नवे पारगाव (तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर) येथील पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे (वय ७८ वर्षे) यांच्यात शिस्त आणि प्रेमभाव या गुणांचा अनोखा संगम आहे. या वयातही त्यांची शिकण्याची आणि सेवा करण्याची तळमळ वाखाणण्याजोगी आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धेच्या बळावर त्या त्यांचे यजमान आणि जावई यांच्या निधनाच्या प्रसंगांना धीराने सामोर्या गेल्या. त्यानंतर मनाने खचलेल्या असतांना त्यांनी संतांचे आज्ञापालन करून साधनेचे प्रयत्न वाढवले.
त्यांची मुलगी आणि नातू यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

डॉ. (श्रीमती) शिल्पा नितीन कोठावळे (मुलगी),
नवे पारगाव (तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर)

१. शिस्तप्रिय
‘आई वैद्यकीय क्षेत्रात स्त्रीरोग तज्ञ म्हणून कार्यरत होती. तेव्हापासूनच तिच्यात ‘स्वच्छतेची आवड आणि नीटनेटकेपणा’ हे गुण आहेत. ती साधनेत येण्यापूर्वीही तिचा आदर्श घेऊन अनेक जण तिच्याकडून या गोष्टी शिकले. आजही ते मला ‘तुमच्या आईमुळेच आमच्यावर चांगले संस्कार झाले’, असे सांगतात. ती घरीही सर्व गोष्टी व्यवस्थित ठेवते. साधनेत आल्यापासून ती प्रत्येक कृतीला भावाची जोड देते. ती अजूनही ‘घरी आश्रमाप्रमाणे शिस्त रहावी’, यासाठी प्रयत्न करते.
२. प्रेमभाव
आई कुटुंबीय, नातेवाईक, साधक, महाविद्यालयातील कर्मचारी आणि घरी काम करणार्या मावशी अन् दादा या सर्वांवर प्रेम करते. ती इतरांची विचारपूस करते. ती त्यांना साहाय्य करते आणि त्यांना वेळ देते.
३. शिकण्याची वृत्ती
या वयातही तिची शिकण्याची तळमळ वाखाणण्यासारखी आहे. ती ‘भ्रमणभाषचा वापर करणे, ‘ऑनलाईन बँकिंग’, आपत्कालीन सिद्धता’, यांविषयीची सूत्रे समजून घेण्याचा प्रयत्न करते. ती आपत्काळाच्या सिद्धतेसाठी घरातील धान्यसाठा करणे आणि अन्य वस्तू विकत आणणे, यांसंदर्भातही लक्ष घालते.
४. स्वीकारण्याची वृत्ती
४ अ. आजारपणामुळे आईची शारीरिक क्षमता अल्प झाल्याने तिने सेवांमध्ये झालेले पालट स्वीकारणे
पूर्वी आई मिरज येथील सनातनच्या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करत असे. ती समाजात जाऊन ‘जिज्ञासूंना संपर्क करणे, विज्ञापने आणणे, अर्पण मिळवणे’ इत्यादी सेवा करत असे. काही वर्षांपूर्वी काही आजारांमुळे तिला मिरज येथील एका रुग्णालयात अतीदक्षता विभागात भरती करावे लागले. केवळ गुरुदेवांच्या कृपेने ती त्यातून बरी झाली. तिला घरी, म्हणजे नवे पारगाव (तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर) येथे यावे लागले. तिची शारीरिक क्षमता अल्प झाल्याने तिच्या सेवांमध्ये पालट झाले. तेव्हा ‘घरी रहावे लागणे, सेवेतील पालट, शारीरिक क्षमतेच्या मर्यादा’, हे सर्व तिने हळूहळू स्वीकारले.
४ आ. आईला ऐकायला अल्प येत असूनही तिने निराश न होता सकारात्मक रहाणे
तिला काही वर्षांपासून ऐकायला अल्प येते आणि गेल्या काही मासांमध्ये याची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे तिला इतरांशी बोलायला पुष्कळ अडचणी येतात; परंतु याविषयी निराश न होता ती सकारात्मक राहून हे स्वीकारत आहे.
५. सेवेची तळमळ
आईची शारीरिक क्षमता अल्प असूनही ती ‘भ्रमणभाषवरून अनेक जणांना संपर्क करणे, इतरांना साधना सांगणे, त्यांच्या प्रयत्नांचा आढावा घेणे, ‘व्हॉट्सॲप’वर विविध ‘पोस्ट’ पाठवणे, विज्ञापने आणि अर्पण मिळवणे’, यांसारख्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करते.
६. आज्ञापालन
माझ्या बाबांचे निधन झाल्यानंतर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी आईला सांगितले होते, ‘‘तुम्ही अधिकाधिक ‘ऑनलाईन’ सत्संग ऐका, म्हणजे तुमच्या मनातील विचार न्यून होतील.’’ त्याप्रमाणे तिने प्रयत्न केले.
७. साधिकेचे वडील आणि पती यांच्या निधनाच्या प्रसंगांना तिच्या आईने धीराने सामोरे जाणे
वर्ष २०१९ मध्ये माझे बाबा डॉ. सुधाकर कोरे अकस्मात् रुग्णाईत झाले आणि नंतर एका वर्षात त्यांचे निधन झाले. यानंतर एक वर्ष होण्याच्या आतच, म्हणजे २९.६.२०२१ या दिवशी माझे यजमान डॉ. नितीन कोठावळे यांचे निधन झाले. वर्षभरातील या घटनांमुळे तिला पुष्कळ मानसिक त्रास झाला; परंतु ती केवळ गुरुदेवांच्या कृपेने या प्रसंगांना धीराने सामोरी गेली. ‘सर्वकाही ईश्वरेच्छेने होत आहे’, यावर तिची श्रद्धा आहे.
८. साधिकेच्या वडिलांच्या आजारपणाच्या वेळी मानसिकदृष्ट्या खचल्याने तिच्या आईची प्रकृती खालावणे आणि ‘साधना चांगली करण्यासाठी खंबीर बनायचे आहे’, असे ठरवल्यानंतर प्रकृतीत सुधारणा होऊ लागणे
या कालावधीतील सर्व घटनांमुळे ती मानसिकदृष्ट्या खचली होती. बाबांच्या शेवटच्या आजारपणाच्या वेळी तिचा आहार न्यून होऊन तिची प्रकृतीही खालावली होती. त्यानंतर एक दिवस गुरुदेवांच्याच कृपेने तिने आम्हाला सांगितले, ‘‘आता मी ठरवले आहे की, मला खंबीर व्हायचे आहे. मला साधना आणि सेवा चांगली करण्यासाठी सक्षम बनायचे आहे.’’ तेव्हापासून तिच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली.
९. श्रद्धा
अ. ‘जे घडते, ते चांगल्यासाठीच असते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आपली सर्वांत अधिक काळजी आहे. त्यामुळे संत सांगतात, तसे आपण करूया. देव करवून घेणार आहे’, अशी तिची श्रद्धा आहे.
आ. तिची काही महत्त्वाची व्यावहारिक कामे करायची अजून शेष आहेत; मात्र ‘आपण प्रयत्न करूया. देव पहाणारच आहे’, अशी तिची श्रद्धा आहे.
१०. भाव
अ. ती देवाजवळ दिवा लावतांना किंवा परात्पर गुरु डॉक्टरांना नैवेद्य दाखवतांना भावपूर्ण प्रार्थना करते. ती श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवतांना त्याच्या मुखापर्यंत घास नेते. तेव्हा जणूकाही ‘ती त्याला घास भरवत आहे’, असे वाटते.
आ. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्याप्रती तिच्या मनात पुष्कळ भाव आहे. त्यांचा काही निरोप आला किंवा त्यांचा आवाज ऐकला, तरी तिची भावजागृती होते. काही वेळा तिला सद्गुरु स्वातीताईंची पुष्कळ आठवण येते आणि नेमका त्या वेळीच तिला सद्गुरु स्वातीताईंचा निरोप येतो.
११. आईमध्ये जाणवलेले पालट
अ. मागील ३ – ४ मासांपासून आईच्या तोंडवळ्यावर अधिक तेज जाणवत आहे. तिचा तोंडवळा आनंदी दिसत आहे.
आ. आधी तिचा स्वभाव कडक होता. आता तिच्यातील प्रेमभाव वाढला आहे. तिला ‘इतरांनी आपले ऐकायला पाहिजे’, असे वाटण्याचे प्रमाण न्यून झाले आहे.
इ. घरी गंभीर परिस्थिती असतांनाही ‘ती स्थिर आणि अंतर्मुख आहे’, असे जाणवते.
ई. आता ती शांत झाल्याचे जाणवते. बाहेर काहीही घडत असेल, तरी ‘ती अनुसंधानात आहे’, असे जाणवते.
प.पू. गुरुदेवांनीच आम्हाला आईच्या समवेत रहाण्याची संधी दिली. देवच तिच्या माध्यमातून आम्हाला वेळोवेळी योग्य दिशा दाखवत आहे. ‘तिचे गुण माझ्यातही येऊ देत’, अशी मी गुरुचरणी प्रार्थना करते. गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
डॉ. कौशल कोठावळे (नातू, मुलीचा मुलगा),
नवे पारगाव (तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर)

१. स्वावलंबी
‘आजी पूर्वीपासून कुणावरच अवलंबून राहिली नाही. आता एवढे वय होऊनही आणि तिला साहाय्य करायला सर्व जण असूनही तिची सर्व कामे ती स्वतःच करते.
२. काटकसरी
ती प्रत्येक वस्तू काटकसरीने वापरते. ‘अन्नाचा एक कणही वाया जाऊ नये’, यासाठी ती आम्हाला अन्नाचे पातेले आणि त्यातील चमचा हाताने व्यवस्थित पुसून घ्यायला सांगते अन् स्वतःही तसे करते. रात्रीचे जेवण शेष असेल, तर ती ते सकाळी गरम करून घेते.
३. तिला जेवणाविषयी किंवा अन्य
कुठल्याही वस्तूंविषयी कसलीच आवड-नावड नाही.
४. ‘स्वतःमुळे इतरांचा वेळ वाया जाऊ नये’, यासाठी तिचे प्रयत्न असतात.
५. व्यष्टी साधनेचे गांभीर्य
आजी नियमितपणे व्यष्टी साधना पूर्ण करते. तिला जेवण झाल्यावर लगेच झोप येते; म्हणून ती तिची व्यष्टी साधना पूर्ण केल्याविना जेवत नाही.
६. ‘इतरांनी साधना करावी’, याची तळमळ
तिला ‘सगळ्यांनी साधना करावी’, असे वाटते. ती घरातील सर्वांना साधनेविषयी सांगते. ती घरात काम करणार्या मावशी आणि दादा यांना ‘जप करा’, असे सांगते अन् त्यांचा पाठपुरावा घेते.
७. सेवेची तळमळ
ती इतरांकडून धर्मकार्यासाठी अर्पण घेण्याची सेवा करते. घरी काम करणार्या व्यक्तींनाही ती अर्पणाचे महत्त्व सांगून त्यांच्याकडूनही अर्पण घेते. ती तिच्या ओळखीच्या काही श्रीमंत लोकांनाही आवर्जून भ्रमणभाष करून त्यांच्याकडून अर्पण घेते.
८. नातवाला साधनेत साहाय्य करणे
माझे व्यष्टी साधनेचे प्रयत्न न्यून झाल्यास तिला ते लगेच कळते. तेव्हा ती मला त्याविषयी विचारते आणि ‘मी काय करायला पाहिजे ?’, हेही सांगते.
९. आजीमध्ये जाणवलेले पालट
अ. तिच्या तोंडवळ्यावर एक पिवळसर छटा दिसते.
आ. तिचे केस सोनेरी झालेले दिसतात.
१०. आजीच्या सहवासात असतांना आलेल्या अनुभूती
अ. मला आजीसमवेत असतांना हलकेपणा जाणवतो आणि ‘तिच्या जवळच रहावे’, असे वाटते.
आ. ‘तिच्याशी बोलल्यावर चांगले वाटते’, असे माझ्या काही मित्रांनीही मला अनेक वेळा सांगितले आहे.
‘मी आजीमुळेच सेवा आणि साधना करत आहे. तिचे योग्य वेळी मिळणारे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन आईला अन् मला सतत साधनारत ठेवते’, यासाठी प.पू. गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |