‘देवद आश्रमात सेवा करणार्या साधिका सौ. आनंदी पांगुळ यांची लहान बहीण नायगाव (पालघर) येथे रहाणार्या डॉ. श्रीमती संगीता म्हात्रे व्यवसायाने डॉक्टर असून त्या ‘क्रायोथेरपी’ची प्रॅक्टिस करतात. (‘क्रायोथेरपी’ म्हणजे अतिशय थंड तापमान वापरून केलेले उपचार !) त्या सनातन संस्थेच्या हितचिंतक आहेत. ऑगस्ट २०२० मध्ये त्यांनी श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी त्यांच्या देवघरात शाडूच्या मातीपासून बनवलेल्या श्री गणेशमूर्तीची स्थापना केली. त्या वेळी देवघरात लावलेली समई आणि निरांजन यांच्या ज्योतींचे श्री गणेशमूर्तीच्या डोळ्यांत प्रतिबिंब पडणे अन् वातावरणातील पंचतत्त्वांचा कलशातील विड्याच्या पानांवर परिणाम होणे, यांविषयी श्रीमती संगीता म्हात्रे यांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. श्री गणेशमूर्तीची स्थापना केल्यानंतर
१ अ. श्री गणेशमूर्तीच्या समोर ठेवलेले
निरांजन आणि समई यांच्या ज्योतींचे प्रतिबिंब श्री गणेशमूर्तीच्या डोळ्यांत पडणे
मी श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी आमच्या घरातील देवघरात श्री गणेशमूर्तीची स्थापना केली. त्यानंतर मला श्री गणेशमूर्तीच्या समोर लावलेले निरांजन आणि समई यांच्या ज्योतींचे मूर्तीच्या डोळ्यांत प्रतिबिंब पडलेले दिसले. डाव्या डोळ्यात ते अधिक स्पष्टपणे दिसत होते.
१ आ. श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी देवघरातील कलशात
ठेवलेला नारळ आणि विड्याची पाने यांमध्ये टप्प्याटप्प्याने झालेले पालट
१. श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी देवघरात कलशाची स्थापनाही केली होती. एका कलशात पाणी घालून त्यावर ५ विड्याची पाने आणि नारळ ठेवला होता. ११ दिवसांनंतर कलशात ठेवलेला नारळ खालून वरच्या दिशेने ओला होतांना दिसला. याचा अर्थ ‘कलशातील पाण्याची पातळी हळूहळू वाढत आहे’, असे माझ्या लक्षात आले. नंतर थोड्या थोड्या दिवसांनी कलशातील पाण्याची पातळी हळूहळू वाढून नारळ खालून वरच्या दिशेने ओला होत होता.
२. ‘११ दिवसांनंतरही कलशातील विड्याची पाने सुकली नव्हती’, असे माझ्या लक्षात आले.
३. नंतर हळूहळू कलशातील पाने एक एक करून सुकू लागली. ती आधी पिवळी झाली आणि नंतर हळूहळू सुकली. २८ व्या दिवशी कलशातील २ पाने पूर्ण सुकली, एक पान थोडे पिवळे पडले, तर एक पान अजूनही हिरवे राहिल्याचे दिसले.
१ इ. ‘श्री गणेशमूर्तीच्या डोळ्यांत ज्योतींचे प्रतिबिंब
पडणे, कलशातील पाणी वाढणे आणि २८ दिवसांनंतरही
कलशातील एक पान हिरवे रहाणे, हे सर्व दैवी असावे’, असे वाटणे
‘वनस्पतींची पाने ही पंचतत्त्वांचे प्रतीक असतात’, हे मला ठाऊक आहे. विड्याच्या पानांमधील पालट पहातांना ‘वातावरणातील पंचतत्त्वांत होणार्या पालटांचा परिणाम त्या पानांवरही होत आहे’, असे माझ्या लक्षात आले. वास्तविक झाडापासून विलग झालेली पाने काही दिवसांतच वाळून जातात. पाण्यात असली, तर ती कुजतात; पण ‘कलशातील पानांमधील हा पालट दैवी असावा’, असे मला वाटले. बुद्धीने विचार केला, तर श्री गणेशमूर्ती नैसर्गिक रंगाने रंगवलेली असल्याने मूर्तीच्या डोळ्यांत ज्योतींचे प्रतिबिंब पडणे, हे अशक्य आहे. त्यामुळे ‘असे प्रतिबिंब पडणे, हे ‘मूर्ती सजीव झाल्याचे लक्षण असावे’, असे मला वाटले.
१ ई. पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी ‘पालट वैशिष्ट्यपूर्ण आहेत’, असे सांगणे
‘वरील पालट होण्यामागे काही शास्त्र आहे का ?’, हे जाणून घेण्यासाठी मी माझी बहीण सौ. आनंदी पांगुळ हिला कळवले. ती सनातन संस्थेच्या माध्यमातून गेल्या २१ वर्षांपासून पूर्णवेळ साधना करत आहे. तिने देवद आश्रमात रहाणार्या सनातनच्या संत पू. (सौ.) अश्विनी पवार यांना यासंदर्भातील छायाचित्रे दाखवली. तेव्हा त्यांनी सांगितले की, हे पालट वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
२. घरात अनेक वेळा दैवी कण आढळणे आणि यातून
‘देव सतत सोबत असल्याची प्रचीती देतो’, असे जाणवणे
दळण वळण बंदीच्या काळात आम्ही दोघी बहिणी सांगली येथे आमच्या आईच्या घरी अडकलो होतो. तेव्हा तेथे प्रतिदिन सौ. आनंदीला पुष्कळ दैवी कण सापडत होते. तिने मला त्या दैवी कणांविषयी सांगितले. अशाच प्रकारचे अनेक दैवी कण मला माझ्या घरीही सापडतात.
देवाची कृपा म्हणून तो सतत सोबत असल्याची प्रचीती देऊन मला त्याचे अस्तित्व दाखवतो. देवाच्या चरणी एकच प्रार्थना आहे की, माझ्या बहिणीला जसे सगुण रूपात गुरु (परात्पर गुरु डॉ. आठवले) मिळाले आहेत, तसे गुरु मलाही मिळावेत. कृतज्ञता !’
– डॉ. संगीता म्हात्रे, नायगाव, पालघर.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादकदैवी कण : सात्त्विक व्यक्ती, स्थान आदी ठिकाणी सोनेरी, रूपेरी आदी अनेक रंगांत दिसणार्या या कणांचे ‘भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर’मध्ये पृथक्करण करण्यात आले. आय.आय.टी. मुंबई येथे केलेल्या चाचणीनुसार या कणांमध्ये कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे घटक असल्याचे सिद्ध झाले. या घटकांच्या मूलद्रव्यांच्या प्रमाणावरून शोधलेले त्यांचे ‘फॉर्म्युले’ सध्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याही कणांच्या ‘फॉर्म्युल्या’शी मिळतीजुळती नाहीत. त्यामुळे हे कण नाविन्यपूर्ण आहेत, हे लक्षात येते. साधक या कणांना ‘दैवी कण’ असे संबोधतात. |