हिंदु धर्माला अपकीर्त करण्यासाठी साम्राज्यवाद्यांचे दुष्प्रचाराचे तंत्र ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था
मुंबई – हिंदु धर्माला आचरण आणि तत्त्वज्ञान यांच्या स्तरावर कलंकित केले जाऊ शकत नाही, हे हिंदुद्वेषी असलेल्या जागतिक साम्राज्यवादी शक्तींना ठाऊक आहे. त्यामुळेच हिंदु धर्माला अपकीर्त करण्यासाठी त्यांनी दुष्प्रचाराचे तंत्र अवलंबले आहे. ‘हिंदुत्व आतंकवादी आणि जातीयवादी आहे, तसेच ते लैंगिक अत्याचारीही आहे’, असा खोटा प्रचार करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ (हिंदुत्वाचे जागतिक स्तरावरील उच्चाटन) या परिषदेत ‘हिंदु धर्म चांगला आहे; मात्र हिंदुत्व घातक आहे’, असा शब्दच्छल करून दिशाभूल केली जात आहे. खरेतर जसे मधुरता आणि साखर वेगळे केले जाऊ शकत नाहीत, तसेच हिंदुत्व हा हिंदु धर्माचाच एक भाग आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले. ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या आंतरराष्ट्रीय हिंदुविरोधी परिषदेचा हिंदुत्वनिष्ठ विविध माध्यमांतून निषेध करत आहेत.
सौजन्य : जम्बो टॉक्स यू ट्यूब
श्री. चेतन राजहंस यांचे जाज्वल्य विचार
१. जागतिक स्तरावर भारतीय स्थानिक हिंदुत्वाला अपकीर्त करण्याचे षड्यंत्र
‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या परिषदेच्या माध्यमातून चालू असलेल्या दुष्प्रचाराचे धागेदोरे भारतीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाशी संबंधित असल्याने केवळ जागतिक स्तरावरच नाही, तर भारतातील स्थानिक हिंदुत्वालाही या परिषदेतून अपकीर्त करण्यात येत आहे. त्यामुळे हे षड्यंत्र कशा प्रकारे कार्यरत आहे, हे हिंदूंनी समजून घेण्यासह सतर्क होणे आवश्यक आहे.
१ अ. ११ सप्टेंबर आणि स्वामी विवेकानंद यांचा संबंध
‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या परिषदेचे आयोजन १० ते १२ सप्टेंबर या कालावधीत करण्यात आले. यातील ११ सप्टेंबर हा दिवस हिंदूंच्या इतिहासातील गौरवास्पद दिवस आहे. याच दिवशी शिकागो (अमेरिका) येथील सर्वधर्म परिषदेत स्वामी विवेकानंद यांनी व्यासपिठावरून उपस्थितांना हिंदु धर्मातील विश्वबंधुत्वाच्या शिकवणीविषयी अवगत केले होते. स्वामी विवेकानंद यांचे ऐतिहासिक भाषण ऐकून सर्व धर्मांचे प्रतिनिधी प्रभावित झाले होते. हिंदु संस्कृतीविषयी त्यांच्यामध्ये जिज्ञासा निर्माण झाली. आजही अमेरिकेत ११ सप्टेंबर या दिवशी हिंदु धर्माचे प्रतिनिधी म्हणून स्वामी विवेकानंद यांचे स्मरण केले जाते.
२. जागतिक स्तरावर हिंदुत्वाचा उदय
कोरोनाच्या काळात जगभरातील लोक हिंदु धर्मानुसार आचरण करू लागले. हिंदु धर्मातील हस्तांदोलन न करता नमस्कार करणे, शाकाहार करणे, योग-आयुर्वेद यांचे महत्त्व आता जागतिक स्तरावर पटत आहे. कोरोनाच्या काळात भारतातील मोदी शासनाविषयी जगभरात सकारात्मक चर्चा झाली. भारतातून औषधे पाठवल्यानंतर ब्राझिलच्या पंतप्रधानांनी ट्विटरवर द्रोणागिरी पर्वत उचललेल्या हनुमानाचे चित्र ‘पोस्ट’ केले. रामजन्मभूमीत श्रीरामाचे मंदिर उभारण्यासाठी विदेशातील सरकारांनीही अभिनंदन करण्यासह अनेकांनी धन अर्पण केले.
३. हिंदुत्वाचा प्रचार वाढल्याने हिंदुद्वेष्ट्यांना पोटशूळ
सध्या जगभरामध्ये अचानकपणे हिंदुत्वाचा प्रचार वाढल्याने हिंदुद्वेष्ट्यांना पोटशूळ उठला आहे. या हिंदुविरोधी शक्ती कोण आहेत, हे जाणून घेणे आवश्यक आहे.
३ अ. ख्रिस्ती
कोरोनाच्या काळात हिंदुत्वामुळे ख्रिस्त्यांची सर्वाधिक हानी झाली आहे. त्यामुळे अनेक ख्रिस्ती मिशनरी ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या परिषदेचे आयोजक आणि प्रायोजक आहेत. ख्रिस्तीधार्जिणी महाविद्यालये आणि विश्वविद्यालये या परिषदेचे सहप्रायोजक आहेत.
३ आ. इस्लामी जिहादी
११ सप्टेंबर २००१ या दिवशी अमेरिकेतील ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’वर ‘अल् कायदा’ या आतंकवादी संघटनेने आक्रमण केले होते. हे आक्रमणकर्ते अफगाणिस्तानातील होते. आता अफगाणिस्तानात तालिबान सत्तेत आल्यानंतर अमेरिकेला या गोष्टीचा विसर पडावा, यासाठी इस्लामी आतंकवादावरून लक्ष हटवण्यासाठी हिंदुत्वाच्या विरोधात वातावरण सिद्ध करण्याचे काम चालू आहे. अमेरिकेतील प्रसारमाध्यमांमध्ये इस्लामिक आतंकवादाऐवजी हिंदुत्वाच्या कथित आतंकवादाविषयी चर्चा व्हावी, या हेतूने या परिषदेला जागतिक जिहादी शक्तींनी पैसा पुरवला आहे.
वर्ष २००९ मध्ये २६ नोव्हेंबर या दिवशी मुंबईत आतंकवादी आक्रमण झाले होते. त्यावरून लक्ष हटवण्यासाठी ‘हिंदु आतंकवादा’चा बागुलबुवा निर्माण करण्यात आला होता. हाच ‘अजेंडा’ (कार्यसूची) वापरून जगातील सर्वांत शांत असणार्या हिंदु समाजाविरुद्ध पद्धतशीरपणे षड्यंत्र रचण्यात आले आहे.
४. तालिबान्यांना ‘राजकारणी’ आणि हिंदुत्वनिष्ठांना
‘आतंकवादी’ म्हणणे, हा वैचारिक आतंकवाद !
शस्त्राच्या बळावर सत्ता हिसकावणारे आणि हिंसेचा पुरस्कार करणारे तालिबानी यांना ‘राजकारणी’ ठरवणे आणि हिंदुत्वनिष्ठांना ‘आतंकवादी’ संबोधणे, हा साम्यवादी, तसेच निधर्मीवादी यांचा अजेंडा आहे. ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या परिषदेतूनही हाच प्रकार चालू आहे. प्रखर हिंदुत्वनिष्ठ असलेल्या सनातन संस्थेला तर वारंवार आतंकवादी ठरवण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला आहे. जपमाळ घेऊन आध्यात्मिक उन्नतीसाठी मार्गदर्शन करणारे आतंकवादी कसे काय असू शकतात ? त्यांना आतंकवादी म्हणणे, हाच मुळात वैचारिक आतंकवाद आहे.
५. ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या परिषदेमागे असणार्या जागतिक शक्ती
५ अ. पाकिस्तान
मूळचे पाकिस्तानातील आणि ‘कोलंबिया ‘युनिव्हर्सिटी’मध्ये प्राध्यापक असणारे ‘मनन अहमद’ हे या परिषदेचे आयोजक आहेत. त्यांनी पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्या समवेतही काम केले आहे.
५ आ. कॅनडा
भारतात शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली खलिस्तानवाद्यांनी धुमाकूळ घातला आहे, यामागे कॅनडा येथील खलिस्तानवादी आहेत. खलिस्तानी आंदोलन हे भारताच्या दृष्टीने स्वतंत्र प्रदेशाची मागणी करणारे फुटीरतावादी आंदोलन आहे. हे आंदोलक कॅनडा आणि पाकिस्तान यांचे साहाय्य घेतात.
६. परिषदेमध्ये भारतातील फुटीरतावादी आणि राजकीय शक्ती यांचाही सहभाग
‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या परिषदेतील बहुतांश वक्ते हे भारतातील निधर्मीवादी, साम्यवादी, तसेच शहरी (अर्बन) नक्षलवादी आहेत. सध्या देशात राष्ट्रनिष्ठ आणि हिंदुत्वनिष्ठ विचारसरणीचे शासन असल्याने भारतात हिंदुत्वाच्या विरोधात उघडपणे बोलता येत नाही. त्यामुळे या परिषदेद्वारे हिंदुद्वेषी स्वत:चा राजकीय हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. जगभरातून हिंदुत्वाचे उच्चाटन करण्याची भाषा करून शेवटी मोदी शासनाचा अवमान करू पहात आहेत.
७. साम्यवादी प्रचारतंत्राचा अवलंब
या परिषदेच्या प्रचारासाठी साम्यवादी प्रचारतंत्राचा अवलंब करण्यात आला आहे. या प्रचारतंत्रात बिनबुडाची वक्तव्ये करून त्यांची उत्तरे मागितली जातात. त्यावर प्रतिवाद होईपर्यंत ही दांभिक विधाने समाजात पसरलेली असतात आणि साम्यवाद्यांचा अजेंडाही प्रसारित झालेला असतो. ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’च्या संदर्भातही असेच काहीसे झालेले आहे. आरंभी या परिषदेला ४० विद्यापिठांचे समर्थन असल्याचे सांगण्यात आले. ‘स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी’ने तर परिषदेच्या आयोजकांनी त्यांच्याकडून कोणतीही अनुमती मागितली नसल्याचे आधीच स्पष्ट केले होते. तसेच ते सहप्रायोजक असल्याचेही त्यांनी नाकारले होते. यानंतर हळूहळू ७ विद्यापिठे या परिषदेतून बाहेर पडलेली आहेत.
८. हिंदुत्वनिष्ठ संघटनांना अपकीर्त करून
राजकीय हेतू साधण्यासाठी साम्यवाद्यांचा खटाटोप
परिषदेचा प्रचार करतांना वापरलेल्या चित्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकाचे उच्चाटन करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. यावरून भारतातील निधर्मीवादी आणि साम्यवादी शक्ती देशातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांना अपकीर्त करू पहात आहेत, हे स्पष्ट होते. साम्यवादी हे शहरी नक्षलवाद्यांना बाहुली बनवून इस्लामी आणि ख्रिस्ती देशांमध्ये हिंदुत्वाविषयी अकारण भीती (हिंदुफोबिया) निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते या देशांशी या माध्यमातून युती करू पहात आहेत.
९. हिंदु समाजाला ‘जातीयवादी’ म्हणणे अयोग्य
हिंदुद्वेषी मंडळी हिंदूंना आतंकवादी ठरवण्यासमवेत जातीयवादीही ठरवू पहात आहेत. प्रत्यक्षात मात्र जगात सर्वाधिक जाती इस्लाममध्ये आहेत. युरोपमध्ये ख्रिस्त्यांचेही ४२ उपपंथ आहेत. प्राचीन भारतात गुणकर्माधारित वर्णव्यवस्था होती. आज ज्याप्रमाणे कोण अधिकारी होणार आणि कोण शिपाई होणार, हे कर्मकौशल्यानुसार ठरते, तशीच स्थिती त्या वेळीही होती. आधुनिक भारतातही १२ जातींचा उल्लेख आहे; परंतु इंग्रजांनी ‘फोडा आणि राज्य करा’ या नीतीनुसार १२ जातींचे ३५ जातींमध्ये विभाजन केले. आजच्या आधुनिक राजकारणाने तर १ सहस्रांहून अधिक जाती निर्माण केल्या. भारतात जातीवाद हा राजकारणाशी निगडित आहे, धर्माशी नाही. भारतात शिक्षण, नोकरी आणि राजकारण यांतून जातीवाद हटवला, तर कोणताही हिंदू जातीविषयी बोलणार नाही. हे सत्य सोडून भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर जातीयवादी म्हणून अपकीर्त केले जात आहे. जातीयवादाची चर्चा करायचीच असेल, तर भारतात सर्वांत जातीयवादी हे साम्यवादी आणि निधर्मीवादी आहेत; कारण समाज अन् राष्ट्र यांच्या आताच्या स्थितीसाठी ते एकाच जातीला उत्तरदायी ठरवतात, तसेच हिंदुत्वाला ब्राह्मणवादी ठरवून भ्रामक संकल्पना पसरवतात.
१०. खरे हिंसावादी कोण ?
‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या परिषदेत ‘हिंदुत्व आणि हिंसा’ या विषयावर चर्चा करण्यात आली. जगात सर्वाधिक हिंसा ख्रिस्ती, मुसलमान आणि साम्यवादी तत्त्वज्ञानाने केली आहे. स्पॅनिश आणि पोर्तुगीज या लोकांनी दक्षिण अमेरिका पादाक्रांत करतांना केलेला विध्वंस, तुर्कांनी अमेरिकेत केलेली हत्याकांडे किंवा नाझींनी ज्यूंचा केलेला नायनाट, यांपेक्षाही भयंकर हत्याकांडे इस्लामने भारतावर आक्रमण केल्यानंतर केली. याविषयी कुणीच चर्चा करत नाही. साम्यवाद्यांचे संपूर्ण तत्त्वज्ञानच हिंसेवर आधारित आहे. ‘ब्लॅक बूक ऑफ कम्युनिझम्’ या पुस्तकात साम्यवादाच्या आरंभापासून आतापर्यंत साम्यवाद्यांनी कोट्यवधी जणांची हत्या केली आहे, याविषयी माहिती देण्यात आली आहे.
‘जम्बू टॉक्स’चे संचालक निधीश गोयल यांनी चेतन राजहंस यांच्याशी साधला संवाद !१० ते १२ सप्टेंबर या कालावधीत आयोजित ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये हिंदुद्वेषाने पछाडलेले साम्यवादी आणि निधर्मी सहभागी झाले होते. या दुष्प्रचारापासून हिंदूंना आधीच सतर्क करण्यासाठी ‘जम्बू टॉक्स’चे संचालक श्री. निधीश गोयल यांनी ९ सप्टेंबर या दिवशी श्री. चेतन राजहंस यांच्याशी या हिंदुविरोधी षड्यंत्रावर प्रकाश टाकण्यासाठी ऑनलाईन संवादाचे आयोजन केले होते. |
जातीच्या उच्च-नीचतेविषयी चर्चा करणे अयोग्य !
१. विश्वात सर्व पंथांमध्ये जाती आहेत.
२. जातीला संस्कृत भाषेत ‘कुल’, हिंदी भाषेत ‘घराना’, इंग्रजी भाषेत ‘हॉऊजेस’ किंवा ‘फॅमिलीज’, फारसी भाषेत ‘खानदान’, अरेबिक भाषेत ‘कबिला’ किंवा ‘जिराना’ असे म्हणतात.
३. श्रीमद्भगवद्गीतेमध्ये ‘कुलधर्म शाश्वत आहे’, असे म्हटले आहे.
४. भारतीय राज्यघटनेत अनेक वेळा जाती आणि जमाती हे शब्द आलेले आहेत. त्यामुळे जात हा शब्द घटनात्मक आहे. जातीवादाला विरोध करायचा असेल, तर सर्वप्रथम राज्यघटनेतून ‘जाती’ हा शब्द हटवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
५. गांधीजींनी ‘हिंद स्वराज’ हा राष्ट्ररचनेचा विचार मांडतांना भारतीय जातीव्यवस्थेची प्रशंसा केली होती.
जातीव्यवस्था ही नैसर्गिक असून कुळांच्या समूहाला ‘जाती’ म्हटले गेले आहे. जगात अशा कुळांच्या समूहाला ‘परिवार’ अथवा ‘कबिला’, असे म्हटले गेले आहे. अशा प्रकारे कुळ, समूह आणि परिवार ही जागतिक स्तरावरील वास्तविकता आहे. त्यामुळे ‘जाती कुणी निर्माण केल्या ?’, हा प्रश्न निराधार आणि हास्यास्पद आहे. जाती कुणीही निर्माण केल्या नाहीत. मनुष्याचा जन्म झाल्यावर जाती निर्माण होतात. मनुष्याचा जन्मच मुळात कोणत्या ना कोणत्या जातीमध्ये होतो. जातीच्या उच्च-नीचतेविषयी चर्चा करणे अयोग्य आहे; कारण सर्वच जाती महान आहेत. सध्या ब्राह्मणद्वेषाला धरून चर्चा होत आहे, हा जातीयवाद आहे. जातीवर आधारित आरक्षण हे पाप आहे आणि हाही एक प्रकारचा जातीयवादच आहे.
– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था.