कष्टाळू, कठीण परिस्थितीला धिराने सामोर्‍या जाणार्‍या, तळमळीने सेवा करणार्‍या पुणे येथील पू. (श्रीमती) उषा मधुसूदन कुलकर्णी !

साधना शिकवून साधकांना जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त करणारी आणि संत बनवणारी सनातन संस्था

पू. (श्रीमती) उषा कुलकर्णी

 

१. आनंदी आणि उत्साही

सौ. ज्योती दाते

‘आईला अनेक वर्षांपासून निद्रानाशाचा विकार आहे, तरी ती दिवसभर उत्साही असते. आईची २ वेळा ‘अँजिओप्लास्टी’ (हृदयाचे शस्त्रकर्म) करावी लागली. त्यामुळे तिचे जेवण आणि हालचाली यांवर पुष्कळ बंधने आली आहेत, तरी ती सतत आनंदी असते.

२. कष्टाळू

आईने अनेक वर्षे शिवणकाम केले आहे. ‘आम्हा तीनही भावंडांचे (सौ. ज्योती नरेंद्र दाते, सौ. मेधा सुनील हर्डीकर आणि श्री. पराग मधुसूदन कुलकर्णी यांचे) चांगले व्हावे’, यासाठी तिने पुष्कळ कष्ट केले आहेत. आम्ही लहान असतांना दिवाळीच्या कालावधीत आईकडे घराच्या सभोवती रहाणार्‍या लोकांचे पुष्कळ कपडे शिवण्यासाठी यायचे. लोकांना वेळेत कपडे शिवून देण्यासाठी तिला दिवस-रात्र शिवणकाम करावे लागत असे. ती रात्री उशिरापर्यंत शिवणकाम करून दिवाळीच्या दिवशी पहाटे उठून आमच्यासाठी फराळाचे पदार्थ बनवायची. ती सणांच्या वेळी किंवा आमचा वाढदिवस असल्यास रात्रभर जागून आमच्यासाठी नवीन कपडे शिवायची.

 

३. पाककलेत निपुण

आई स्वयंपाक उत्कृष्ट बनवते. ती एकही पदार्थ वाया घालवत नाही. तिच्या घरी आंब्याचे झाड आहे. ‘एकही आंबा वाया जाऊ नये’, यासाठी ती या वयातही ‘आंब्याचे लोणचे, साखरांबा, आंबापोळी आणि सरबत’, असे विविध प्रकार बनवायची.

 

४. बुद्धीमान

आईला वाचनाची पुष्कळ आवड आहे. तिचे शिक्षण ११ वीपर्यंत (मॅट्रिकपर्यंत) झाले आहे. ती अत्यंत बुद्धीमान आहे. ती या वयातही भ्रमणभाषवर ‘व्हॉट्सॲप’ आणि ‘यू ट्यूब’ यांवरील माहिती वाचायला अन् पहायला शिकली. ती संस्थेकडून घेण्यात येणार्‍या प्रत्येक ‘ऑनलाईन’ सत्संगाला उपस्थित असते.

 

५. इतरांचा विचार करणे

आई तिच्या ६ भावंडांमध्ये (कै. आशा आनंद हर्डीकर, श्री. अशोक माधव वैद्य, कै. मंगला माधव वैद्य, सौ. माधुरी सुधाकर गोहाड आणि श्री. अनिल माधव वैद्य यांच्यामध्ये) सर्वांत मोठी आहे. आमचे सर्व मामा आणि मावश्या तिला ‘ताई’ असे संबोधतात अन् तिनेही आजपर्यंत हे ‘ताईपण’ सांभाळले आहे. आईच्या माहेरी आणि सासरी कुणी रुग्णाईत झाले, तर ती रात्री रुग्णालयात थांबते. ती सर्वांना सांगते, ‘‘तुम्ही दिवसभर दमता. तुम्हाला रात्री झोप आवश्यक आहे. मी रात्री थांबू शकते.’’

 

६. सहनशील

ती कपडे शिवत असतांना २ वेळा शिलाईयंत्राची सुई तिच्या नखातून आरपार गेली. तेव्हा तिने त्याविषयी जराही न बोलता बोटाला चिंधी बांधून पुन्हा शिवणकाम चालू केले.

 

७. आई प्रत्येक प्रसंगात परेच्छेने वागत आली आहे.

 

८. परिस्थिती स्वीकारणे

ती रुग्णालयात असतांना तिच्यासाठी दोन्ही वेळचा डबा द्यायला आम्हाला पुष्कळ अडचणी येत होत्या. आम्ही तिला एक वेळचा डबा पाठवत होतो. तेव्हा ती एक वेळ रुग्णालयातीलच जेवण जेवायची. ते तिला आवडत नसे; पण तिने ते स्वीकारले.

 

९. कठीण परिस्थितीला धिराने सामोरे जाणे

९ अ. आईच्या सुनेचे निधन झाल्यावर तिने त्या प्रसंगाला खंबीरपणे
सामोरे जाणे आणि तेव्हापासून तिने पुन्हा एकदा संसाराची सूत्रे हातात घेणे

७ वर्षांपूर्वी एका अपघातात तिच्या सुनेचे (कै. सौ. तनुजा पराग कुलकर्णी यांचे) निधन झाले. तेव्हा तिची नात (मुलाची मुलगी) कु. सानिया पराग कुलकर्णी केवळ १० वर्षांची होती. आई या कठीण प्रसंगाला अत्यंत धिराने सामोरी गेली. तिने पुन्हा एकदा संसाराची सूत्रे हातात घेतली आणि वयाच्या ७३ व्या वर्षापासून ती घर सांभाळत आहे. तिचे त्याविषयी कोणतेच गार्‍हाणे नसते.

९ आ. आईला श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्याने तिला रुग्णालयात भरती केल्यावर जाणवलेली सूत्रे

९ आ १. आईला श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्याने तिला ‘कोविड वॉर्ड’मध्ये भरती करण्यात येणे, एकटी असूनही तिने न घाबरता तेथे रहाणे आणि ‘मी व्यष्टी साधना पूर्ण करत आहे’, असे तिने सांगणे

ऑक्टोबर २०२० मध्ये तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्याने आईला रुग्णालयात भरती केले होते. तेव्हा आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘कोरोनाची चाचणी झाल्याविना त्यांच्यावर पुढील औषधोपचार करता येणार नाहीत.’’ तिला रुग्णालयातील ‘कोविड वॉर्ड’मध्ये भरती केले. तेथे तिला नातेवाईक भेटू शकत नव्हते. तेव्हा तिच्या जवळ भ्रमणभाषही नव्हता. तिच्या सभोवती अत्यवस्थ असलेले रुग्ण होते. अशा स्थितीतही ती घाबरली नाही. ती आम्हाला सांगायची, ‘‘मी व्यष्टी साधना पूर्ण करत आहे.’’

९ आ २. आईच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यावर तिला घरी आणायला कुणीच नसल्याने ती रुग्णवाहिकेतून एकटीच घरी येणे, एका साहाय्यकाने ‘आजी, तुम्ही आता छान आहात’, असे सांगणे आणि तेव्हा ‘परात्पर गुरु डॉक्टरच त्याच्या माध्यमातून बोलत आहेत’, असा तिचा भाव असणे

त्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने तिची कोरोना चाचणी ‘निगेटिव्ह’ (कोरोनाचा संसर्ग झालेला नसणे) आली आणि तिला अतीदक्षता विभागात ठेवले. आई रुग्णालयात असतांना माझ्या भावाला (श्री. पराग कुलकर्णी यांना) कोरोना झाला. त्याला घरातच अलगीकरणात रहावे लागले. आईच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाल्याने तिला रुग्णालयातून घरी जाण्यास अनुमती मिळाली. त्या वेळी (भावाला कोरोना झाल्याने आणि अन्य नातेवाइकांना अडचणी आल्याने) आईला रुग्णालयातून घरी घेऊन यायला कुणीच जाऊ शकत नव्हते. या परिस्थितीतही आई पुष्कळ स्थिर आणि खंबीर होती. ती रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेतून एकटीच घरी आली. तेथील एका साहाय्यकाने आईला सांगितले, ‘‘आजी, काळजी करू नका. तुम्ही आता छान आहात.’’ तेव्हा ‘परात्पर गुरु डॉक्टरच त्याच्या माध्यमातून बोलत आहेत. मला आता कसलीच चिंता नाही’, असा आईचा भाव होता.

९ आ ३. घरी आल्यावर पुष्कळ थकवा असतांनाही आईने अंघोळ करून स्वतःसाठी आणि मुलासाठी कॉफी बनवणे, ती रात्री एकटीच झोपणे आणि ‘परात्पर गुरु डॉक्टर सतत जवळ आहेत’, असे जाणवत असल्याने मला भीती वाटत नाही’, असे तिने सांगणे

आई ६ दिवस रुग्णालयात राहून एकटी घरी आली. तेव्हा घरी माझा भाऊ अलगीकरणात होता आणि घरात अन्य कुणी काही करण्यासारखे नव्हते. तिने रुग्णालयातून आल्यावर अंघोळ केली. तिने स्वतःसाठी आणि भावासाठी कॉफी बनवली. ती रात्री एकटीच झोपली. मी तिला विचारले, ‘‘तुला भीती वाटली नाही का ?’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘परात्पर गुरु डॉक्टर सतत जवळ आहेत’, असे मला जाणवते. मला खरंच भीती वाटत नाही.’’ रुग्णालयातून आल्यावर तिला पुष्कळ थकवा आला होता; पण ती एकटीच त्या परिस्थितीला सामोरी गेली.

 

१०. सेवेची तळमळ

अ. माझी आई गेल्या २५ वर्षांपासून साधनेत आहे. तिने ‘दैनिक ‘सनातन प्रभात’, सात्त्विक उत्पादने आणि सनातन पंचांग यांचे वितरण करणे; ग्रंथप्रदर्शन कक्षावर सेवा करणे, हिंदु राष्ट्र-जागृती सभा आणि गुरुपौर्णिमा महोत्सव यांचा प्रसार करणे, ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे वर्गणीदार बनवणे, भ्रमणभाषवरून जिज्ञासूंना संपर्क करणे, खाऊ बनवून देणे’ इत्यादी सेवा केल्या आहेत.

आ. आई रुग्णालयात असतांना तिला संतांनी ६ घंटे नामजप करायला सांगितला होता. त्याही स्थितीत तिने उत्तरदायी साधकांना विचारले, ‘‘प्रतिदिन मी करत असलेला समष्टीसाठी जप करायचा का ?’’ यातून तिच्यातील ‘सेवेची तळमळ, ध्यास आणि आज्ञापालन’, हे गुण मला शिकायला मिळाले.

 

११. अल्प अहं

ती मला म्हणते, ‘‘मी तुझी आई असले, तरी अध्यात्मात तूच माझी आई आहेस.’’

 

१२. ती उत्तरदायी साधकांना नियमितपणे तिच्या व्यष्टी साधनेचा आढावा देते.

 

१३. आईमध्ये जाणवलेले पालट

अ. तिची त्वचा मऊ होऊ लागली आहे. ती दिवसेंदिवस अधिक सुंदर दिसत आहे. तिच्याकडे पाहून मला आनंद वाटतो.

आ. तिचे मायेतील बोलणे न्यून झाले आहे.

इ. पूर्वी तिला तिच्या मुलाची आणि नातीची चिंता वाटायची. तिला वाटायचे, ‘तिच्यामागे या मुलाचे आणि नातीचे कोण करणार ?’ आता तिने सर्व परात्पर गुरुदेवांवर सोपवले आहे. आता तिचे काळजी करण्याचे प्रमाण उणावले आहे.

ई. मागील ६ – ७ मासांपासून आईची साधनेची तळमळ वाढली आहे. ‘मी आणखी काय प्रयत्न करू ?’, असे ती सतत विचारते.

उ. तिच्याकडून चूक झाल्यास तिला खंत वाटते.

ऊ. तिच्याशी बोलतांना ‘मी आईशी बोलत आहे’, असे वाटत नाही, तर ‘मी एका उन्नत जिवाशी बोलत आहे. तिच्याकडून आनंदाची स्पंदने माझ्याकडे येत आहेत’, असे मला जाणवते.

ए. तिची परात्पर गुरुदेवांवरील श्रद्धा पुष्कळ वाढली आहे. ‘ती सतत भगवंताच्या अनुसंधानात असते आणि तिचा आतून नामजप चालू आहे’, असे मला वाटते.

 

१४. कृतज्ञता आणि प्रार्थना

आईचा संपूर्ण जीवनपट डोळ्यांसमोर आल्यावर मला जाणीव झाली, ‘परात्पर गुरु डॉक्टरांनीच तिला प्रत्येक परिस्थितीत सांभाळले आहे. त्यांनी तिला प्रारब्ध सहन करण्याचे बळ दिले आणि अजूनही तेच तिला अखंड चैतन्य पुरवून अत्यंत स्थिर ठेवत आहेत.’

‘परात्पर गुरुदेवांच्या कृपेने मला ही सर्व सूत्रे लिहिता आली’, यासाठी मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते. ‘आईकडून मला अखंड शिकता येऊ दे. तिच्यातील गुण माझ्यात येण्यासाठी माझ्याकडून प्रयत्न होऊ देत’, अशी मी परात्पर गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना करते.’

– सौ. ज्योती दाते (मोठी मुलगी, ६२ टक्के आध्यात्मिक पातळी), पुणे

 

पू. (श्रीमती) उषा मधुसूदन कुलकर्णी यांच्याविषयी साधिकांना जाणवलेली सूत्रे

सौ. मनीषा पाठक (६८ टक्के आध्यात्मिक पातळी), पुणे

सौ. मनीषा पाठक
१. परिस्थिती स्वीकारणे

अ. ‘सध्या कोरोनाच्या काळात घरातील कामे करण्यासाठी कुणाला बोलावणे शक्य नाही. अशा परिस्थितीत अन्य कुणी साहाय्याला नसतांना श्रीमती उषा कुलकर्णीकाकू दिवसभर घरातील कामे आणि त्यांची व्यष्टी साधना पूर्ण करतात.

आ. एकदा त्या मला म्हणाल्या, ‘‘परिस्थिती स्वीकारायचीच आहे ना, तर ती आनंदाने स्वीकारूया !’’

२. त्यांच्या छायाचित्रातील त्यांच्या हातावर चकाकी आल्याचे दिसत आहे.’
३. ‘काकू संत झाल्या आहेत’, असे मला वाटते.’

 

सौ. राजश्री खोल्लम, पुणे

सौ. राजश्री खोल्लम

१. ‘श्रीमती उषा कुलकर्णीकाकूंची छायाचित्रे पाहिल्यावर मला पुष्कळ आनंद जाणवला.

२. त्यांच्या तोंडवळ्यावर तेज जाणवते.

३. ‘त्या आनंदावस्थेत आहेत’, असे मला जाणवले.’

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment