परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारख्या थोर विभूतीच्या माध्यमातून ईश्वर प्रगट होऊन कार्य करतो ! – ह.भ.प. गणेश महाराज, देवद, पनवेल

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात हरिनाम दिंडीचे स्वागत !

विणेकरीचें औक्षण करताना श्री.अविनाश गिरकर

विठु माझा, विठु माझा । संत-गोपाळांचा मेळा । जनी-भक्तांचा सोहळा ।।

पनवेल – नामाने पवित्रता येते; नामदिंडी गावाचा परिसर पुनित करते. प्रत्येक युगात अधर्म वाढला की, ईश्वर अवतार घेतो; परंतु कलियुग चालू होऊनही ईश्वराचा अवतार अद्याप झालेला नाही. अवतार होण्यासाठी प्रत्येक युगात भक्तांनी प्रार्थना केली आणि मग अवतार झाले. आता विविध संत, संप्रदाय आदी नाम, भजन, कीर्तन यांच्या माध्यमातून कार्य करत आहेत; हे सारे अधर्माला थोपवून धरत आहेत. सनातन संस्थेचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारख्या थोर विभूतीच्या माध्यमातून ईश्वर प्रगट होऊन कार्य करतो, असे उद्गार ह.भ.प. गणेश महाराज यांनी काढले. ८ डिसेंबर या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात ग्रामस्थ मंडळाच्या वतीने काढण्यात येणार्‍या हरिनाम दिंडीचे प्रतीवर्षीप्रमाणे आगमन झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी गुरुवर्य नाथा पाटील हेही उपस्थित होते. या दिंडीच्या माध्यमातून षड्रिपू निर्मूलन आणि व्यसन निर्मूलन यांच्या संदर्भात कार्य केले जाते.

आश्रमात दिंडीचे स्वागत करण्यात आले. विणेकरींचे औक्षण, तसेच पाद्यपूजन सनातनचे साधक श्री. अविनाश गिरकर (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) यांनी केले. तुळशी वृंदावन, ज्ञानेश्वरी आणि कलश मस्तकावर वाहून आणलेल्या वारकरी महिलांचे पाद्यपूजन आणि औक्षण सनातनच्या साधिका सौ. मेधा गोडसे यांनी केले. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत देवद गावातील अनेक वारकरी अभंग गात दिंडीत सहभागी झाले होते. या वेळी आश्रमाच्या वतीने वारकरी बांधवांना प्रसाद देण्यात आला.

या वेळी सनातनचे साधक श्री. निनाद गाडगीळ (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) म्हणाले, ‘‘ह.भ.प. गणेश महाराज यांचे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना नेहमीच सहकार्य असते. हरिनाम दिंडी काढणार्‍या वारकर्‍यांचे समाजप्रबोधनाचे कार्य उत्तरोत्तर वाढत जावो, अशी विठुरायाच्या चरणी प्रार्थना करतो.’’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. नम्रता दिवेकर यांनी केले.

दिंडी आश्रमातून परततांना ज्ञानेश्वरी, तुळशी वृंदावन आणि कलश मस्तकावर घेऊन सनातनच्या साधिका काही अंतरापर्यंत दिंडीत सहभागी झाल्या.

 

सनातन संस्थेविषयी गौरवोद्गार

धर्माचे कार्य निःस्वार्थपणे करणारी सनातन संस्था आहे. धर्मपरंपरा कायम रहावी या उदात्त हेतूने संस्था कार्यरत आहे, असे ह.भ.प. गणेश महाराज या वेळी म्हणाले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment