सत्संग आणि सेवा यांमध्ये अधिकाधिक सहभागी होऊन राष्ट्र-धर्माचे कार्य करायला हवे ! – सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर, धर्मप्रचारक, सनातन संस्था

कळंबोली येथे युवा साधक-प्रशिक्षण शिबिर चैतन्यमय वातावरणात पार पडले !

सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर
कळंबोली (जिल्हा रायगड) – आपल्याला विविध सत्संगांच्या माध्यमातून सकारात्मक ऊर्जा ग्रहण करण्याची संधी मिळत आहे. आपण सर्वांनी सत्संग आणि सेवा यांच्यात अधिकाधिक सहभागी होऊन राष्ट्र-धर्माचे कार्य करायला हवे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी केले. येथील न्यू इंग्लिश स्कूल (मराठी माध्यम) या शाळेच्या सभागृहात सनातन संस्थेच्या वतीने रायगड जिल्ह्यातील युवा साधकांसाठी २१ नोव्हेंबर या दिवशी आयोजित केलेल्या युवा साधक-प्रशिक्षण शिबिरात त्या बोलत होत्या. या शिबिरात सनातन संस्थेच्या संत पू. (सौ.) संगीता जाधव यांनीही ‘ऑनलाईन’ माध्यमातून उपस्थित युवांना मार्गदर्शन केले. शिबिर चैतन्यमय वातावरणात पार पडले.

श्री. मनीष माळी यांनी शिबिराचा उद्देश सांगितला. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा परिचय आणि सनातन संस्थेचे कार्य’ यांविषयी सनातन संस्थेच्या सौ. मोहिनी मांढरे यांनी, तर हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची ओळख, तसेच जीवनातील साधनेचे महत्त्व यांविषयी समितीचे श्री. राजेंद्र पावसकरगुरुजी आणि श्री. मनीष माळी यांनी उपस्थितांना सांगितले. शिबिराचे सूत्रसंचालन कु. श्रुती किचंबरे यांनी केले.

सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर म्हणाल्या, ‘‘समाजातील युवा ‘फॅशन’च्या नावाखाली फाटलेले कपडे घालणे किंवा भुतांची चित्रे असलेले कपडे घालणे, केस विविध आकारांत कापणे अथवा रंगवणे अशा कृती करतात. अशा अयोग्य कृतींमुळे संबंधित व्यक्तीकडे नकारात्मकता खेचली जाऊन व्यक्तीची बुद्धीही नकारात्मक विचार करू लागते.’’

पू. (सौ.) संगीता जाधव

श्रीगुरूंचे स्मरण केल्याने अडचणी दूर होतील ! – पू. (सौ.) संगीता जाधव

अभ्यास किंवा कोणतीही सेवा करतांना येणार्‍या अडचणींच्या वेळी श्रीगुरूंचे स्मरण केल्यास अडचणी दूर होतात. आपण ‘सत्’मध्ये रहावे, यासाठी श्रीगुरुच सर्व लीला करत आहेत. कुणीतरी आपल्याला भेटले, सेवा सांगितली किंवा संपर्क केला, तरी ‘श्रीगुरुच आपल्याला निरोप देत असतात’, असा भाव ठेवण्याचा प्रयत्न करूया.

शिबिरार्थींचे मनोगत

१. शिबिराच्या कालावधीत माझी परीक्षा होती; पण ‘पुन्हा संधी मिळणार नाही’, असा विचार करून मी शिबिरात आलो. शिबिरात विषय मांडतांना ‘मी बोलत नसून श्रीगुरुच सुचवत आहेत’, असे जाणवत होते. शिबिरातून ऊर्जा मिळाल्याने मी व्यष्टीसाठी प्रयत्न करीन.
– कु. प्रथमेश भोईर

२. आम्ही प्रथमच शिबिरात आलो. शिबिरात सर्व सूत्रे कृतीत आणण्यासाठी प्रयत्न करणार. सद्गुरु अनुराधाताईंनी मार्गदर्शनात सांगितल्याप्रमाणेही प्रयत्न करू. शिबिरात येण्यापूर्वी ‘कंटाळा येईल’, असे वाटले; पण तसे न होता चांगले वाटले.
– कु. आदित्य पवार, कु. अनुराग मोकल, कु. श्रवण बाईत

३. प्रायोगिक भागातून विषय कसा मांडावा ?, हे शिकायला मिळाले. ‘सेवा करतांना गुरूंना विचारून करत आहे’, असा भाव ठेवून प्रयत्न केले. तेव्हा परात्पर गुरुदेवांनी सेवा करायला शिकवली, असे लक्षात आले.
– कु. स्नेहा भोईर आणि कु. प्रथमेश पडवळ

अनुभूती

१. व्यासपिठावरील आसंदीत परात्पर गुरुदेव बसलेले दिसत होते. – कु. शांभवी म्हात्रे आणि अनुराग मोकल

२. सद्गुरु अनुराधाताई शिबीरस्थळी येण्याआधी सभागृहात निराळाच दैवी सुगंध येत होता. शिबिरात परात्पर गुरुदेव आणि सद्गुरु ताई आधीपासूनच उपस्थित असल्याचे जाणवत होते. – कु. पूजा पाटील

विशेष सहकार्य

१. नगरसेवक आणि न्यू इंग्लिश स्कूल (मराठी माध्यम) चे विश्वस्त श्री. सतीश पाटील आणि प्रभारी (इन्चार्ज) सौ. देशपांडे यांनी शिबिरासाठी सभागृह विनामूल्य उपलब्ध करून दिले.

२. ‘गिरीश मंडप डेकोरेटर्स’ यांनी शिबिरासाठी आवश्यक साहित्य विनामूल्य उपलब्ध करून दिले.

३. श्री. रमेश पाटील यांनी शिबिरार्थींसाठी चहाची व्यवस्था केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment