संभाजी ब्रिगेडकडून फेसबूक पोस्टद्वारे सनातन संस्थेच्या पनवेल आश्रमावर आक्रमण करण्याची चिथावणी !

संभाजी ब्रिगेड

मुंबई – ‘सनातन पंचांग २०२२’मध्ये राजमाता जिजाऊंचा तिथीनुसार १७ जानेवारी २०२२ असा उल्लेख करण्यात आला आहे. हा उल्लेख योग्य असतांना जाणीवपूर्वक ‘तो दिनांकानुसार १२ जानेवारी २०२२ असा हवा’, असा कागांवा करत मराठा सेवा संघ, तसेच संभाजी ब्रिगेड पुरस्कृत फेसबूक पृष्ठांवर सनातनविषयी अपप्रचार आणि चिथावणीखोर पोस्ट करण्यात आल्या आहेत. यांतील काही फेसबूक पानांवर सनातन पंचांग जाळण्याची धमकी देण्यात आली आहे. एकाने त्याच्या ‘कमेंट’मध्ये (प्रतिक्रियेमध्ये) सनातन संस्थेच्या पनवेल आश्रमाचा पत्ता दिला असून संभाजी ब्रिगेडच्या एकाने ‘कमेंट’मध्ये या आश्रमावर आक्रमण करून तो फोडण्याचे समाजकंटकांना आवाहन केले आहे.

 

४ डिसेंबर या दिवशी नांदेड येथे काही
समाजकंटकांकडून ‘सनातन पंचांग २०२२’च्या प्रती जाळल्याचे वृत्त आहे.

१. या संदर्भात अधिक माहिती अशी की, काही लोकांनी सनातनच्या ‘हेल्पलाईन’वर पंचांग मागवले. यानंतर पंचांग वितरण करणार्‍या एका वितरकाला दूरभाष करून ‘राजमाता जिजाऊ यांची जयंती १२ जानेवारी २०२२ ला असतांना तुम्ही तिथीने ती १७ जानेवारी २०२२ असे त्यात दिले आहे. तुम्ही पंचांगात चुकीचे लिहिले आहे. तुम्ही लोकांना चुकीची दिशा देत आहात’, असे सांगितले.

२. या संदर्भात मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडशी संबंधित लोकांच्या फेसबूक पानांवर या संदर्भात मोठा अपप्रचार चालू असून ‘यांना राजमाता जिजाऊ यांची जयंती माहिती नाही, हे नालायक आहेत, आम्ही पंचांग जाळणार’, अशी चिथावणीखोर भाषा वापरण्यात आली आहे.

३. ‘सनातन पंचांगा’चे वितरण करणार्‍या काही वितरकांना ‘व्हॉट्सअप’वर ‘पंचांग हवे’ असे संदेश येत असून मागणी करणार्‍यांचे नाव, पत्ता विचारले असता काहीच उत्तर आलेले नाही, तसेच ‘१-२ दिवसांत पंचांगाची होळी करणार आहे, त्यासाठी पंचांग हवे आहेत’, असेही दूरभाष येत आहेत.

राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीविषयी खुलासा

वर्ष १८५७ पूर्वीच्या काळात इंग्रजी कालगणना प्रचलित नसल्यामुळे त्या काळातील संत, राजे, क्रांतीकारक यांच्या जयंती आणि पुण्यतिथी तिथीनुसार प्रचलित होत्या. यासाठी ‘सनातन पंचांग’मध्ये वर्ष १८५७ च्या आधीचे संत, राजे, क्रांतीकारक आदींच्या जयंती आणि पुण्यतिथी यांचा उल्लेख तिथीनुसार केला जातो. यांतील काही अपवादात्मक दिनविशेष दिनांकानुसारही साजरे केले जातात, उदा. छत्रपति शिवाजी महाराज यांची जयंती शासकीय धोरणांनुसार दिनांकानुसार, तर अनेक शिवभक्त तिथीनुसार साजरी करतात. यासंदर्भातील स्पष्टीकरणात्मक सूचना सनातन पंचांगाच्या जानेवारी मासाच्या मलपृष्ठावर सविस्तरपणे दिली आहे.

या धोरणानुसार ‘सनातन पंचांग २०२२’मध्ये राजमाता जिजामाता यांच्या जयंतीचा उल्लेख पौष पौर्णिमेला, म्हणजेच १७ जानेवारीला केला आहे. यात इतिहास पालटण्याचा किंवा राजमाता जिजाऊ यांचा अपमान करण्याचा कोणताही उद्देश नाही; मात्र काही जण ‘सनातन पंचांग’ इतिहास पालटण्याचा प्रयत्न करत आहे’, असा अपसमज पसरवत आहेत.

– संपादक, सनातन पंचांग
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment