बेंगळुरू – येथील ‘सी बर्ड ट्रान्सपोर्ट’च्या कार्यालयात सनातन संस्थेच्या वतीने ‘तणावमुक्त जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर १४.११.२०२१ या दिवशी शिबिर घेण्यात आले. हिंदु जनजागृती समितीचे राज्य प्रवक्ते श्री. मोहन गौडा, सनातन संस्थेच्या सौ. शारदा योगिश, श्री. नवीन गौडा आणि ‘सी बर्ड’चे मालक श्री. नागराजैय्या आणि सौ. रूपा हे उपस्थित होते. आस्थापनाच्या ३० कर्मचार्यांनी या शिबिराचा लाभ घेतला.
खरा आनंद भगवंताच्या नामजपात आहे ! – सौ. शारदा योगिश, सनातन संस्था
सौ. शारदा सर्वांना मार्गदर्शन करतांना म्हणाल्या, ‘‘मनुष्य आनंद मिळवण्यासाठी जन्माला येतो; परंतु मायेच्या विविध आकर्षणात अडकल्यामुळे, तसेच प्रापंचिक जीवनात आकंठ बुडून गेल्यामुळे जन्माला येण्याचा उद्देश विसरून जातो. क्षणिक सुख मिळवण्यासाठी पराकाष्ठेचे प्रयत्न करतो; परंतु त्यात खर्या आनंदापासून वंचित रहातो. खरा आनंद भगवंताच्या नामजपात आहे. त्यासाठी आपण आध्यात्मिक आणि लौकिक प्रगतीसाठी स्वतःच्या कुलदेवतेचा नामजप करावा. स्वतःचे कार्य प्रामाणिकपणे केले, तर भगवंताची कृपा प्राप्त होऊन व्यावहारिक आणि कौटुंबिक जीवनात यश मिळते.’’
श्री. नागराजैय्या यांनी ‘सीबर्ड’च्या वाटचालीविषयी कर्मचार्यांना सविस्तर माहिती दिली. ‘आम्ही अत्यंत कठीण परिस्थितीत ‘सीबर्ड’ नावाचे वाहतूक आस्थापन स्थापन केले होते. आज आस्थापनाची उलाढाल कोट्यवधी रुपयांत आहे. कठीण परिस्थितीत यश मिळण्यासाठी आपण सर्वांनी मिळून एक मनाने भगवंताचा नामजप करण्याचा प्रयत्न करूया’, असे आवाहन श्री. नागराजैय्या यांनी केले.