भावविभोर करणारी ‘बालकभावा’ची विविध चित्रे पाहून वाचकांचा श्रीकृष्णाप्रती भाव जागृत झाला असेल ! प्रस्तूत लेखातून आपण सनातनच्या गोपी साधिका आणि अन्य साधकांना ही चित्रे पाहून काय जाणवले, कोणत्या अनुभूती आल्या हे पहाणार आहोत.
१. गोपी
१ अ. सौ. उमा रविचंद्रन् यांची बालकभावातील चित्रे पहातांना श्रीकृष्णाने चित्रमय भावविश्वात नेणे
‘सौ. उमा रविचंद्रन् यांनी काढलेली बालकभावातील चित्रे १२.९.२०१२ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये पाहिली. ती चित्रे पहातांना मन आनंदाने भरून गेले आणि श्रीकृष्ण या जिवालाही त्या बालकभावाच्या विश्वात घेऊन गेला. श्रीकृष्ण मला त्या प्रत्येक चित्रात नेऊन त्या चित्रातील भाव अनुभवायला देत होता. सौ. उमा रविचंद्रन् यांची बालकभावाच्या संदर्भातील चित्रे आणि त्यांतील भाव पाहून असे वाटले, ‘लहानपणापासून देवानेच आपल्याला असे सांभाळले आणि आनंद दिला आहे. तो आनंद सर्वांना परत मिळावा, देव समवेत असल्याची जाणीव व्हावी; म्हणून सौ. उमाक्कांचा कृष्णाप्रती असलेला भाव श्रीकृष्णानेच प्रकट केला.’
– गोपी तृप्ती गावडे आणि गोपी वृषाली कुंभार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.९.२०१२)
१ आ. कर्ता-करविता श्रीकृष्णच (प.पू. डॉक्टरच)
असल्याची जाणीव वाढवून कृष्णलीलेचा आनंद घेणे आवश्यक !
`सौ. उमाक्कांच्या सर्व चित्रांमधून असे लक्षात येते की, आपण काहीच करत नाही. सगळे काही देवच करतो, आतापर्यंत सर्व त्यानेच केले अन् तो करतही आहे. श्रीकृष्ण आपली माता-पिता आहे. आपल्याला काय पाहिजे, काय नको, आपली साधना कशी होणार, कोण कुठल्या मार्गाने पुढे जाणार, हे आपल्यापेक्षा गुरूंनाच अधिक ठाऊक असते. त्यांना शरण जाऊन तळमळीने प्रार्थना करून देव जी लीला घडवतो, त्यातला आनंद घ्यायला हवा. आपली जर तळमळ असेल, तर देव आपल्याला नक्कीच साहाय्य करतो. तळमळ वाढवण्यासाठीही देवालाच शरण जावे लागते.’
– गोपी तृप्ती गावडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.९.२०१२)
१ इ. ‘सौ. उमाक्कांचा उत्कट बालकभाव त्यांच्या
अंतरातून ओसंडून चित्ररूपात येऊन वहात आहे’, असे जाणवणे
‘सौ. उमाक्का यांनी काढलेली चित्रे पाहून `त्यांचा उत्कट बालकभाव अंतरातून ओसंडून चित्ररूपात येऊन वहात आहे आणि श्रीकृष्णानेच समष्टीला बालकभाव शिकवण्यासाठी त्यांच्या माध्यमातून भावरूपी चित्रे रेखाटली आहेत’, असे वाटले. त्यांच्या भावामुळे आनंददायी परमात्म्याची लीला अनुभवता आली. सौ. उमाक्कांच्या अंतरंगाने श्रीकृष्णाच्या भक्तीरसातला आनंद घेतल्याने तोच भाव आणि आनंद त्यांनी रेखाटलेल्या चित्रांतही आला आहे.’
– गोपी दीपाली मतकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१ ई. ताण आणि निराशा यांमधून बाहेर काढून प्रत्येक क्षणाला कृष्णानंद देणारी चित्रे !
`दिवसभरातील प्रत्येक कृती करतांना सौ. उमाक्का लहान बालिका होऊन श्रीकृष्णाच्या अनुसंधानात रहातात आणि श्रीकृष्णच येऊन त्यांची प्रत्येक कृती करत असतो. वैयक्तिक कृतींसमवेतच समष्टीमध्ये सेवा करतांनाही त्या प्रत्येक क्षणाला कृष्णाचा आनंद घेतात. कधी कोणाला ताण आणि निराशा आली, तर ही चित्रे पाहून त्यांना त्या स्थितीतून बाहेर पडून आनंदी व्हायला साहाय्य होईल.’ – गोपी वृषाली कुंभार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.९.२०१२)
१ उ. साधिकांनी चित्रातील बालिकेच्या ठिकाणी स्वतःला अनुभवणे
१ उ १. सौ. उमाक्कांमधील समष्टी भावामुळेच प्रत्येक जण श्रीकृष्णभाव अनुभवू शकणे आणि प्रत्येकाला ‘मीच ती बालगोपी आहे’, हा आनंद घेता येणे
`सौ. उमा रविचंद्रन् यांच्या निर्मळ भावामुळेच सगळ्यांना ‘ती सुंदर भावरूपी बालगोपी मीच आहे’, असे वाटत आहे. सौ. उमाक्कांच्या बालकभावामुळे ‘परमेश्वररूपी पिता श्रीकृष्ण मजसाठीही असेच करत आहे’, याची जाणीव होऊन सर्व जण तोच भाव आणि आनंद अनुभवत आहेत.
त्यांच्या हृदयातील उत्कट बालकभावरूपी लाटा समष्टीस भक्तीरसातील मधुर कृष्णानंद देण्यास आल्यामुळे आत्मानुभूतीरूपी चित्रांमुळे ती भावरूपी लडीवाळ बालगोपी आणि जगत् पिता श्रीकृष्ण यांची लीला प्रत्येकाला सौ. उमाक्कांच्या भावामुळे अनुभवण्यास मिळाली. `बालकभावामुळे त्या बालकासम हलक्या झाल्या आहेत. त्यांच्या देहाला काही जडत्वच नाही’, असे वाटते. आनंद आणि भाव यांमुळे त्यांच्या अंतरंगाप्रमाणे त्यांचा देहही कृष्णभक्तीच्या आनंदात तरंगत आहे. त्या तरंगांमुळे मलाही आनंद मिळत होता.’ – गोपी दीपाली मतकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१ उ २. चित्रांमध्ये स्वतःला अनुभवून चित्राद्वारे आनंद लुटणे
`भाव असलेल्या प्रत्येक साधकाने ‘त्या चित्रांमध्ये स्वतःच त्या बालिकेच्या ठिकाणी आहोत’, असे अनुभवले आणि तो आनंद घेतला. आपला जर भाव असेल, तर देव आपल्याला कसे सांभाळतो, आनंद देतो आणि साहाय्य करतो, हे प्रत्यक्ष अनुभवता आले.’ – गोपी तृप्ती गावडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.९.२०१२)
१ ऊ. सौ. उमाक्का यांनी काढलेली चित्रे पाहून गोपी दिपाली मतकर हीला सुचलेले काव्य
लीला करूनी सारी, राहशी तू नामानिराळा रे भगवंता !
हे प्रभु, रचितोस तू लीला अपार आनंदमयी ।
श्रीकृष्णभक्ती शिकवण्या घडवीशी लीला आनंददायी ।। १ ।।
श्रीकृष्णलोकातील भावमय, भक्तीमय अन् आनंदी लीलांचे ।
बालगोपी उमाक्काच्या भक्तीने झाले दर्शन श्रीकृष्णप्रीतीचे ।। २ ।।
उमाक्काच्या भक्तीमुळे धावत रे तू आला ।
लीला करूनी सारी अशी राहशी नामानिराळा ।। ३ ।।
उमाक्काच्या भक्तीप्रेमासाठी खेळ थांबवूनी लंपडावाचा ।
धावत आलास रे कृष्णा, लडीवाळ हट्ट पुरवण्या बालकाचा ।। ४ ।।
उमाक्कांच्या बालकभावातील कृष्णचित्रांनी व्यापिले दैनिक ।
बालगोपी गोजिरी सुंदर अन् पिता असे हा ब्रह्मांडपालक ।। ५ ।।
अज्ञानीच की रे आम्ही तुझी बालके हे श्रीकृष्णा ।
अजाण आम्ही खट्याळ आनंदमय लीला तुझी समजण्या ।। ६ ।।
उमाक्कांच्या रूपातूनी बालकभावातूनी तूच दर्शवलेस ।
श्रीकृष्ण भेटेल बालकासम निर्मळ भक्ती केल्यास ।। ७ ।।
भक्तप्रेमापायी भगवंतही भक्ताचाच भक्त होत असे ।
बालकभावरूपी मधुर चित्रांतूनी जिवास हे शिकवत असे ।। ८ ।।
रे परब्रह्मा, तूच सारे करत आहेस तुझ्या निर्गुण रूपातूनी ।
दर्शवलेस तू उमाक्कांच्या चित्ररूपी बालकभावातूनी ।। ९ ।।
हे श्रीकृष्णा, तूच गुंफलेस हे शब्दरूपी पुष्प ।
तूच करूनी घे तुज चरणी हे आता अर्पण ।। १० ।।
– गोपी दीपाली मतकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.९.२०१२)
२. सनातनच्या साधकांना आलेल्या अनुभूती, तसेच
त्या चित्रांतून त्यांना उमाक्का यांची जाणवलेली आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये
२ अ. चित्रांतील श्रीकृष्णाला पाहिल्यावर तो सुंदर अन्
मोहक वाटणे आणि ३ दिवसांपर्यंत मनःपटलावर दृश्य दिसून भावजागृती होणे
‘साधिकेने काढलेल्या चित्रांपैकी `श्रीकृष्ण बालकभावाचे चित्र काढतांना आणि श्रीकृष्ण मुलाखतीचे सत्र पहातांना’ या दोन चित्रांतील श्रीकृष्णाला पाहिल्यावर मला तो फारच सुंदर आणि मोहक वाटला. ती चित्रे पाहिल्यानंतर ३ दिवसांपर्यंत माझ्या मनःपटलावर त्या श्रीकृष्णाचे मुख दिसत होते आणि माझी भावजागृती होत होती. भावजागृतीची ही अनुभूती मी प्रथमच आणि एवढ्या कालावधीपर्यंत अनुभवत होते.
२ आ. सौ. उमाक्कांच्या चित्रांशी संबंधित लिखाणाचे भाषांतर
करतांना भावजागृती होणे आणि ते कितीही वेळा वाचले, तरी समाधान न होणे
सौ. उमाक्कांच्या चित्रांशी संबंधित लिखाणाचे इंग्रजीतून मराठीत भाषांतर करतांना ‘त्यात उमाक्कांना जे सांगायचे आहे, ते जसेच्या तसे व्यक्त होऊ दे’, अशी प्रार्थना पुनःपुन्हा होत होती. उमाक्कांच्या धारिकांचे भाषांतर करत असतांना नेहमीच भावजागृती होते. ते लिखाण कितीही वेळा वाचले, तरी समाधानच होत नव्हते.’ – सौ. विजयलक्ष्मी आमाती, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
२ इ. सौ. उमाक्कांची चित्रे पाहिल्यावर अडीच वर्षांच्या पूर्तीने ‘चित्रांतील
मुलगी मीच असून कृष्णाने मला चैतन्य दिले’, असे सांगून श्री गणपतीचा नामजप करणे
‘सौ. उमाक्का यांनी रेखाटलेली श्रीकृष्णाची चित्रे कु. पूर्ती (माझी भाची) हिने पाहिल्यावर ती (तिच्या) आईला म्हणाली, ‘‘चित्रांतील ती मुलगी मीच आहे. मी त्याच्याकडे (कृष्णाकडे) चैतन्य मागितले आणि त्याने मला ते दिले. आता मी त्याच्याकडे जाते.’’ नंतर ती देवघरापाशी गेली आणि तिने देवासमोर बसून श्री गणपतीचा नामजप केला. यावरून ‘सौ. उमाक्का यांची चित्रे अडीच वर्षांच्या मुलीलाही अंतर्मुख करणारी आहेत’, हे लक्षात आले.’ – कु. प्रियांका लोटलीकर, सनातन आश्रम, गोवा. (१४.९.२०१२)
२ ई. भाव आणि आनंद हे शब्दांच्या पलीकडेच असतात,
याचा पुरावा देणारी सौ. उमा रविचंद्रन् यांनी साकारलेली चित्रे !
‘सौ. उमा रविचंद्रन् यांनी साकारलेली बालकभावातील चित्रे शब्दांपलीकडील आनंद देत होती. ती सर्व चित्रे अंतर्मनातून माझ्याशी संवादही साधू लागली. या वेळी श्रीकृष्ण (श्रीकृष्णाने साधिकेला उंच उचलल्याचे चित्र दाखवून) म्हणाला, मी माझ्या (सनातनच्या) सर्व भक्तांना अध्यात्मातील सर्वोच्च पातळीवर घेऊन जाणारच आहे. साधकांच्या रक्षणासाठी पांचजन्य केव्हाच कार्यरत झालेला आहे. आता पुढील काळात सुदर्शन-चक्रही वेग घेणार आहे. प.पू. डॉक्टरांनी धर्मसंस्थापनार्थ चालू केलेली माझी भक्ती आता समष्टीतून परमोच्च अवस्था गाठण्यासाठीचा प्रयत्नही प्रारंभ झालेला आहे. पांचजन्य शंख संतुष्ट झालेला असून त्यानेच या सर्व चित्रांतील आनंदाच्या लहरी ब्रह्मांडात पोहोचवल्या आहेत. या सर्व चित्रांमधून माझी भक्ती आपोआपच वाढीस लागण्याचे माझेच हे प्रयोजन आहे. सौ. उमा यांची आंतरिक कृष्णभक्ती मला प्रसन्न करणारी असल्याने मीच त्यांना अशी चित्रे काढण्याची आतून प्रेरणा देत असतो. या वेळी श्रीकृष्ण हसत होता.’ – श्री. श्रीकांत भट, अकोला