अनुक्रमणिका
- १. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी २५ वर्षांपूर्वी शिकवलेली सूत्रे
- २. आधी केले, मग सांगितले, ही उक्ती सार्थ करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
- ३. अनेक संतांच्या चरित्रावरून आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनातून शिकायला मिळालेली सूत्रे
- ४. प.पू. भक्तराज महाराज यांचे चरित्र वाचतांना आणि त्यांच्या सहवासात असतांना आलेले अनुभव
- ५. इतर ग्रंथांचे वाचन करण्यापेक्षा संत चरित्रात अधिक सत्य, चैतन्य आणि आनंद मिळणे
- ६. संतांचे चैतन्यमय वाङ्मय वाचून साधना आणि बुद्धी यांनी समजून घेणे अन् त्यानुसार वाचकाने कृती करावी, यासाठी संतांनी ग्रंथ लिहिले असणे
- ७. सर्वसाधारण व्यक्तीचे व्यक्तीमत्त्व संतमहात्म्यांच्या व्यक्तीमत्त्वासारखे कणखर व्हावे, यासाठी अभ्यात्मशास्त्राचे अभ्यासवर्ग चालू करण्यात येणे आणि ही हिंदु राष्ट्र निर्माण होण्याच्या दृष्टीने पहिली पायरी असणे
- ८. परात्पर गुरु डॉक्टरांनी परात्पर गुरु पांडे महाराज यांचे मार्गदर्शन संकलित करण्याचे, तसेच पू. गडकरीकाका आणि सद्गरु राजेंद्र शिंदे यांच्या साधना प्रवासाचे टंकलेखन करण्याचे दायित्व दिल्याने मनन-चिंतन होऊन मनावर संस्कार होणे
- ९. परात्पर गुरु डॉक्टर यांचे चरित्र
- १०. ग्रंथ पाहून भावजागृती होणे
- ११. सच्चिदानंद अवस्थेकडे घेऊन जाणारे संतांचे वाङ्मय !
- १२. संतांच्या वाङ्मयाने आमूलाग्र पालट होऊन चरित्र घडत असणे
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी २५ वर्षांपूर्वी शिकवलेली सूत्रे
अ. ‘ज्याचा अभ्यास केल्याने स्वतःमध्ये चांगले संस्कार आणि पालट होतात, ते खरे शिक्षण असते.
आ. ज्या ग्रंथाच्या परिशीलनाने, म्हणजे अभ्यासाने आपले चरित्र घडते, ते संत-चरित्र असते.
इ. ज्या पुस्तकाच्या अभ्यासाने अज्ञान ग्रंथीचा नाश होतो, त्याला ‘ग्रंथ’ म्हणतात.
२. आधी केले, मग सांगितले, ही उक्ती सार्थ करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वरील सूत्रे स्वतः आचरणात आणली. त्यासाठी त्यांनी प्रथम ‘अध्यात्मशास्त्र’ हा चक्रमुद्रांकित (सायक्लोस्टाईल पाने असलेला) ग्रंथ संकलित केला. मुंबईचे संत मलंगशहा बाबा यांचे चरित्र लिहिले. त्यानंतर प.पू. भक्तराज महाराज यांचे चरित्र लिहिले. असे करत असतांना त्यांनी कलियुगातील पंचम वेद, म्हणजे सनातन संस्थेच्या वतीने मानवाच्या कल्याणासाठी शेकडो ग्रंथांची ज्ञानगंगा आणली. संतांच्या चरित्राचा अभ्यास होण्यासाठी त्यांचा साधनाप्रवास, वैशिष्ट्ये, अनुभूती, समष्टी कार्य इत्यादी सनातन संस्थेने प्रकाशित केलेले ग्रंथ, दैनिक ‘सनातन प्रभात’, संकेतस्थळ यांवरून प्रकाशित केले जात आहेत. परात्पर गुरु डॉक्टरांचा संकल्प आणि कृपा यांमुळे मला याचा प्रत्यय येत आहे.
३. अनेक संतांच्या चरित्रावरून आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनातून शिकायला मिळालेली सूत्रे
मुंबईचे संत मलंगशहा बाबा यांच्याकडे आम्ही परात्पर गुरु डॉक्टरांच्या अभ्यासवर्गातील काहीजण शिकण्यासाठी जात होतो. त्यांच्या चरित्रावरून ‘मला संत कोणती साधना करतात ? आध्यात्मिक उपाय कोणते करतात ? त्यांचा अधिकार काय असतो ? चांगल्या आणि वाईट शक्ती म्हणजे काय ?’, इत्यादींविषयी शिकता आले. तेव्हा जे ग्रंथात लिहिले होते, ते अनुभवता आले.
४. प.पू. भक्तराज महाराज यांचे चरित्र वाचतांना आणि त्यांच्या सहवासात असतांना आलेले अनुभव
वर्ष १९९२ ते १९९५ मध्ये प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) मुंबईला येत असत किंवा भंडार्याच्या निमित्ताने आम्ही त्यांच्याकडे गेल्यावर ते आध्यात्मिक स्तरावर बोलत असत. तेव्हा त्यांच्याकडून शिकायला मिळत असे. तसेच ‘त्यांचे भक्त श्री. प्रभात कुमार, श्री. अंजनी कुमार हे प.पू. बाबांच्या समवेत असतांना मला काय शिकायला मिळाले ?’, हे मी परात्पर गुरु डॉक्टरांना लिहून देत असे. परात्पर गुरु डॉक्टरांनी लिहिलेल्या ‘संत भक्तराज महाराज यांचे चरित्र’ आणि ‘संत भक्तराज महाराज यांची शिकवण’ हे ग्रंथ वाचल्यावर मला पुष्कळ शिकायला मिळून अनुभूती आल्या.
५. इतर ग्रंथांचे वाचन करण्यापेक्षा संत चरित्रात अधिक सत्य, चैतन्य आणि आनंद मिळणे
परात्पर गुरु डॉक्टर यांच्या कृपेने मला नारायणगावचे संत प.पू. काणे महाराज यांचा सत्संग लाभला. त्यांनी जे अध्यात्म आणि साधना याविषयी शिकवले, ते परात्पर गुरु डॉक्टरांनी ग्रंथामध्ये लिहून ठेवले आहे. प.पू. काणे महाराज यांनी मला गीता प्रेसचे विश्वस्त पू. हनुमान प्रसाद पोद्दार यांचे चरित्र वाचण्यास दिले. तसेच ‘श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज – चरित्र आणि वाङ्मय’ हा ग्रंथ वाचण्यास सांगितले. हे ग्रंथ वाचल्यावर ‘संतांची चैतन्यमय चरित्रे का वाचावी ?’, हे लक्षात आले. इतर वाचनापेक्षा संत चरित्रात अधिक सत्य, चैतन्य आणि आनंद मिळतो, हे शिकायला मिळाले.
६. संतांचे चैतन्यमय वाङ्मय वाचून साधना आणि बुद्धी यांनी समजून
घेणे अन् त्यानुसार वाचकाने कृती करावी, यासाठी संतांनी ग्रंथ लिहिले असणे
परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितले आहे, ‘अध्यात्म हे कृतीचे शास्त्र आहे. यात बुद्धीने समजून घेण्याला २ टक्के, तर साधना म्हणून प्रत्यक्ष कृती करण्याला ९८ टक्के महत्त्व आहे.’ ज्ञानाला २ टक्के महत्त्व असले, तरी योग्य आणि अयोग्य काय हे समजून घेऊन कृती केल्यास ९८ टक्के फलनिष्पत्तीचा लाभ मिळण्यास साहाय्य होते. कृतीमागील विचार आणि हेतू यांना महत्त्व असते. त्यासाठी ‘संतांच्या चैतन्यमय वाङ्मयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे’, असे वाटते; म्हणून परात्पर गुरु डॉक्टरांनी मानवाच्या कल्याणासाठी ग्रंथांची निर्मिती केली आहे.
७. सर्वसाधारण व्यक्तीचे व्यक्तीमत्त्व
संतमहात्म्यांच्या व्यक्तीमत्त्वासारखे कणखर व्हावे,
यासाठी अभ्यात्मशास्त्राचे अभ्यासवर्ग चालू करण्यात येणे
आणि ही हिंदु राष्ट्र निर्माण होण्याच्या दृष्टीने पहिली पायरी असणे
परात्पर गुरु डॉक्टर यांनी वर्ष १९८७ मध्ये लिहिलेल्या पहिल्या ‘अध्यात्मशात्र’ या ग्रंथाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे, ‘मनोविकारावर मात करता यावी; म्हणून ‘भारतीय वैद्यकीय संमोहन आणि संशोधन संस्थे’च्या वतीने स्वसंमोहन उपचारशास्त्राचे अभ्यासवर्ग गेली ४ वर्षे घेतले जात आहेत. अशा अभ्यासवर्गात केवळ ‘कमकुवत व्यक्तीमत्त्वाच्या व्यक्तीचे व्यक्तीमत्त्व सर्वसाधारण व्यक्तीच्या व्यक्तीमत्त्वाएवढे कसे करायचे ?’, याचे शिक्षण दिले जाते. मात्र ‘सर्वसाधारण व्यक्तीचे व्यक्तीमत्त्व संतमहात्म्यांच्या व्यक्तीमत्त्वासारखे कणखर केले, तर एकंदर समाजाच्या मनःस्वास्थ्याच्या दृष्टीने ती गोष्ट आणखी योग्य होईल’, असे वाटल्यामुळे संस्थेच्या वतीने अध्यात्मशास्त्राचे अभ्यासवर्ग चालू करण्यात आले.’
यावरून संत हे समाजातील आदर्श आणि कणखर व्यक्तीमत्त्व असणार्या व्यक्ती आहेत. सर्वांचेच असे व्यक्तीमत्त्व असेल, तर ते रामराज्य, ईश्वरी राज्य किंवा हिंदु राष्ट्र निर्माण होते. हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्या वर्ष १९८७ मध्ये लिहिलेल्या ‘अध्यात्मशास्त्र’ या ग्रंथात लिहिले आहे. त्यांनी केवळ सांगितले आणि लिहिले नाही, तर त्यानुसार करून दाखवले आहे.
त्यानुसार त्यांनी संतलिखाण, संत-चरित्र इत्यादी काळानुसार चैतन्यमय ग्रंथाची निर्मिती करून पंचम वेदाची ज्ञानगंगा अवतरवली. या ग्रंथाच्या अभ्यासामुळे मला अध्यात्मशास्त्राची गोडी लागली आणि त्यामुळेच पुढे परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने साधना करू शकलो.
८. परात्पर गुरु डॉक्टरांनी परात्पर गुरु पांडे महाराज यांचे
मार्गदर्शन संकलित करण्याचे, तसेच पू. गडकरीकाका आणि सद्गरु राजेंद्र शिंदे
यांच्या साधना प्रवासाचे टंकलेखन करण्याचे दायित्व दिल्याने मनन-चिंतन होऊन मनावर संस्कार होणे
परात्पर गुरु पांडे महाराज यांचे मार्गदर्शन संकलित करतांना आणि त्यांचे हस्तलिखित चरित्र वाचल्यावर मला अध्यात्म अन् साधना यांविषयी शिकायला मिळाले. ‘पू. गडकरीकाका आणि सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचा साधना प्रवास’ या लिखाणाच्या टंकलेखनाची सेवा करतांना मनन आणि चिंतन झाल्यामुळे मनावर संस्कार झाले. त्यामुळे ‘मलाही विचार करतांना आणि कृती करतांना दृष्टीकोन कसा असावा ?’, हे लक्षात आले. ही परात्पर गुरु डॉक्टरांची माझ्यावर असलेली फार मोठी कृपा आहे. यासाठी मी सर्व संत, सद्गुरु आणि परात्पर गुरु यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.
९. परात्पर गुरु डॉक्टर यांचे चरित्र
परात्पर गुरु डॉक्टरांचे चरित्र त्यांचे ज्येष्ठ बंधू सद्गुरु डॉ. वसंत आठवले यांनी त्यांच्या देहत्यागापूर्वी लिहिले. ‘संतांचे चरित्र लिहिणाराही आध्यात्मिक अधिकारी पाहिजे’, हे या ग्रंथाचा अभ्यास केल्यावर लक्षात येते. त्यामुळे परात्पर गुरु डॉक्टरांचे माहात्म्य समाजापुढे येण्यास साहाय्य झाले.
१०. ग्रंथ पाहून भावजागृती होणे
आता ‘परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्रमय जीवन दर्शन’ या ग्रंथांचे प्रकाशन होत आहे. हा ग्रंथ बहिणीला भेट दिल्यावर तिची भावजागृती झाली. तिला लिहिता वाचता येत नाही, तरीही तिला त्यातील चित्रे पाहून चैतन्याचा आनंद उपभोगता आला.
११. सच्चिदानंद अवस्थेकडे घेऊन जाणारे संतांचे वाङ्मय !
वर्ष १९९१ मध्ये परात्पर गुरु डॉक्टरांनी अभ्यासवर्गात सूक्ष्मातील प्रयोग केला होता. एका पिशवीत त्यांचा ‘अध्यात्मशास्त्र’ ग्रंथ होता, तर दुसर्या पिशवीत प्रसिद्ध कादंबरी होती. ‘त्याकडे पाहून काय वाटते ?’ ते वर्गातील साधकांना विचारल्यावर बहुतेक साधकांना ‘अध्यात्मशास्त्र’ ग्रंथ ठेवलेल्या पिशवीकडे पाहिल्यावर चांगले वाटले. यावरून संतांचे वाङ्मय सच्चिदानंद अवस्थेकडे घेऊन जाणारे साधन आहे. ते स्थुलासह सूक्ष्मातून कार्य करते, हे शिकायला मिळाले.
१२. संतांच्या वाङ्मयाने आमूलाग्र पालट होऊन चरित्र घडत असणे
सध्या समाजाचा ग्रंथ वाचनाकडे कल नाही. त्यातूनही अध्यात्म आणि संत वाङ्मय वाचणारे अल्प आहेत. मात्र ‘प्रवाहाच्या विरुद्ध पोहणे’, हीच साधना आहे. यामुळे संतांचे वाङ्मय आणि संतांच्या चरित्राचा ग्रंथ साधकाने जवळ ठेवला, घरी ठेवला, डोक्याखाली घेऊन झोपला किंवा त्याचा थोडासा अभ्यास करून त्यानुसार लगेच कृती केली, तर त्याच्यातील चैतन्याने साधकामध्ये आमूलाग्र पालट होऊन त्याचेही चरित्र घडते, असे मला गुरुकृपेने प्रत्यक्ष अनुभवायला आले. त्यासाठी मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१४.५.२०१९)