निरागसता, प्रीती आणि उत्कट राष्ट्र अन् धर्म प्रेम असणारे फोंडा, गोवा येथील सनातनचे साधक श्री. लक्ष्मण गोरे (वय ८० वर्षे) झाले सनातनच्या ११४ व्या व्यष्टी संतपदी विराजमान !

पू. लक्ष्मण गोरे

रामनाथी (फोंडा) – सनातनच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल, असा दिवस म्हणजे मार्गशीर्ष शुक्ल पक्ष तृतीया अर्थात् ६ डिसेंबर २०२१ ! निरागसता, प्रीती आणि उत्कट राष्ट्र अन् धर्म प्रेम असणारे फोंडा, गोवा येथील सनातनचे ८० वर्षीय साधक श्री. लक्ष्मण गोरे सनातनच्या ११४ व्या व्यष्टी संतपदी विराजमान झाले. गोरेआजोबा यांची अवघ्या ४ मासांत ८ टक्के आध्यात्मिक पातळी वाढली, ही एक वैशिष्ट्यपूर्ण घटना होय. त्यांच्या या अलौकिक आध्यात्मिक वाटचालीची भावविभोर करणारी घोषणा सनातनच्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी एका अनौपचारिक भावसोहळ्यात केली. या वेळी ‘पुष्प मनाचे कर जोडोनिया अर्पी तव चरणा ।’ या सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनपंक्तीनुसार उपस्थित सर्व साधकांनी भावस्थिती अनुभवली. हा सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ पहाण्याचे महद्भाग्य लाभलेल्या साधकांनी श्रीगुरूंच्या सुकोमल चरणी भावपूर्ण कृतज्ञता व्यक्त केली.

या मंगल सोहळ्याला सनातनच्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यासमवेत सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ, पू. सदाशिव परांजपे, पू. (सौ.) शैलजा परांजपे आणि हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ यांची वंदनीय उपस्थिती लाभली. या वेळी पू. लक्ष्मण गोरे यांच्या पत्नी वैद्या (सौ.) मंगला गोरे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), मुलगी सौ. गौरी आफळे, जावई श्री. वैभव आफळे (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) आणि नात कु. योगिनी आफळे यांच्यासह काही साधकही उपस्थित होते. या सोहळ्याचे सूत्रसंचालन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विशारद आणि ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. तेजल पात्रीकर यांनी केले.

 

अशा प्रकारे उलगडले संतपदाचे गुपित !

पू. लक्ष्मण गोरे यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करतांना सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

१. सोहळ्याच्या आरंभी कु. तेजल पात्रीकर यांनी उपस्थितांकडून २ सूक्ष्मप्रयोग करवून घेतले. पहिल्या प्रयोगामध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्ध करण्यात आलेल्या ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ या चैतन्यमय नामजपाचे ध्वनीमुद्रण उपस्थितांना ऐकवण्यात आले आणि ते ऐकतांना ‘काय जाणवते’, हे अनुभवण्यास सांगितले. या वेळी आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती काही साधकांनी कथन केल्या.

२. दुसर्‍या प्रयोगाच्या अंतर्गत ‘पांढर्‍या लखोट्यामध्ये ठेवलेल्या एका वस्तूकडे पाहून काय जाणवते’, याविषयी प्रयोग करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर श्रीगुरूंप्रती भक्ती वृद्धींगत करणारा भावप्रयोग घेण्यात आला. गुरुभक्तीने ओतप्रोत भरलेल्या या भावप्रयोगाने सर्व साधक न्हाऊन निघाले. यानंतर साधकांना ‘पांढर्‍या लखोट्यामधील वस्तूकडे पाहून काय जाणवले’, याविषयी विचारण्यात आले. त्या वस्तूकडे पाहून ‘त्यातून प्रीतीचा वर्षाव होत आहे’, ‘त्यातून चैतन्याच्या लहरी पसरत आहेत’, असे साधकांना जाणवले.

३. यानंतर व्यासपिठावर उपस्थित श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी श्री. लक्ष्मण गोरे यांना व्यासपिठावर येण्याची विनंती केली आणि त्यांना ‘पांढर्‍या लखोट्यात गुंडाळलेल्या वस्तूकडे पाहून काय जाणवले’, असे विचारले. या वेळी श्री. गोरेआजोबा म्हणाले, ‘‘पूज्य मां की अर्चना का एक छोटा सा उपकरण हूं ।’’ म्हणजे ‘भारतमातेचे पूजन करण्याचे मी एक छोटेसे उपकरण आहे !’ यातून उपस्थित साधकांना गोरेआजोबा यांच्यातील उत्कट राष्ट्रभक्तीचा प्रत्यय आला.

४. यानंतर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ म्हणाल्या, ‘‘परात्पर गुरुदेव आपल्याला अंतर्मुख करत आहेत. भगवंत आपले अंतर्चक्षू उघडत आहे. सूक्ष्म-परीक्षणातून भगवंत आपल्याला प्रचीती देत असतो. सूक्ष्म-परीक्षण करण्याची क्षमता आपल्यात नसून ती दृष्टी गुरूंची आहे. विश्वात परात्पर गुरुदेव एकमेव आहेत जे आपल्यात सूक्ष्म जाणण्याची क्षमता निर्माण करत आहेत. पांढर्‍या लखोट्यातील वस्तू पाहून मला थंडावा जाणवला आणि तो वाढत गेला. माझ्या हृदयातून ‘ओंकार’ बाहेर पडत होते आणि ‘निर्गुण’ जप चालू झाल्याचे मला जाणवले.’’ हे ऐकल्यावर ‘ती चैतन्यमय वस्तू म्हणजे आहे तरी काय ?’, याविषयी उपस्थित साधकांची उत्कंठा शिगेला पोचली.

५. तेव्हा श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी लखोट्यातील वस्तू सर्वांना दाखवली. ती वस्तू म्हणजे श्री. लक्ष्मण गोरेआजोबा यांचे छायाचित्र होते. ते पाहून सर्व साधकांची पुष्कळ भावजागृती झाली. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांनी ‘छायाचित्राकडे पहात रहावेसे वाटते ना !’, असे उपस्थितांना उद्देशून म्हटले. त्यानंतर त्यांनी ते छायाचित्र शेजारी बसलेल्या श्री. गोरेआजोबा यांना दाखवले.

स्वत:च्याच छायाचित्राकडे पाहून आजोबांचे हात नकळत जोडले गेले. तेव्हा आजोबा म्हणाले, ‘‘प.पू. डॉक्टरांची कृपा आहे. मी एवढा सुंदर दिसतो, असे मला वाटले नव्हते.’’ त्यांच्या छायाचित्राकडे पाहून ‘आध्यात्मिक स्तराचे म्हणजे दैवी सौंदर्य काय असते’, याची सर्वांनी प्रत्यक्ष अनुभूती घेतली.

६. त्यानंतर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई म्हणाल्या, ‘‘गोरेआजोबा यांच्यामधील निर्मळता आणि प्रीती या दैवी गुणांमुळे त्यांच्या छायाचित्राकडे पाहून आनंद जाणवतो. गोरेकाका यांची प्रगती लपू शकली नाही. आज ते संतपदी विराजमान झाले आहेत. ‘लपविलास तू हिरवा चाफा, सुगंध त्याचा लपेल का ?’ या भावगीतानुसार पू. गोरेकाका यांच्यातील संतत्व लपून राहिले नाही. त्यांच्या आध्यात्मिक वाटचालीमुळेच त्यांच्यातील संतत्व आणि दिव्यत्व यांची आज सर्वांना अनुभूती आली.’’ या प्रसंगी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांनी त्यांच्या अमृतवाणीतून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पू. गोरेआजोबा यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार (पृष्ठ ५ वर दिले आहेत) उपस्थित साधकांना ऐकायला मिळाले.

७. यानंतर सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी पू. गोरेआजोबांचा पुष्पहार घालून आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ, तसेच श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी पू. गोरेआजोबा यांना वाकून नमस्कार केला. हे पाहून अनेक साधकांची पुष्कळ भावजागृती झाली. या प्रसंगी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना पू. गोरेआजोबा कृतज्ञताभावाने म्हणाल्या, ‘‘प.पू. डॉक्टरांच्या कृपेनेच मला ही फुलांची माळ मिळाली आहे; पण मला ती झेपेल ना ?’’ यातून पू. आजोबांना ‘आध्यात्मिक स्तरावरील संतत्वाचे दायित्व पेलेल ना’, असे विचारायचे होते. त्यावेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ म्हणाल्या, ‘प.पू. गुरुदेवच सर्व करवून घेतील !’

८. सोहळ्याच्या शेवटच्या सत्रात सनातनच्या ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सूक्ष्म-ज्ञान प्राप्तकर्त्या साधिका कु. मधुरा भोसले यांनी सोहळ्याच्या वेळी सूक्ष्म जगतामध्ये घडलेल्या घडामोडींविषयी त्यांनी केलेले परीक्षण सांगितले. (ते उद्याच्या, म्हणजेच १५ डिसेंबरच्या दैनिकात प्रकाशित करत आहोत.)

 

त्यागी, सेवाभावी आणि सतत कृतज्ञताभावात
असलेले श्री. लक्ष्मण गोरे सनातनच्या ११४ व्या संतपदी विराजमान !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘मूळचे तळेगाव दाभाडे (पुणे) येथील श्री. लक्ष्मण गोरे हे पूर्वी एका मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनेत राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती यांचे कार्य करत होते. तेव्हापासूनच ते त्यागी जीवन जगत आहेत. नंतर ‘त्या संघटनेचे कार्य सोडून सनातनमय होणे’, हे त्यांनी देवाच्या कृपेनेच साध्य केले.

सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना चालू केल्यावर ते आश्रमात ‘दिसेल ते कर्तव्य’, या भावाने मिळेल ती आणि दिसेल ती सेवा करू लागले. त्यांनी देवद आश्रमात परात्पर गुरु पांडे महाराज यांची मनोभावे सेवा केली. सतत अंतर्मुख असलेल्या काकांनी स्वभावदोष-निर्मूलनासाठी कठोर प्रयत्न करून स्वतःत आमूलाग्र पालट घडवून आणले आहेत. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना महाराष्ट्र सोडून गोव्यात स्थलांतरित होण्याविषयी विचारल्यावर एकही क्षण न दवडता ते त्यासाठी सिद्ध झाले.

आतापर्यंत गोरेकाकांची हृदयाची ३ शस्त्रकर्मे झाली आहेत. हृदयविकारामुळे आजारी असतांनाही काका देवावरील दृढ श्रद्धेच्या बळावर स्थिर होते. ‘या वयात शारीरिक त्रास होत असूनही काका सेवारत असतात’, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. काका जीवनात घडणार्‍या प्रसंगांकडे साक्षीभावाने पहातात, तसेच ते सतत कृतज्ञताभावात असतात.

गोरेकाका यांच्या पत्नी वैद्या (सौ.) मंगला लक्ष्मण गोरे (वय ७२ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), मुलगी सौ. गौरी वैभव आफळे, जावई श्री. वैभव आफळे (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) आणि नात कु. योगिनी सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. काकांनी त्यांची मुलगी, जावई आणि नात यांना पूर्णवेळ साधना करण्यासाठी पाठिंबा दिला अन् ते त्यांना साधनेत सर्वतोपरी साहाय्य करत आहेत.

‘त्यागी आणि समर्पित जीवन कसे जगावे ?’, याचा आदर्श सर्वांसमोर ठेवणार्‍या श्री. लक्ष्मण गोरेकाका यांची आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होत आहे. वर्ष २०१८ मध्ये त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. त्यानंतर जुलै २०२१ मध्ये त्यांची आध्यात्मिक पातळी ६३ टक्के होती. निरागसता, सेवेची तळमळ, कृतज्ञताभाव इत्यादी अनेक गुणांमुळे अवघ्या ४ मासांत त्यांची आध्यात्मिक पातळी ८ टक्के वाढली असून आजच्या शुभदिनी त्यांनी ७१ टक्के आध्यात्मिक गाठली आहे आणि ते ‘व्यष्टी’ संत म्हणून सनातनच्या ११४ व्या संतपदावर विराजमान झाले आहेत. ‘अल्प कालावधीत जलद आध्यात्मिक प्रगती करण्याच्या संदर्भात सनातनच्या इतिहासात कोरून ठेवावा’, असा हा आनंददायी क्षण आहे. पू. गोरेकाकांच्या पत्नी वैद्या (सौ.) मंगला लक्ष्मण गोरे यांचीही आध्यात्मिक प्रगती जलद गतीने होत आहे.

‘पू. लक्ष्मण गोरे यांची पुढील आध्यात्मिक प्रगती अशीच जलद गतीने होईल’, याची मला निश्चिती आहे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

 

पू. गोरेआजोबा यांची परात्पर गुरु डॉक्टरांवर पुष्कळ
श्रद्धा असून ते सनातनमय झाले आहेत ! 
– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

दळणवळण बंदीच्या कालावधीत पू. गोरेकाका आश्रमात येऊ शकत नव्हते. अशा परिस्थितीतही त्यांनी घरी राहून साधनेचे प्रयत्न चालू ठेवले. त्यांना कधी आश्रमात येण्यासाठी चारचाकी नेण्यास गेली, तरी चालक साधकाला अडचण येऊ नये म्हणून ते त्यांच्या घरापासून मुख्य रस्त्यापर्यंत काही अंतर चालून येतात. यातून उतारवयातही त्यांच्यातील ‘दुसर्‍याचा विचार करणे’, हा गुण लक्षात येतो. त्यांची परात्पर गुरु डॉक्टरांवर पुष्कळ श्रद्धा असून ते सनातनमय झाले आहेत.

श्रीगुरूंनी करवून घेतलेल्या राष्ट्र-धर्म कार्यामुळेच आजचा दिवस उजाडला !

पू. लक्ष्मण गोरेआजोबा यांनी व्यक्त केलेले भावपूर्ण मनोगत !

‘लहानपणापासून मला राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भातील कार्याची आवड होती. आमचा व्यवसाय असला, तरी मी कधीच पैशासाठी हपापलो नाही. ‘अधिकोषात किती पैसे आहेत’, याचा मी कधी विचारही केला नाही. माणूस पैशासाठी धावतो; परंतु मी मात्र केवळ राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठीच कार्य करत राहिलो. ‘गुरूंनी माझ्याकडून करवून घेतलेल्या सेवेमुळेच आजचा दिवस उजाडला’, असे मला वाटते.’

 

पू. लक्ष्मण गोरेआजोबा यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केलेले हृद्य मनोगत

यजमानांना लोभ, मोह, आवड-नावड, राग आदी दोष
कधीच शिवले नाहीत !
 – वैद्या (सौ.) मंगला गोरे (पू. गोरेआजोबा यांच्या पत्नी)

वैद्या (सौ.) मंगला गोरे

प.पू. डॉक्टरांच्या कृपेनेच आजचा दिवस पहायला मिळाला. गोरेकाका हे आधीपासूनच सामान्य नसून वेगळेच होते. लोभ, मोह, आवड-नावड, राग आदी दोष त्यांना कधीच शिवले नाहीत. आमच्यात कधी वाद झाला, तर १० मिनिटांतच ते सर्व विसरून माझ्याशी बोलायला लागत. त्यांना कधीच कशाचीच चिंता वाटली नाही. त्यांचे व्यक्तीमत्त्व नि:स्पृह आहे. त्यांच्याविषयी मी अनेक वेळा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यासाठी मी त्यांची क्षमा मागते. माझ्या सासूबाई नेहमी म्हणायच्या, ‘माझा मुलगा वेगळाच आहे. तू त्याला सांभाळून घे !’ काही दशकांपूर्वी एका हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे कार्य ज्या दिशेने चालू होते, ते पुढे दिशाहीन होत गेले. हे त्यांना उमगल्याक्षणी त्यांनी ती संघटना सोडून ते सनातनच्या मार्गदर्शनाखाली साधना करू लागले. ते साधकांना नेहमी म्हणत, ‘जिकडे कमी, तिकडे आम्ही, मला धरा तुम्ही !’ आज गुरुदेवांनी त्यांचा उद्धार केल्यामुळे मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’

 

पू. बाबांचे उदाहरण भारतातील सर्व हिंदुत्वनिष्ठांना
शिकण्यासारखे !
 – सौ. गौरी आफळे (पू. गोरेआजोबा यांची मुलगी)

सौ. गौरी आफळे

‘बाबा प्रत्येक वर्षी रामजन्मभूमी आंदोलनासाठी अयोध्या येथे जात असत. आज ६ डिसेंबर असून वर्ष १९९२ मध्ये आजच्याच दिवशी बाबरीचा ढाचा पाडण्यात आला होता. आता रामजन्मभूमीवर राममंदिर उभारले जात आहे. बाबांची ही कितीतरी वर्षांपासूनची इच्छा फलद्रूप झाली आहे. त्याच समवेत प.पू. डॉक्टरांनी बाबांच्या जीवनाचे ‘राममंदिर’ केले आहे. प.पू. गुरुदेवांनी पू. बाबांना योग्य मार्गावर आणून त्यांच्याकडून साधना करवून घेऊन त्यांचा उद्धार केला. पू. बाबांचे उदाहरण हे भारतातील सर्व हिंदुत्वनिष्ठांना शिकण्यासारखे आहे. ‘त्यांच्या उदाहरणाने सर्वांच्या मनावर साधनेचे महत्त्व बिंबवले जाईल’, असे वाटते. बाबांचे संपूर्ण आयुष्य हे त्याग, समर्पण आणि सेवाभाव यांनीच भरलेले आहे. यासाठी मी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.’

 

पू. गोरेकाका हे लहान बाळासारखे निरागस आहेत !
– श्री. वैभव आफळे (पू. गोरेआजोबा यांचे जावई)

श्री. वैभव आफळे

गेल्या काही दिवसांपासून घरात दैवी कण मिळत होते. पत्नीच्या (सौ. गौरी आफळे यांच्या) हातावर स्वस्तिक उमटल्याची अनुभूतीही नुकतीच आम्ही घेतली. ही सर्व शुभचिन्हे असल्याचे लक्षात आले. वर्ष २०१८ मध्ये जेव्हा पू. गोरेकाकांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित झाली, तेव्हा त्यांच्यामध्ये बालकभाव असल्याचे लक्षात आले होते. आता त्यांना काहीही दिले, तरी ते खातात. आता ‘ते अगदी बाळासारखे निरागस झाले आहेत’, असे जाणवते. आज ६ डिसेंबर हा ‘विजय दिवस’ (बाबरी ढाचा पाडल्याचा दिवस हा ‘विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो.) असून तो आनंदाचा दिवस ठरला आहे.

मध्यंतरी त्यांच्या एका ओळखपत्रामध्ये काही गोष्टी अद्ययावत करून घेतल्या. त्यांना याविषयी कल्पना दिल्यावर त्यांना ते लक्षात येईना. तेव्हा मी त्यांना म्हटले, ‘तुम्ही तुमची सर्व संपत्ती भगवंताच्या चरणी अर्पण केली आहे. त्यामुळे सरकारने तुम्हाला भेट दिली आहे.’ वयोमानानुसार पू. काकांना काही गोष्टी लक्षात येत नाहीत. आधी त्यांना समजावून सांगतांना आम्हाला राग येत असे; मात्र गेल्या काही कालावधीपासून त्यांना सर्वकाही प्रेमानेच सांगावेसे वाटते. या माध्यमातून ‘भगवंताने आमच्यामध्ये संतांशी कसे वागावे ?’, याची सिद्धता आधीच करून घेतली, असे जाणवते.’

 

पू. आजोबा शांत आणि निरागस झाले आहेत !
 – कु. योगिनी आफळे (पू. गोरेआजोबा यांची नात)

कु. योगिनी आफळे

‘आज मला वेगळाच आनंद अनुभवायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून पू. आजोबा पुष्कळ शांत आणि निरागस झाले आहेत, असे जाणवते.’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment