पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी साधनेविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

पू. (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज

 

१. पुण्य का साठवावे ?

१ अ. ‘हे शरीर इथेच सोडून जायचे आहे’, हे लक्षात ठेवून मनुष्याने दानधर्म करून पुण्य साठवावे !

पुराणांत सांगितले आहे की, मनुष्यजन्म मिळणे कठीण आहे. तो मिळाला आहे, तर भक्ती करून आणि पुण्य साठवून हा देह मिळाल्याचे सोने करावे. सत्याच्या मार्गाने चालावे, धर्माप्रमाणे वागावे आणि परोपकार करावा. भूदान, गोदान, वस्त्रदान, अन्नदान, श्रमदान आणि ज्ञानदान असे दानाचे प्रकार आहेत. माणूस जन्माला आल्यावर त्याला ऋषिऋण, पितृऋण, देवऋण आणि समाजऋण अशी ४ ऋणे फेडावी लागतात. देव, देश आणि धर्म सांभाळा. ‘जन्माच्या आधी जिकडे होतो, तिकडे एक दिवस हे शरीर या भूमीवर टाकून जावे लागणार आहे’, हे लक्षात असूदे. ‘एक दिवस शरीर खाली भूमीवर पडेल’, याची आठवण दिवसातून ३ वेळा माणसाला असली पाहिजे.’

१ आ. परमार्थाचा लाभ मृत्यूनंतर मिळणे

‘प्रपंच केला, तरी मनस्ताप आहे आणि परमार्थ केला, तर मनस्ताप अधिक आहे; परंतु परमार्थ केल्याचे फळ मेल्यावर मिळते. जीव चांगल्या मार्गाला, देवांना भेटायला जातो आणि मुक्त होतो. जन्म-मृत्यूचे ८४ लक्ष फेरे चुकवतो.’

 

२. आयुष्यात केवळ परमार्थासाठी वेळ द्यावा !

‘जन्माला आल्यापासून जो वेळ परमार्थ करण्यात खर्च होतो, तो चांगला वेळ आहे. प्रपंचात फालतू गप्पा मारण्यात वेळ जातो. ‘आपले आयुष्य माणसाने फुकट घालवू नये’, असे मला वाटते. आयुष्यात नामस्मरण, ध्यान आणि पूजा या शुभकार्यासाठी वेळ द्यावा, म्हणजे पुण्य जमा होईल.’

 

३. साधनेत सातत्य हवे !

‘तुम्ही केवळ एक मास देव आणि ११ मास राक्षस रहाता. मला तसे वागून चालेल का ?’

 

४. नियमित साधना केल्याने होणारे परिणाम

४ अ. भक्ती, ज्ञान, वैराग्य धारण केल्यासच ईश्वरी शक्ती आणि आनंद मिळू शकणे

‘न दिसणारे दिसावे’, असे ज्याला वाटत आहे, त्याने भक्ती, ज्ञान, वैराग्य धारण करावे, तरच त्याला ईश्वराची शक्ती प्राप्त होईल. बहुसंख्य लोक देवासाठी विषयसुख सोडायला सिद्ध नाहीत. मग परमेश्वर आणि परमेश्वराचे ज्ञान कुठून मिळणार ? उद्यापासून ‘एका देवाविना माझे कुणी नाही’, असे प्रतिदिन सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी म्हणत जा. बघ, सुख तुझ्या शरिरात पाणी भरील. हे अव्यक्त, कुणाला न दिसणारे सुख (आनंद) मी अनुभवत आहे. खोटे, म्हणजेच मायेतील सुख मी फेकून दिले आहे आणि शाश्वत, मोठे सुख घेतले आहे. आता जिकडे तिकडे मला आनंद दिसत आहे.’

४ आ. शरिरातील विषयांचा कचरा प्रतिदिन काढला,
तर शरीर प्रतिदिन प्रफुल्लित आणि आनंदी रहाणार असणे

‘घरातील केर प्रतिदिन काढता, मग शरिररूपी घरातील केर का काढत नाही ? शरिरातील विषयांचा कचराही प्रतिदिन काढलात, तर प्रतिदिन शरीर प्रफुल्लित आणि आनंदी राहील. देवांच्या चांगल्या कथा ऐकल्याने देह आपोआप स्वच्छ होईल. ‘वेळ नाही’, म्हणू नका. सतत पूजा, ध्यान आणि नामस्मरण करा. त्यामुळे देह स्वच्छ आणि निर्मळ होईल. ‘देवाचे नाम’ हाच साबण आहे.’

४ इ. साधना करणार्‍याला मनुष्याची स्थिती समजणे

‘अध्यात्माचा अभ्यास केला आणि प्रत्येक माणसाच्या हावभावांचे बारीक निरीक्षण केले, तर ‘तो मनुष्य कसा आहे ?’, हे समजते. कामवासनेने भरलेले डोळे, मद्याने लाल झालेले डोळे, दुःखी, पीडित आणि रोगी व्यक्ती लक्षात येते. गरिबी आणि श्रीमंती तोंडवळ्यावरील हावभावांवरून समजते. चोरांची दृष्टी पहाताच ‘तो काय करणार ?’, हे समजते. कपटी, आगलाव्या, लबाड आणि बुडव्या समजतो. नम्र आणि गर्विष्ठ माणूसही समजतो. त्या समवेत भक्तीने भरलेला जीवही लक्षात येतो.’

– पूज्य (ह.भ.प.) सखाराम रामजी बांद्रे (वय ७० वर्षे), कातळवाडी, ता. चिपळूण, जिल्हा रत्नागिरी.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment