१. कोरोनाच्या कालावधीत जहाजांना बंदरात थांबण्यासाठी आलेल्या अडचणी
१ अ. दळणवळण बंदीमुळे जहाजांना कुठल्याही देशांच्या बंदरात
थांबण्यास बंदी असणे आणि त्यामुळे साधक प्रवास करत असलेले जहाज २२ दिवस पाण्यातच असणे
‘कोरोनाच्या काळात मी आपत्काळाची झलक अनुभवली. मी जानेवारी २०२० मध्ये एका परदेशी आस्थापनाच्या प्रवासी जहाजावर नियुक्त झालो होतो. मला हाँगकाँगला नियुक्त व्हायचे होते; पण पारपत्र (‘व्हिसा) मिळण्यात आलेल्या अडचणीमुळे मी एक आठवडा उशिरा सिंगापूर येथे जहाजावर नियुक्त झालो. फेब्रुवारीपासून हाँगकाँग, थायलंड, कंबोडिया, सिंगापूर आणि मलेशिया येथील बंदरांत प्रवासी, तसेच अन्य जहाजे यांना जाण्या-येण्याची अनुमती नव्हती. आमच्या आस्थापनातील अधिकार्यांनी सांगितले, ‘‘ज्यांना घरी जायचे आहे, ते स्वखर्चाने किंवा आस्थापन व्यवस्था करेल, तसे जाऊ शकतात.’’ आमच्या आस्थापनाच्या ‘यू.एस्.ए.’ येथील मुख्यालयातील अधिकार्यांनी त्या देशांतील सरकारी कर्मचार्यांना विचारले, ‘‘तुमच्या देशांतील नागरिकांना तुमच्या देशात जाण्याची अनुमती देऊ शकतो का ?’’; पण दळणवळण बंदीमुळे त्या देशांतील सरकारी अधिकारी तेथील मूळ रहिवाशांनाही आपल्या देशात प्रवेश द्यायला सिद्ध नव्हते, तसेच जहाजांना कुठल्याही देशांच्या बंदरात थांबण्यास बंदी होती. त्यामुळे आमचे जहाज २२ दिवस पाण्यातच होते. जहाजावरील रेशन सामुग्री संपत आली होती.
१ आ. कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे भारत सरकारने अनुमती नाकारणे
आमच्या आस्थापनाने भारताच्या बंदरात जहाज थांबू देण्यासाठी भारत सरकारला विनवणी केली; पण कोरोनामुळे भारत सरकारनेही अनुमती दिली नाही. नंतर जहाज दुबईला गेले. तिथल्या प्रशासनाने काही अटी घातल्या होत्या. ते अन्य देशांच्या कर्मचार्यांना सोडण्यास सिद्ध होते.
२. जहाजावरील कर्मचार्यांना झालेले त्रास
२ अ. देशांतील नियम पालटल्याने जाणे रहित होऊन कर्मचार्यांची मनःस्थिती बिघडणे
काही देशांत सकाळी असलेल्या नियमांत त्याच दिवशी सायंकाळी पालट झालेला असायचा. जहाजावरील कर्मचार्यांची त्यांच्या देशांत जाण्याची सिद्धता झाल्यावर त्या देशांतील नियम पालटल्यामुळे त्या कर्मचार्यांचे जाणे रहित व्हायचे. त्यामुळे त्यांची मनःस्थिती बिघडायची.
२ आ. कर्मचार्यांना विमानतळापर्यंत जाऊन परत यावे लागणे
काही कर्मचारी विमानतळापर्यंत जाऊन परत यायचे. तेथे गेल्यावर कर्मचार्यांना ‘कोरोनाची चाचणी करावी लागेल किंवा नंतर अलगीकरणात रहावे लागेल’, असे त्यांच्या लक्षात यायचे.
नंतर आम्ही इटलीला गेलो. तेथेही वरीलप्रमाणेच स्थिती होती. काही काळाने या स्थितीत सुधारणा झाली.
२ इ. मनःस्थिती बिघडल्याने एका कर्मचार्याने जीव देणे
एका युरोपियन कर्मचार्याचे घर जवळ असूनही त्याला घरी जायला अनुमती मिळत नव्हती. शेवटी त्याने पाण्यात उडी मारून जीव दिला.
३. श्रीकृष्णाच्या कृपेने साधकाला जहाजावर स्थिर रहाता येऊन तो घरी सुखरूप पोचणे
अ. मी जहाजावर असतांना ‘कोरोनाविरुद्ध प्रतिकारक्षमता वाढावी आणि आध्यात्मिक बळ लाभावे’, यांसाठी नामजप करत होतो. आमच्या जहाजावर एकही कोरोनाबाधित व्यक्ती सापडली नाही.
आ. जहाजावरील ‘केमिकल’चा साठा संपत आल्याने निर्जंतुकीकरण करण्यासाठी खडेमीठ आणि व्हिनेगर घातलेले पाणी वापरले.
इ. मला जहाजावर श्रीकृष्णाचे अस्तित्व सतत जाणवत होते.
मला घरी जातांनाही अशाच अडचणी येत होत्या. मी ठरवलेल्या दिवसापेक्षा २० दिवस उशिरा घरी पोचलो; पण श्रीकृष्णाच्या कृपेने सुखरूप घरी पोचलो.’
– श्री. राहुल राऊत, फोंडा, गोवा.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |