आजच्या काळात भगवद्गीतेचे महत्त्व !

 

भगवद्गीता अवतरण्याचा दिवस

‘भगवद्गीतेतील जीवनाचे तत्त्वज्ञान कालमर्यादेने बांधलेले नाही. मानवजातीला पथदर्शन करणारे हे विचार श्रीकृष्णाने प्रिय शिष्य अर्जुनाला सांगितले. इतिहासतज्ञांच्या अंदाजानुसार ख्रिस्ताब्द पूर्व ३१०१ या काळात कलियुगप्रारंभी हे महायुद्ध झाले. आजचा काळ लक्षात घेतला, तर अंदाजे ५ सहस्त्र वर्षांआधीचे पुरातन आणि तितकेच अभिनव असे हे तत्त्वज्ञान आहे. महर्षि व्यास यांच्या महाभारतात, भीष्मपर्वात २५ ते ४२ अध्यायांतील हे ७०० श्लोक आहेत. अर्जुनाचा रथ कौरव-पांडव सेनेच्या मध्यभागी श्रीकृष्णाने आणून उभा केला. आपल्या प्रियजनांचा संहार आपल्याला करायचा आहे, या कल्पनेने अर्जुन हताश झाला. महाभारताच्या युद्धाच्या पहिल्याच दिवशी, म्हणजे कार्तिक अमावास्येला किंवा काही इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला मानसिक आणि आंतरिक विकास साधणारे तत्त्वज्ञान (भगवद्गीता) अवतरले.

 

धर्माचरणाची वर्तमानातील स्थिती आणि त्याविषयी महर्षि व्यासांचे म्हणणे

आजचा म्हणजे वर्तमानकाळाचा विचार केला, तर पूर्णत्वापासून आणि आदर्शांपासून ढासळलेले जग आपणास दिसते. प्रतिदिन सकाळी वर्तमानपत्र उघडताच खून, मारामार्‍या, बलात्कार, अपहरण, अपघात यांविषयीच्या बातम्यांनी मन उदास होते. या सगळ्या घडामोडींकडे यंत्रवत् कोरडेपणाने, असंवेदनशीलपणे पहाणारे आपण जगण्याच्या एका बिकट, वाकड्यातिकड्या चढउतारावर, विनाशाच्या गर्तेजवळ उभे आहोत, अशी जाणीव होते.

एकीकडे विज्ञानाची नेत्रदीपक झेप, तर दुसरीकडे हा तुटलेपणा याचे मार्मिक वर्णन करतांना दलाई लामा आपल्या एका कवितेत म्हणतात, ‘यांची चंद्रावर धाव । पण यांना शेजार्‍यांचे माहीत नाही नाव’ आणि ज्यांनी प्रेम देऊन मन घडवायचे त्या आईवडिलांजवळ मुलांवर मायेची पाखर घालण्यासाठी वेळच नाही. भय, क्रोध, मत्सर, मोह यांच्या आहारी जाणारी मने उच्चविद्या घेतलेली; पण शहाणपणा, समजूतदारपणा, मानवता यांना वंचित आहेत. स्टेम सेलमुळे (स्वतःच्या शरिरातील पेशी), मूलपेशींवरील संशोधनाने माणसाला व्याधींवर विजय मिळवता येईल, कदाचित् अमरत्व प्राप्त करता येईल; पण मनाच्या व्याधी, बेफाम भावनांमुळे घडणार्‍या दंगली, बाँबस्फोट, आत्महत्या यावर उपाय करायला जीवनशास्त्रीय प्रगत तंत्रज्ञान कदाचित् कुचकामी ठरेल.

गीता ही श्रीकृष्णाची वाङ्मयीन मूर्ती आहे. ज्या मानव समाजासाठी हे अमोघ विचार अवतरले, तो समाज पुरातन काळापासून ते आजच्या संगणक युगापर्यंत कायम प्रेयसाच्या ओढीने अधोगतीकडे जाणारच आहे. महाभारताअंती द्रष्टे व्यास म्हणतात की,

ऊर्ध्वबाहुर्विरौम्येष्य न च कश्चित् श्रुणोति माम् ।
धर्मादर्थश्च कामश्च सधर्मः किं न सेव्यते ।।

अर्थ : मी (भगवान वेदव्यास) दोन्ही हात उंचावून मोठ्या आवाजात लोकांना सांगत आहे, तरी कुणी माझे ऐकत नाही. अरे बाबांनो ! धर्माचे पालन केले, तर आपसुखच अर्थ आणि काम प्राप्त होतील, तर तुम्ही त्या धर्माचेच आचरण का बरे करत नाही ?

 

कुठे सुख-संपत्ती-सत्ता यांचा त्याग करू पहाणारा
अर्जुन आणि कुठे त्यामागे धावणारा आजचा समाज !

