भाग्यनगर (तेलंगाणा) – सनातन संस्थेच्या वतीने आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा येथील जिज्ञासूंसाठी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने श्रीकृष्णाच्या सामूहिक नामजपाचे ‘ऑनलाईन’ आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सामूहिक नामजपाच्या प्रारंभी सनातनच्या साधिका सौ. तेजस्वी वेंकटापूर यांनी श्रीकृष्णाविषयीची माहिती सांगितली. त्यानंतर ‘ऑनलाईन’ नामजपाला प्रारंभ करण्यात आला. या वेळी सर्व जिज्ञासूंनी २० मिनिटे सामूहिक नामजप केला. हा कार्यक्रम जिज्ञासूंना पुष्कळ आवडला. ‘या नामजपामुळे पुष्कळ शांत वाटून आनंद जाणवला’, असे अनेकांनी कळवले.
अभिप्राय
१. श्री. सुरेश जाखोटिया – मी जन्माष्टमीच्या दिवशी घरात बसून नामजप करण्याचे ठरवले होते; परंतु कार्यक्रम चालू झाल्यानंतर ‘घरच्या गोशाळेत बसून नामजप करूया’, असे वाटले. गोशाळेत बसून नामजप केल्याने श्रीकृष्णतत्त्व अधिक प्रमाणात मिळाले, असे वाटले.
२. श्री. धोनीश्वर – नामजपाला आरंभ करण्यापूर्वी ‘ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने कालीयामर्दन केले, तसे माझा अहं आणि अवगुण या नामजपामुळे नष्ट व्हावेत’, अशी प्रार्थना केली. त्यानंतर मला ते न्यून होत असल्याची अनुभूती आली.
३. सौ. सुजाता – मी श्रीकृष्णाच्या प्रतिमेसमोर बसून नामजप केला. माझा पुष्कळ दिवसांपासून नामजप होत नव्हता. ‘मी स्वत: गोकुळामध्ये असल्यासारखे वाटत होते. माझ्या समोर श्रीकृष्ण बसला आहे आणि मी गंगाजलाने त्याचे चरण धुवत आहे, तसेच मी समर्पणभावाने त्याच्या चरणांवर डोके ठेवले आहे अन् माझ्या शरिराच्या प्रत्येक अवयवामध्ये चैतन्याचा प्रवाह वहात आहे’, असे मला वाटत होते.
४. श्री. विश्वनाथगुरुजी – सामूहिक नामजपामध्ये सहभागी झाल्यामुळे मला पुष्कळ चांगले वाटले. मी संपूर्ण एकाग्रतेने नामजप करण्याचा प्रयत्न केला. आजच्या रज-तमयुक्त काळात असे कार्यक्रम होणे आवश्यक आहे.
५. सौ. अनुराधा – माझ्या समोर साक्षात् भगवान श्रीकृष्ण उभा आहे, अशी अनुभूती आली.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार जिज्ञासूंच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |