पती पू. (कै.) डॉ. नीलकंठ दीक्षित यांच्यासह व्रतस्थपणे आयुष्य जगलेल्या बेळगाव येथील श्रीमती विजया दीक्षितआजी सनातनच्या ११३ व्या व्यष्टी संतपदी विराजमान !

धर्माचरणाचे तेज ज्यांच्या मुखावरी विलसे । पू. दीक्षितआजी यांच्या रूपे सनातन संतमाला वर्धिष्णु होतसे ।

पू. (श्रीमती) विजया दीक्षितआजी यांचे औक्षण करून सन्मान करतांना श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

रामनाथी (गोवा) – भगवंत भावाचा भुकेला असतो ! भक्ताच्या भक्तीला प्रतिसाद देण्यासाठी तो आतुर असतो ! कधी व्रत-वैकल्यांच्या माध्यमातून, कधी स्वप्नदृष्टांताद्वारे, तर कधी अनुभूतींच्या माध्यमातून तो भक्तांना भगवंतभेटीची पुढची पुढची दिशा दाखवतो ! याची प्रचीती आज सनातनच्या साधकांनी घेतली. भगवंताची निरपेक्ष भक्ती करणार्‍या, पती पू. (कै.) डॉ. नीलकंठ दीक्षित यांच्यासह व्रतस्थपणे आयुष्य जगलेल्या आणि सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती उत्कट भाव असलेल्या बेळगाव येथील श्रीमती विजया दीक्षितआजी (वय ८९ वर्षे) सनातनच्या ११३ व्या व्यष्टी संतपदी विराजमान झाल्याची आनंददायी घोषणा एका भावसोहळ्यात करण्यात आली. कार्तिक शुक्ल पक्ष त्रयोदशी (१७.११.२०२१) या दिवशी असलेल्या त्यांच्या ८९ व्या वाढदिवसाच्या औचित्याने सनातनच्या श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी ही घोषणा केली. ही वार्ता ऐकून पू. (श्रीमती) विजया दीक्षितआजी यांचा भाव दाटून आला. रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात पार पडलेल्या या अनौपचारिक भावसोहळ्याला त्यांची कन्या सौ. अंजली कणगलेकर, जावई श्री. यशवंत कणगलेकर, नातू होमिओपॅथी वैद्य अंजेश कणगलेकर आणि श्री. सत्यकाम कणगलेकर हे सनातनच्या मार्गदर्शनाखाली पूर्णवेळ साधना करणारे कुटुंबीय, तसेच बेळगाव येथे घरी राहून साधना करणारा पू. (श्रीमती) विजया दीक्षित यांचा मुलगा श्री. जयंत, सून सौ. अनघा आणि नातू श्री. अनुज हे कुटुंबीय आणि सनातनचे काही साधक उपस्थित होते. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी पू. आजी यांना पुष्पहार घालून आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला, तसेच वाढदिवसानिमित्त त्यांचे औक्षणही केले.

 

श्रीमती दीक्षितआजींच्या भाव-भक्तीमय साधनाप्रवासाद्वारे उलगडले त्यांचे संतत्व !

पू. आजींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदाताई यांनी पू. दीक्षितआजी यांच्या साधनाप्रवासाविषयी जाणून घेतले. आजींचे साधनेतील विलक्षण अनुभव ऐकल्यानंतर श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आजींविषयी लिहिलेला संदेश सर्वांना वाचून दाखवला. या संदेशाद्वारेच ‘पू. आजी संतपदी विराजमान झाल्या आहेत’, हे घोषित करण्यात आले.

 

मी केवळ परात्पर गुरुदेवांनी सांगितलेले
साधनेचे प्रयत्न केले ! – पू. (श्रीमती) दीक्षितआजी

साधनेत या टप्प्यापर्यंत पोचण्यात माझे काहीच प्रयत्न नाहीत. १८ वर्षांपूर्वी प.पू. गुरुदेव माझ्या मुलीच्या (सौ. अंजली कणगलेकर यांच्या) बेळगाव येथील घरी आले होते, तेव्हा त्यांनी मला जे सांगितले, तेच साधनेचे प्रयत्न मी आतापर्यंत करत आले आहे. ‘आमच्या सर्व कुटुंबियांवर परात्पर गुरुदेवांची कृपा व्हावी’, अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते.

(हे मनोगत व्यक्त करतांना पू. आजींचा भाव पुष्कळ जागृत झाला. त्यामुळे त्यांना पुढे बोलता आले नाही.)

 

धर्माचरणी आणि निरपेक्ष वृत्ती असलेल्या
अन् पती पू. (कै.) डॉ. नीलकंठ दीक्षित यांना गुरुस्थानी मानून त्यांची
भावपूर्ण सेवा करणार्‍या बेळगाव येथील पू. (श्रीमती) विजया दीक्षित (वय ८९ वर्षे) !

परात्पर गुरु डॉ. आठवले

बेळगाव येथील संत पू. (कै.) डॉ. नीलकंठ दीक्षित यांच्या सहधर्मचारिणी आणि रामनाथी आश्रमातील साधिका सौ. अंजली कणगलेकर यांच्या मातोश्री श्रीमती विजया दीक्षित (वय ८९ वर्षे) पहिल्यापासूनच धर्माचरणी आहेत. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी त्यांचे पती पू. (कै.) डॉ. नीलकंठ दीक्षित यांनाच गुरुस्थानी मानले आणि त्यांच्या शिष्या बनून आध्यात्मिक वाटचाल केली.

पू. दीक्षितआजोबांनी वर्ष २०१९ मध्ये देहत्याग केला. त्यापूर्वी ८ वर्षे ते रुग्णाईत असतांना आजींनी त्यांची भावपूर्ण सेवा केली.

वर्ष २०१९ मध्ये पू. दीक्षितआजोबा यांनी संतपद प्राप्त केले आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून अवघ्या अडीच वर्षांतच दीक्षित आजींनीही ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून संतपद प्राप्त केले आहे. परेच्छेने वागणे, निरपेक्ष वृत्ती, ईश्वराप्रती अनन्य भाव आदी गुणांमुळे त्यांनी जलद गतीने आध्यात्मिक प्रगती केली असून त्या व्यष्टी संत म्हणून सनातनच्या ११३ व्या संतपदावर विराजमान झाल्या आहेत.

पू. (कै.) डॉ. नीलकंठ दीक्षित आणि पू. (श्रीमती) विजया दीक्षित या संतदांपत्याने केलेल्या संस्कारांमुळे त्यांचे सर्वच कुटुंब साधनेत प्रगती करत आहे. त्यांची मुलगी सौ. अंजली कणगलेकर, जावई श्री. यशवंत कणगलेकर, तसेच नातू श्री. अंजेश आणि श्री. सत्यकाम हे सर्वजण तळमळीने साधना करत आहेत. पू. दीक्षितआजींचे दीर कै. शिवराम दीक्षित आणि त्यांच्या जाऊबाई श्रीमती शैलजा शिवराम दीक्षित (वय ८१ वर्षे) हेही जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाले आहेत.

विवाहातील सप्तपदीचा अर्थ ‘सप्तलोकांतील प्रवास जोडीने करणे’, असा आहे. पू. (कै.) डॉ. नीलकंठ दीक्षित आणि पू. (श्रीमती) विजया दीक्षित हे उभयता सप्तलोकांतील प्रवास एकत्रच करत असून ‘खरे व्यावहारिक आणि आध्यात्मिक सहजीवन कसे असावे ?’, याचा त्यांनी सर्व साधकांसमोर आदर्श ठेवला आहे.

‘पू. विजया दीक्षितआजी यांची पुढील प्रगती अशीच जलद गतीने होईल’, याची मला खात्री आहे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

 

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना
पू. (श्रीमती) दीक्षितआजी यांच्या सहवासात आलेल्या
वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती आणि पू. आजींच्या देहात झालेले वैशिष्ट्यपूर्ण पालट

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

१. पू. आजींना लांबून पाहिल्यावरही ‘त्यांच्याभोवती तेजाचे वलय दिसणे’, ‘मन निर्विचार होऊन ध्यान लागणे’ आदी अनुभूती येणे

यंदा दीपावलीच्या कालावधीत पू. आजी रामनाथी आश्रमात आल्या. मी अन्य सेवेसाठी जात असतांना मला त्या दूरूनच दिसल्या. तेव्हा त्यांच्या मुखाभोवती तेजाचे वलय आणि प्रकाश जाणवला. आजींचे तेज वातावरणात प्रक्षेपित होत होते. त्यांना दूरूनच पहात असूनही माझे मन निर्विचार होऊन ध्यान लागले.

२. पू. आजींशी बोलतांना ‘स्वतः काही न बोलता त्यांचे बोलणे ऐकत रहावे’, असे वाटणे

आताही पू. आजींच्या मुखावर गुलाबी छटा दिसते. त्यांची त्वचा लोण्यासारखी मऊ आहे. त्यांच्या सहवासात मन निर्विचार झाले. हा सोहळा चालू असतांनाही ‘स्वतः काही न बोलता पू. आजींचे बोलणे ऐकत रहावे’, असे वाटत आहे.

पू. आजींच्या देहातील हे वैशिष्ट्यपूर्ण पालट आणि त्यांच्या सहवासात येणार्‍या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती त्यांच्या संतत्वाची प्रचीती देतात. त्यामुळेच दीपावलीच्या कालावधीत आजी आल्यानंतर त्यांना पाहूनच आश्रमातील अनेक साधकांना ‘आजी संत झाल्या आहेत’, हे जाणवले होते.

 

पू. दीक्षितआजींच्या ठिकाणी पिवळा प्रकाश
जाणवतो ! – पू. तनुजा ठाकूर, संस्थापक, वैदिक उपासनापीठ

पू. तनुजा ठाकूर

पू. तनुजा ठाकूरपू. तनुजा ठाकूरमी पू. दीक्षितआजींना प्रथम पाहिल्यावरच त्यांची प्रभावळ चांगली असल्याचे जाणवले. ‘आजींना संत घोषित करण्यासाठीच परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांना आश्रमात बोलावले आहे’, असे मला वाटले. पू. आजींकडे पाहून आनंद जाणवतो. आता त्यांचे स्थूल अस्तित्व जाणवत नाही, त्यांच्या ठिकाणी पिवळा प्रकाश दिसत आहे. ‘पू. आजी इतरांहून वेगळ्या आहेत’, हे सामान्य व्यक्तीच्याही लक्षात येते, इतक्या त्या तेजस्वी आहेत.

 

पू. (श्रीमती) विजया दीक्षित यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केलेले मनोगत !

मला कळू लागले, तेव्हापासूनच आई विविध माध्यमांतून ईश्वराची
भक्ती करत आहे ! – सौ. अंजली कणगलेकर (पू. विजया दीक्षित यांची कन्या)

सौ. अंजली कणगलेकर

जेव्हापासून मला कळू लागले, तेव्हापासून आई व्रते, पूजा, मंदिरात प्रदक्षिणा घालणे अशा माध्यमांतून ईश्वराची भक्ती करत आहे. ‘माझ्या जीवनात गुरु यावेत आणि साधनेत पुढे जावे’, अशी आईला पुष्कळ तळमळ लागली होती. आमच्या घरी अनेक संत यायचे. आई त्यांची सेवा पुष्कळ मनापासून करत असे. ‘जणू तिच्यामध्ये संतसेवेची ओढ आतूनच आहे’, असे जाणवायचे. पूर्वी आई १०० माळा नामजप करत असे. आजही पू. आई म्हणते, ‘‘माझा नामजप अजून व्हायला हवा.’’ यातून तिची तळमळ लक्षात येते.पू. आईने आमच्यावर संस्कार करतांना कधीही कोणतीही कृती करण्यासाठी तिने दबाव आणला नाही. तिचे बोलच इतके शांत, मधुर आणि अंतर्मनात जाणारे असत की, ‘चांगल्या गोष्टी कराव्यात’, असा संस्कार आमच्यावर आपोआप झाला.

पू. विजया दीक्षितआजी या सर्व नाती आदर्शरित्या निभावणार्‍या
आहेत !– श्री. यशवंत कणगलेकर (पू. (श्रीमती) दीक्षितआजी यांचे जावई)

श्री. यशवंत कणगलेकर

पू. दीक्षितआजी एक ‘आदर्श गृहिणी’ आहेत. घरी आलेल्या अतिथींची सेवा करतांना ‘कुणाला काय आवडते’, हे लक्षात ठेवून त्या आदरातिथ्य करत असत. पतीची मनापासून सेवा करणार्‍या त्या ‘आदर्श पत्नी’ आहेत. अशी पतिव्रता मी आतापर्यंत पाहिली नाही. मुलांवर चांगले संस्कार करणार्‍या त्या ‘आदर्श माता’ आहेत. त्या ‘आदर्श आजी’ आहेत. माझ्या मुलांवर जे संस्कार मीही करू शकलो नाही, ते चांगले संस्कार त्यांनी केले. त्या ‘आदर्श सासू’ आहेत. त्यांनी सुनांना मुलीप्रमाणे प्रेम दिले आहे.

आईमुळे लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले ! – श्री. जयंत दीक्षित (पू. (श्रीमती) विजया दीक्षित यांचा मुलगा)

श्री. जयंत दीक्षित

आज आईच्या वाढदिवसाच्या दिवशी जी आध्यात्मिक भेट मिळाली, तिचा आनंद अविस्मरणीय आहे. आम्ही लहान असतांना आई व्रत म्हणून देवाला बेलपत्रे, फुले आदी १ लक्ष अशा संख्येने वाहात असे. ती फुले, बेलपत्रे आदी गोळा करून आणण्याची सेवा माझी असायची. आईमुळे असे धार्मिक संस्कार माझ्यावर लहानपणापासून झाले. आई आजपर्यंत सर्वांची सेवा करत आली आहे, तशीच तिची सेवा करण्याचा आम्ही प्रयत्न करू.

परात्पर गुरुदेवांनी पू. आईंच्या वाढदिवसानिमित्त अमूल्य
भेट दिली आहे ! – सौ. अनघा जयंत दीक्षित (पू. (श्रीमती) विजया दीक्षित यांची सून)

सौ. अनघा दीक्षित

पू. आईंच्या वाढदिवसाच्या दिवशी परात्पर गुरुदेवांनी अत्यंत अमूल्य भेट दिली. आम्ही आतापर्यंत त्यांना वाढदिवसाच्या दिवशी अनेक भेटवस्तू दिल्या आहेत; पण ही भेट अमूल्य आहे. परात्पर गुरुदेवांनी मला संतसेवेची संधी पुन्हा एकदा दिली आहे.

(या वेळी सौ. अनघा दीक्षित यांनी पू. आजींविषयी काव्य भावपूर्णरित्या वाचून दाखवले.)

संत आजी-आजोबा लाभणे, हे माझे सौभाग्य ! – श्री. अनुज जयंत दीक्षित (पू. आजींच्या मुलाचा मुलगा)

श्री. अनुज दीक्षित

आजोबा आणि आजी दोघेही संत आहेत, हे माझे सौभाग्य आहे. पू. आजीचे प्रेम सर्वांना  मिळत राहो !

आजीच्या संतपदाचे शुभसंकेत जाणवत होते ! – होमिओपॅथी वैद्य अंजेश कणगलेकर (पू. आजींचा नातू)

होमिओपॅथी वैद्य अंजेश कणगलेकर

काही वर्षांपूर्वी परात्पर डॉ. आठवले पू. आजींना म्हणाले होते, ‘आता संत व्हायचे आहे ना !’

त्यानंतर काही वर्षांतच आता आजी संतपदी विराजमान झाल्या आहेत. पू. आजींना आश्रमात घेऊन येतांना काही अडथळे आले, तसेच अनेक शुभसंकेतही मिळाले. ‘ते सर्व आजींच्या संतपदाचे संकेत होते’, हे आता लक्षात आले.

लहानपणीपासूनच पू. आजींनी व्यापकत्वाची शिकवण दिली ! – श्री. सत्यकाम कणगलेकर (पू. आजींचा नातू)

श्री. सत्यकाम कणगलेकर

लहानपणी भावासमवेत वाद झाल्यावर मी रडत रडत आजीजवळ गेलो. तेव्हा आजी म्हणाल्या, ‘तो (भाऊ) दुसरा कुणी नाही, तो आपला आहे.’ जेव्हा गुरुदेवांनी मला साधनेविषयी मार्गदर्शन केले, तेव्हा त्यांनीही ‘आपल्याला ‘मी’तून ‘आम्ही मध्ये जायचे आहे. (व्यापक व्हायचे आहे.)’, असे मार्गदर्शन केले. आजींना मला लहानपणी जो व्यापक दृष्टीकोन दिला, तीच शिकवण गुरुदेवांनीही मला दिली. लहानपणीपू. आजीच्या माध्यमातून गुरुवाणीनेच मला मार्गदर्शन केले.

(पू. दीक्षितआजी यांचा साधनाप्रवास आणि त्यांची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत. – संपादक दैनिक सनातन प्रभात)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या/संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक दैनिक सनातन प्रभात
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment