१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्यावर आलेली अरिष्टे ही एक प्रकारची इष्टापत्तीच !
‘आपण चालत असू, तर वार्याचा विरोध होत नाही; पण धावत असू तर वार्याचाही आपल्याला विरोध होतो. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कल्याणकारी कार्याच्या संदर्भातही असेच अनुभव येत आहेत. जेथे राम-कृष्णादी अवतार आणि ज्ञानेश्वर-तुकोबांसारखे संतमहात्मे यांनाही विरोध झाला, तेथे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याला विरोध होणे, हे स्वाभाविक आहे. वर्ष २००८ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य वेगाने पसरू लागले आणि दुसरीकडे सनातनवर एकामागून एक अशी अरिष्टे कोसळू लागली. ४.६.२००८ या दिवशी गडकरी रंगायतन, ठाणे येथील स्फोट आणि १६.१०.२००९ या दिवशी मडगाव येथील स्फोट या प्रकरणांत सनातन संस्थेचे नाव गोवण्याचा प्रयत्न केला गेला. त्यातून तावूनसुलाखून सनातनचे निर्दाेषत्व सिद्ध होत असतांना वर्ष २०१३ पासून घडत असलेल्या नास्तिकतावाद्यांच्या हत्यांचे खापर सनातन संस्थेवर फोडण्याचा प्रयत्न झाला. या सर्व प्रकरणांत सनातनची मोठ्या प्रमाणात अपकीर्ती झाली. सनातन संस्थेवर बंदी आणण्याचाही घाट घातला गेला. ईश्वरी आशीर्वाद आणि ईश्वराचे पृथ्वीवरील रूप असलेल्या संतांनी केलेले साहाय्य यांमुळेच या सर्व प्रकरणातून सनातनचे निर्दाेषत्व सिद्ध होत आहे. संतांनी सांगितल्याप्रमाणेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्यावर आलेली ही अरिष्टे एक प्रकारची इष्टापत्तीच ठरली. एव्हाना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य भारतभर पोचण्यासाठी २० – २२ वर्षे लागली असती, ते कार्य या आपत्तींमुळे अवघ्या ४ – ५ वर्षांत भारतभर पोहोचले !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यावरील अरिष्टे टाळण्यासाठी संतांनी केलेल्या, तसेच आजही करत असलेल्या अनमोल साहाय्याची माहिती या प्रकरणात संकलित केली आहे. खरे तर हेच कार्य अनेक अज्ञात संतांनीही केले आहे. त्या ज्ञात-अज्ञात साहाय्याची शब्दांच्या माध्यमांतून कृतज्ञता व्यक्त करणे कठीण असल्याने त्याचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करत आहोत.’
– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था
२. संतांनी सनातनला साहाय्य करण्यामागील कारण
२ अ. साधना म्हणून राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य केल्यास संत स्वतःहून साहाय्य करतात !
‘व्यवहारात कोणाचे साहाय्य हवे असल्यास त्यांना कार्याविषयी बरीच माहिती सांगावी लागते किंवा कोणाच्या तरी ओळखीने त्यांना भेटलो, तरच ते साहाय्य करण्याचा विचार करतात. याउलट संतांकडे गेल्यावर त्यांना सनातन संस्थेचे नाव सांगितले, तरी साधकांच्या साधनेमुळे आणि ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ या ध्येयामुळे ते पुरेसे असते. खरे म्हटले, तर संतांना काहीच सांगावे लागत नाही. त्यांना आपल्या कार्याची जाणीव आतूनच होत असल्याने ते लगेच स्वतःहून साहाय्य करतात. व्यावहारिक जगातील कोणाच्याही साहाय्याच्या तुलनेत ते साहाय्य अनंत पटींनी महत्त्वाचे असते. संतांच्या अशा साहाय्यामुळे सनातन संस्थेचे कार्य वेगाने वाढत आहे !’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२१.१२.२०१४)
३. संतांनी स्थूल स्तरावर केलेले साहाय्य
अ. एका संतांनी सनातनवर अरिष्ट आल्याचे वृत्त कळल्याबरोबर काही आर्थिक साहाय्य हवे असल्यास कळवण्यास सांगितले.
आ. ‘एका संतांनी त्यांच्या व्यावहारिक जीवनातील ओळखींचा वापर करून साहाय्य केले.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२.७.२००८)
‘सत्ताधिकार्यांशी असलेल्या ओळखीचा उपयोग संकटात होत नाही. खरे साहाय्य संतच करतात, याची प्रचीती सनातनने बंदीची टांगती तलवार असतांना वारंवार घेतली !’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले (२१.८.२०१४)
४. संतांनी आध्यात्मिक स्तरावर केलेले साहाय्य
सनातनवरील अरिष्ट दूर होण्यासाठी अनेक संतांनी सनातनच्या बाजूने प्रतिक्रिया, संदेश आणि आशीर्वाद दिले, तर काहींनी आध्यात्मिक उपायसुद्धा करण्यास सांगितले. त्यांची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
४ अ. ह.भ.प. निवृत्ती महाराज वक्ते, पंढरपूर, जिल्हा सोलापूर.
१. ‘नारायण कवचा’चा जप जोरात १,००८ वेळा ब्राह्मणांकडून करणे. तेव्हा मध्ये नारसिंहाचे चित्र ठेवून धूप-दीप लावून सोवळ्यामध्ये अनुष्ठान करणे. (यानुसार आज्ञापालन करण्यात आले. – संकलक)
२. साधकांच्या सुटकेसाठी ‘कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने । प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः ॥’ असा जप १ लाख वेळा करणे. (यानुसार आज्ञापालन करण्यात आले. – संकलक)
४ आ. प.पू. स्वामी राधिकानंद सरस्वती, पुणे
तीन शुक्रवार सर्वांच्या नावाने देवीला अभिषेक केला, आणि प.पू. डॉ. आठवले यांचे नाव अन् गोत्र घेऊन खणा-नारळाने देवीची ओटी भरली, तसेच हे अरिष्ट दूर होण्यासाठी देवीला प्रार्थना करणे. (यानुसार आज्ञापालन करण्यात आले. – संकलक)
४ इ. प.पू. शिवानंद मूर्तिगारु, विशाखापट्टनम्
यांनी उपाय सांगितला, पण ‘सांगितलेला उपाय करणे शक्य नाही’, असे सांगितल्यावर त्यांनी स्वतः लगेचच अनुष्ठान चालू केले.
४ ई. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी, वडाळा महादेव, ता. श्रीरामपूर, जिल्हा नगर
यांनी सांगितले, ‘‘मीच काय ते करतो’’ आणि त्यांनी लगेचच अनुष्ठान चालू केले.
४ उ. योगतज्ञ दादाजी वैशंपायन, कल्याण, जिल्हा ठाणे
यांनी कडक अनुष्ठान चालू केले.’
– (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले (२.७.२००८)
४ ऊ. पू. जनार्दनस्वामी, पेण, जिल्हा रायगड.
१. पू. स्वामींनी त्यांच्या १०० साधकांना जपाला बसवले.
२. पू. स्वामीजी स्वतः प्रतिदिन दोन-अडीच घंटे (तास) जप करायचे.
३. पू. स्वामींनी सांगितलेला उपाय : आश्रमातील २१ साधकांनी समोर औदुंबराचे पान ठेवून त्याला कुंकू लावावे आणि अरिष्ट दूर होण्यासाठी प्रतिदिन २० मिनिटे ‘ॐ’ चा जप करावा. (औदुंबराचे पान प्रतिदिन विसर्जित करावे.) यासाठी त्यांनी एक कुंकवाची डबीही दिली.
५. सनातनवरील संभाव्य बंदीच्या वेळी
गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांनी सनातनला दिलेला आधार
‘गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी एरव्ही प्रत्येक ३ – ४ दिवसांनी प.पू. डॉ. आठवले यांच्याविषयी विचारणा करायचे. सनातनवर बंदी येण्याचे वातावरण असतांना ते सनातनविषयीही प्रत्येक ३ – ४ दिवसांनी विचारणा करायचे.’ – प.पू. भास्करकाका, गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे उत्तराधिकारी (२७.११.२००९)
५ अ. मडगाव बाँबस्फोट प्रकरणामुळे आलेल्या अरिष्टाविषयी
गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांनी वेळोवेळी पाठवलेले संदेश
१. काही काळजी करण्याचे कारण नाही. देवाला आपली अधिक काळजी आहे. या उठाठेवीमधून नवीनच काहीतरी घडेल. (असे महाराजांनी अगदी खात्रीपूर्वक सांगितले. – स्वामी रामानंदनाथस्वामी, गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे शिष्य) (६.९.२०१०)
२. धर्मग्लानीचा काळ असला, तरीही धर्मग्लानी होणार नाही. याची अंतःकरणापासून खात्री आहे. (असे महाराजांनी सांगितले. – स्वामी रामानंदनाथस्वामी) (१४.९.२०१०)
३. आलेली आपत्ती निश्चित निघून जाईल. आपत्तीचे स्वागत करा. कार्य चालू राहीलच. आपत्तीकडे संधी म्हणून पहा. देवकार्य घडावे म्हणूनच प्रसिद्धीकरता हे ईश्वराचे नियोजन आहे ! (१७.१०.२००९)
४. आपत्तीच्या संदर्भातील आध्यात्मिक भाग आम्ही सांभाळतो. आपण स्थुलातील भाग सांभाळावा आणि निश्चिंत रहावे ! (१८.१०.२००९)
५ आ. सनातनवरील अरिष्टाविषयी साधकांचे मनोबल वाढवण्यासाठी
गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांनी दिलेले आशीर्वाद – साधकांनो, हेही दिवस जातील !
१. ‘मूल्य दिल्याविना कार्य होत नाही.
२. वरून विपत्ती दिसत असली, तरी ही विपत्ती नसून कार्य विस्तारासाठी भगवत् योजना नाही, असे कसे म्हणता येईल ?
३. रामकार्य करणार्याला अपयश कसे प्राप्त होईल ?
४. धर्मो जयति नाधर्मः सत्यं जयति नानृतम् ।
क्षमा जयति न क्रोधो विष्णुर्जयति नासुरः ॥
अर्थ : नेहमी धर्माचाच विजय होतो. असत्याचा नव्हे, तर सत्याचा विजय होतो. क्षमा जिंकते, क्रोध नव्हे. भगवान श्रीविष्णु विजयी होतात, असुर नाहीत !
५. Patience at every bayonet point of life brings prosperity. (संकटाच्या अत्त्युच्च क्षणी सहनशक्ती बाळगल्यास पुढे उत्कर्ष साधतो.)
६. रामाने केलेली योजना धीर धरून पहात रहावे आणि नारायणाने दिलेल्या बुद्धीनुसार धर्मयुक्त आचरण करावे.
७. हेही दिवस जातील.’ (२.११.२००९)
५ इ. सनातनवर येणार्या संभाव्य बंदीच्या संदर्भात गुरुदेव डॉ. काटेस्वामीजींनी केलेले मार्गदर्शन !
१. ‘संकटामुळे लढण्याची वृत्ती वाढते. सनातनवरील बंदीचे वातावरण हा लाभ आहे, त्याला ‘संकट’ का म्हणायचे ?
२. पहाट होण्यापूर्वी रात्रीचा अंधःकार असतो. त्याप्रमाणे ईश्वरी राज्याची पहाट होण्यापूर्वी संकटे वाढणारच.’
– प.पू. भास्करकाका (२७.११.२००९)
३. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांनी प.पू. रामानंदनाथस्वामी यांना सनातनवरील संभाव्य बंदी आणि प.पू. डॉक्टरांची संभाव्य अटक यासंदर्भात सांगितले, ‘शक्यतो होणार नाही; पण झाल्यास विरोधकांना संस्थेकडे यावेच लागेल !’
५ ई. सनातन संस्थेवर येणार्या संभाव्य बंदीच्या संदर्भात गुरुदेव डॉ. काटेस्वामीजींनी सांगितलेला उपाय
‘सप्तशतीचा पाठ बंदीचे संकट जाईपर्यंत प्रतिदिन म्हणणे’ – प.पू. भास्करकाका (२७.११.२००९) (यानुसार आज्ञापालन करण्यात आले. – संकलक)
५ उ. सनातन संस्थेवर येणार्या संभाव्य बंदीच्या संदर्भात गुरुदेव डॉ. काटेस्वामीजींनी शेवटपर्यंत स्वतः हवन करणे
‘सनातनवर बंदी येणार’, असे समजल्यापासून गुरुदेव ‘बंदी येऊ नये’, यासाठी गेली दोन वर्षे प्रतिदिन इतर हवनांबरोबर सनातनसाठीही हवन करायचे. दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या मणक्याचा अस्थीभंग झाला. त्यामुळे ते अंथरुणाला खिळून होते. या काळात यज्ञकुंडात हवन देणे शक्य नसल्याने ते पलंगाच्या बाजूला होमाचे पात्र ठेवून पडल्या पडल्या हात त्याच्यावर धरत. मग शिष्य त्यांच्या हातावर हवनाच्या वस्तू टाकत. त्या वस्तू हातावरून घरंगळून होमपात्रात पडत. अशा प्रकारे शेवटपर्यंत त्यांनी हवन देणे चालू ठेवले होते.’ – प.पू. रामानंदनाथस्वामी (वर्ष २०१०)
६. संत आध्यात्मिक स्तरावर करत असलेले साहाय्य
६ अ. प.पू. परूळेकर महाराज, वराड, जिल्हा सिंधुदुर्ग
१. सनातनवर येणारी अरिष्टे दूर होण्यासाठी प.पू. महाराज वर्ष २००८ पासून प्रतिदिन रात्री २ ते सकाळी ६ या कालावधीत नामजप करत आहेत. नामजप करतांना ‘या नामजपाचे सर्व श्रेय सनातनला मिळू दे. सनातनवरील अरिष्टे दूर होऊ देत’, अशी ते प्रार्थना करतात.
२. वर्ष २०१३ पासून सनातनवरील अरिष्टे दूर होण्यासाठी ‘प.पू. महाराज प्रतिदिन कोणता नामजप किती वेळ करतात’, ते पुढील सारणीवरून लक्षात येईल.
प.पू. महाराज प्रतिदिन करत असलेला नामजप | नामजप करण्याचा कालावधी | |
---|---|---|
१. | ।। ॐ श्रीराम जय राम जय जय राम ।। | प्रतिदिन अडीच घंटे |
२. | ।। ॐ श्रीकृष्णाय वासुदेवाय गोविंदाय गोपीजनवल्लभाय नमः ।। | प्रतिदिन दीड घंटा |
३. | ।। श्रीराम जय राम जय हनुमान ।। श्रीराम जय राम जय हनुमान ।। |
दिवसातील उर्वरित घंटे |