन एकाग्र होण्यास) साहाय्य होत असल्याचे जाणवले.

ई. नादाची अनुभूती येणे : माझ्या मनाला नादाची जाणीव होत होती.’

– कु. प्रियांका लोटलीकर (टीप १)

 

६. बेलाचे आरोग्यदृष्ट्या असलेले लाभ

अ. आयुर्वेदातील कायाकल्पात त्रिदलरससेवनाला महत्त्व दिले आहे.

आ. बेलफळाला आयुर्वेदात अमृतफळ म्हणतात. बेलाने बरा होत नाही, असा कोणताही रोग नाही. कोणतेही औषध न मिळाल्यास बेलाचा वापर करावा; मात्र गरोदर स्त्रीला बेल देऊ नये; कारण त्याने अर्भक मरण पावण्याची शक्यता असते.

टीप १ : सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथील कु. प्रियांका लोटलीकर या सनातन संस्थेच्या साधिका आहेत. संस्था शास्त्रीय भाषेत धर्मशिक्षण देण्यासह प्रत्येक प्राणिमात्राच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी कार्यरत आहे. (मूळस्थानी)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘शिव’

4 thoughts on “शिवाला बेल वहाण्यामागील शास्त्र”

  1. बेल कसा वाहावा खुप छान माहिती. या बद्दल स वि स्त र विडियो बन वावा

    Reply
    • नमस्कार,

      शिवपिंडीच्या पूजनाविषयीची सविस्तर माहिती देणारा video पुढील लिंकवर उपलब्ध आहे – https://www.youtube.com/watch?v=qaP8SYvgj_0 शिवपिंडीवर बेल वाहाण्यासंबंधी माहिती 5:26 पासून पुढे आहे.

      Reply
    • नमस्कार,

      ‘३आ.’ या सूत्राखाली दिलेल्या चित्राप्रमाणे बेल वाहावा.

      Reply

Leave a Comment