लोकमान्य टिळक यांनीही समकालीन गंभीर समस्यांचा उल्लेख करतांना ‘वाढती लोकसंख्या, बुडता व्यापार, निःसत्त्व जमीन आणि निःसत्त्व माणसे’, हे मुद्दे अधोरेखित केले होते. अशा लोहाच्या थंड गोळ्यावर सत्ता गच्च (घट्ट) धरून ठेवणारे ‘धृतराष्ट्र’च राज्य करणार. ‘जोवर जगणे आहे, तोवर ऋण (कर्ज) काढूनही चैन करण्यात ज्यांना काही विपरीत वाटत नाही’, असा हा समाज आहे.

न काङ्क्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च ।
किं नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा ।। – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १, श्लोक ३२

अर्थ : हे कृष्णा, मला तर विजयाची इच्छा नाही, राज्याची नाही की सुखांचीही नाही. हे गोविंदा, आम्हाला असे राज्य काय करायचे ? अशा भोगांनी आणि जगण्याने तरी काय लाभ होणार आहे?

‘राज्य भोगण्यासाठी हा रक्तलांछित विजय मला सर्वथा नकोसा वाटतो’, हे बोलणारा पापभिरू अर्जुन कुठे आणि सुख-संपत्ती-सत्ता यांसाठी नीतीमूल्ये आणि भावना गुंडाळून ठेवणारा समाज कुठे ?

 

सर्व करूनही अलिप्त रहाणारा श्रीकृष्ण !

स्वतः श्रीकृष्णाइतका अधिकारी, समाजाला (तरी) दुसरा कोण वाटणार ? कंसवधानंतर उग्रसेनाला, जरासंध आणि नरकासुराचा वध केल्यावर त्या दोघांच्या पुत्रांना उत्तराधिकारी करणारा आणि स्वतः द्वारका वसवून तिचे अधिराज्य वसुदेव आणि युवराज बलरामाकडे सोपवणारा हा अलिप्त पुरुष, कृष्णशिष्टाई करणारा राजनीतीज्ञ, आततायी आणि आतंक माजवणार्‍यांचा कर्दनकाळ, प्राग्ज्योतिषपूरच्या नरकासुराचा वध केल्यावर त्याने बंदिगृहातील सोळा सहस्त्र स्त्रियांशी विवाह करून ना सासर, ना माहेर अशा स्त्रियांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. चतुर तर्कशास्त्रज्ञ, सुदाम्याचा मित्र, ‘हा सूर्य हा जयद्रथ’ असे सांगणारा हा भौगोलिक घडामोडींचा जाणकार आणि दुसर्‍यांचे मन वाचणारा श्रेष्ठ मनोवैज्ञानिक ! जे विचार तो इथे सांगतो आहे, ते जीवनाच्या सर्व अंगांना सहजपणे स्पर्श करणारे नित्यनूतन विचार आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे.

 

गीतेने समाजाला मनाच्या शक्तीची जाणीव करून देणे

प्रत्येकाच्या हृदयात तो परमात्मा स्थित असूनही आम्ही जाती, वर्णभेद विसरू शकत नाही. अटळ दुःख सहन करण्याची शक्ती हे मनोबल गीतेने समाजाला दिले.

‘मरणं प्रकृतिः शरीरिणाम् ।’ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १५, श्लोक १५ म्हणजे ‘शरीर असलेल्याला मरण हे स्वाभाविक आहे.’
‘जायते (जन्म होणे), अस्ति (रहाणे), वर्धते (वाढ होणे), विपरिणमते (पालट होणे), अपक्षीयते (क्षय होणे), विनश्यति (नष्ट होणे)’, या देहाच्या अवस्था सांगितल्या आहेत. धनुर्धर अर्जुनाला या मनाच्या शक्तीची जाणीव होती. आपले मन ‘चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवद्दृढम् ।’ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ६, श्लोक ३४ म्हणजे मन चंचल, व्याकुळ करणारे आणि वळवण्यास अत्यंत कठीण आहे. याचा उल्लेख अर्जुनाने प्रांजळपणे केला आहे. वार्‍याची मोट बांधणे जितके कठीण, तितके मन काबूत (ताब्यात) ठेवणे कठीण असते.

 

गीतेचा प्रभाव

अनुसंधान, निदिध्यास, उजळणी, अभ्यास याचा ध्यास ठसावा; म्हणून गीतेत (अध्याय ६, श्लोक ३५; अध्याय १२, श्लोक ९ आणि १०; अध्याय ८, श्लोक ८) आणि इतरत्रही अभ्यासयोगाचा प्रभाव सांगितला आहे. वारा जर निवांत असला, तर दिव्याची ज्योत स्थिरपणे तेवते, तसेच मन स्थिर असेल, तर तेलात भिजलेल्या वातीआधारे तेल वर चढते, तसेच माणसाचा कल उन्नत विचारांकडे श्रेयसाकडे होतो.’

– आचार्य सौ. प्रज्ञा आपटे

साभार : ‘प्रज्ञालोक’, डिसेंबर २०१६

Leave a Comment