साधना शिकवून साधकांना जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त करणारी आणि संत बनवणारी सनातन संस्था

पुणे – येथील श्री. गजानन बळवंत साठे (वय ७७ वर्षे) गेल्या १९ वर्षांपासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. ते उच्चशिक्षित आहेत. ते शासकीय नोकरीतून प्रथम श्रेणी अधिकारी (क्लास वन ऑफिसर) म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत; पण या गोष्टींचा त्यांना अहं नाही. ते अत्यंत नम्र आहेत. आतापर्यंत त्यांनी ‘ग्रंथप्रदर्शन आणि वितरण कक्ष लावणे, दैनिक आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करणे’, इत्यादी सेवा केल्या आहेत. उतारवयातही त्यांचा सेवा करण्याचा उत्साह ‘तरुणांना लाजवेल’, असा आहे. उतारवयात त्यांची तीन शस्त्रकर्मे झाली; पण त्या वेळीही गुरुदेवांवरील श्रद्धेच्या बळावर ते स्थिर होते. त्यांच्याविषयी त्यांच्या पत्नी, मुली आणि साधक यांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
सौ. मंगला साठे (पत्नी, वय ७४ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), सातारा रस्ता, पुणे.

१. प्रामाणिकपणा
‘माझ्या यजमानांनी ३४ वर्षे प्रामाणिकपणे शासकीय नोकरी केली. काही वर्षे ते धुळे येथे नगर रचनाकार (टाऊन प्लानर) म्हणून काम पहात होते. त्यांच्याकडे काही बांधकाम व्यावसायिक जागेच्या मंजुरीसाठी येत असत आणि त्यांना म्हणत, ‘‘साहेब, तुम्हाला एक सदनिका देतो. माझे हे काम (नियमबाह्य) करा.’’ तेव्हा यजमान त्यांना नकार देत; मात्र त्यांच्या हाताखालचे काही जण ‘साहेबांनी पैसे मागितले आहेत’, असे सांगून त्यांच्याकडून पैसे घेत असत. यजमानांना हे कळल्यावर त्यांनी तेथून स्वतःचे स्थानांतर (बदली) करून घेतले.
२. शांत स्वभाव
आम्हाला दोन मुली (आधुनिक वैद्या (डॉ.) सौ. अश्विनी देशपांडे, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के आणि सौ. मानसी आगाशे) आहेत; पण यजमान कधीही मुलींना रागावले नाहीत. ‘श्री गुरूंच्या कृपेने आपल्याला दोन्ही मुली आणि दोन्ही जावई (आधुनिक वैद्य (डॉ.) अजय जयवंत देशपांडे आणि श्री. मिलिंद मनोहर आगाशे) चांगले मिळाले’, असा त्यांचा भाव आहे.
३. अहं अल्प असणे
एकदा बस चालू झाली असतांना यजमान बसमध्ये चढले. ते चालत्या बसमध्ये चढले; म्हणून वाहक (कंडक्टर) त्यांना रागावले. तेव्हा त्यांनी हात जोडून ‘चूक झाली. पुन्हा असे करणार नाही’, असे सांगून त्यांची क्षमा मागितली.
४. सनातन संस्थेच्या माध्यमातून साधनेला आरंभ
यजमानांची वृत्ती धार्मिक आहे. वर्ष १९९८ मध्ये मी आणि यजमानांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे पुणे येथे झालेले प्रवचन ऐकले, तरी प्रत्यक्षात आम्ही दोघे पती-पत्नी वर्ष २००२ मध्ये नियमितपणे सत्संगाला जाऊ लागलो आणि आमच्या साधनेला आरंभ झाला.
५. सेवाभाव
दळणवळण बंदीच्या आधीच्या काळात मला सेवेला कुठेही जायचे असेल, तर यजमानांचे वय अधिक असूनही ते ‘मला दुचाकीवरून पोचवणे आणि आणणे’, ही सेवा आनंदाने करायचे. ‘सर्व सेवा सारख्याच महत्त्वाच्या आहेत’, असा त्यांचा भाव आहे. त्यांना जी सेवा सांगितली जाते, ती करायची त्यांची सिद्धता असते. ‘दैनिक आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वितरण, साहित्य वितरण, विज्ञापने आणणे, साहित्याची ने-आण करणे’, या सर्व सेवा ते दुचाकीवरूनच करतात.
६. साधिकेचे यजमान त्यांच्या शस्त्रकर्मांच्या वेळी स्थिर असणे
६ अ. पौरुषग्रंथीच्या (‘प्रोस्टेट’च्या) शस्त्रकर्माच्या वेळी साधिकेच्या यजमानांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ‘मला प्रारब्ध भोगण्याची शक्ती द्या’, अशी प्रार्थना करणे
मार्च २०१९ मध्ये यजमानांना लघवीचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयामध्ये भरती करायचे ठरले. तेव्हा यजमानांनी घरातून रुग्णालयात जाण्यापूर्वी निघतांना परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना केली, ‘मला माझे प्रारब्ध भोगण्याची शक्ती द्या.’ त्या वेळी त्यांचे पौरुषग्रंथीचे (‘प्रोस्टेट’चे) शस्त्रकर्म झाले.
६ आ. ‘हर्निया’च्या (अंतर्गळाच्या) शस्त्रकर्माच्या वेळी साधिकेच्या यजमानांच्या हृदयाचे ठोके न्यून होणे, त्यामुळे त्यांचे ‘हर्निया’चे शस्त्रकर्म करता न येणे आणि ‘पेसमेकर’ बसवण्याचे शस्त्रकर्म करावे लागणे अन् त्या वेळी त्यांनी ‘प.पू. डॉक्टर’ असा नामजप अखंड करणे
मार्च २०२१ मध्ये यजमानांना ‘हर्निया’चा (अंतर्गळाचा) त्रास होऊ लागला; म्हणून त्यांना रुग्णालयामध्ये भरती करावे लागले. शस्त्रकर्माची सर्व सिद्धता झाली असतांना ‘यजमानांच्या हृदयाचे ठोके फार न्यून झाले आहेत’, असे लक्षात आले. त्यामुळे त्यांचे ‘हर्निया’चे शस्त्रकर्म रहित करावे लागले. हृदयरोग तज्ञांनी आम्हाला सांगितले, ‘‘यांचे शस्त्रकर्म करून यांना ‘पेसमेकर’ (हृदयाची गती नियंत्रित करणारे उपकरण) बसवावा लागेल.’’ त्या वेळीही यजमान ‘प.पू. डॉक्टर’ असा नामजप अखंड करत होते. शस्त्रकर्म करणार्या आधुनिक वैद्यांनीही यजमानांना ‘तुम्ही तुमच्या गुरुदेवांना प्रार्थना करा’, असे सांगितले. त्या वेळी शस्त्रकर्म करून त्यांना ‘पेसमेकर’ बसवला. आता यजमान प्रतिदिन ‘पेसमेकर’च्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतात.
६ इ. जून २०२१ मध्ये त्यांचे ‘हर्निया’चे शस्त्रकर्म करण्यासाठी त्यांना रुग्णालयात भरती केले होते; पण त्यांना लघवीचा त्रास होऊ लागल्याने त्यांचे दुसर्यांदा पौरुषग्रंथीचे (‘प्रोस्टेट’चे) शस्त्रकर्म करावे लागले.
या सर्व शस्त्रकर्मांनंतर आता यजमान स्थिर आणि आनंदी आहेत. ते गुरुदेवांची कृपा अनुभवत आहेत. ‘गुरुदेवांच्या कृपेने मिळालेल्या या बोनस आयुष्यामध्ये माझ्याकडून साधना करवून घ्या’, अशी ते गुरुदेवांना प्रार्थना करतात.
‘हे गुरुमाऊली, यजमानांसारखे गुण माझ्यामध्ये आणण्यासाठी माझ्याकडून प्रयत्न होऊ दे’, अशी आपल्या कोमल चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’
आधुनिक वैद्या (डॉ.) सौ. अश्विनी देशपांडे
(मोठी मुलगी, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सातारा रस्ता, पुणे.

१. ‘बाबांचा स्वभाव भोळा आणि निरागस आहे.
२. समाधानी
ते नेहमी घरासाठी, आई किंवा आम्ही दोघी बहिणी आणि नातवंडे यांच्यासाठी जे आवश्यक साहित्य आहे, ते घेतात. ‘स्वतःसाठी काही घ्यावे’, असे त्यांना वाटत नाही. जे आहे, त्यात ते समाधानी असतात.
३. आमच्या लहानपणी कधी ‘बाबा रागावले आहेत’, असे आम्हा बहिणींना आठवत नाही.
४. बाबांना खाण्या-पिण्याची आवड नाही.
५. वडिलांनी आईला घरकामात आणि सेवेत साहाय्य करणे
बाबा प्रथम श्रेणी अधिकारी (‘क्लास वन ऑफिसर’) म्हणून निवृत्त झाले आहेत; पण कुठल्याही सेवेला त्यांनी कधीच कनिष्ठ मानले नाही. घरी आई आणि बाबा दोघेच असतात. बाबा न कंटाळता घरातील सर्वच सेवांमध्ये आईला साहाय्य करतात. आई काही वर्षे दायित्वाच्या सेवा करत असतांना बाबा तिला त्या सेवांतही साहाय्य करायचे. कधी कधी आई सलग २ – ३ दिवसही हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या सेवांसाठी बाहेर जात असे. तेव्हा घरच्या सर्व सेवा बाबा एकटेच करायचे.
६. भाव
ठराविक कालावधीनंतर बाबा अर्पण देतात. ‘मला जे काही मिळते, ते सर्व गुरुधन आहे’, असा त्यांचा भाव आहे.
‘मला असे आध्यात्मिक आई-बाबा दिले’, यासाठी श्री गुरुचरणी कोटी कोटी कृतज्ञता !’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात