हिंदु राष्ट्रात शासकीय योजना, वास्तू,रस्ते, पुरस्कार इत्यादी सर्वांना नावे देण्याची पद्धत !

शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि संबंधित शक्ती एकत्र असतात. त्यामुळे व्यक्ती योग्य नसल्यास तिच्या नावामुळे वातावरणात रज-तमात्मक लहरी पसरतात. तसे होऊ नये; म्हणून हिंदु राष्ट्रात शासकीय योजना, वास्तू, रस्ते, पुरस्कार इत्यादी सर्वांना राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी कार्य केलेल्या रज-सत्त्व प्रधान व्यक्ती, तसेच सत्त्वगुण प्रक्षेपित करणारे संत, देवता इत्यादींची नावे असतील.

 

१. हिंदु राष्ट्रात शासकीय योजना, वास्तू, रस्ते इत्यादींची नावे

१ अ. राष्ट्रपुरुषांची नावे असतील !

हिंदूंचे तेजस्वी राजे; उदा. छत्रपती शिवाजी महाराज; थोर राष्ट्रपुरुष, उदा. स्वातंत्र्यवीर सावरकर; क्रांतीवीर, उदा. आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके, अशी राष्ट्रासाठी अमोल कार्य केलेल्यांची दिली जातील.

देशात आजही रस्त्यांना ‘अकबर रोड’, ‘औरंगजेब रोड’ इत्यादी परकीय आक्रमकांची नावे आहेत. हिंदु राष्ट्रात शासकीय योजना, वास्तू, रस्ते इत्यादी सर्वांना परकीय आक्रमकांची नावे नसतील !

 

२. हिंदु राष्ट्रात साहित्य अन् कला या क्षेत्रांत देण्यात येणार्‍या पुरस्कारांची नावे

 

आजकाल साहित्य अन् कला या क्षेत्रांत दिल्या जाणार्‍या पुरस्कारांना ती क्षेत्रे गेल्या शे-दीडशे वर्षांत ज्यांनी गाजवली, त्या मान्यवरांची नावे दिली जातात, उदा. नाट्यकलेसाठी बालगंधर्व पुरस्कार दिला जातो. हिंदु राष्ट्रात विविध कलांचे जनक असलेल्या देवता, त्या क्षेत्रांचे शास्त्र लिहिणारे ऋषी, तसेच त्या क्षेत्रात उत्तुंग कर्तृत्व गाजवलेले आणि सहस्रो वर्षे ज्यांची नावे जनमानसावर कोरली गेली आहेत, त्यांच्या नावे पुरस्कार दिले जातील.

२ अ. संगीत : श्री सरस्वतीदेवी, नारदमुनी, चित्रसेन गंधर्व, तसेच तानसेन, संगीततज्ञ बैजनाथ बावरा

२ आ. नृत्य : नटराज (शिव)

२ इ. नाटक : ‘नाट्यशास्त्र’ ग्रंथांचे कर्ते भरतमुनी, ‘नटसूत्रम्’चे रचनाकर्ते अष्टाध्यायीकार पाणिनी

२ ई. साहित्य : महाकवी कालिदास, भर्तृहरी, भास, भवभूति, माघ, भारवि, भामह आणि दंडिन

२ उ. चित्रकला : श्री गणपती तसेच राजा रवि वर्मा

२ ऊ. शिल्पकला : विश्वकर्मा

२ ए. युद्धकला : परशुराम, द्रोणाचार्य, अर्जुन, पहिले बाजीराव पेशवे (जागतिक युद्धशास्त्रात यांचे युद्धविषयक डावपेच प्रमाण मानले जातात. ते युद्धकलेतील वैशिष्ट्यपूर्ण डावपेचांच्या आधारे स्वतःच्या कारकीर्दीत एकही लढाई हरले नाहीत.)

२ ऐ. शरीरसौष्ठव : बजरंग बली (हनुमान), बलराम, भीमसेन

 

३. हिंदु राष्ट्रात विविध क्षेत्रांत दिल्या जाणार्‍या पुरस्कारांची नावे

३ अ. राजकारण (उत्तम संसदपटू) : श्रीकृष्ण, आर्य चाणक्य

३ आ. अर्थ : कुबेर

३ इ. आरोग्य : धन्वंतरी, चरक, सुश्रुत, च्यवन

३ ई. पत्रकारिता : लोकमान्य टिळक

३ उ. विज्ञान

३ उ १. वनस्पतीशास्त्र : जीवक

३ उ २. रसायनशास्त्र : नागार्जुन

३ उ ३. परमाणूशास्त्र : आचार्य कणाद

३ उ ४. खगोलशास्त्र : वराहमिहीर

३ उ ५. वैज्ञानिक संशोधन : भारद्वाज ऋषी

३ ऊ. गणित : भास्कराचार्य, आर्यभट्ट, श्रृंगेरीपिठाचे जगद्गुरु भारती कृष्णतीर्थ (वैदिक गणिताचे जनक)

३ ए. इतिहास संशोधन : पु.ना. ओक

३ ऐ. विद्वान : महात्मा विदूर, धर्मराज युधिष्ठीर

३ ओ. अध्यापन : द्रोणाचार्य, आर्य चाणक्य, दादोजी कोंडदेव

३ औ. विद्यार्थी : आरुणी, कल्याण

३ अं. समाजसेवा : त्या त्या भागातील संत

३ क. क्रीडा : अर्जुन

डॉ. आठवले (मार्गशीर्ष शु. ११, कलियुग वर्ष ५११३ (६.१२.२०११)

 

४. हिंदु राष्ट्रात सर्व स्तरांवर ‘अध्यात्म’
हाच पाया असल्याने रस्त्यावरील फलकही साधनेच्या दृष्टीने पूरक असतील !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

‘महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील नागोठणे हे गाव सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे जन्मस्थान आहे. तेथे ज्या घरात त्यांचा जन्म झाला, त्या घराकडे जाणार्‍या रस्त्याला १२.५.२०२३ या दिवशी तेथील ग्रामपंचायतीकडून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे नाव देण्यात आले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले वर्ष २००८ मध्ये म्हणाले होते, ‘हिंदु राष्ट्रामध्ये रस्त्यावरचे फलक अध्यात्माशी संबंधितच असतील !’ रस्त्याला गुरुदेवांचे नाव दिल्याची बातमी वाचून मला त्यांचे ते उद्गार आठवले आणि वाटले, ‘त्यांच्या त्या वाक्याप्रमाणे व्हायला आता त्यांच्या नावापासूनच आरंभ झाला आहे !’

आपण बघतो की, रस्त्यांवर शासनाने विविध फलक लावलेले असतात, उदा. ‘अपघात टाळा !’, ‘अती घाई, संकटात नेई !’, ‘मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक !’, ‘धूम्रपान, मद्यपान म्हणजे आयुष्याची धूळधाण !’, ‘दारू पिऊन गाडी चालवणे, म्हणजे अपघाताला निमंत्रण !’ इत्यादी. असे असूनही अपघात व्हायचे ते होतातच !

याउलट हिंदु राष्ट्रात रस्त्यावरील फलक हे आध्यात्मिक स्तरावरील असतील. यामध्ये साधनेचे थोडक्यात महत्त्व फलकावर लिहिले जाईल. ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप करा !’, असे लिहिले जाईल. तसेच घाटरस्त्याला आरंभ होण्यापूर्वी असलेल्या फलकावर ‘येथे २ मिनिटे थांबून देवाला प्रार्थना आणि नामजप करा !’, असे लिहिले जाईल. ‘देव चारचाकीत बसला आहे आणि आपण त्याचा चालक आहोत’, असा भाव ठेवा’, असे लिहिले जाईल. यामुळे गाडीच्या चालकाला देवाच्या अनुसंधानात रहाता येईल. चालक देवाच्या अनुसंधानात राहिला, तर देवच त्याची काळजी घेईल आणि अपघात होण्याचे प्रमाण बरेच अल्प होईल. तसेच अपघात होण्याचे कारण ‘अनिष्ट शक्ती’ हेही असते. देवाच्या अनुसंधानात राहिले, तर अनिष्ट शक्तींचा त्रास होण्याचे प्रमाणही अल्प होईल. अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीतच हिंदु राष्ट्राचा पाया ‘साधना करणे’ हा असेल !’

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (१६.५.२०२३)

Leave a Comment