३० नोव्हेंबर २०२१ या दिवशी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ जयपूर दौर्यावर असतांना त्यांनी श्री. वारिद सोनी (‘वारिद’चा अर्थ दक्ष) यांना ‘कुटुंबियांना भेटायला येणार’, असा निरोप दिला. दुपारी १२ वाजता ‘उच्चकोटीच्या संत घरी येणार’, या विचाराने सोनी परिवाराने भावभक्तीने सिद्धता केली. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ त्यांच्या घरी गेल्यावर त्यांनी श्री. वारिद सोनी आणि त्यांचे वडील श्री. वीरेंद्र सोनी यांच्यासोबत कैलासातून आणलेल्या शिवलिंगाची आरती केली. आरतीचे निमित्त काढून छायाचित्र आणि चित्रीकरण चालू करण्यात आले. त्यानंतर श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या श्री. वीरेंद्र सोनी आजोबांना म्हणाल्या, ‘‘आज मी तुमची मुलाखत घेऊन तुम्ही केलेल्या साधनेविषयी जाणून घेणार आहे.’’ काही पूर्वनियोजन नसतांना श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी श्री. वीरेंद्र सोनी यांच्या साधनामय जीवनाविषयी जाणून घेतले. शेवटी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ म्हणाल्या, ‘‘श्री. वीरेंद्र सोनी यांनी घरी राहूनच भाव-भक्तीने साधना केली. त्यांनी धर्मग्रंथांचे वाचन केले. वाचन केल्यानंतर आतून त्यांना जे ईश्वराकडून ज्ञान मिळाले, त्याचे त्यांनी या वयात लिखाण केले आहे. भगवान शिवावर त्यांची अचल श्रद्धा आहे. घरी राहूनही त्यांनी भाव वाढवला आणि आज त्यांनी संतपद गाठले आहे. आज ते पू. वीरेंद्र सोनी झाले आहेत.’’ हे ऐकताच सोनी परिवारातील सर्व सदस्य आनंदित झाले !
पू. वीरेंद्र सोनी यांचा परिचय !
पू. वीरेंद्र सोनी यांचा जन्म ९ नोव्हेंबर १९३५ या दिवशी राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील हरसौली गावात झाला. वर्ष १९५६ ते १९९५ पर्यंत त्यांनी भारतीय रेल्वेमध्ये काम केले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ‘वानप्रस्थी प्रचारक’ म्हणून कार्यरत होऊन राष्ट्रसेवा करायचे ठरवले. त्या काळात ते जयपूर येथील संघाच्या ‘भारतीय भवन’चे कार्यालय प्रमुखही होते. वर्ष २००१ पासून वृद्धापकाळामुळे ते त्यांचा मुलगा श्री. वारिद सोनी यांच्याकडे राहू लागले. वर्ष २०१३ मध्ये त्यांच्या हृदयाची शस्त्रकर्म झाले. वर्ष २०१६ मध्ये त्यांनी त्यांचे गुरु श्री रविनाथ महाराज आणि मुलगा श्री. वारिद सोनी यांच्यासोबत अत्यंत कठीण कैलास-मानसरोवर यात्रा केली.
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि श्री. वीरेंद्र सोनी यांच्या भेटीची पार्श्वभूमी !
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी वर्ष २०१९ मध्ये कैलास-मानसरोवर (मानससरोवर) यात्रा केली. शिवभक्त श्री. वारिद सोनी हे या यात्रेचे मार्गदर्शक होते. श्री. वारिद सोनी यांनी याआधी ६ वेळा कैलास यात्रा केली आहे. त्यांनी अनेक भक्तांना कैलास यात्रेसाठी मार्गदर्शनही केले आहे. वर्ष २०१९ मध्ये श्री. वारिद सोनी आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची भेट जयपूर येथील सनातनच्या साधिका श्रीमती अर्चना खेमका यांच्या घरी झाली. तेव्हापासून श्री. सोनी यांना श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याविषयी विलक्षण आत्मियता निर्माण झाली. त्यांनी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना घरी बोलवले आणि त्यामुळे घरचे सदस्य म्हणजे त्यांचे वडील श्री. वीरेंद्र सोनी, श्री. वारिद सोनी यांच्या पत्नी सौ. मधु सोनी आणि त्यांचा मुलगा श्री. मृघेंद्र सोनी यांच्याशी ओळख झाली. पहिल्या भेटीतच श्री. वारिद सोनी यांचे वडील श्री. वीरेंद्र सोनी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना पाहून म्हणाले, ‘‘आज आमच्या घरी साक्षात् दुर्गादेवी आली आहे.’’