पोर्तुगिजांना सळो कि पळो करून सोडणारे छत्रपती संभाजी महाराज !

१. छत्रपतींच्या गडांमधील मर्द असा फोंडा येथील ‘मर्दनगड’ !

‘फोंड्याचा गड पोर्तुगीज-मराठा सरहद्दीवर होता. गोव्यातील पोर्तुगीज सत्तेला शह देण्यासाठी, ती सत्ता आमूलाग्र उपटून टाकण्यासाठी तिला वेढा देण्याचा जो प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराजांनी केला, त्यातील फोंड्याचा गड हा एक महत्त्वाचा दुवा होता. त्याचे नाव ‘मर्दनगड’ होते. त्याच्या भिंती २५ विती रुंद होत्या. भोवताली बुरूज होते. कोटाभोवती खंदक होता. खंदकात पाणीही होते. तसेच बाहेरच्या बाजूस भक्कम तटबंदी होती. अशा तर्‍हेने तो मर्दनगड नावाला साजेशा गडांमधील मर्द होता.

 

२. छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्या सैन्याने पोर्तुगिजांना ‘सळो कि पळो’ करणे !

पोर्तुगिजांनी मर्दनगडाच्या तटावर तोफांचा भडिमार चालू ठेवला. तटाला आणखी एक खिंडार पडले. ९ नोव्हेंबरला खिंडीतून आत शिरण्याचा पोर्तुगिजांनी बेत केला. संभाजी महाराज त्या वेळी राजापुरात होते. त्यांचे लक्ष या लढाईकडे लागले होेते. ‘फोंड्याच्या आघाडीवर आपण स्वतः हजेरी लावायची’, असे महाराजांनी ठरवले. ते घाईघाईने फोंड्यास पोचले. त्यांची जिद्द आणि ईर्षा एवढी दुर्दम्य होती की, त्यांनी ८०० स्वारांच्या संरक्षणाखाली ६०० पायदळ सैनिक किल्ल्यात सुखरूप पोचते केले. त्यांचे ते धारिष्ट्य आणि ती बेदरकार वृत्ती पोर्तुगीज पहात राहिले. त्यांच्यावर आक्रमण करण्याचे भानही त्यांना राहिले नाही. संभाजी महाराज युद्धात उतरलेले पहाताच व्हॉईसरॉयने हे युद्ध आपणाला महाग पडणार, याची खूणगाठ मनाशी बांधली.

महाराजांची उपस्थिती पाहून मराठ्यांना चेव आला. किल्लेदार येसाजी कंक हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळचा योद्धा. आता तो वृद्ध झाला होता; पण तरुणाला हटवण्याचे शौर्य, धैर्य आणि काटकपणा त्याच्या ठायी होता. त्या वृद्ध युवाने पराक्रमाची शर्थ केली. त्याने आणि त्याचा मुलगा कृष्णाजी याने निवडक सैनिक बरोबर घेऊन गडाबाहेर जाऊन पोर्तुगिजांशी लढा दिला. ज्यांच्याशी ते लढले, त्यांचा त्यांनी पूर्ण पराभव केला; पण त्या हातघाईच्या लढाईत येसाजी आणि त्यांचा पुत्र कृष्णाजी जबर घायाळ झाले. लढाईचा रंग पालटलेला पाहून माघार घेण्याचे व्हॉईसरॉयने ठरवले. १० नोव्हेंबरला पोर्तुगिजांनी माघार घेण्यास प्रारंभ केला. मराठ्यांनी त्यांच्यावर छापे घातले आणि त्यांना सळो कि पळो केेले. तोफा, बंदुका मागे टाकून त्यांना पळावे लागले. भाताची ३०० पोती आणि २०० गाढवांवर मावेल एवढे सामान त्यांनी मागे ठेवले.

 

३. शूर मराठ्यांची युद्धनीती !

११ नोव्हेंबरला पोर्तुगीज दुर्भाटला पोचले. नदी ओलांडताच ते आपल्या राज्यात, गोवा बेटात पोचणार होते; पण दुर्भाटच्या परिसरात त्यांना एक टेकडी पार करायची होती. त्या टेकडीवर मराठे सैनिक होते. त्यांच्यावर आक्रमण करून टेकडी ताब्यात घेतल्याखेरीज पोर्तुगिजांना सुरक्षितपणे नदी गाठता येणे शक्य नव्हते. त्यांनी मराठा सैनिकांवर आक्रमण केले. फिरंगी टेकडी चढतांच मराठा सैनिक पळू लागले. मराठ्यांची ती युद्धकला फिरंग्यांच्या परिचयाची नव्हती. ते पळणार्‍या मराठ्यांचा ईर्षेने पाठलाग करू लागले. मराठ्यांच्या पळण्यात शिस्त होती, चातुर्य होते. फिरंग्यांच्या नजरेत त्या गोष्टी लक्षात आल्या नाहीत. व्हॉईसरॉयने मागे राहिलेले सैन्यही जनरल दो रुद्रीग द कॉश याच्या ताब्यात दिले आणि त्याला मराठ्यांचा पाठलाग करायला पाठवले. त्याच्या साहाय्याला घोडदळही पाठवले आणि मग पळणार्‍या मराठा सैनिकांनी उचल खाल्ली. पाठलाग करणारे फिरंगी पांगले होते; पण मागे वळलेले मराठे शिस्तीने आणि एकजुटीने आता तुटून पडले होते. लढाईची ही अनपेक्षित कलाटणी पाहून फिरंगी गर्भगळीत झाले. मराठ्यांनी त्या दिवशी शौर्याचा कहर केला. फिरंग्यांना त्यांनी गारद केले, पायदळी तुडवले. मराठ्यांकडे पायदळ होते. फिरंग्यांच्या घोडदळाशी त्या पायदळाने शौर्याने झुंज दिली. पाठीला ढाली बांधून घोड्याजवळ वाकून ते घोड्यावर वार करत होते. घोड्यावरील स्वार खाली कोसळताच त्याला कंठस्नान घालत होते. पोर्तुगीज व्हॉईसरॉय कोंदि द आल्व्होर मराठ्यांच्या दृष्टीस पडले. त्याला भाल्याने टोचून ठार मारायला काही मराठे धावले; पण ते बचावले. पोर्तुगीज सैनिकांनी आणि अधिकार्‍यांनी जिवाच्या आकांताने धूम ठोकली. काहींंनी पोहून नदी पार केली. या युद्धात पोर्तुगीज पायदळ पूर्णपणे गारद झाले होते. त्यातील क्वचितच कुणी बचावला असेल.

 

४. अखेर फितुरी नडली !

त्या वेळी फोंड्याच्या परिसरातील ५० मुसलमान फिरंग्यांच्या साहाय्याला धावले. त्यांनी साहाय्य केले नसते, तर एकही पोर्तुगीज जिवानिशी निसटला नसता. संभाजी महाराज आणि पोर्तुगीज यांच्यामधील युद्धात गोव्यातील अन् जवळपासचे देसाई पोर्तुगिजांच्या बाजूने उभे ठाकले. फोंड्याचा दुलबा नाईक देसाई ऐन लढाईच्या प्रसंगी पोर्तुगिजांस वश झाला. पेडण्याचा केशव प्रभुदेसाई हा बारदेशमध्ये फिरंग्यांच्या आश्रयाखाली १६८० च्या ऑक्टोबरपासून रहात होता. त्यानेच कोकणातील देसाई संभाजी महाराजांविरुद्ध पोर्तुगिजांस मिळण्यास सिद्ध होतील, असे व्हाईसरॉयला कळवले होते. डिचोलीचा देसाई वर्ष १६८३ च्या मध्यापासून गोवा बेटात आपल्या कुटुंबासह येऊन राहिला होता. साखळीचे राणे कुंभारजुवे बेटात वर्ष १६८२ पासून वास्तव्य करत होते. रेवाडे, नानोडे आणि पीर्ण येथील वतनदार सत्रोजी राणे हा तर पोर्तुगिजांकडून संभाजी महाराज यांच्या विरोधात लढतांना मराठ्यांकडून कैद झाला होता.

 

५. पोर्तुगिजांचा दारुण पराभव; पण पोर्तुगिजांचे दैव समुद्रांनी रक्षिले !

२४ नोव्हेंबर १६८३ या दिवशी रात्री ८ वाजता नदीला ओहोटी लागली असतांना छत्रपती संभाजी महाराजांचे सैन्य जुवे बेटात घुसले आणि त्यांनी किल्ला ताब्यात घेतला. मराठ्यांनी जुवे बेटाचा कब्जा घेतला, ही खबर विजरेईला (पोर्तुगीज शब्द विजरेई – व्हॉईसरॉय) लगेच कळली. दोन तासांनंतर रात्रीचे १० वाजता गोवा शहरात चर्चच्या घंटा वाजवून संकटाची सूचना लोकांना देण्यात आली. पाद्री लोक शस्त्रास्त्रे घेऊन मांडवी नदीच्या बाजूस असलेल्या तटबंदीकडे धावले. धावजीच्या बाजूने शत्रू धडक देईल, असा तर्क करून विजरेई सैन्यासह सगळी रात्र पाळत ठेवून राहिला; पण मराठ्यांनी त्या रात्री काही हालचाल केली नाही. दुसर्‍या दिवशी २५ नोव्हेंबर १६८३ या दिवशी सकाळी ७-८ वाजण्याच्या सुमारास विजरेईने ४०० शिपायांसह जुवे बेटाकडे चाल केली. विजरेईच्या सैन्याशी मराठ्यांच्या सैन्याने किल्ल्याजवळ मुकाबला केला. हातघाईचे युद्ध झाले. पराभूत होऊन मराठ्यांच्या घोडदळास घाबरून पोर्तुगीज सैनिक विजरेईस सोडून जीव बचावण्यासाठी टेकडीवरून धावत पळत मागे फिरले. त्यांनी नदी गाठण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी विजरेई मराठ्यांकडून कैद झाला असता; पण रुद्रीगु द कोस्त घोडा घेऊन त्याच्या साहाय्यास धावून आला. त्यामुळे तो बचावला. तरी तो घायाळ झालाच.

नदी पार करतांना कितीतरी पोर्तुगीज सैनिक बुडून मेले. मराठ्यांनी पळणार्‍या सैनिकांवर मोठेमोठे दगड ढकलून दिले. दगडाखाली काही सैनिक चेंगरले. जुवे बेट ताब्यात घेतल्यानंतर मराठ्यांनी रात्रीच्या वेळी नदी किनार्‍यावरील शेताचे बांध फोडून टाकले होते. त्यामुळे नदीचे पात्र रुंदावले होते. पळून जाणारे काही सैनिक चिखलात रुतले गेले. मराठ्यांनी त्यांना कंठस्नान घातले. मोठ्या प्रयासाने विजरेई आणि काही अधिकारी होडीत बसून पळून गेले. पोर्तुगिजांचा हा दारुण पराभव गोवा बेटातील लोकांनी तटावर उभे राहून पाहिला; पण मराठ्यांचा धाक एवढा मोठे होता की, कुणीच विजरेईच्या साहाय्यास धावून आला नाही. ही लढाई संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली लढली गेली. महाराजांना त्याच दमात गोवा बेट सर करायचे होते; पण नदीस भरती आल्यामुळे त्यांना बेत स्थगित करावा लागला. ‘‘ते दिवशी गोवे घ्यायचेच; परंतु फिरंग्यांचे दैव समुद्रांनी रक्षिले’’ असे ‘खंडो बल्लाळ चिटणीस यांची त्रोटक हकिकत’ या लेखात लिहिले आहे.’

(साभार : स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास खंड १, पहिली आवृत्ती; प्रकाशक : क्रीडा आणि सांंस्कृतिक संचालनालय, गोवा सरकार; लेखक – मनोहर हिरबा सरदेसाई)

छत्रपती संभाजी महाराजांच्या बलीदान दिवसाचा संबंध
गुढीपाडव्याशी जोडून गुढीपाडव्याला विरोध करणारे धर्मद्रोही !

डॉ. सच्चिदानंद शेवडे

‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलीदान दिवस आणि गुढीपाडवा हा नववर्षदिन लागोपाठ येतो. गेल्या काही वर्षांपासून खानदेश आणि मराठवाड्यात काही महाभागांनी गुढ्या उभारणे हा शंभूराजांचा अपमान असल्याचे सांगत कित्येकांना गुढ्या उभारू दिल्या नाहीत आणि उभारलेल्या गुढ्या खेचून काढल्या. विचारस्वातंत्र्य आणि पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणार्‍या महाराष्ट्रात असे घडणे, हे चिंताजनक आहे.

या राजाला औरंगजेबाने अत्यंत हाल करून ठार केले. तो दिवस होता फाल्गुन अमावास्या ! दुसर्‍या दिवशी चैत्र शुद्ध प्रतिपदा, म्हणजेच गुढीपाडवा हा हिंदूंचा नववर्ष दिन होता; म्हणून जाणीवपूर्वक शंभूराजांचे डोके भाल्यावर टोचून फिरवण्यात आले.

वस्तूतः या गोष्टीचा गुढीपाडव्याच्या गुढीशी काहीच संबंध नाही. श्रीराम वनवास संपवून अयोध्येत परतले, तेव्हापासून गुढ्या-तोरणे उभारण्याची आपली परंपरा आहे. सृष्टीचा निर्मिती दिवस म्हणूनही गुढीपाडव्याचे महत्त्व आहे. ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टी निर्माण केल्याचे मानले जाते, म्हणजेच खरे तर हा दिवस फक्त हिंदूंचाच नसून अखिल विश्‍वातील मानवजातीचा आहे. सर्वांनीच हा पृथ्वीचा वाढदिवस म्हणून साजरा करायला हवा. गुढीपाडव्याचा आदला दिवस धर्मवीर शंभूराजांचा बलीदानदिन म्हणून गांभीर्याने पाळायला हवा; पण त्याचे सावट दुसर्‍या दिवसाच्या आनंदावर कशासाठी ? घरातले कुणी गेले, तरी बारा दिवस गांभीर्य राखून तेराव्याला गोडधोड जेवण करतात. शंभूराजांच्या नावाने ज्यांना फक्त राजकारणच करून आपले महत्त्व वाढवायचे आहे आणि जातीमध्ये वैमनस्य निर्माण करायचे आहे, अशा लोकांच्या डोक्यातच गुढीविषयीची विकृत कल्पना शिजली असणार. शिवराय अथवा शंभूराजे यांच्या मृत्यूमुळे विवक्षित जातीच्या लोकांना आनंद झाल्याचे खोटे ढोलसुद्धा वाजवले जात आहेत. असे करतांना आपल्या जातीच्या किती जणांनी शिवराय आणि शंभूराजांना पाठिंबा दिला होता अन् किती जण त्यांच्या विरोधात होते, हे एकदा तपासून पहावे. एखादा माणूस वाईट असणे, ही त्याची वैयक्तिक दुर्बलता असते, त्यावरून अख्खी जात दोषी ठरत नाही, हे लक्षात ठेवायला हवे !’

– डॉ. सच्चिदानंद शेवडे, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते, डोंबिवली

(साभार : ‘निवडक मुक्तवेध’)

 

Leave a Comment